Sunday, 6 May 2018

सचित्र सहल वृत्त

                                                            पहिला टप्पा
                                            वर्षातून एकदा जाणारी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल शुभंकर शुभार्थींसाठी आनंदोत्सव असतो.शब्दांपेक्षा हा आनंद छायाचित्रातून (फोटोतून ) अधिक पोचेल असे वाटल्याने टप्प्याटप्प्याने तो आपल्यापर्यंत छायाचित्रातून  पोचवत आहे.
 यावर्षीची सहल १ नोव्हेंबरला पानशेत जवळील अभिरुची फार्म हाऊस येथे गेली होती.३१ शुभंकर, शुभार्थी सहभागी झाले.४५ वर्षापासून ९५ वर्षापर्यंतचे शुभार्थी सहभागी होते.सात शुभार्थी शुभंकराच्या सोबतीशिवाय एकटे आले होते हा यावेळच्या सहलीचा विशेष होता.सहल सकाळी  साडे आठ वाजता हॉटेल अश्विनी पासून निघाली.सर्वजण अगदी वेळेत हजर होते.चिंचवडहून आलेल्या पाडळकर पती पत्नीना वेळ गाठण्यासाठी पहाटे ६.३० लाच घरातून निघावे लागले.सर्व मंडळी बसमध्ये स्थानापन्न झाल्यावर अंजलीने हजेरी घेतली. केशवरावांसाठी लवकर व्हीआरएस घ्यावी  लागलेल्या अंजलीतील शिक्षिकेचे हे आवडते काम.सुरुवातीलाच ती हे काम करताना आजार विसरून सर्वांना शाळकरी मुले व्हायला लावते.सर्वाना ओरिगामी साठी कागद वाटण्यात  आले.बसमध्येच sandwich आणि खोबऱ्याच्या वड्या देण्यात आल्या.शुभार्थी उमेश सलगर यांनी रात्री बारापर्यंत जागून खास स्वत: बनवलेले रव्याचे लाडू आणले होते.अंताक्षरी,गप्पा यात अभिरुची कधी आले समजलेच नाही.आल्या आल्या  चहापान झाल्यावर उन्हे वाढण्याआधी ज्यांना शक्य आहे त्यांनी आजूबाजूचे निसर्ग दर्शन करायचे ठरले.सर्वजण निसर्ग पाहताना हरखून गेले होते.मोबाईलमध्ये आठवणी साठवून ठेवत होते.          
                                                         दुसरा टप्पा
                       दुसरा टप्पा ११.१५ ला सुरु व्हायचा होता.निसर्ग दर्शनात रमलेल्यांचा ११.३० पर्यंत पत्ताच नव्हता.हळूहळू सर्व येऊ लागले.गोलाकारात सर्व स्थानापन्न झाले.शोभना तीर्थळी यांनी इडली डोसा खेळ घेतला आणि श्रीपाद कुलकर्णी प्रथम,रेखा आचार्य दुसऱ्या आल्या.लगेच श्यामाताईनी त्यांना बक्षिसे दिली आणि परस्पर परिचयाचा कार्यक्रम सुरु झाला.९५ वर्षाचे कलबाग आणि ८६ वर्षाच्या सुमन जोग यांच्या परिचयाने सर्व भारावून गेले.त्यांचे सहलीत असणेच प्रेरणादायी होते.इतरांनी अगदी थोडक्यात ओळख करून दिली. प्रत्येकाची पूर्वपीठीका वेगळी असली तरी सर्वांचाच  पीडीसह आनंदी राहण्याचा प्रयत्न कौतुकास्पद होता.आणि स्वतंत्र लेखाचा विषयही आहे.
यानंतर नोव्हेंबर महिन्यात जन्म असलेल्या शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस हास्याचा केक कापून आणि  हास्याचाच फुगा फोडून साजरे करण्यात आले.अमेरिकेत राहणारी सून पीएचडी झाल्याबद्दल श्यामलाताईंनी सर्वाना खरे पेढे वाटले.
