Sunday, 16 May 2021

क्षण भारावलेले - १७

                                   भेटू आनंदे उपक्रमात '२०२१ जागतिक पार्किन्सन्स मेळावा  Behind the curtain' या कार्यक्रमात या लेखातील बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत तरी मला व्यक्त झाल्याशिवाय राहवले नाही.हा कार्यक्रम आणि जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा २०२१ या दोन्ही कार्यक्रमाच्या व्हिडीओ लिंक सोबत दिलेल्या आहेत.                     

                                                      क्षण भारावलेले - १७  - भाग १

                                                                ११ एप्रिल २०२१ चा जागतिक पार्किन्सन्स दिन मेळावा.प्रथमच ऑनलाईन होणार होता आमचे वेबडिझायनर अतुल ठाकूर यांच्या भरवशावर आम्ही हे शिवधनुष्य उचलण्याचे धाडस करत होतो..आदल्या दिवशी रंगीत तालीम घेतली तेंव्हा अतुल पुढे बरेच challenges वाढून ठेवले आहेत हे लक्षात आले होते.कार्यक्रमाच्या दिवशी साडेचारला कार्यक्रम सुरू व्हायचा होता दुपारी एक वाजता पुन्हा रंगीत तालीम झाली.अतुलने रात्रभर काम करून बरेच प्रश्न सोडवत आणले होते.पण अजून कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण डॉक्टर  दाम्पत्यांचे व्याख्यान हा विषय अधांतरीच होता.आम्ही Ventilator वर आहोत असे वाटत होते.मार्चपासून आमचे सत्वपरीक्षा देणे चालूच होते.

                               कार्यक्रमाचा आराखडा ठरल होता.त्यानुसार सर्व कामाला लागले होते.स्मरणिका प्रकाशन हा त्यातील एक भाग. हत्ती गेला शेपूट राहिले होते.पण ते बाहेर पडेपर्यंत दमछाक झाली.कोरोना वाढत चाललेला.शासन नियम वेळोवेळी बदलत होते.कधी काय बंद होईल शाश्वती नसल्याने सारखी टांगती तलवार.काही कामे प्रत्यक्ष जाऊनच संगणकासमोर बसून करायला हवी होती.अशातही कोरोनाचा विचार न करता आणि बाहेर पडायचे नाही ही माझी सुचना धाब्यावर बसवून मृदुला आणि आशानी विनयकडे सातत्याने बसून काम पूर्ण केले.

                          शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन हाही कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असतो.आम्हाला प्रोत्साहन देणारे, सक्रीय सहभाग असणारे आणि प्रामुख्याने तांत्रिक ज्ञान असणारे  उत्साही शुभंकर रमेश तिळवे कलाकृतींचे काम पाहणार होते.ते आजारी पडले.कलाकृती गोळा करण्याचे काम मी करु शकत होते.पण तिळवे ज्या तांत्रिक करामती करून गम्मत आणणार होते ते मला जमणारे नव्हते.जबाबदारीच्या ओझ्याखाली आधीच वाकलेल्या अतुलने आपणहून ती जबाबदारी घेतली.

                        अडचण आली की प्रत्येकवेळी मानसिक हतबलता येत होती.परंतु सतत नवनवीन धक्के देणाऱ्या पार्किन्सन्स मित्रामुळे अडचणीवर मात करायची सवयही झाली आहे.

                       एप्रिल उजाडला.डॉ.प्रयाग यांचे व्याख्यान हा मेळाव्याचा महत्वाचा भाग होता.त्यांच्याशी संपर्काचे काम आशा रेवणकर करत होती.निमंत्रण पत्रिकेवर विषय काय द्यायचा हे ती विचारणार होती.आता निमंत्रण पत्रिका पोष्टाने जाणारच नव्हत्या.ऑनलाईन पाठवायच्या होत्या,नाहीतर दरवर्षी निमंत्रणे तयार होऊन पोस्टात पडतातही.दोन तारखेला सकाळी आशाचा निरोप आला 'दोन ध्रुव' नाव सांगितले.त्यांच्या पत्नीने नाव सुचविले.त्याही बोलणार आहेत..बाकी नंतर बोलते.तीच्या स्वरावरून मला काळजीच वाटली.

