Friday, 24 September 2021

आठवणीतील शुभार्थी - डॉक्टर महादेव ठोंबरे

                                       (पर्किंन्सन्स मित्रमंडळ या आमच्या स्वमदत गटाचे 'पार्किन्सन्ससह आनंदाने जगूया हे ब्रीदवाक्य आहे.काही जणांनी मला विचारले पर्किन्सन्स आजारामुळे दैनंदिन जीवनात  त्रास सहन करावा लागतो,जगण्याची गुणवत्ता कमी होते.हा आजार बरा होणारा नाही असे सारखे डोक्यात असते असे असतांना आनंदात राहता येईल? याचे हो, नाही असे उत्तर देण्यापेक्षा ज्यांनी पार्किन्सन्सला मित्र बनवले शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी राहिले आणि आमचे जे रोलमॉडेल बनले अशा शुभार्थींबद्दल लिहिणे मला अधिक योग्य वाटले.त्यातूनच 'आठवणीतील शुभार्थी'  मालिका सुरु झाली).                    

                                   आठवणीतील शुभार्थी - डॉक्टर महादेव ठोंबरे

                                .स्मरणिका पाठवण्याचे काम मृदुला करत होती.तिने कृषी सोसायटीतील शुभार्थी सतीश चिटणीस यांना स्मरणिका पाठवली असे सांगताच मला ठोंबरे कृषी सोसायटीत राहतात हे लक्षात आले तिच्याशी मी त्याबाबत बोलले.ती म्हणाली, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या ठोंबरे यांचा फोन मिळेल.कृषी सोसायटीत ओळखीचे आहेत आणि दुसरे दिवशी सकाळी ११ वाजताच शुभार्थी सतीश चिटणीस यांनी ठोंबरे यांच्या मुलाचा मिलिंदचा मोबाईल नंबर पाठवला.ते ठोंबरे यांच्या शेजारीच राहत होते.मला युरेका युरेका असे मोठ्यांनी ओरडावे असे वाटले.ठोंबरे कुटुंबियाना संपर्क करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते.काखेत कळसा आणि गावाला वळसा असे झाले होते.

                            डॉक्टर महादेव ठोंबरे यांच्याबद्दल कितीतरी दिवसापासून मला लिहायचे होते.कोणावरही लिहिताना मी त्यांच्या कुटुंबियांची परवानगी घेते.आणि माझ्या आठवणींवर विसंबून न राहता त्या बरोबर आहेत ना हे तपासून घेते.डॉक्टरांच्याबाबत त्यांचा फक्त लॅंडलॉइन आमच्या कडे होता.त्यावर संपर्क होत नव्हता.सुरुवातीच्या काळात मोबाईल थोड्याच सभासदांकडे असायचा माझ्याकडेही नव्हता.त्यांचा संपर्क शोधण्याचे सर्व प्रयत्न वाया गेले होते.आणि अचानक तो सापडला..तसे नमनालाच घडाभर तेल झाले.आता मुळ विषयावर येते.

                           डॉक्टर ठोंबरे यांच्या निधनाला ६/७ वर्षे झाली पण त्यांच्याबरोबर झालेल्या भेटी मला आत्ता आत्ता घडून गेल्यासारख्या आठवतात..अश्विनी मध्ये सभेला ते नियमित यायचे सुरुवातीला एकटेच यायचे.नंतर थोडा तोल जायला लागल्यावर पत्नी बरोबर येई.ते मंडळात यायला लागले तेंव्हा त्यांनी पंचाहत्तरी ओलांडली होती.घशाच्या  कॅन्सर होऊन गेला होता.त्यांच्या बोलण्यावर त्याचा परिणाम झाला होता.व्हिस्परींग सारखे बोलणे होते.पण त्याना काहीना काही भरभरून सांगायचे असायचे आणि ते सांगण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत.

                        त्यांची खरी ओळख झाली ती त्यांच्या घरभेटीत.तेंव्हा तीर्थळी फोरव्हीलर चालवायचे.आम्ही भरपूर घरभेटी करायचो.आम्हाला घर शोधावे लागू नये म्हणून ठोंबरे वाहिनी गेटपासून थोड्या पुढे येऊन उभ्या होत्या.साधी राहणी उच्च विचारसरणी असे दोघेही होते.ठोंबरे वाहिनिना मी प्रथमच पाहत होते.पण अनेक वर्षाची ओळख असल्यासारख्या आमच्या गप्पा सुरु झाल्या..त्यांच्या बागेत केसरी आंब्याचे झाड होते. आम्हाला आग्रह करून त्यांनी आंबा कापून दिला.

