Wednesday, 18 March 2020

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ५१

                                                      पार्किन्सन्स विषयक गप्पा - ५१
                                    मंडळाचे ब्रोशर करण्यासाठी जुने फोटो शोधताना अचानक विस्मृतीत जाऊ पाहणारे काही आनंददायी क्षण गवसले.इकेबानात रमलेले शुभार्थी हा त्यातील एक.
प्रत्येक वर्षी जानेवारीत तिळगुळ समारंभ असतो आणि आजाराविषयी व्याख्यान न ठेवता काही तरी वेगळा विषय ठेवला जातो. १४ साली एक व्याख्यात्या 'आनंदी कसे राहायचे' हे सांगायला येणार होत्या पण सभेला चार पाच दिवस राहिले असताना मी येऊ शकत नाही असा त्यांचा निरोप आला.आता ऐनवेळी नवा वक्ता शोधावा लागणार होता.आमच्यातल्याच उत्साही शुभंकर शीलाताई वाघोलीकर म्हणाल्या मी इकेबानावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान देऊ का? याला कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत शंकाच होती पण ठेऊन तरी पाहू असा विचार करून  असे व्याख्यान ठेवायचे ठरले..शीलाताईनी इकेबाना संबंधित बॉम्बे ओहारा स्कूलची विविध पदे भूषवली होती.१९७९ पासून त्या जपानी इकेबाना कलेशी संबंधित होत्या.त्यांनी इकेबानाची प्रदर्शने भरविली होती.अनेक विद्यार्थिनी तयार केल्या होत्या.पण शुभार्थीना तास दीड तासात काय शिकवणार ही शंका आमच्या मनात होतीच.पण शीलाताईंनी ही शंका निराधार ठरविली.कृतीतून आनंद लुटला.
                           शीलाताई पूर्ण तयारीनिशी आल्या होत्या.त्यानी प्रत्येक शुभार्थीना पुष्परचना करायला लावल्या.चौकोनी आकारात टेबले आणि खुर्च्या मांडल्या होत्या. ३० शुभार्थी होते.प्रत्येकाला छोटा Bowl पाण्यात भिजवलेले Oasis घालून दिलेला होता. लाल Carnations,पांढरी शेवंती,काही पाने आणि fern दिले होते.सुरुवातीला काही पुष्परचना दाखवून त्यांनी शुभार्थीकडून पुष्परचना करून घ्यावयास सुरुवात केली.शुभार्थी भान विसरून पुष्परचना करत आहेत आणि ते दृश्य पाहण्यास त्यांचा पार्किन्सन्सही थबकला आहे हे दृश्य मनोहारी होते.शीलाताईंनी केलेल्या पुष्परचना आणि शुभार्थींच्या पांढऱ्या,लाल,हिरव्या रंगातील ३० पुष्परचना यामुळे वातावरणात प्रसन्नता आणि वेगळीच उर्जा जाणवत होती.शुभार्थीनी झालेला आनंद आपल्या मनोगतातून व्यक्त केला.ठरलेल्या वक्त्या आल्या नाहीत हे किती बरे झाले हे अनेकांनी बोलून दाखवले.उद्यापासून घरी अशा पुष्परचना करू असे काहींनी सांगितले.शिलाताईंनी  पुष्परचना ज्यांच्या त्यांना भेट दिल्या.संक्रांतीचे  वाण समजा म्हणाल्या.फुलांसाठी झालेला खर्च मंडळ त्यांना देऊ करत होते पण त्यांनी घेतला नाही.शुभार्थीना मिळालेला आनंद हीच त्यांना मोठ्ठी भेट वाटत होती.
                      यानंतर बरेच दिवस माझे यजमान घरी पुष्परचना करत होते.एकदा शीलाताई घरी आल्या होत्या त्यानाही ह्यांनी केलेली पुष्परचना पाहून खूप आनंद झाला.
                       सांगलीच्या शुभार्थी गीता पुरंदरे,मुंबईचे शुभार्थी मोहन पोटे त्यांनी लावलेल्या बागेतील फुलांचे फोटो पाठवत असतात.हा लेख वाचून आणि फोटो पाहून हे शुभार्थी तसेच ज्यांच्याकडे बाग आहे ते शुभंकर, शुभार्थी रोज नवी पुष्परचना करण्यास नक्की प्रवृत्त होतील.
                       