                    दुपारी मेसेज आला रेवणकरना आयसीयूत ठेवलय.MRI आहे.त्यानंतर MRI नॉर्मल आल्याचाही मेसेज आला.अजून दोन दिवस मुक्काम वाढला असाही मेसेज आला..काय झाले समजत नव्हते.ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती.तरी डॉक्टरना मेसेज करत होती.चार तारीख आली.अजून निमंत्रण पत्रिका तयार नव्हती डॉ.प्रयाग. यांच्याशी बोलणे झाल्याशिवाय ती तयार होऊ शकत नव्हती.शेवटी मी आशाला डॉ. प्रयाग यांचा नंबर दे असा मेसेज केला.मृदुलाने निमंत्रण पत्र तयार करण्याचे काम हातात घेतले.कच्चा आराखडा करून डॉ.प्रयाग यांना पाठवला.त्यांचे लगेच उत्तर आल्यावर मृदुलाने तिच्या ओळखीच्या माणसाकडे निमंत्रण पत्रिका करायला दिली.

                    कार्यक्रमाचे एक आकर्षण हृषीकेश पवारने बसवलेला डान्स हे असते.मी स्वत: त्याच्या डान्सक्लासमध्ये सहभागी असल्याने त्याला येणाऱ्या अडचणी मला दिसत होत्या.ऑनलाइनबरोबर रेग्युलर क्लास चालू झाला होता.सर्व नियम पाळून जवळचे लोक यात सहभागी होत होते.लॉकडाऊनमुळे ते बंद झाले लाइव्ह कार्यक्रम देण्याची शक्यता राहिली नाही.त्यातच हृषीकेश आजारी पडला डॉ.नी विश्रांती सांगितली तरी त्याचे ऑनलाईन क्लास घेणे चालूच होते.इंटरनेटच्या व्यत्ययाने क्लास बुडत होते.त्याला मी म्हणत होते तब्येतीपेक्षा दुसरे काही महत्वाचे नही तर त्याचे म्हणणे 'We must keep our spirit high'  ९ तारीख आली तरी व्हिडीओ आला नव्हता.आम्ही आधीच्या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ काढून ठेवले होते.शेवटी डान्स क्लिप,सहभागींचे शेअरिंग आणि स्वत:च्या मनोगतासह हृषीकेशचा व्हिडिओ ९ तारखेला रात्री आला..

                             हे सर्व चालू असताना पाच तारखेला आणखी एक धक्का. .मृदुलाचा फोन आला आई सिरीयस आहे मी रत्नागिरीला चाललेय.त्या  अवस्थेतत तिने निमंत्रण पत्रिका ज्यांना करायला दिली त्यांचा फोन दिला.या गडबडीत आणखी एक गोष्ट चालली होती.११ एप्रिल जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त आकाशवाणीवर परिक्रमा कार्यक्रमात मंडळाची माहिती सांगणारी मुलाखत होणार होती ते कामही मृदुला पाहत होती.मुलाखतीसाठी मी आणि आशा जाणार होतो त्याबद्दलचे सर्व अपडेट्सही तिने दिले

                     .गौरी लागू मुलाखत घेणार होत्या.त्यांचा फोन नंबर दिला.त्यांनी करोनामुळे घरून फोनवरही मुलाखत देता येईल असे सांगितले होते.आशाला तर आता शक्यच नव्हते.घरून मी एकटीनेच मुलाखत द्यायचे ठरले आकाशवाणी द्वारे अनेकांच्यापर्यंत पार्किन्सन्समित्रमंडळाची माहिती जाणार होती त्यामुळे तेही महत्वाचे होते.

