Friday, 23 April 2021

क्षण भारावलेले - १४

                                                        क्षण भारावलेले - १४

१३ जुलै २०२० ची व्हिडीओ कॉन्फरन्स पार्किन्सन्स मित्र मंडळाचे काम करणाऱ्यांसाठी भारावून टाकणारी होती.इंडियन मेडिकल असोशीएशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांचे व्याख्यान आणि स्मरणिकेचे प्रकाशन असे दोन कार्यक्रम होते दोन्ही उत्तम झाले.
५० शुभंकर, शुभार्थी उपस्थित होते.सहभागींची संख्या हळूहळू वाढत आहे.व्हिडिओ कॉन्फरन्स साठी शुभंकर, शुभार्थी आता सरावलेले आहेत‌. पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई असे भारतातील सभासद होते शिवाय इंग्लंड,अमेरिकेतील थोड्या गैरसोयीच्या वेळा सांभाळूनही हजर राहणारे होते.
होस्ट अतुल ठाकूर प्रत्येक वेळी कोणाला काही तांत्रिक अडचण असली तर सोडविता यावी आणि एकमेकांशी बोलता यावे म्हणून पंधरा मिनिटे आधीच कॉन्फरन्स चालू करतात. डॉक्टर अविनाश भोंडवे ही पंधरा मिनिटे आधीच हजर झाले.अतुलने पहिले पेज टाकून त्यावर रीबनच्या फितीने झाकले होते. रीबनवर क्लिक केल्यावर पहिले पेज येणार होते. आणि स्मरणिकेचे प्रकाशन होणार होते हे सर्व नेमके कसे होईल यावर डॉक्टरांनी अतुलशी चर्चा केली. एकीकडे डॉक्टरना सारखे फोन येत होते आणि दुसरीकडे सर्व शुभंकर, शुभार्थी एकमेकांना पाहून हाय-हॅलो करत होते. बरेच दिवसांनी भेटल्याने आनंदित झालेले दिसत होते. डॉक्टरांचे स्वतःच्या मागचे वलय विसरून अनौपचारिक वागणे ते आमच्या परिवारातले आहेत हे दाखवणारे होते.
बरोबर चार वाजून पाच मिनिटांनी कान्फरन्स
चालू झाली.
‘आला पावसाळा तब्येत सांभाळा’ या विषयावरील व्याख्यान तर उत्तम झालेच पण प्रश्नोत्तरात हळूहळू गाडी करोना कडे वळली आणि डॉक्टरांनीही अनेक समजुती कशा भ्रामक आहेत हे सांगितले. शुभार्थी किरण दोषी हे त्यांचे पेशंट चे नाव दिसल्यावर त्यांना व्हिडिओ on करायला सांगुन तुमचा मला चेहरा पाहायचा आहे असे सांगितले.अनिल शेंडे यांना अमेरिकेत तुमच्याकडे काय परिस्थिती आहे असे विचारले. एकूण खेळीमेळीच्या वातावरणात कॉन्फरन्स झाली. वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण सहभागी झालो आहोत हे विसरायला झाले. या कान्फरन्समधील स्मरणिकेचे वेब एडिशन म्हणून प्रकाशन हा आमच्यासा साठी अनोखा प्रकार होता. हे प्रकाशन डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्यासारख्या वैद्यकीय साक्षरतेचे व्रत घेतलेल्या मान्यवर व्यक्तिकडून व्हावे हे आमचे भाग्यच कारण आमच्या स्मरणिका मुख्यता लोकांच्या मनातील भ्रामक समजुती दूर करून पार्किन्सन साक्षरतेचे काम करणे, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे याच उद्देशाने असतात.