                 ते काय बोलत होते ते मला समजायला त्रास होत होता. मग त्यांनीच स्वत: मी नेलेली प्रश्नावली भरली. कृषी क्षेत्रात त्यांचे मोट्ठे काम होते.Joint Director of Agriculture या पदावरून ३५ वर्षे सेवा करून ते निवृत्त झाले होते.ते हाडाचे संशोधक होते.निवृत्त झाले तरी त्यांचे काम थांबले नव्हते.'आदर्श शेती उद्योग' नावाचे मासिक ते चालवत होते.त्याचे संपादक,प्रकाशक सबकुछ तेच होते.पार्किन्सन्स झाल्यावर ही ५/६ वर्षे ते हे मासिक एक हाती चालवत होते.त्यांचा पीएचडीचा विषय जंतुनाशके,कीटकनाशकके यावरच होता.त्यात त्यांचे सारखे काम चालत असे त्यांना झालेला कॅन्सर आणि पार्किन्सन्स हे त्याचेच फलित असे त्यांचे म्हणणे होते.त्यांनी स्वत:च्या शरीरालाही प्रयोगवस्तु बनवले होते.आणि त्यानुसार ते स्वत:च्या पार्किन्सन्सचे निरीक्षण करत.२०११ च्या स्मरणिकेसाठी त्यांनी ते ज्यांच्याकडे उपचार घेत त्या नटराज द्रविड यांच्याकडून लेख लिहवून घेऊन दिला होता.   

                       आम्ही त्यांच्याकडे जाऊन आल्यावर दोन चार दिवसात त्यांचा फोन आला तुमचा पत्ता सांगता का? मी सांगितला.ते का मागतात हे काही मी विचारले नाही एक दिवशी ठोंबरे रिक्षाने थेट आमच्या घरी आले होते. मला थोडे आश्चर्यच वाटले.ते गोखले नगरला राहत आणि आम्ही सॅलसबरी पार्कला.त्यांनी रिक्षा थांबवून ठेवली होती.ते म्हणाले तुमच्या प्रश्नावलीतील काही प्रश्नाची उत्तरे सविस्तर दिली नव्हती म्हणून मी ती द्यायला आलो.त्यांनी कोणती औषधे घेता या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले होते.खरे तर न्यूरॉलॉजीस्टची औषधे त्यांनी दिली होती.पण आता आयुर्वेदिक व इतर औषधे लिहून आणली होती.औषधाचा खर्च किती येतो या प्रश्नाचे उत्तर मला अगदी ढोबळ अपेक्षित होते.त्यांनी अलोपाथी,आयुर्वेदिक,अर्थोपेडीक,मसाज. अशी वर्गवारी करून लिहून आणली होती.त्या दिवसाची तारीख टाकली होती. एका संशोधकाला नेमका आणि सविस्तर डेटा किती महत्वाचा असतो याची मला जाण होती आणि ते हाडाचे संशोधक असल्याने त्याना हे महत्वाचे वाटले असावे.मला स्वत:चीच लाज वाटली.आणि डोळ्यात पाणी आले.पंचाहत्तरी ओलांडलेले ,दुर्धर व्याधीने ग्रासलेले ठोंबरे इतक्या लांब ही माहिती देण्यासाठी आले होते.मी प्रश्नावली भरून घेतल्याने हे माझे मोठे संशोधन आहे असे त्यांना वाटले असावे.मी त्याना मंडळाच्या कार्याची दिशा ठरविण्यासाठी  ही सर्वसाधारण पाहणी आहे हे निट सांगायला हवे होते.    

                 आजही त्यांच्याबद्दलच्या आठवणी लिहिताना माझा गळा दाटून आला आहे.कौटुंबिक दुर्घटना,कॅन्सर,पर्किन्सन्ससारखे दुर्धर आजार असे नियतीने कोरडे ओढले असले तरी .त्यांच्यातील संशोधक,परोपकारी सर्वांच्या मदतीला धावून जाणारा माणूस,कृतिशीलता,उत्साह या कशालाच नियती स्पर्श करू शकली नव्हती.माझ्या स्वत:च्या ,कॅन्सरच्या काळात ठोंबरेंची आठवण मला मानसिक आधार देणारी होती.

