Saturday, 6 April 2019

क्षण भारावलेले - ८

                                                  क्षण भारावलेले - ८
                                     वेबसाइटच्या कामासाठी अतुल ठाकूर आणि माझे नेहमीच फोनवर बोलणे होत असते. त्या दिवशी अतुलनी विचारलं 'शीला ताई कशा आहेत येतात का सभेला?'. आणि माझ्या लक्षात आले बरेच दिवस शीलाताईना फोन करायचं पेंडिंग आहे. अतुलनी फोन ठेवल्या ठेवल्या मी लगेच शीलाताईना फोन केला. एकमेकांच्या तब्येतीची चौकशी, जुन्या आठवणी आणि भरपूर गप्पा झाल्या. आता प्रत्यक्ष भेटणे अशक्यच आहे.फोनवरच भेटत राहू असा संभाषणाचा शेवट झाला. त्यांचा पार्किन्सन्स वाढलेला असला तरी बोलणं अजूनही स्पष्ट आणि खणखणीत आहे.बोलता बोलता मी खानापूर येथील सनवर्ल्डला' समृद्ध जीवन कार्यशाळे'साठी जाणार असल्याचे सांगितले.त्यांनी माझ्याकडून फोन नंबर घेतला.
                                   रात्री दहा वाजता शिलाताईंचा फोन आला. ' .अग शोभा  उद्या मीही येत आहे कार्यशाळेला. पैसेही भरले..माझ्या केअरटेकरलाही घेवून येणार.' मी आवाक अशा अवस्थेत यायचे धाडस शिलाताईच करू जाणे..२००८ पासून त्याना विविध अवस्थेत आणि त्या अवस्थेनुसार फिरुनी नवी जन्मेन मी म्हणत,स्वत:ला बदलत आनंदाचा मार्ग निवडताना मी पाहिले.
                                   शीलाताई आणि अनिल कुलकर्णी हे हरहुन्नरी,उत्साही जोडपे. २००८ ला दिनानाथ हॉस्पिटल मध्ये पहिली कार्यशाळा झाली त्यावेळी  आमच्यात सामील झाले.दोघानाही पीडी होता.दोघेही एकमेकाचे उत्तम शुभंकर.अमेरिकेतील सपोर्ट ग्रुप पाहून काही कल्पना घेऊन ते आले होते.शीलाताई डॉक्टर,अनिल कुलकर्णी केपीआयटीचे व्हाईस प्रेसिडेंट.त्यांनी व्हिजन ,मिशन सर्व ठरवत कामाचा आराखडा तयार केला.कार्यशाळेत आलेल्या श्रोत्यांचे पुण्यातील विभागानुसार गट केले.कोथरूड गटाचे काम यशस्वीरीत्या केले.संगणकाचा वापर करायला त्यांनी शिकविले.अनेक अफलातून कल्पना त्याना सुचत.त्यांनी मंडळाच्या कामाची गती वाढवली.सुचित्रा दाते यांच्या नृत्योपाचारात शेंडे,तीर्थळी,कुलकर्णी पती पत्नी सामील झालो.पटवर्धनही कधीतरी यायचे.शीलाताई आणि तीर्थळी सिन्सिअर विद्यार्थी. त्यांच्या फॉर्महाउसवरही एकत्रित जायचो कधी कधी सभा त्यांच्या घरी व्हायच्या.आमची अगदी घट्ट मैत्री झाली.
                              या काळात त्यांचे विणकाम,नव्याने शिकलेली चित्रकला, पेटी शिकणे हे चालूच होते.त्यांची फ्रीजिंगची समस्या वाढली होती.तशाही अवस्थेत त्या मुलीच्या बाळंतपणासाठी  अमेरीकेला गेल्या.डिंकाचे लाडू वगैरे साग्रसंगीत स्वहस्ते केले.तेथे बरेच दिवस राहिल्याने कामातील सहभाग कमी झाला.त्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर, त्यातूनही बाहेर आल्या.कार्यकारिणीच्या सभांना अनिल कुलकर्णी एकटेच येत.शीलाताइंचे येणे बंद झाले.सभा सहली यात सामील होणे चालूच होते.दोनदा त्यांच्या फॉर्महाउस वर सहल गेली.त्यांची अमेरिकेत राहणारी मुलगी पुण्यात त्यांच्या वर राहायला आली.नातवंडे जवळ असल्याने दोघेही खुश राहू लागले.