                            



Monday, 16 March 2020

डॉक्टर ह.वी.सरदेसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली

     डॉक्टर ह.वी.सरदेसाई  यांना भावपूर्ण श्रद्धांजली

                     वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य व्क्तीम्त्व असलेले डॉक्टर ह.वी.सरदेसाई यांचे रविवार दि.१५ मार्च रोजी दु:खद निधन झाले.पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.पार्किन्सन्स मित्रमंडळासाठी ते आधारवड होते.२०१२ च्या जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त्च्या मेळाव्यात ते अध्यक्ष होते. त्यांच्या मौल्यवान विचाराचा व्हिडीओ मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.त्यांनी स्मरणिकेसाठी लेखही लिहून दिला.त्याची लिंक सोबत दिली आहे.शेखर बर्वे यांचे 'पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत' हे पुस्तक असो की स्मरणिका असो त्यांनी त्यावर सुरेख  स्वहस्ताक्षरात प्रतिक्रिया दिल्या त्यांचे कौतुकाचे शब्द आमच्यासाठी कोणत्याही पुरस्काराइतकेच महत्वाचे आहेत.
                 त्यांची उणिव आम्हाला नेहमीच भासत राहील.

https://www.parkinsonsmitra.org/?p=66
https://www.parkinsonsmitra.org/?page_id=22


                                         

