Wednesday, 18 March 2020

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ५१

                                                      पार्किन्सन्स विषयक गप्पा - ५१
                                    मंडळाचे ब्रोशर करण्यासाठी जुने फोटो शोधताना अचानक विस्मृतीत जाऊ पाहणारे काही आनंददायी क्षण गवसले.इकेबानात रमलेले शुभार्थी हा त्यातील एक.
प्रत्येक वर्षी जानेवारीत तिळगुळ समारंभ असतो आणि आजाराविषयी व्याख्यान न ठेवता काही तरी वेगळा विषय ठेवला जातो. १४ साली एक व्याख्यात्या 'आनंदी कसे राहायचे' हे सांगायला येणार होत्या पण सभेला चार पाच दिवस राहिले असताना मी येऊ शकत नाही असा त्यांचा निरोप आला.आता ऐनवेळी नवा वक्ता शोधावा लागणार होता.आमच्यातल्याच उत्साही शुभंकर शीलाताई वाघोलीकर म्हणाल्या मी इकेबानावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान देऊ का? याला कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत शंकाच होती पण ठेऊन तरी पाहू असा विचार करून  असे व्याख्यान ठेवायचे ठरले..शीलाताईनी इकेबाना संबंधित बॉम्बे ओहारा स्कूलची विविध पदे भूषवली होती.१९७९ पासून त्या जपानी इकेबाना कलेशी संबंधित होत्या.त्यांनी इकेबानाची प्रदर्शने भरविली होती.अनेक विद्यार्थिनी तयार केल्या होत्या.पण शुभार्थीना तास दीड तासात काय शिकवणार ही शंका आमच्या मनात होतीच.पण शीलाताईंनी ही शंका निराधार ठरविली.कृतीतून आनंद लुटला.
                           शीलाताई पूर्ण तयारीनिशी आल्या होत्या.त्यानी प्रत्येक शुभार्थीना पुष्परचना करायला लावल्या.चौकोनी आकारात टेबले आणि खुर्च्या मांडल्या होत्या. ३० शुभार्थी होते.प्रत्येकाला छोटा Bowl पाण्यात भिजवलेले Oasis घालून दिलेला होता. लाल Carnations,पांढरी शेवंती,काही पाने आणि fern दिले होते.सुरुवातीला काही पुष्परचना दाखवून त्यांनी शुभार्थीकडून पुष्परचना करून घ्यावयास सुरुवात केली.शुभार्थी भान विसरून पुष्परचना करत आहेत आणि ते दृश्य पाहण्यास त्यांचा पार्किन्सन्सही थबकला आहे हे दृश्य मनोहारी होते.शीलाताईंनी केलेल्या पुष्परचना आणि शुभार्थींच्या पांढऱ्या,लाल,हिरव्या रंगातील ३० पुष्परचना यामुळे वातावरणात प्रसन्नता आणि वेगळीच उर्जा जाणवत होती.शुभार्थीनी झालेला आनंद आपल्या मनोगतातून व्यक्त केला.ठरलेल्या वक्त्या आल्या नाहीत हे किती बरे झाले हे अनेकांनी बोलून दाखवले.उद्यापासून घरी अशा पुष्परचना करू असे काहींनी सांगितले.शिलाताईंनी  पुष्परचना ज्यांच्या त्यांना भेट दिल्या.संक्रांतीचे  वाण समजा म्हणाल्या.फुलांसाठी झालेला खर्च मंडळ त्यांना देऊ करत होते पण त्यांनी घेतला नाही.शुभार्थीना मिळालेला आनंद हीच त्यांना मोठ्ठी भेट वाटत होती.
                      यानंतर बरेच दिवस माझे यजमान घरी पुष्परचना करत होते.एकदा शीलाताई घरी आल्या होत्या त्यानाही ह्यांनी केलेली पुष्परचना पाहून खूप आनंद झाला.
                       सांगलीच्या शुभार्थी गीता पुरंदरे,मुंबईचे शुभार्थी मोहन पोटे त्यांनी लावलेल्या बागेतील फुलांचे फोटो पाठवत असतात.हा लेख वाचून आणि फोटो पाहून हे शुभार्थी तसेच ज्यांच्याकडे बाग आहे ते शुभंकर, शुभार्थी रोज नवी पुष्परचना करण्यास नक्की प्रवृत्त होतील.
                       
                            



No comments:

Post a Comment