Monday, 15 October 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा - २८

                                          पार्किन्सन्सविषयी गप्पा -
             
                  मागच्या गप्पात आपण अंजलीने पतीच्या पीडीच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या पातळ्यांवर कसे बदल केले हे पाहिले.
                आशा रेवणकर यांनीही फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवायला नियमित जाण्याचे काम  थांबवले.बालभारतीमध्ये पाठ्यपुस्तक लेखनाचे रोजचे काम तसेच एस.एस.सी बोर्डातील रिसोर्स पर्सन म्हणून काम मात्र चालू ठेवले.हे काम करताना त्या फोनवर उपलब्ध राहू शकतात.त्यांचे पती एकटे राहू शकतात.ते ब्रिज चाम्पियन आहेत अजूनही खेळायला जातात परंतु एकदा ते रस्त्यात पडले.अशी वेळ आली तर फोनवर त्या लगेच उपलब्ध असणे त्याना महत्वाचे वाटले.आणि त्या व्याख्यान देत असल्या तर फोन  बंद ठेवायच्या.आता त्या बराच वेळ घरी असल्याने नकळत त्यांचे पती आनंदी असतात.
               शशिकांत देसाई सुरुवातीची काही वर्षे सभेला एकटेच येत.नंतर त्यांची पत्नी  वसूही सभेला येऊ लागली.देसाईंचा पीडी थोडा वाढला होता.तोल जाणे सुरु झाले,भासही होत.पण वसू नियमित त्यांना सभेला घेऊन येते.सहलीला येते.दिनानाथ हॉस्पिटलमधील गृपलाही नेते.आमची कार्यकारिणी सदस्य असल्याने त्या मिटींगलाही ती त्याना घेऊन येते.तिला लक्षात आले त्यांचे वाचन टी.व्ही.पाहणे अशा सर्व गोष्टी बंद झालेत.ते फक्त बसून असतात.तिने वेळीच त्यांच्या activity वाढतील असे प्रयत्न सुरु केले.त्याना ज्येष्ठांसाठी असलेल  'रेनबो डे-केअर सेंटरचा पर्याय सापडला.सकाळी ९.३० ते ५ पर्यंत ते तेथे राहतात.त्यांची बस न्यायला सोडायला येते.विविध खेळ असतात.समवयस्क असतात. हळू हळू ते हसायला,बोलायला लागले आहेत.
                 एकदा पीडी झाला कि तो कधी न कधी वाढणार आहे हे वास्तव समजून घेऊन त्याला हाताळले की पीडीसह अनादी राहणे सोपे जाते.पीडीच्या वाढीची टांगती तलवार सतत डोक्यावर बाळगायची नाही.आणि जेंव्हा वाढ होते त्यावेळी.हताश न होता घाबरून न जाता त्याच्याशी समायोजन साधण्यासाठी योग्य उपाय करायचा असा समतोल साधण्याची कसरत  शुभंकरालाच करावी लागते.
                            आता या अवस्था म्हणजे नेमके काय ते पाहू. 
                       पार्किन्सन्सचे निदान झाले कि' हा आजार कधीही बरा होणारा नाही. आणि वाढत जाणारा आहे' असे सांगितले जाते. 'असे असले तरी आजार समजून घेऊन योग्य औषधोपचार,व्यायाम,आजाराचा स्वीकार,शुभंकर,स्वमदत गटाचे सहकार्य  या आधारे लक्षणावर नियंत्रण आणता येते. आणि जीवनाची गुणवत्ता वाढवता येत'अशी जोड दिल्यास पहिल्या विधानातील नकारात्मकता आणि भयावहता कमी होते.आमच्या अनेक शुभार्थिनी असे गुणवत्तापूर्ण जीवन जगून आदर्श घालून दिला आहे.
                 आजार वाढत जाणारा आहे. म्हणजे आज निदान झाले.आणि लगेच चार आठ दिवसात तो वाढला असे होत नाही.पीडीच्या अनिश्चितता आणि अनाकलनीयता या स्वभावाचे प्रत्यंतर येथेही येते.प्रत्येकाच्या बाबत वाढीचा वेग वेगळा असतो.या आजाराच्या लक्षणांच्या अवस्थेनुसार पाच अवस्था सांगितल्या जातात.पहिली अवस्था निदान झाल्यावरची लक्षणे दिसू लागण्याची आणि पाचवी शयाग्रस्ततेची.याबाबत फार खोलात न शिरता याबाबतची लिंक सोबत देत आहे.माझ्या पाहण्यात पहिल्या दुसऱ्या अवस्थेतच अनेकजण बराच काळ असतात.मी यातली तज्ज्ञ नाही त्यामुळे याबाबत खोलात न जाता   शुभंकराची  भूमिका कशी महत्वाची  आहे एवढेच  सांगायचे आहे.
https://parkinsonsdisease.net/basics/stages/
                  
अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson's Mitramandal, Pune( https://www.youtube


             


