Tuesday, 23 November 2021

२००९ च्या पार्किन्सन दिन मेळाव्यातील मनोगत


                                           २००९ च्या पार्किन्सन दिन मेळाव्यातील मनोगत   -  गोपाळ तीर्थळी

                                  

                                      उपस्थित निमंत्रित, मान्यवर आणि बंधू भगिनीनो

             


  मी गोपाळ तीर्थळी गेली दहा वर्षे माझ्या पार्किन्सन मित्राबरोबर राहत आहे.त्यात गेली अडीच ते तीन वर्षापूर्वी मला एखादा परीस सापडावा तसे श्री शेंडे आणि श्री पटवर्धन सापडले.

                त्यांच्र्बरोबर बोलून आणि त्यांनी गोळा केलेल्या पार्किन्सन डिसीज ( PD ) बद्दल माहिती,पुस्तके,सी,डी.या सार्याने माझा पार्किन्सन कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.आयुष्यात खूप काही केले पण स्वत:चा स्वत:वर विश्वास ठेवून आपण आपले आयुष्य खूप चांगल्या तर्हेने कसे जगायचे हा मंत्र मिळाला.

                    हा माझा फायदा इतराना व्हावा म्हणून मी पार्किन्सन मित्रमंडळाचा सदस्य होऊन इतर पीडी मित्राशी घरोघरी जावून गप्पा मारल्यावर  त्यांच्या चेहऱ्यावर पडलेला फरक आणि त्याना मिळालेला विश्वास,आनंद खूप काही देवून जातो.मला पार्किन्सननी खूप काही दिले.मित्र दिले,योगासने शिकवली.प्राणायाम,आयुर्वेदातील पंचकर्म,डान्स थेरपी,स्पीच थेरपी,ओंकार चैतन्य हास्यक्लब सारखा परिवार की जो तुमचे स्वास्थ्य उत्तम राखतो.

                         हे सगळे पहिले की वाटते जीवनात आनंद लुटायचा असेल तर तुम्ही दुसर्याला आनंदी कसे करता येईल हे पहा.म्हणजे ते पाहताना मिळणारा आनंद दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने तसा मिळणार नाही.म्हणू ते करताना हुरूप येतो,तो उत्तरोत्तर वाढत जातो.जावो ही इच्छा आहे.हे करण्यासाठी    

                          It is not to be taught

                          It is to be experience. 

 

Friday, 19 November 2021

क्षण भारावलेले - १९

                                         क्षण भारावलेले - १९

                                  गेली दीड पावणेदोन वर्षे करोनाने घातलेल्या थैमानामुळे प्रत्यक्ष भेटी केंव्हा सुरु होतील? होतील की नाही? झाल्या तरी त्यावेळी आपण असू की नाही.असे अनेक प्रश्न पडत होते.हळूहळू करोनाचे रौद्र रूप सौम्य होत आहे. आणि प्रत्यक्ष भेटीगाठी सुरु झाल्या आहेत.फोनवर ऑनलाईन कितीही भेटी झाल्या तरी प्रत्यक्ष भेटीचा आनंद वेगळाच.ज्यांच्या भेटीची ओढ आहे पण भेटीची शक्यता कमी अशा अनपेक्षित भेटी झाल्या तर परमानंदाच. १४ नोव्हेंबरचा रविवार असाच परमानंद आणि भारवलेले क्षण देऊन गेला.  

                         डॉ.क्षमाताई वळसंगकर यांचा आम्ही येऊ का असा फोन आला.त्या व डॉ.सतीश वळसंगकर एका कौटुंबिक कार्यासाठी पुण्याला आले होते त्यांचे पुण्यात अनेक नातेवायिक, स्नेही आहेत.त्यात आमच्याकडे येण्यासाठी त्या वेळ काढत होत्या याचेच मला प्रथम अप्रूप वाटले होते.ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता दोघे आले.आल्या आल्या आम्ही फक्त गप्पा मारायला आलो आहे काही करू नका असे त्यांनी जाहीर केले. बेळगावी करदंट.आणि फराळ देत होते, काही तरी घ्याच असा आग्रह करत होते.तर त्या म्हणाल्या तुम्हाला असे वाटते तर थोडे बांधून द्या.आता औपचारिकपणा केंव्हाच गळून गेला होता.अनेक वर्षांची ओळख असल्यासारखे वाटत होते.पार्किन्सन ग्रुपमधील कोणीही भेटले की असेच होते.

