Tuesday, 10 July 2018

पार्किन्सन्सविषयक गप्पा - १८

                                      पार्किन्सन्सविषयक गप्पा - १८
                          गप्पांना सुरुवात झाल्यावर मला अनेकजणांनी सांगितले की यापूर्वी या आजाराविषयी आम्हाला काहीच माहित नव्हते.किंबहुना आम्ही हे नाव ही ऐकले नव्हते.नंतर अल्झायमर आणि पक्षाघात संबंधी व्हिडीओ काहींनी पाठवले.त्यावेळी मला लक्षात आले ते पार्किन्सन्सची अल्झायमर आणि  पक्षाघाताशी  सांगड घालत होते.हे तीन्ही आजार मेंदूशी निगडीत असले तरी पूर्णपणे वेगळे आहेत.यापूर्वीच्या गप्पात मी अल्झायमर म्हणजेच स्मृतीभ्रन्शाविषयी लिहिले आहे.आता पक्षाघात आणि पार्किन्सन्सच्या फरकाविषयी लिहित आहे.सांगलीचे शुभार्थी  रेगे यांना आधी पक्षाघात झाला आणि नंतर पार्किन्सन्स.असे उदाहरण विरळाच.
                           पक्षाघात आणि पार्किन्सन्स यातील वेगळेपण म्हणजे पक्षाघातात एखादा अवयव कायमचा बधीर होतो वा लुळा पडतो.संवेदनाशून्यही बनतो.पार्कीन्सन्समध्ये एखादा अवयव ताठरल्यासारखा दिसला तरी त्यात संवेदना असते.पार्किन्सन्समध्ये काहीजणांना ऑन ऑफची समस्या असते.ऑन पिरिएड म्हणजे औषधाचा परिणाम चालू असून हालचाली व्यवस्थित होत असतात.औषधाचा परिणाम कमी झाला की,व्यक्ती एकदम ताठर होते हालचाल करता येत नाही.याला ऑफ पिरिएड म्हणतात.पुढचा डोस घेतल्यावर हळूहळू हालचाली सुरु होतात.म्हणजेच ही अवस्था तात्पुरती असते.
           पक्षाघातात तातडीने उपचार झाल्यास औषधोपचार आणि फिजिओथेरपी करून रुग्ण त्यातून बाहेर पडू शकतो.उपचारास वेळ लागला तर मात्र निकामी अवयव पूर्ववत होणे कठीण होते.पार्किन्सन्समध्ये कंप, ताठरता,हालचालीतले मंद्त्व ही व इतर काही लक्षणे असल्यास ती पूर्णपणे कमी होत नाहीत.त्यावर नियंत्रण आणता येते.कोणत्याही आजाराचे स्वरूप एकदा समजले की त्याला हाताळणे सोपे जाते.आणि त्याला स्वीकारले की आजार आटोक्यात राहतो.यासाठी ही सर्वसाधारण माहिती माझ्या ज्ञानानुसार देत आहे.काही उणिवा असल्यास कृपया तज्ज्ञांनी सांगाव्यात.
           अधिक माहितीसाठी

www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson's Mitramandal, Pune( https://www.youtube.com/playlist?list=PLfigPhBt8dAjA7e6-IeeVFfV2fgqSFyS7 ) हा युट्युब channel पहा

No comments:

Post a Comment