Wednesday, 30 December 2020

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ६३

                                               पार्किन्सन्सविषयक गप्पा  - ६३

                                        पार्किन्सन्सवर नियंत्रण आणणारा एक रामबाण उपाय मला माहित आहे.हा प्रयोगाने कोठेही सिद्ध झालेला नाही.तरीही यावर कोणी आक्षेप घेईल असे वाटत नाही.आमच्या अनेक शुभार्थींच्यावर याचा झालेला उपयोग मी पाहिलेला आहे.उत्सुकता वाढली ना? सांगते सांगते.मंडळी नातवंडाचे आगमन हा तो उपाय.ज्यांच्याकडे नातवंड आली त्यांना नक्की पटले असेल.तसे प्रत्येकालाच ही दुधावरची साय निर्भेळ आनंद देते.पण पार्किन्सन्स शुभार्थींच्याबाबत ही साय त्यांचा आजार विसरायला लावते  हे महत्वाचे.

                                     आमचे मंडळाचे संस्थापक मधुसूदन शेंडे यांच्या उत्साहाला अमेरिकेहून मुले नातवंडे आली की उधाण येत असे.दुसरे संस्थापक शरच्चंद्र पटवर्धन यांच्या घरी त्यांच्या मुलाला मुलगा झाला म्हणून आम्ही सर्व पहायला गेलो होतो.नेहमी थकलेल्या पटवर्धन वहिनी उत्साहित दिसत आहेत हे सर्वाना जाणवले.त्यांनीही हसत हसत याला दुजोरा दिला.आमच्याकडेही नातवंडे आली की ह्यांचा एखादा डोस विसरला जातो पण त्याने काही फरक पडत नाही.

                                 हे सर्व आत्ताच आठवायचे कारण म्हणजे मृदुला कर्णीला ५/६ महिन्यापूर्वी नातू झाला.सध्या लॉकडाऊनमुळे घरून काम करायचे आहे त्यामुळे मुलगा, सून पुण्यात आहेत.मृदुलाकडे फोन केला की  नातवाबद्दल किती सांगू आणि किती नको असे तिला होते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे शुभार्थी कर्णी यांच्या वागण्यात नातवंड आल्यापासून खूपच बदल झाला.ते आनंदी असतात. त्यांची एक गोळी कमी झाली.पार्किन्सन्स  मित्रमंडळाचा सोमवारी 'भेटू आनंदे' हा ऑनलाईन  कार्यक्रम असतो.२८ तारखेच्या सोमवारी शुभंकरांच्या अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम होता.त्यावेळी मृदुला  आणि त्यांच्याकडे अनेक वर्षे असलेला केअरटेकर रवी यांनी कर्णी यांच्यात झालेल्या बदलाची माहिती सांगितली.कर्णी यांचे मूड स्विंग असायचे ते कमी झाले.नातू रडला की ते सर्वांना रागवतात.नातवाची छोटी छोटी कामे आवडीने करतात.स्वत:च्याच कोशात असणारे कर्णी आता कुटुंब प्रमुखाच्या अविर्भावात वावरत असतात.मृदुलाचा गोड नातू आयुष त्याच्याही नकळत आजोबांचा शुभंकर झाला आहे.या छोट्या शुभंकराचे  स्क्रीनवर दर्शनही झाले.सभेत उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच ते सुखावह वाटले.

                                           

                                   

                                 

Saturday, 19 December 2020

आठवणीतील शुभार्थी - नारायण कलबाग

                                                  आठवणीतील शुभार्थी - नारायण कलबाग

                          ' परंतु यासम हा' असे ज्यांच्याबद्दल म्हणता येईल असे आमचे कलबाग काका होते. आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान.उर्जा स्त्रोत,तन,मन धनानी  पार्किन्सन्स मित्रमंडळाशी  एकरूप झालेले कलबागकाका म्हणजे जेष्ठ शुभार्थी नारायण कलबाग.यांचे ३० सप्टेंबर २०२० ला ९६ व्या वर्षी निधन झाले.तसे त्यांचे जाणे अनपेक्षित नव्हते.तरीही ते सेन्चुरी नक्की करतील असे वाटत होते.त्यांच्याशी अजून किती तरी विषयावर बोलायचे होते सर्व राहून गेले.माझा शेवटचा फोन lock down च्या काळात झाला.

                         .कलबागकाका  हे आदर्श शुभार्थी  (पेशंट ) होते..त्यांच्या पत्नीलाही पार्किन्सन्स होता.त्या डॉक्टर होत्या. त्या गेल्यावर काका  एकटेच राहात.रडत कण्हत नाही तर गाण म्हणत.फक्त स्वत:पुरते पाहत  नाही तर इतरांनाही मदत करत.स्वत:चा पार्किन्सन्स त्यांनी नीट समजून घेतला होता.. त्यानुसार दिनचर्या आखली.छानशी सपोर्ट सिस्टिम तयार केली.