                    मृदुला कऱ्हाडपार्यंत पोचली आणि तिला आई गेल्याचे कळले.ती खरे तर शनिवारी आईला भेटून रविवारी परत आली होती.आणि पुन्हा लगेच तिला सकाळी जावे लागत होते.त्यातही तिने उरकलेली कामे पाहून तिच्याबद्दलचा आदर आणि प्रेम यांनी माझे मन भरून आले. 

                    त्या दिवशी दुपारी कार्यकारिणीची मिटिंग ठेवली होती.अनेक अडचणीमुळे ती सारखी पुढे ढकलली जात होती शेवटी मृदुला नसली तरी मिटिंग घ्यायचे ठरले.कार्यक्रमाला फक्त पाच दिवस राहिले होते,त्यात शनिवार, रविवार पूर्ण लॉकडाऊन असल्याने शुक्रवारपर्यंत सर्व आवरायला हवे होते.आशा सोमवारीच  हॉस्पिटलधून घरी आली होती रेवणकर आता बरे होते पण पाच दिवस हॉस्पिटलमध्ये असल्याचा शिण त्यामुळे ती खूप थकली होती.

                          सूत्रसंचालनाचे काम मृदुला करणार होती. मंगळवारी मृदुलालाच्या अनुपस्थितीतच  कार्यकारिणी मिटिंग झाली.इतक्या अडचणी येत होत्या तर प्रत्येक कामासाठी A बरोबरच B,C,D असे पर्याय ठेवावे लागले होते.मीटिंग मधून  छान सूचना आल्या.दीपाने श्यामला ताईंचे,पटवर्धन सरांचे,प्रार्थना म्हणणाऱ्या पोटे आणि मीनल या शुभार्थीचे, वक्त्यांची ओळख करून देणाऱ्या आशाचे असे सगळे व्हिडिओही घ्यावेत असे सुचविले.ऐनवेळी तांत्रिक अडचण आली तर व्हिडीओ लावता येणार होते.तिने व्हिडीओ कसा असावा याचे बारकावे सांगणारे टीपणही तयार करून दिले.सविताने कार्यक्रमाचा क्रम आणि प्रत्येकाला किती वेळ आहे हे सांगणारी कार्यक्रम पत्रिका तयार केली.

                         मृदुला मिटींगला नव्हती पण मी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करेन असे तिने सांगितले.दु:ख विसरून तिच्याकडे असलेली कामे करायला तिने सुरुवात केली.स्मरणिका तयार झाल्या.प्रयाग डॉक्टरांच्या कडे स्मरणिका आणि बॅनर  पाठवायचे होते. विनयने ते नेऊन दिले.

                        सर्वाना सांगितल्यानुसार एकेक व्हिडीओ यायला सुरुवात झाली.आता फक्त पटवर्धन यांचा व्हिडिओ यायचा होता.आता परिस्थिती नियंत्रणात आहे असे वाटत असताना एक जबरदस्त धक्का देणारी घटना घडली.कार्पोरेशनने प्रयाग  हॉस्पिटल कोविदवार्ड म्हणून जाहीर केले होते.डॉक्टर पतीपत्नींवर प्रचंड जबाबदारी आणि ताण होता. ते प्रयत्न करणार होते तरीही ११ तारखेला झूम मिटिंग जॉईन करु शकतील का हे त्यानाही  सांगता येणे शक्य नव्हते.केंव्हा कोणती इमर्जन्सी येईल हे सांगता येत नव्हते.आमच्या सर्वांचे अवसानच गळाले.