                     आता चुलीवरचा गरमागरम स्वयंपाक तयार झाला होता.गरम गरम भाकरी,चपाती,भरले वांगे,मुगाची उसळ,बटाटा भाजी,भजी, पापड,लोणचे,चटणी,वरण भात आणि शिरा असा मेनू होता.वाढण्याची जबाबदारी काही शुभंकर शुभार्थीनी उचलली.जेवताना जवळ बसलेल्यांची  गप्पातून अनुभवाची देवाण घेवाण चाललीच होती.
                                                        अभिरुची फार्म हाउस सहल  तिसरा टप्पा
                    खेळ, करमणुकीचे कार्यक्रम,ओरिगामीच्या कलाकृतीतून बक्षिसासाठी निवड अशा अजून बऱ्याच
गोष्टी व्हायच्या होत्या. विश्रांती न घेता लगेच सर्व कामाला लागले.अंजलीनी प्रत्येकाला काय कार्यक्रम करणार याची विचारणा केली.सुमनताई आणि श्यामाताईनी ओरीगामीचे नंबर काढले.इतर गोलाकर  खुर्च्या मांडत होते. कोण शुभंकर कोण शुभार्थी कोणालाच ओळखता आले नसते.सर्वांचा उत्साह पाहून पीडीनेच शरमेने मान खाली घातली होती.अंजलीनी खेळ तयार करून आणला होता १० प्रश्न आणि त्याला दिलेल्या पर्यापैकी अचूक पर्याय निवडायचा होता.सर्वाना कागद वाटण्यात आले.दहा मिनिटे वेळ दिला होता. चीद्दरवार यांचे १० पैकी १० बरोबर आले.सुरेश बागल,केशव महाजन,रामचंद्र करमरकर,स्नेहलता जोशी,आशा रेवणकर यांचे ९ बरोबर आले.सर्वाना लगेच बक्षिसे देण्यात आली.ओरिगामी मध्ये सविता ढमढेरेच्या फुलपाखराला प्रथम आणि आशाच्या इस्त्रीच्या शर्टला दुसरा क्रमांक मिळाला.
                    यानंतर जोस्ना सुभेदार यांच्या गीतेच्या १५ व्या अध्यायाने करमणुकीच्या  कार्यक्रमास सुरुवात  झाली.अंजलीने आपल्या खुसखुशीत शैलीत सूत्रसंचालन केले.सविता ढमढेरे आणि शोभना तीर्थळीसह सर्व शुभंकर शुभार्थिनी 'चांदणं,चांदण झाली रात' हे कोळीगीत म्हटले.उमेश सलगर यांनी आईची महती सांगणाऱ्या कवितेचे वाचन केले.सुरेंद्र महाजन यांनी 'शिवशक्तीचा अटीतटीचा' हे नाट्यगीत म्हटले.केशव महाजन यांनी पाकिजातील संवाद म्हटले,स्नेहलता जोशी यांनी'या सुखानो या' आणि लोकाग्रहासाठी' केतकीच्या बनी तिथे ' हे गीत म्हटले.अंजलीने स्वरचित कवितेत एका चिमुकलीचे मनोगत व्यक्त केले. श्रीपाद कुलकर्णी यानी विनोदी पुणेरी पाट्यांचे वर्णन करून सर्वाना हसवले 'मेरा दिल मचल.गया तो मेरा क्या कसूर' हे गीत गाऊन सर्वाना जुन्या काळात नेले.विजया मोघे यांनी 'गौरिहारी दिनानाथा' हे भक्तीगीत म्हटले.शोभना तीर्थळी यांनी' रसिक बलमा'  म्हटले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.सहभागी सर्वाना श्यामाताई यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
                   तोवर चहा आलाच.चहा घेऊन लगेच निघायचे होते.यावेळी सर्वांचा  एकत्रित फोटो काढायचाच असे दीपाने ठरवले होते. आणि ते पूर्णत्वास आणले.अंजलीने हजेरी घेतली आणि बस परतीच्या प्रवासाला निघाल्या.खवय्या उमेश सलगर यांनी तेवढ्यात नीर फणस विकत घेतले. जेवणात त्याची भजी होती.जाताना अनोळखी असणाऱ्यात आता जवळीकीचे नाते निर्माण झाले होते.
( सचित्र सहल वृत्त म्हटले असले तरी येथे फोटो घालता आले नाहीत.फोटोसाठी वेबसाईट www.parkinsonsmitra.org  पहावी.)




No comments:

Post a Comment