                  सतीश चिटणीस यांच्याकडूनही मला माहित नसलेल्या काही गोष्टी कळल्या..आणि त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दुणावला.त्यांच्यावर गांधीवादाचा पगडा होता. ते फक्त खादीच वापरत.ते सोसायटीचे सेक्रेटरी होते.हिरीरीने समस्या सोडवत.सोसायटीच्या कार्यकारिणीचे ते अखेरपर्यंत सदस्य होते. सोसायटीच्या चांगल्या कामात त्यांचे मोठे योगदान होते कोणालाही काही अडचण आली कि ते धावून जात.हे करताना गाजावाजा किंवा कोणताही आव नसे.लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी त्यांची मैत्री होती.

                 ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.शेवटचे ५/६ महिने त्यांचे बाहेर पडणे बंद झाले होते.कारण खूप  तोल जात होता.पण उत्साह,आनंद मात्र शेवटपर्यंत तसाच होता.ठोंबरे सर तुमच्या अशा जगण्याला सलाम.

 




Wednesday, 8 September 2021

पुस्तक प्रकाशन

                                                पुस्तक प्रकाशन

 रविवार दि.५ सप्टेंबर रोजी शेखर बर्वे यांच्या 'पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढतया पुस्तकाच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचे ऑनलाईन प्रकाशन दिनानाथ मंगेशकर हास्पीटलच्या न्युरॉलॉजी विभागाचे प्रमुखन्युरॉलॉजिस्ट डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्या  हस्ते झाले.

या पुस्तकाची पहिली आवृत्ती १३ मे २०१३ साली प्रकाशित झाली.ती संपल्यामुळे ३१ मार्च १५ ला पुनर्मुद्रण करण्यात आले. दरम्यानच्या काळात नवनवीन माहिती येत होती अभ्यासू वृत्तीच्या लेखक शेखर बर्वे यांना या सुधारणा करण्याचा ध्यास लागला.८० वर्षे ओलांडलेल्या शेकर बर्वे यांनी झापाटल्यासारखे हे काम केले.जुनेजाणते न्युंरॉलॉजिस्ट प्रदीप दिवटे यांनी ते बारकाईने तपासून पाहून सूचना केल्या.पहिल्या आवृत्तीला त्यांनी प्रस्तावना दिली होती.या आवृत्तीला मात्र तरुण न्युरॉलॉजिस्टकडून प्रस्तावना घेण्यास सुचविले त्यानुसार बर्वेनी न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला.
  डॉक्टर राहुल कुलकर्णी पार्किन्सन्स मित्रामंडळाशी सुरुवातीपासून निगडीत आहेत.२००८ ला पहिला जागतिक पार्किन्सन्सदिनानिमित्ताचा मेळावा त्यांच्या सहकार्याने दीनानाथ हॉस्पिटल मध्ये झाला.यानंतर अनेकवेळा ते व्याख्यान देण्यासाठी आले. स्मरणिकेत लेख लिहिले.महत्वाचे म्हणजे शेखर बर्वे यांचे पुस्तक त्याना उपयुक्त वाटल्याने  त्यांनी स्वत:कडे विक्रीसाठी ठेवले.त्यांच्यामार्फत अनेक पेशंटना ते पोचले विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांना याचा उपयोग झाला.त्यामुळे डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाणे साहजिक होते.त्यांनीही उत्तम प्रस्तावना लिहून दिली आणि आपल्या कार्यबाहुल्यातून प्रकाशनासाठी वेळ काढला.
प्रकाशन सोहळा अत्यंत सुटसुटीत झाला.
सुरेश फडणीस यांच्या 'तू बुद्धी दे तू तेज दे' या सुरेल स्वरात गायलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.संस्थेची कार्यवाह आशा रेवणकरनी सूत्रसंचालन केले.
त्यांनी प्रास्ताविकात पुस्तक प्रकाशनाची पार्श्वभूमी,मंडळाच्या वाटचालीतील सध्याच्या महत्वाच्या घटना सांगितल्या.सध्या कार्यरत असलेली नारीशक्ती नेटाने काम करत आहे असे सांगत भविष्यातील योजनांसाठी आशावाद व्यक्त केला.
लेखक शेखर बर्वे आणि डॉक्टर राहुल कुलकर्णी यांची ओळख करून दिली.महत्वाचे म्हणजे त्यांच्यातील माणूसपण उलगडून दाखवले.
यानंतर राहुल कुलकर्णी यांनी प्रकाशन केले. शेखर बर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.करोना काळात आलेल्या अनेक अडचणीवर मात करत पुस्तक निर्मिती करण्याची जिद्द त्यांनी बाळगली.
डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी झोप,वेदना आणि विस्मरण या पार्किन्सन्ससाठी दिल्या जाणाऱ्या औषधाने बऱ्या न होणाऱ्या आणि शुभार्थीसाठी त्रासदायक असणाऱ्या लक्षणाबद्दल आणि त्यावरील उपयाबद्दल उपयुक्त माहिती दिली.
ऑनलाईन कार्यक्रम झुमवर दाखवणारे होस्ट अतुल ठाकूर आणि को होस्ट गिरीश कुलकर्णी यांच्या मदतीशिवाय हा नेटका कार्यक्रम होणे शक्य नव्हते.
 May be an image of 2 people, indoor and text that says '4:24 PM O Phadnis'
 May be an image of 2 people, including Shobhana Tirthali and people sitting
 May be an image of 3 people, including Shyamala Madhusudan Shende and text
 