                          या दोघांच्याबद्दल मी यापूर्वी लिहिले आहे मंडळाच्या ऑनलाईन  मासिक सभेतही या दोघानी हजेरी लावली आहे.तरी प्रत्यक्ष पाहताना अनेक गोष्टी नव्याने उमगत होत्या.त्या संथ वाहणाऱ्या नदीसारख्या,तर ते कोसळणाऱ्या धबधब्यासारखे.तरीही .वैयक्तिक जीवनात,कौटुंबिक जीवनात,व्यावसायिक जीवनात ते एकमेकास किती अनुरूप आहेत हे गप्पातून सतत जाणवत होते.

                         डॉक्टर सतीश यांच्यावर कंप आणि कमी झालेले वजन वगळता पार्किन्सन्सच्या कोणत्याच खुणा दिसत नव्हत्या.रीजीडीटी नाही.पार्किन्सन्सच्या वाढीची गतीही स्लो आहे.याचे श्रेय जेवढे त्याच्या सकारात्मकतेला, नवनवीन शिकत राहण्याच्या वृत्तीला,'जेजे आपणास ठावे ते ते इतरास शिकवावे शहाणे करून सोडावे सकळजन' या वृत्तीने विविध विषयावर निरपेक्षपणे  शिकवत राहण्याच्या तळमळीला,झोकून देवून काम करण्याच्या वृत्तीला आहे तसेच या वादळाचा पार्किन्सन्स समजून घेऊन अबोलपणे त्याला हाताळणाऱ्या क्षमा ताईनाही आहे.डॉक्टरना आपल्या गोळ्यांची वेळ झाली आहे ही आठवणही नव्हती.क्षमाताई मात्र आपला दुखरा पाय, रंगलेल्या गप्पा यातही ही आठवण ठेऊन होत्या.ते घरी असले की हे करता येते.पण बाहेर जाताना गोळ्या बरोबर दिल्या असल्या तरी ते विसरतील ही हमी असते मग ड्रायव्हरला सांगून ठेवावे लागते.अशी लटकी तक्रार क्षमाताई करत होत्या. आणि आपण तिचे पहिले मुल आहे हे डॉक्टर कौतुकाने सांगत होते.आणि निरागस लहान मुलाप्रमाणेच वलय विसरून त्यांच्या गप्पा चालल्या होत्या.

                            सोलापूरसारख्या छोट्या शहरात कमी साधन सामग्रीत कॉम्प्लिकेटेड केसेस यशस्वीपणे हाताळणारे पोटाच्या विकाराचे तज्ज्ञ सर्जन, सोलापूरच्या सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध संस्थाचे अधिकारपद भूषविणारी असामी अशा कोणत्याच झुली घेऊन ते वावरत नव्हते.क्षमाताईही एक उत्तम,अनुभवी,गोल्डमेडल मिळवणाऱ्या अनेस्थेशियालॉजिस्टस, 'इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेशियालॉजिस्टस,सोलापूर' शाखेचे अध्यक्षपद भूषविलेल्या,.राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील भूलात्ज्ज्ञांच्या परिषदेत अभीभाषणे केलल्या.शास्त्रीय निबंध आणि शोध निबंधासाठी प्रथम पारितोषिके मिळवणाऱ्या, एक उत्तम कवयित्री हे सर्व विसरून साधेपणाने वावरत होत्या. त्यामुळे मनमोकळ्या गप्पा झाल्या.