Saturday, 13 October 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा - २७

                                                पार्किन्सन्सविषयी गप्पा  - २७
                            अंजली महाजनच्या घरी मी प्रथम गेले. त्यावेळी ती शाळेत मुख्याध्यापिकेची नोकरी करत होती.तिचे पती केशवराव स्वत:ची काळजी घेऊ शकत होते तिच्या सासूबाईही चांगल्या परिस्थितीत होत्या.ती घरी नसली तरी केशवराव आनंदी राहतील याची योजना तिने करून ठेवली होती.गच्चीतली छोटी बाग केली होती,देवपूजेचे,वर्तमानपत्रे लावून ठेवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले होते.त्यांच्या आवडीच्या महमद रफीच्या गाण्याच्या सीडी आणून ठेवल्या होत्या.दुपारी अडीच तीन पर्यंत ती घरी येई.पण जेंव्हा त्यांना नैराश्य येत आहे,त्यांचा आत्मविश्वास कमी होत आहे  असे लक्षात आले तेंव्हा अंजलीने मुलीशी चर्चा करून स्वेच्छयानिवृत्ती घेतली.'माझ्या पत्नीने घेतली स्वेच्छयानिवृत्ती आणि माझी वाढली आनंदी वृत्ती ' असा लेख केशवरावांनी स्मरणिकेसाठी दिला होता. या लेखाची लिंक सोबत दिली आहे अवश्य वाचा.त्यांची अंजलीच्या उपस्थितीने असुरक्षितता संपली,दिवसभरातील प्रत्येक कृती आनंद देवू लागली. 'केवळ पत्नीच्या उपस्थितीने माझा निम्मा आजार बरा झाला'  असे त्यांनी लिहिले आहे.
                    मी जितक्या वेळा तिच्या घरी गेले तितक्यावेळा तिने त्यांच्या पीडीच्या अवस्थेनुसार  घराची रचना बदललेली दिसली.उदा तिसऱ्या.मजल्यावर घर असल्याने त्यांचे खाली जाणे कमी झाल्यावर तिने बाल्कनी आत घेतली,गज लावून ती बंद केली.त्यावर रुफ केले,झोपाळा लावला,तेथे बसून रस्त्यावर पाहण्यात केशवराव रमू लागले.ती स्वत:सासूबाई आणि पतीचे सर्व करता होती पण जेंव्हा हे अशक्य आहे हे लक्षात आले तेंव्हा तिने ब्युरोचा  माणूस ठेवला.
                  या प्रत्येक निर्णयानंतर नातेवायिक,समजतील इतर यांच्याकडून टीका टिप्पणी होत राहिली.पण अंजली प्रत्येकवेळी निर्णयावर ठाम होती कारण तिने ते विचारपूर्वक घेतले होते.शुभार्थीचा आजार समजून घेतला, शुभार्थीचे सातत्याने निरीक्षण केले कि असे योग्य निर्णय घेता येतात.
                या पीडीच्या अवस्था म्हणजे काय? आणि इतर काही शुभंकरांचे अनुभव पुढच्या गप्पात पाहू.                  केशव महाजन यांच्या लेखाची लिंक.                
https://www.parkinsonsmitra.org/wp-content/uploads/2015/08/SwecchaNivRuti2013.pdf
अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson's Mitramandal, Pune( https://www.youtube


Monday, 1 October 2018

पुस्तक प्रकाशन

                                                       पुस्तक प्रकाशन
                         शुभार्थी डॉक्टर प्रकाश जावडेकर यांच्या' डॉक्टर होणे एक आव्हान ' या पुस्तकाचे ३० सप्टेंबरला प्रकाशन झाले.Continental प्रकाशन सारख्या प्रतिथयश, जुन्या जाणत्या प्रकाशन संस्थेने ते प्रकाशीत केले.प्रकाशन समारंभास डॉक्टर मोहन आगाशे अध्यक्ष होते. प्लास्टिकसर्जन रवीन थत्ते,अर्थोपेडीक सर्जन नंदू लाड हे जावडेकरांचे शिक्षक  मुम्बईहून आले होते.या सर्वांची भाषणे सुटसुटीत,नेमकी वैद्यकीय सध्य परिस्थितीवर आणि डॉक्टर पेशंट यांच्यातल्या संबंधावर भाष्य करणारी होती.जावडेकरांचे मनोगत पुस्तक निर्मितीची पार्श्वभूमी सांगणारे होते.पत्नीच्या आग्रहातून गप्पांना लेखनाचे स्वरूप आले.त्या समीक्षकही बनल्या.याचा  त्यांनी आवर्जून उल्लेख केला.जावडेकरांचे इंदापूरचे वर्गमित्र त्यांचा सत्कार करायला प्रेमाने आले होते.हा तसा कौटुंबिक सोहळा होता.आणखी एक पुस्तक लिहित असल्याची घोषणाही त्यांनी केली.
                         विशेष म्हणजे दीड दोन तासाच्या या कार्यक्रमात जावडेकरांचा पार्किन्सन्स अदृश्यच होता.नंतर पुस्तकावर सह्या घेण्यासाठी लोक गोळा झाले.इतक्या सगळ्या सह्या करतानाही कंपाद्वारे आपले अस्तित्व दाखविण्यास पार्किन्सन्स बहुधा विसरला.
                         डॉक्टर जावडेकर तुमचे मनापासून अभिनंदन.इतर शुभार्थीसाठी तुम्ही प्रेरणा स्थान आहात.पुढील पुस्तकासाठी शुभेच्छा.