 May be an image of 5 people, including Shyamala Madhusudan Shende and text that says 'REC LIVE Redmi Prime shyamala shyamalashende shende Savita Vithal Kate Surekha'

May be a closeup of Rahul Kulkarni, eyeglasses and text that says '4:53 PM REC 41 LIVE Kulkarni'May be an image of 1 person, eyeglasses and text that says '5:06 PM REC 38 LIVE Savita SVBarve Barve'May be an image of 1 person and text that says 'Vijayalaxmi Revankar'

Saturday, 4 September 2021

क्षण भारावलेले १८

                                            क्षण भारावलेले १८

                            नुकतीच राखी पौर्णिमा होऊन गेली,whats app,फेसबुक, सर्वकडे भरभरून पोस्ट येत होत्या.त्यात एक पोस्ट मनाला भिडली.आमचे शुभार्थी मनोहर लिमये यांनी राखीचे दोन सुंदर कोलाज केलेले होते.इतके नाजूक काम पार्किन्सन्स शुभार्थी ( पेशंट )करू शकतो यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही.या क्रिएटीव्हिटीला तोडच नाही.यापूर्वी ११ एप्रिलच्या पार्किन्सन्सदिन सोहळ्याच्या कार्यक्रमच्या वेळी शुभार्थींचे कलाप्रदर्शन भरवले होते.त्यातही त्यांनी सुंदर कोलाज पाठविले होते.मास्कबाबतचा संदेश त्यातून पोचवला होता.

                          या वेळच्या कोलाजपैकी  एका कोलाज वर प्रेरणा, सौ मंदाताई आणि एकावर प्रेरणा सौ.सुनंदाताई असे लिहिले होते.दोन्हीवर मजेत गेलेला वेळ सहा तास,खर्च रुपये शून्य,मूल्य अमुल्य असे लिहीले होते.खाली म.भा,लिमये अशी सही ही केली होती.मला हे सर्वच भारी वाटले.मी कुतूहल वाटून मनीषा ताई लिमयेना फोन केला.मंदाताई आणि सुनंदाताई या मनोहर लिमये यांच्या मोठ्या बहिणी असे समजले.

                       मनोहरराव स्वत: ८१ वर्षाचे आहेत आणि बहिणी त्यांच्यापेक्षा मोठ्या.एक बहिण घरी येऊन राखी बांधून गेली होती.तिला कोलाज प्रत्यक्ष देता आले होते.दुसऱ्या बहिणीचे खुब्याचे हाड मोडल्याने शस्त्रक्रिया झाली होती.ती येऊ शकत नव्हती.मनोहर रावांची परिस्थिती पर्किन्सन्समुले मनात आले आणि  आणि गेले अशी नव्हती.करोनामुळे शक्यतो बाहेर जाणे टाळणे गरजेचे होते.पुण्यातल्या पुण्यात असून भेट न झाल्याने दोन्ही भावंडे तळमळत होती.शेवटी घरच्यांनी त्यांची भेट घडवून आणायचे ठरवले.मनोहर रावांसाठी केअरटेकर आहे परंतु पहिल्या मजल्यावरून खाली आणायचे जोखमीचे होते.मग दोन मुली,एक जावई असा लवाजमा दिमतीला आला सर्व जण बहिणीकडे आले.इतका आटापिटा करून भाऊ आलेला पाहून बहिण भारावून गेली.त्यांनी सहा तास खपून आणलेली भेट पाहून तर बहिणीबरोबर बहिणीचे  पतीही भारावून गेले.त्याची फ्रेम करून ते आता लावणार आहेत. बहिण, भावाच्या प्रेमाची खूण असेल ती.राखी पोर्णिमेदिवशी रेडिओवर 'द्रोपादिशी बंधू शोभे नारायण'' हे गाणे लागले होते Whats app वर ही आले होते. त्यातील 'प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण' ही ओळ मला फिरून फिरून आठवत होती.भावाची ही भेट बहिणीला शस्त्रक्रियेतून रिकव्हर व्हायला औषधाइतकिच कदाचित जास्तच उपयोगी पडणार हे नक्की. 