Sunday, 15 March 2020

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ५०

                                                   पार्किन्सन्स विषयक गप्पा - ५०
                              माझ्या मुलीचा दोन  दिवसापुर्वी फोन आला 'आई बाबांना बागेत हास्यक्लबला पाठवू नको.' तिच्या मते बाबांची लाळ गळते म्हणून ते सतत रुमाल तोंडाकडे नेतात. तो खाली ठेवतात तोच पुन्हा तोंडाकडे नेतात.करोना व्हायरस कोणत्याही स्त्रावातुंनच तुमच्यापर्यंत पोचू शकतो त्यामुळे त्यांनी न जाणेच बरे.तिचे बाबा  काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पण कालपासून बागेत येणाऱ्याना बाग बंद करण्यात आली. आणि माझी समस्या सुटली.पण या निमित्ताने सर्वच शुभंकर, शुभार्थींशी या विषयावर गप्पा माराव्या असे वाटले.मी गप्पा म्हणत आहे कारण मी जे सांगते आहे ते तज्ज्ञ म्हणून नाही तर अनुभवाचे बोल आहेत.आपणही आपले अनुभव सांगावे.आणि माझ्या लिखाणात काही उणिवा असल्यास त्याही सांगाव्यात.
                           करोना व्हायरसमुळे सगळीकडे घबराट निर्माण झाली आहे.तसे घाबरण्याचे कारण नाही.सोशल मिडीयावर सातत्याने काय काळजी घ्यावी ते सांगितले जात  आहेच.पण पार्किन्सन्स पेशंटसाठी विशेष काय काळजी घ्यावी हे मात्र निट समजून घेतले पाहिजे.
                         पार्किन्सन्स शुभार्थी बरेचसे जेष्ठनागरिक असतात. त्यातच पीडीमुळे विविध अवयवात ताठरता येते.श्वसनमार्गात सुद्धा ती असते त्यामुळे पूर्ण श्वास घेण्याची क्रिया मुळातच होत नसते.श्वसनाशी सबंधित लक्षणे असणाऱ्या आजारांना तोंड देणे त्यांना शक्य नसते आणि करोनाचे श्वास घेण्यात अडथळा हे एक लक्षण असते.त्यामुळे जनसंपर्क टाळावा.
                   सर्वसामान्य माणसाना लाळ गीळण्याची प्रक्रिया सहज होत असते पण शुभार्थीना गिळण्याशी संबंधित स्नायूच्या ताठरतेमुळे गिळण्याची समस्या असते. लाळ अपोआप गिळण्याची प्रक्रिया होत नाही.ती तोंडात साठून राहते मग जास्त लाळ झाली की तोंडातून अनियंत्रीतपणे गळत राहते.अर्थात सर्वच शुभार्थीची ही समस्या नसते.करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तोंडाकडे सारखा हात लावू नये असे सांगितले जाते.पण लाळ गळणाऱ्या पीडी शुभार्थीना हे शक्य नसते.यासाठीही जनसंपर्क टाळावा.
                 पीडी शुभार्थीना मुळातच त्यांच्या लक्षणामुळे सामजिक भयगंड असतो.आत्मविश्वास कमी होतो  तो जाण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. लोकात जास्तीतजास्त मिसळायला सांगितले जाते आणि आता याच्या उलटे जन संपर्क टाळायला सांगितले जात आहे.येथे हे  काही काळासाठीच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच प्रत्यक्ष जनसंपर्क टाळला तरी  फोनवर सोशल मिडीयावर तुम्ही संपर्कात राहू शकता.मंडळाचे पार्किन्सन्स गप्पा आणि पार्किन्सन्स इन्फो असे दोन whats App group आहेत यावर तुम्ही गप्पा मारू शकता.येथे सातत्यने कोडी येतात ती सोडवू शकता.
                  नेहमीचे व्यवहार बंद होऊन घरीच बसायचे तर सर्वसामान्यांना सुद्धा कंटाळवाणे वाटते.उदास वाटू शकते. पीडी शुभार्थीच्या बाबतीत तर आजाराचा भाग म्हणून नैराश्य,निरसता (Apathy ) हे दाराशीच दबा धरून बसलेले असतात. येथे शुभंकराची जबाबदारी वाढते.वेळ आनंदात जावा यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आधीच ठरवून ठेवाव्यात.एकत्र कोडी सोडवावीत,युट्युब वर अनेक चांगले चांगले ओंडीओ,व्हिडीओ उपलब्ध आहेत शुभार्थीची आवड पाहून ते ऐकावेत पाहावेत.माझ्या यजमानांना आयपीएचचे व्हिडीओ,दासबोध,कीर्तने असे वाध्यात्मिक व्हिडीओ,कवितेचे पान हे आवडतात. मी ते लावत असते.ओरिगामी इतर हस्तकौशाल्याचेही पाहून करण्यासाठी व्हिडिओ उपलब्ध आहेत ते करू शकता.पेंटिंग,विणकाम चित्रकला करू शकता. फक्त रंगवू शकाल अशी चित्रे असलेली पुस्तकेही मिळतात.ती तर सर्वांसाठीच मन रमवणारी.जुने चित्रपट,जुनी चित्रपटातील गाणी ही सुद्धा आनंद देतात.रमेश तिळवे कचऱ्यातून कला निर्मिती सातत्याने करतात,आपल्या सर्वांनाच त्या आनंद देतात. तसे प्रयोग करून पाहता येतात.काही शुभंकर, शुभार्थी बागकामाचा छंद जोपासतात.नामस्मरण,ध्यान,प्राणायाम,व्यायाम या गोष्टीही मन रमवतात. ही जंत्री खूप मोठ्ठी होऊ शकते.महत्वाचा मुद्दा काय तर आपल्याला आनंदी राहायचे आहे नैराश्याला फिरकू द्यायचे नाही.थोड्या दिवसांचा प्रश्न आहे भरकन निघून जातील.
        ( नमुन्यासाठी शुभार्थी,शुभंकरांच्या काही कलाकृती दिल्या आहेत.)