                      मागच्या वर्षी दीपा आणि आशा डॉ.प्रयाग यांच्याकडे ११ एप्रिलच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण द्यायला गेल्या होत्या.त्यांच्या अगत्यपूर्ण  वागणुकीने भाराऊन गेल्या होत्या.ते क्रिटीकल केअर तज्ज्ञ असल्याने 'पार्किन्सन्स पेशंट आणि इमर्जन्सी' असा विषय घेऊन गेल्या होत्या डॉक्टर म्हणाले तुमचा हा सोहळा असतो असा विषय कशाला घेता ? मी विषय सुचवू का आणि त्यांनी पूल आणि तेंडूलकर यांच्या  आठवणी हा विषय सुचविला.लॉकडाऊन झाला.कार्यक्रम रद्द करावा लागला.नंतर आम्ही ओंनलाईन.कार्यक्रम सुरु झाल्यावरही त्याना बोलवायचा प्रयत्न केला पण ते कधी अमेरिकेला गेले.कधी आजारी पडले अशा अडचणी निघत राहिल्या शेवटी या वर्षीच्या ओंनलाईन जागतिक मेळाव्यासाठी त्याना बोलवण्यात आम्ही यशस्वी झालो होतो त्यांच्या भाषणाची चातकाप्रमाणे वाट पाहत होतो आणि ही अडचण आली.डॉक्टरना नाहीच जमले तर इतक्या कमी वेळात कोणाला विचारायचे.आमच्या हितचिंतक वृद्धशास्त्राच्या अभ्यासक,कृतीशील लेखिका.रोहिणी ताई पटवर्धन यांची  आठवण झाली.त्यांना मी फोन केला अडचण सांगितली.त्या खानापूरला होत्या तेथे रेंज नसते. त्या म्हणाल्या तरी मी काहीही करीन आणि हजर राहीन.त्यांच्या आश्वासनाने धीर आला.पण ही वेळ आली नाही.परंतु इतक्या ऐन वेळी मदतीस तत्पर असलेल्या रोहिणीताईंच्या बद्दलचा आदर वाढला.

                  . सविताने त्यांना त्यांच्या वेळेनुसार घरून व्हिडीओ करून देण्याचा  पर्याय सुचविला.यात फक्त प्रश्नोत्तरे होणार नव्हती.हॉस्पिटल कोविद वार्ड झाल्याने त्यांच्या मागचा कामाचा व्याप आणि ताण पाहता त्याना वेळ कसा मिळणार असे आम्हाला वाटत होते पण त्यांनी आम्ही रात्री किंवा पहाटे रेकोर्डिंग करू असे सांगितले.  नॅशनल,इंटरनॅशनल अशा मोठमोठ्या सेमिनारमध्ये ते सहभागी होत असल्याने त्यांच्याकडे अद्ययावत तांत्रिक यंत्रणा होती आणि ते उत्तमरीत्या हाताळूही शकत होते.मागे Banner लावणे,स्मरणिकेचे प्रकाशन हे सर्व मी व्यवस्थित करीन असे सांगत त्यांनी आम्हाला आश्वस्त केले. 

                  आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता रंगीत तालीम घेतली.आलेले व्हिडिओ ओपन होणे,सलग व्यवस्थित दिसणे यात अडचणी येत होत्या.अतुलनी कलाकृतींचे प्रेझेंटेशन तयार केले होते ते व्यवस्थित होत होते.शक्यतो सर्व गोष्टी लाईव्ह करता येतील का पाहिले गेले.दुसर्या दिवशी पुन्हा सकाळी ११ वाजता रंगीत तालीम घ्यायचे ठरले.तंत्रज्ञान न समजणाऱ्या आम्ही सर्व बायका आणि बेभरवशी तांत्रिक साधने यांच्यासह अतुलला काम करावे लागत होते को होस्ट असलेला आमचा छोटा मित्र गिरीश कुलकर्णीचा थोडा आधार होता.