                             सगळे छान चालू होते आणि घरातच अनिल कुलकर्णी पडले.बरेच दिवस शय्याग्रस्त झाले.शीलाताई ५/६ महिने घरातून बाहेरही पडू शकल्या नाहीत.अनिलना त्या सतत जवळ हव्या असायच्या.
यातून बरे होऊन ते दोघेही सभेला आले आणि आम्हाला खूप आनंद झाला.पण तो फार काळ टिकणारा नव्हता.दुखणे वाढत गेले.आणि अनिल हे जग सोडून गेले.माझी तब्येत बरी नसल्याने मी शीलाताईना भेटायलाही जाऊ शकले नाही.या सर्व काळात शीलाताई शांतचीत्तच होत्या.त्या अनिल गेल्यावर प्रथमच सभेला आल्या.त्याना पाहून मला भावना अनावर झाल्या.त्यांना एकट्या पहायची सवय नव्हती. त्यांनी माझीच समजूत काढली. स्मरणिकेसाठी त्यांनी अनिल कुलकर्णी यांच्यावर लेख लिहून दिला.त्यांच्या प्रेमकहाणीपासून सर्व लिहिले होते त्यांच्यातील अद्वैत लेखनातून जाणवत होते.त्या त्यांना  डॅडी म्हणायच्या.ते अजूनही त्यांच्या बरोबरच आहेत असे त्यांच्या वागण्यातून जाणवत राहते.
                            यानंतर त्या शांतीवन सहलीला आल्या.मनोरंजनाच्या कार्यक्रमात  यांनी एक विनोद सांगितला.'एका माकडाने काढले दुकान' हे बालगीत ठसक्यात म्हणत स्वत:तील लहान मुल जपल्याचे दाखवून दिले. सहलीत विजय ममदापुरकर यांनी काढलेली  कार्टून पाहून त्यांना पुन्हा चित्रकलेची हुक्की आली.
                         दैवाला पुन्हा त्यांची खोडी काढायाची लहर आली. त्यांना मेंदूची वेगळीच  समस्या सुरू झाली.काही क्षणाकरता त्याना काहीच आठवेना झाले.हातातून वस्तू पडत.लगेच त्या  पुर्वव्रत होत.पण आता मुलीला त्यांना कोठे पाठवायची भीती वाटू लागली.शीलाताईनी आता तेथल्याच ज्येष्ठ  लोकांचा ग्रुप बनवलाय आणि त्या दैवाला खोडी माझी कढाल तर म्हणत आनंदीच आहेत.
                      या सर्व पार्श्वभूमीवर त्या खानापूरला येणार याचे मला आश्चर्य वाटले.मी त्यांना रोहिणीताईंना तब्येतीबद्दल कानावर घालायला सांगितले.रोहिणीताई कृतीशील वृद्ध कल्याणशास्त्र तज्ज्ञ असल्याने त्यांनी सहज मान्यता दिली. उलट त्याना आनंदच झाला.सकाळी शीलाताई ठरल्याप्रमाणे आला. आम्ही एकमेकीना मिठी मारली.आमची दोघींचीही भेटण्याची तीव्र इच्छा होती म्हणून ही भेट घडली.  कार्यशाळेत तीन पार्किन्सन्स शुभार्थी ( पेशंट) आणि मी शुभंकर ( केअरटेकर )सामील झालो होतो रोहिणी ताईंनी आमच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन केले.                     
                    शीलाताई एक दिवसच  थांबणार होत्या पण आमच्या खुप गप्पा झाल्या.बोलता बोलता त्यांनी त्यांच्या गळ्यात असलेली शिट्टी वाजवली.त्यांची केअरटेकर लगेच आली. .'घरातही बेल लावण्यापेक्षा हा मार्ग उत्तम. ही  डॅडीची कल्पना' त्या सांगत होत्या.त्यांच्याबरोबर आज मला अनिल कुलकर्णीही कितीतरी दिवसांनी त्यांच्या अफलातून कल्पनेसह भेटत होते.
                   

No comments:

Post a Comment