                          Lock down काळात त्यांच्याकडे येणारा मसाजवाला सकाळी थोड्या वेळासाठी आणि रात्री येणारा केअर टेकर येत असेल का अशी काळजी मला वाटत होती..म्हणून चौकशीसाठी सारखा फोन करत होते त्यांचा लैंडलाइन लागत नव्हता. ते हल्ली काही वेळा मुंबईला भाच्याकडे राहतात. तेथे असतील असे वाटले. मोबाईलही लागत नव्हता. थोडी काळजी वाटत होती आणि एक दिवशी त्यांचाच फोन आला मला हायसे वाटले. नेहमी सारखा स्पष्ट आवाज.त्यांच्या पत्नीच्या पार्किन्सन्स बद्दल,त्यांच्या भाचीने पाठवलेल्या सपोर्ट ग्रुपच्या पुस्तकाबद्दल अशा खुप गप्पा झाल्या.

             मधल्या काळात त्यांना भोवळ आली होती त्यांचे भिंतीवर डोके आपटले ते खाली पडले. बराच वेळ पडून होते. काम करणारा माणूस आल्यावर भाची ला फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे दोन-तीन दिवस राहावे लागले. भाची काही दिवस राहिली आणि ती आता परत कॅनडाला गेली आहे डॉक्टरने सांगितले आता एकटे राहायचे नाही त्यामुळे आता चोविस तास एक माणूस असतो.हे सर्व कथन ते कोणतेही भयंकरीकरण न करता सांगत होते. अगदी सर्दी खोकला झाला होता आणि डॉक्टर कडे गेलो होतो इतक्या सहजतेने सांगत होते.