                 अतुलची आता सत्व परीक्षा होती त्यांच्याकडे आलेले व्हिडीओ इनपुट गुणवत्ता वेगवेगळी होती..इंटरनेट बंद होणे,संगणक hang होणे,संगणक हळू चालणे या गोष्टी त्यांच्या हातात नव्हत्या.मोठ्या प्रमाणात होणाऱ्या transition साठी लागणारा संगणक त्यांच्याकडे नव्हता.साधनसामग्रीची कमतरता..काही गोष्टी घ्याव्यात तर  शनिवार रविवार पूर्ण बंद असल्याने तेही शक्य नव्हते.या सगळ्या अडचणीवर त्यांनी संगणक जास्तीत जास्त स्मूथ चालेल यासाठी संगणकावर कमीत कमी गोष्टी ठेवणे असे काही मार्ग शोधले ११ तारखेच्या रंगीत तालमीत व्हीडोओ चांगले चालले.अतुलने थोडा जरी माउस हलवला तर व्हिडिओ चालत नव्हता त्यामुळे कार्यक्रमाच्यावेळी लोकांना आत घेण्याचे काम गिरीशने करायचे ठरले.अतुल पूर्ण वेळ म्यूट असणार होते.सुत्रसंचलन करणाऱ्या मृदुलाला अतुलला काही सांगायचे असले तर खाणाखुणांनी सांगावे लागणार होते.त्याचीही रंगीत तालीम झाली.व्हिडिओ चालेपर्यंत तिला काही तरी ऐनवेळी  बोलत राहावे लागणार होते.ती हे सर्व तिच्यासाठी आवाहनच होते.

               अजूनही पटवर्धन आणि महत्वाचा म्हणजे डॉक्टर प्रयाग यांचा व्हिडीओ यायचा होता.एवढ्यात व्हिडिओ तयार आहे पण सेंड होत नाही असा डॉक्टरांचा मेसेज आला.कोणाला तरी पाठवले तर पेनड्राईव्हवर ते देऊ शकणार होते.त्या दिवशी  कडक बंद असल्याने कोणालाही पोलीस सोडत नव्हते.व्हिडीओचे दोन भाग केले तर कदाचित पाठवता येईल असे आशाने सुचविले.आता मात्र आम्ही Ventilator वर होतो आणि याच क्षेत्रातले तज्ज्ञ डॉ.प्रयाग यांच्या हातात सर्व होते.शेवटी दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान व्हिडिओ अतुलकडे सेंट झाला.अतुलने सांगितले व्हिडिओ लोड व्हायला बराच वेळ लागेल त्यामळे दुसरे काही सांगू नका.याच दरम्यान पटवर्धन यांचा व्हिडिओ मी अतुलकडे पाठवला होता.पटवर्धन यांनी मेल वर लिखित मजकूरही पाठवला होता.अडचण आल्यास तो कोणीतरी वाचावा असे सांगितले होते.ते काम अंजलीकडे सोपवण्यात आले.

               पावणे दोनच्या दरम्यान अतुलचा डॉक्टरांचा व्हिडीओ लोड झाल्याचा मेसेज आला.पटवर्धन यांचा एक व्हिडिओ लोड झाला होता. एक ओपनच होत नव्हता.कार्यक्रम होइपर्यंत कोणाच्याच जीवात जीव नव्हता.साडेचारला कार्यक्रम सुरु होणार होता.आम्ही चारलाच झूमवर हजर झालो.डॉक्टर द्वयीचा व्हिडीओ थोडासा लावून पहिला चांगलाच चालत होता.वेळेवर मिटिंग सुरु झाली.आम्ही श्वास रोखून पाहत होतो.पहिल्या प्रार्थना,श्यामाताईंचे मनोगत व्यवस्थित झाले.पटवर्धन यांचे मनोगत वाचणारी अंजलीला ऐनवेळी तांत्रिक अडचण आली आणि प्रसंगावधान वापरून अतुलने लोड झालेला पटवर्धन यांचा व्हिडीओ लावला. 