                                 आता सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत लिमये मध्यंतरी वारली पेंटिंग शिकले. दिवाळीसाठी भाऊबीज म्हणून बहिणींना आता  वारली पेंटिंग भेट हवे आहे.मनीषाताईंच्या बहिणीला आणि जाऊबाईनाही वारली पेंटिंग हवे आहे.हे भावनिक आव्हान स्वीकारून लिमये त्या तयारीला लागलेही.सगळ्या नातेवायीकांनी मिळून त्याना पार्किन्सन्स विसरायच्या उद्योगाला लावले आहे.

                               घरचा शुभंकर मानिषाताई तर उत्साहाचा झरा आहेत,मला मनीषा ताईंशी वेगवेगळ्या संबंधात बोलताना त्यांच्या सासर माहेरची नातेसंबंधाची वीण घट्ट असलेली जाणवली.त्यांचे एक भाऊ विश्वनाथ भिडे यानाही पार्किन्सन्स असल्याने ते आमच्या ग्रुप मध्ये आहेत.त्या सांगत होत्या त्यांचा डीपी पाहिलात का? तो पाहीला तर ते ट्रेक करतानाचा होता तों आत्ता आत्ता पर्यंत ट्रेक करत होता असे त्या कौतुकाने सांगत होत्या.जेंव्हा आम्ही मनीषा ताईंचे व्याख्यान ठरवले तेंव्हाहा भाऊ अनेकांना कौतुकाने व्याख्यानाची लिंक पाठवत होता.नियमाने वागणाऱ्या मनीषा ताईंचा ग्रुपशिवाय इतरांना लिंक पाठवली तर चालेल ना असा फोन आला.अर्थात मी चालेल असे सांगितले.

                          त्यांच्यातील प्रयोगशील शिक्षिका शुभंकर म्हणूनही सतर्क असते. अनेक कल्पक पर्याय शोधत असते.'PDMDS' च्या एका ऑनलाइन सभेत मनीषाताईंनी सांगितलेला प्रकल्पही असाच मनाला भिडणारा होता.त्यांची नववीत असलेली नात मराठी, हिंदी, इंग्लिश अशा कोणत्याही भाषेत काहीतरी वाचून दाखवायची तेही फोनेवरून.आजोबा त्यातले शब्द आठवून सांगायचे.आज्जी ते लिहून काढायची महिनाभर हा प्रयोग चालला.गावाला गेली तरी नातीनी प्रयोगात खंड पडू दिला नाही.पहिल्या दिवशी चार शब्द आठवले. महिन्यानंतर १९ शब्दापर्यंत मजल गेली.मला या प्रयोगाचे खूप अप्रूप वाटले.विशेषत:टीनेजर नात आज्जी आजोबांच्या प्रयोगात सामील झाली याचे कौतुक वाटले.

                         मनोहर रावांसाठी पत्नी मनीषाताई खंबीरपणे उभ्या आहेतच शिवाय नातेवायीकांची अख्खी टीमही जोडलेली आहे.वर्षानुवर्षाच्या परस्पर सलोख्याच्या संबंधातून हे घडलेले असते.वरवर पाहता या छोट्या गोष्टी वाटतात पण पार्किन्सन्ससारख्या रोज नवनवीन समस्या निर्माण करणाऱ्या आजारात आपण इतरांना हवे आहोत हा विश्वास देतात,कृतीशील राहायला,पार्किन्सन्स विसरून आनंदाने जगण्यास बळ देतात.म्हणूनच  मला ही माणसातली इन्व्हेस्टमेंट फार फार मोलाची वाटते.

May be an illustration of 2 people and flower

               May be an illustration of 2 people and flower      

May be an image of 1 person