                              त्यांच्या फोनच्या डीपीवर आमच्या मंडळाच्या सहलीच्या वेळचा वसू देसाई आणि सरोजिनी कुर्तकोटी त्यांच्याशी बोलत असतानाचा फोटो होता. ते मला सांगत होते तुमच्या दोघांचा बाकावर बसलेला फोटो आहे तो माझ्यासमोर ठेवलेला आहे. मी एकदम नीशब्द झाले.बहुता भाचीने काही फोटोची हार्ड कॉपी काढून दिली असावी का? त्यांच्यासाठी आम्ही सर्व त्यांचे कुटुंबीय होतो म्हणून ते मुंबईवरूनही मोठ्या आवडीने मासिक सभेला येत.सह्लीना येत.
                          मंडळात ते सामील झाले तेंव्हा बहुदा त्यांची  ८५ वर्षे उलटून गेली होती.मध्यंतरी आता हयात नसलेल्या जुन्या शुभार्थीच्या घरी जाऊन भेटी द्यायचे ठरले कलबागांची पत्नी पेशंट होती.शेखर बर्वे त्यांच्या घरी गेले तर कलबागांची भेट झाली.ते म्हणले मला आता पार्किन्सन्स झाला आहे मला मंडळात सामील करून घ्या.ते सामील झाले आणि आमच्यातलेच झाले.सभेच्यावेळी फार बोलता येत नसे पण सहलीत गप्पा होत. त्यांचे नवनवीन पैलू तुकड्यातुकड्याने समजत गेले.त्यांच्या तरुणपणातील मुंबईच्या साहित्यिक,सांस्कृतिक, वैद्यकीय,शैक्षणिक वर्तुळात त्यांचा संचार होता.त्या काळाचा ते चालताबोलता इतिहास होते.आचार्य अत्रे,विजय तेंडुलकर,वसंत देसाई अशी बुजुर्ग मंडळी त्यांच्या उठण्या बसण्यातील होती.वसंत देसाई यांच्या कार्यक्रमात ते सहभाग ही घेत असत.
                          .त्यांनी न्यूरॉलॉजिकल आजारावरची वृत्तपत्रातील, मासिकातील कात्रणे काढून ठेवली होती.ती वेगवेगळ्या आजारानुसार लावून ठेवली होती.ती त्याना आमच्याकडे सुपूर्द करायची होती.त्यांच्याकडे येणाऱ्या केअरटेकरच्या मुलीची शिक्षणासह सर्व जबाबदारी त्यांनी घेतली होती.ते दीडदोन तास सलग बोलायचे.दमतील म्हणून त्याना थांबावावे लागायचे.
                         माझे नाव त्याना आठवायचे नाही मग ते डॉक्टर म्हणायचे.मागच्या वर्षीच्या सहलीत दुपारी कोणाला आराम करायचा असेल तर वेळ ठेवला होता.कलबाग म्हणाले डॉक्टर जरा बसा बोलायचे आहे.मला त्यांनी विश्रांती घ्यावी असे वाटत होते.पण गप्पा हीच त्यांची विश्रांती असावी.बसमधून येताना त्याना छोटी छोटी गावे दिसली.आय.एम,ए.चे अध्यक्ष अविनाश भोंडवे त्यांचे Family Doctor. त्यांच्याशी बोलतो हे फॉर्म हाऊस छान आहे येथे डॉक्टर्सची मिटिंग घेऊन आजूबाजूच्या गावातील वैद्यकीय प्रश्नांचा  आढावा घ्यावा.ते प्रश्न सोडवावे असा त्यांचा विचार होता.त्यासाठी फार्महाउसचा फोन नंबरही त्यांनी घेतला.आम्ही बसमधून येताना गमती जमती करत होतो पण हा अनेक आजार असलेला ९५ वर्षाचा तरुण भोवतालच्या खेड्यांचा विचार करत होता.त्यांची यासाठी पैसे खर्च करायची तयारी होती. त्यांच्याविषयीच्या आदरानी मी नतमस्तक झाले.असे क्षण त्यांनी वेळोवेळी दिले.नंतर त्यांच्या  डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली.ते बरेच दिवस भाच्याकडे मुंबईला होते.हा विषय मागे पडला असावा.
                          सोमवार ११ डिसेंबर ला पार्किन्सन्स मित्रमंडळ सभा नर्मदा या नव्या वास्तुत होणार होती  कलबागकाकांचा  फोन आला.नव्या वास्तुत पहिलीच सभा होणार तर ईश्स्तवनाने सुरुवात करूया.फोनवरून त्यांनी २/३ प्रार्थना म्हणून दाखविल्या.या वयातही आवाजात अजिबात थरथर नाही,सुरेल आवाज. मी लगेच होकार दिला. सभेची सुरुवात त्यांच्या प्रार्थनेनेच झाली.ऐनवेळी आमचा स्पीकर चालू झाला नाही.त्यांची दमणूक झाली.तरीही त्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोचला.सर्वजण भारावून गेले..ते अनेक वर्षे सभांना येतात पण त्यांचे गान  कौशल्य आमच्या नव्यानेच लक्षात आले होते.
                              त्यावर्षी आम्ही एप्रिलमधील जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात कलबाग काकांचे इशस्तवन ठेवायचे ठरवले. आत्तापर्यंत २/४ शुभार्थी आणि त्यांना आधारासाठी १/२ शुभंकर (केअरटेकर) असा इशस्त्वनात सहभाग असायचा.आम्ही हे धाडस केले असले तरी मनातून थोडी धाकधूक होती.नेहमी इशस्तवन म्हणायला ५/६ जण असल्याने.एकाची काही अडचण आली तर बाकीचे असतात.पण येथे ते एकांडा शिलेदार असणार होते.वय,पीडी,त्यांचे इतर आजार उन्हाळा,विविध आजाराच्या साथी असे विविध प्रतिकूल घटक ऐनवेळी दगा देवू शकले असते हे लक्षात घेऊन आम्ही कार्यकारिणीतीलच काहींनी मिळून एक इशस्तवन तयार ठेवले होते. सकाळी त्यांचा फोन आला.'मी बरोबर पावणे चार वाजता हॉलवर हजर असेन मला सोडायला येणाऱ्या माणसाच्या नातीला माझी प्रार्थना ऐकायची आहे. तिची शाळा सुटली की तिला घेऊन आम्ही येऊ?'त्याप्रमाणे ते आलेही.
                                  ते चार खुराची काठी वापरतात.त्यांना धरून वर नेले. बसायला खुर्ची ठेवली होती ती त्यांनी नाकारली आणि उभे राहणे पसंत केले'.मी गणेश वंदना,ध्यान वंदना आणि सरस्वती वंदना म्हणणार आहे यासाठी मला  तीन मिनिटे पंधरा सेकंद लागतील' असे सांगत त्यांनी काठी कडेला ठेवली आणि हातात माईक धरून नमस्कार करत ओंकाराने सुरुवात केली.त्यांचा स्टेजवरचा वावर,स्पष्ट शब्दोच्चार,स्तवनातील भावपूर्ण तन्मयता, सुरेलपणा, थक्क करणारा होता.एका हातात माईक आणि दुसऱ्या हाताने हातवारे करत ते गात होते   त्यांचे आजार आणि वय पाहता त्यांचा सहभाग प्रेररणादायीच होता.गाताना एकदाच क्षणभर त्यांचा तोल जात होता आणि त्यांनी काठी धरली.आमची कार्यकर्ती सविता तेथे होतीच पण निमिषात त्यांनी स्वत:ला सावरले.प्रार्थना संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.सर्व सभागृह भारावून गेले होते.प्रमुख पाहुणे डॉक्टर उल्हास लुकतुके यांनीही आपल्या भाषणात त्यांचे भरभरून कौतुक केले.
                       त्यांच्याकडे सांगण्याजोगे  खूप होते..कोणीतरी त्यांच्याशी  बोलून हे शब्दबद्ध केले पाहिजे.त्यांच्या दिनचर्येचा व्हिडिओ केंला पाहिजे असे आम्हाला  वाटत होते.पण सर्व राहूनच गेले याची फारफार हळहळ वाटते.
.आपल्या परिवारातील वडिलधारे माणूस गेल्याची भावना आम्हा सर्वांच्याच मनात आहे.कलबागकाका आमच्यासाठी तुम्ही कायम प्रेरणा स्थान राहाल.