Tuesday, 28 December 2021

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७५

                                                   पार्किन्सन्सविषयक गप्पा -  ७५

                 गप्पा ७४ मधी चौघी बहिणींची कथा वाचून अनेक प्रतिक्रिया आल्या.काहींनी अशीच उदाहरणे आमच्याही अनुभवास आली असे सांगितले.यातली मयुर श्रोत्रीय यांची प्रतिक्रिया जशीच्या तशी द्यावी असे वाटले.त्यांच्या सर्वच प्रतिक्रिया सविस्तर,वेगळा विचार देणाऱ्या असतात..वडिलांना पार्किन्सन्स होता.ते असताना पार्किन्सन्स मित्रमंडळाची त्याना माहिती नव्हती.आत्याला पार्किन्सन्स झाला.त्या अतिशय  सकारात्मक.विचार करणाऱ्या,मानसशास्त्राच्या शिक्षिका,चांगल्या वाचक.आहेत.पण आता त्यांचा पार्किन्सनन्स वाढला आहे.मयूरच्या वाचनात 'मित्रा पार्किन्सना'  हे माझे इ प्रतीष्ठान तर्फे प्रकाशित झालेले इ पुस्तक आले. ते थेट आमच्या घरी आले.ग्रुपमध्ये सामील झाले परिवारातले महत्वाचे सदस्य बनले.whats app group  सुरु केला तेंव्हा मला तांत्रिक ज्ञान काहीच नव्हते.मयुरना मी विनंती केली आणि ते admin झाले. मला त्यांचा खूपच आधार वाटला.अतिशय संयतपणे ते ग्रुप सदस्याना हाताळतात.आत्या नगरला आणि हे पुण्याला पण त्यांचे आत्याकडे लक्ष असते.अविवाहित आत्याची काळजी त्यांची वयस्क आई घेत असते.संवेदनाशील मयूर यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे.ते लिहितात,  

  • "बरोबर आहे शुभंकराची अशी परीस्थिती असू शकते.बऱ्याच वेळा यात शुभार्थीला सहन करावे लागते. मानसिक खच्चीकरण होते आणि शुभार्थी उपचारांना साथ देत नाही.
     एक दुसरीही बाजू सांगतो,
    माझी आत्या पार्किन्सन्स ची शुभार्थी. तिला आता अजिबात बोलता येत नाही. कोणाच्या आधाराशिवाय चालता येत नाही. 16 तास  2 नर्स आहेत. 8 तास घरातील माणसे काळजी घेतात.
    जेव्हा घरी जातो तेव्हा तिच्याशी नॉर्मल विषयांवर गप्पा मारतो. तब्येत वगैरे चौकशी करत नाही. एखादे पुस्तक वाचलेस का?( ती आता वाचत नाही हे माहिती असले तरीही).
    एखाद्या बातमीबद्दल चर्चा करतो. माझ्या ऑफिस विषयी, मुलीच्या शिक्षणाविषयी ,एखाद्या नवीन खाद्यपदार्थाविषयी, हॉटेल विषयी.. घरात नेहेमी बोलतो तश्या गप्पा मारतो. conscious inclusion.
    आपण आजही relevant आहोत ही भावना मोठी असते.

                        परंतु ज्या माणसांना आपण नेहेमीच ताकदीने उभे राहतात पाहिले आहे त्यांना अश्या अवस्थेत पाहताना दुःख होते. 
    शुभंकर म्हणून शुभार्थींचे आयुष्य प्रत्येक स्थितीत सुंदर करणे हे आपले कर्तव्य आहे .
    तसेच शुभार्थींने कोणताही न्यूनगंड न ठेवता, कोणतेही दडपण न ठेवता बिनधास्त जगावे. कोणीही कोणावर ओझे नाही आणि कोणीही कोणावर उपकार करत नाही. आज या वयात येताना आपणही अनेक त्याग केले आहेत आणि मुलांवर देखील अनेक उपकारच केले आहेत . कोणी आपली काळजी घेते तर आपल्यावर उपकार नाही तर आपल्या उपकारांची परतफेड करत आहेत हे लक्षात ठेवावे. बिनधास्त जगावे".याशिवाय त्यांनी मला त्या मुलींचा फोन द्या मी बोलून बघतो असेही त्यांनी मला सुचविले.
                      त्यांनी सांगितलेली दुसरी बाजुच माझ्या अनुभवाला अधिक आली. चौघी बहिणींसारखे उदाहरण अपवादात्मकच असते.कणभर आधार दिला तर मणभर आनंद देणारे जास्त आढळतात.अशा शुभंकर, शुभार्थी मुळे कामातील उत्साह वाढतो.
                       बऱ्याच वेळा पती किंवा पत्नी हे शुभंकर असतात.काही वेळा सह्चर हयात नसेल,अविवाहित व्यक्ती असेल तर अशा शुभार्थींची तरुण मुले,सुना,जावई उत्तम शुभंकर बनतात.,अविवाहित व्यक्ती असेल तर भाऊ,बहिण शुभंकर बनताना दिसतात.
                      पुढील गप्पात अशी  उदाहरणे सांगणार आहे.
     
                             
                      

No comments:

Post a Comment