आठवणीतील शुभार्थी - वासंती भदे
हल्ली शुभार्थी वासंती भदे यांची मला रोज
आठवण येते.पार्किन्सन्स झालेल्या प्रत्येकाला कंप असतोच असे नाही,अशा
प्रत्यक्षात व्यक्ती पाहता आल्या त्यापैकी शीलाताई कुलकर्णी पहिल्या आणि
वासंती ताई दुसऱ्या.पार्किन्सन्स मंडळाच्या सुरुवातीच्या शुभार्थीपैकी
त्या एक होत्या.त्यावेळी आम्ही कोथरूड,सहकारनगर,शहरविभाग अशा गटवार सभा घेत
होतो.त्या कोथरूड गटाच्या सभेला आपल्याबरोबर पगारी शुभांकाराला घेऊन
नियमित यायच्या.मी पाहिले तेंव्हापासून त्या अगदी ९० अंशात पाठीत वाकलेल्या
आणि एका बाजूला कललेल्या होत्या. माझ्या नवऱ्याबाबतही हेच झाले आहे.
डॉक्टरनी पिसा सिंड्रोम असे त्याचे नाव सांगितले.पिसाच्या मनोऱ्यासारखे एका
बाजूला झुकलेले म्हणून हे नाव दिले गेले.वासंती ताईना पहिले त्यावेळी
ह्याना असे होणार असे वाटले नव्हते.पीडी झाल्यावर १८ वर्षांनी असे झाले.
वासंती ताईना मात्र सुरुवातीच्या काळातच हा त्रास झाला.त्यांची मणक्याची
शस्त्रक्रियाही झाली होती.फिजिओथेरपीने यांचे एका बाजूला कळणे कमी
झाले.पाठीतील बाक कमी होण्यासाठीही उपाययोजना चालू आहेत.त्या
त्यांच्याबरोबर शेअर करता आल्या असत्या असे वाटत राहते.अत्यंत अशक्त,पाठीत
वाकलेल्या अशा अवस्थेतही आनंदी असणाऱ्या,वासंती ताईंच्याबाबत मला नेहमीच
कुतूहल वाटायचे.त्यांच्या कोथरूडच्या घरी घरभेटीला गेलेल्यावेळी हे कुतूहल
शमले.
वासंती ताई
त्याकाळातील बी.ए.होत्या.पीटीसीही केले होते.काही दिवस शिक्षिकेची नोकरी
केली.पती वाईच्या विश्वकोश कार्यालयात नोकरीला होते. निवृत्त झाल्यावर त्या
पुण्यात आल्या.चार विवाहित मुली, सर्व उच्चशिक्षित.दोन अमेरिकेत दोन
पुण्यात.पती निधनानंतर त्या एकट्या राहत होत्या. कोणावर अवलंबून राहायचे
नाही आणि कोणाला भार होऊन राहायचे नाही असा खाक्या असल्याने.मुलीनी
बोलाविले तरी मुलींच्याकडे एक दिवसही राहण्याची त्यांची तयारी
नव्हती.सकाळी एक बाई,रात्रीसाठी एक बाई,आठवड्यातून तीन वेळा फिजिओथेरपी
करायला फिजिओथेरपिस्ट यायच्या.अशी सोय करून देवून येता जाता त्यांच्याकडे
लक्ष देणे असे करण्याशिवाय मुलीनाही गत्यंतर नव्हते.सोबत असणाऱ्या केअर
टेकरशी त्यांचे नोकरासारखे नाही तर मैत्रीचे संबंध होते त्यामुळे एकट्या
असल्या तरी त्यांना एकटेपण जाणवत नव्हते.आपण वाकलो आहोत याची लाज किंवा खंत
त्यांना नव्हती सर्व नातेवाईक.मित्र परिवारात त्या प्रिय होत्या,पीडी
पेशंटना असणारा सोशल फोबिया त्यांना अजिबात नव्हता. लग्न,मुंज,बारसे असे
समारंभ त्या चुकवत नसत.सर्वाना मला भेटून आनंद होतो असे त्या उत्साहाने
सांगत होत्या. कुलधर्म कुलाचार,पोथीवाचन,ज्ञानेश्वरीपठण असा त्यांचा
दैनंदिन कार्यक्रम ठरलेला असायचा.इतरत्र गेले की त्यात व्यत्यय येतो असे
त्याना वाटे.कुरडया,पापड सर्व मी दोन वर्षापूर्वीपर्यंत घरी करत होते असे
त्या सांगत होत्या.आम्ही परतलो तर बाहेर सोडायला आल्या.त्यांच्या अशा
आनंदी वृत्तीमुळे.पार्किन्सन्स त्यांना बिचकून असावा.त्यांच्याबद्द्ल
'अरेरे काय यांची अवस्था' अशी कीव न वाटता.त्यांच्या आनंदी वृत्तीमुळे
प्रेरणाच मिळायची.
अशी
चालती बोलती बाई अचानक गेल्याची वार्ता समजल्यावर आश्चर्यच वाटले.त्यांच्या
मुलीचा आईच्या स्मरणार्थ देणगी द्यायची आहे.असा फोन आला.तेंव्हा त्यांच्या
मृत्युची वार्ता समजली.थोड्याच दिवसांचा संबंध आला पण त्यांनी सर्वांच्या
मनात आपलेपणा निर्माण केला होता.त्या पीडीला टक्कर देत होत्या.परंतु
अन्नविषबाधा झाल्याने त्यांचा ७७ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या
इच्छेप्रमाणे कोणावरही अवलंबून, भार होऊन राहावे लागू नये ही त्यांची इच्छा
पुरी झाली होती.पार्किन्सन्सलाही त्यांनी चकवले.
No comments:
Post a Comment