                      सर्व व्यवस्थित चालले होते आता डॉक्टर शिरीष आणि आरती प्रयाग यांचे आगमन झाले.त्यांनी स्मरणिकेचे प्रकाशन केले.त्यांच्या मागचा बॅनर सुंदर दिसत होता.पु.ल.देशपांडे आणि विजय तेंडुलकर या दोन दिग्गजांचा शेवटचा काळ प्रयाग हॉस्पिटलमध्ये गेला.डॉक्टर आरती यांनी त्यांच्यावर बोलण्यासाठी  दोन ध्रुव हे सार्थ नाव सुचविले होते. दोन परस्पर भिन्न व्यक्तीमत्वांचा प्रयाग दाम्पत्यावर झालेला परीस स्पर्श हळुवारपणे उलगडला जात होता.आता विचार करताना वाटते हॉस्पिटलमध्ये एवढी गडबड चालू असताना त्याना एकमेकाशी चर्चा करायला वेळही मिळाला नसेल तरी एकमेकांच्यात पूर्ण समन्वय असलेले, सूत्रबद्ध,नेमके,दोन धृवांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा उलगडून दाखवणारे  हजारो ऐकणार्यांवर गारुड करणारे वक्तव्य डॉक्टर दाम्पत्याना कसे काय शक्य झाले.तेही तेवढेच दिग्गज आहेत म्हणूनच.महाराष्ट्र सरकारने पु.लं.च्या शेवटच्या दिवसात सरकारी खर्चाने जगातल्या कोणत्याही देशात उपचारासाठी जाण्याची तयारी दाखवली होती पण सुनीता बाईनी माझा शिरीषवर पूर्ण विश्वास आहे आम्ही येथे समाधानी आहोत असे उत्तर दिले.यापेक्षा हॉस्पिटल, आणि डॉक्टर यांच्यासाठी मोट्ठे प्रमाणपत्र कोणते असू शकते? पुर्ण वेळ दोघे डॉक्टर आपल्यासमोर बसून गप्पा मारत आहेत असेच वाटत होते.गप्पांच्या शेवटी ते भावूक झाले. ऐकणाऱ्या सर्वांना त्यांनी भावूक केले.(व्याख्यानाची  युट्युब लिंकसोबत दिली आहे.व्याख्यान  मुळातूनच ऐकावे.)                   

                         एकुणात  आमचा ऑनलाईनचा पहिला प्रयोग यशस्वी झाला होता.काही तासापूर्वी आम्ही Ventilator वर आहोत असे वाटत होते.परंतु डॉ.शिरीष आणि डॉ.आरती प्रयाग यांनी आम्हाला अलगद Ventilator वरून थेट विश्वाच्या अंगणात आणून सोडले होते.आणि आम्ही मस्त रसपान केले.

                        आत्तापर्यंत कधीही न आलेली या थोर व्यक्तींची ऐतिहासीक आणि मराठीभाषेचे लेणे ठरावी अशी माहिती हजारो लोकांच्यापर्यंत पोचली. ती पोचवण्याचे आम्ही माध्यम झालो हे आमच्यासाठी अभिमानाचे होते.यावर कडी म्हणजे कार्यक्रमानंतर डॉक्टर दाम्पत्यांचा आम्हाला मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ दिलेत त्याबद्दल धन्यवाद असे सांगणारा फोन आला कोणतीही मदत लागली तर आम्ही दोघे केंव्हाही तयार आहोत असे सांगणारी पुस्तीही त्यांनी जोडली.आधीच भारावून गेलेली आशा, अनेक वर्षांची ओळख असल्याप्रमाणे आतापर्यंत आलेला सर्व ताण,आम्हाला येणाऱ्या अडचणी  त्यांच्यापुढे सांगून मोकळी झाली.या समारंभामुळे दोन थोर व्यक्तिमत्वे आमच्या परिवारात सामील झाली हे केवढे मोट्ठे फलित.

https://www.youtube.com/watch?v=jFRIUiG58A4

https://www.youtube.com/watch?v=FRI-wSRZh74


No comments:

Post a Comment