या वर्षी प्रथमच स्मरणिकेचा मजकूर तयार असूनही Lock down मुळे जागतिक पार्किन्सन दिन मेळावा होऊ शकला नाही.मेळाव्यात प्रकाशित होणारी स्मरणिका ही प्रकाशित झाली नाही. आशा रेवणकर,वसुमती देसाई, म‌दुला कर्णी, अंजली महाजन उषा कुलकर्णी या संपादक मंडळींनी यासाठी अनेक महिने बरेच कष्ट घेतले होते.दीपा होनप लागेल ती मदत करायला उपलब्ध होती. श्यामला शेंडे यांनी अमेरिकेत बसून चारुशीला सांखला यांच्या २०१९ च्या जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यातील व्याख्यानाचा व्हिडिओ ऐकून शब्दांकन करण्याचे क्लिष्ट काम केले होते. आशा रेवणकर यांनी मनोविकार तज्ज्ञ उल्हास लुकतुके यांच्या घरी जाऊन त्यांचे बोलणे रेकॉर्ड करून त्याचे शब्दांकन केले होते. डॉक्टर यश वेलणकर, डॉक्टर अविनाश भोंडवे डॉक्टर अतुल ठाकूर यांचे महत्त्वपूर्ण लेख या स्मरणिकेत होते. शुभार्थी मोरेश्वर काशीकर यांच्या ‘पार्किन्सन्स डिसीज एक प्रतिबंधन एक शक्यता’ हा लेख पतंजली योग सुत्राचा वापर कसा करता येईल याचा विचार करणारा होता. माझ्यासह आमचे सहकारी शुभंकर, शुभार्थी यांनी आपल्या अनुभवातून काढलेले नवनीत आणि वैशाली खोपडे, गिरीश कुलकर्णी या कार्यकर्त्यांनी लिहिलेले अनुभव हे सर्वच शुभंकर, शुभार्थींच्या दृष्टीने मोलाचे होते पण हे सर्व संगणकात बंदिस्त होते. करोनाचा प्रसार पाहता सर्व व्यवहार केंव्हा ठिकाणावर येतील हे माहीत नव्हते. आम्ही हातावर हात ठेवून बसलो होतो आणि अशावेळी श्यामलाताईंचे
चिरंजीव अनिल शेंडे यांनी स्मरणिका वेबसाईटवर का टाकत नाही असे सुचविले. मजकूर शेवटच्या टप्प्यात होता पण अजून थोडे प्रूफ रीडींग आवश्यक होते. मग विनय दीक्षित नी आम्हाला पीडीएफ स्वरूपात मजकूर पाठवायचा आणि आम्ही दुरुस्त्या करून व्हाट्सअप वर पाठवायचे असे करत चुका दुरुस्त झाल्या. हार्ड कॉपी नसताना असे तपासणे आणि तेही मोबाईलवर हे आमच्या साठी सोपे नव्हते. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत चुका दिसत राहिल्या आणि अगदी आदल्या दिवशीपर्यंत विनयने कंटाळा न करता
त्या दुरुस्त करून दिल्या.
अतुल ठाकूर यांनी वेबसाईटवर स्मरणिका लोड केलेली आहे आणि त्याची लिंक फेसबुक वर, व्हाट्सअप वर पोचवली आहे. आता जगभरातील मराठी वाचू शकणाऱ्या पर्यंत संगणकात बंदिस्त असलेले ज्ञान पोहोचणार आहे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. या कॉन्फरन्सचे कार्यकर्ता गिरीश कुलकर्णी यांनी स्क्रीन शॉट घेतले रेकॉर्डिंग केले त्यामुळे आजचा कार्यक्रम ही आम्ही सर्वांपर्यंत पोहचवू शकणार आहोत कदाचित इतरांसाठी हे फार मोठे नसेल पण टेक्नॉलॉजीचे शून्य ज्ञान असणाऱ्या आमच्यासाठी ते फार भारावून टाकणारे आहे आणि वेबसाईट उपलब्ध होती म्हणून आम्ही हे करु शकलो आणि वेबसाईट उपलब्ध करण्याचे सर्व क्रेडिट अतुल ठाकूर यांच्याकडे जाते. त्यांच्याबद्दल आणि त्यांचे पार्किन्सन्स मंडळासाठीचे योगदान याबद्दल स्वतंत्रपणेच लिहावे लागेल. 



No comments:

Post a Comment