          डॉक्टर सतीश यांच्याकडे जेजे आपणासी ठावे हे इतके भरपूर आहे की गप्पांची गाडी नागमोडी वळणे घेत विविध विषयातून संचार करत होती.(या दोघांच्यावर लिहिलेल्या लेखाची लिंक देत असल्याने त्यांच्या बहुश्रुततेचा तपशील देत नाही) एका होमिओपथी कॉन्फरन्स मध्ये ते अध्यक्ष असताना त्यांनी होमिओपाथीचे जनक हनिमन वर स्वत: आरती तयार करून म्हणून दाखवली.उपस्थित सर्व श्रोत्यानि उभे राहून टाळ्या वाजवल्या.गीतरामायणातील गाणी त्यांनी अनेक भाषात भाषांतरित केली आहेत.गीतरामायणातील एक गाणे त्यांनी म्हणून दाखवले.मी ते लगेच रेकॉर्ड केले.पार्किन्सन्सचा त्यांनी अनकंडीशनल स्वीकार केला आहे.असे त्यांच्या वागण्यातून दिसत होते.हे सांगण्यासाठी त्यांनी  'जिना यहाँ मरना यहाँ हे गाणे म्हणून दाखवले. तेही मी रेकॉर्ड केले.खरे तर ते आल्यापासून रेकोर्डिंग चालू ठेवायला पाहिजे होते असे मला नंतर वाटत राहिले. जेंव्हा वाटेल तेंव्हा मी पेटी काढून वाजवत बसतो असे ते सांगत होते.ते सतत बोलण्याने दमतील असे मला वाटत होते.क्षमाताई म्हणाल्या, 'ते तासंतास मेडिको, नॉनमेडिको विषयावर कोणत्याही वयाच्या विध्यार्थ्यांना शिकवत असतात. शिकवणे हा त्यांचा प्राण आहे.ते माणसात रमणारे आहेत'.हे सर्व मोफत चालते.त्यांनी त्यांची डायरी दाखवली त्यांचे अक्षर पाहून मी थक्क झाले.सतत कंप पावणाऱ्या हाताने इतके सुंदर अक्षर कसे येऊ शकते याचे मला आश्चर्य वाटत होते.घरच्याना त्यांनी आता व्याप कमी करावे असे वाटत असते.पण त्याना मुळात हा व्याप वाटतच नाही.

               एका प्रतिथयश सर्जनला हाताला कंप सुरु झाल्यावर शस्त्रक्रिया बंद कराव्या लागल्या याचे मलाच वाईट वाटले होते.पण आज त्याना पाहताना, ऐकताना वाटले पार्किन्सन्सने त्यांच्या बोलण्यावर आक्रमण केले नाही हे किती चांगले झाले.त्यांच्या वाणीमुळे अनेकांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ते प्रकाश देत आहेत.मरगळ दूर करून उर्जा देत आहेत.अनेकांचे आयुष्य मार्गी लावत आहेत.ही मनावर केलेली सर्जरीच.आणि ती करणे हे अत्यंत कठीण, ते कोणत्याही विद्यापीठात शिकवले जात नाही.हे करणारे डॉ.सतीश यांच्यासारखे विरळाच.

                            या भेटीत क्षमाताईनी त्यांचा मोती अनुभूतीचे हा काव्य संग्रह भेट दिला हे सोनेपे सुहागा असे झाले.१२० कवितांमधील कोणतीही उघडावी आणि आनंद लुटावा.यावर स्वतंत्रपणे लिहावे लागेल.क्षमा ताईनीही आता काम बंद केले आहे.आपल्या कामातून दुसर्यांच्या वेदना कमी करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले.आता आपल्या कवितातून त्या वाचकांच्या मनावर हळुवार फुंकर घालत आहेत.

                            ते परत निघाले तेंव्हा काही राहिले नाही न असे मी म्हणत होते तर डॉक्टरनी  मी हृद्य ठेऊन चाललो आहे अशा अर्थाचा शेर सांगितला.बाहेर थांबून पुन्हा थोड्या गप्पा झाल्या.धबधब्याच्या स्वच्छ पाण्यात भिजल्यावर जसा फ्रेशनेस मिळतो तशी आमची अवस्था झाली. पार्किन्सन्स मित्रामुळे आमच्या जीवनात अशी श्रीमंत करणारी माणसे आली.धन्यवाद मित्रा.

https://www.parkinsonsmitra.org/?p=3013

https://www.parkinsonsmitra.org/?p=3010

May be an image of 3 people, people sitting and indoor