Wednesday, 28 February 2018

स्वप्नात रंगले मी

                                                  स्वप्नात रंगले मी
                          जोशीकाका  पेपर वाचनात दंग होते.इतक्यात कानाशी बेल वाजली.बाईसाहेब आपटल्या वाटत म्हणत काका स्वयंपाकघरात आले.एकदा काकू  पडल्या आणि त्यांच्या हाका काकाना ऐकूच आल्या नव्हत्या.कितीतरी वेळ त्या पडून होत्या.कामवाली आल्यावर समजले.काकांच्या मनात अनेक दिवस अपराधीपणाची भावना होती..आता पार्कीन्सन्स मित्रमंडळने बनविलेली बेल हाताला बांधलेली असल्याने अशी वेळ येत नाही.काका घाईघाईतच आत आले.काकुना उठवण्याचा प्रयत्न केला काकुनी हातानीच नको सांगितले सरकत सरकत त्या भिंतीला टेकून बसल्या.'कितपत लागले आहे ते हॉस्पिटल मध्ये नेल्यावरच समजेल' काका मनाशीच म्हणाले.त्यांनी प्रथम ब्लडप्रेशर पहिले.थोडे लो होते. मग लगेच खास पार्किन्सन्ससाठी असलेले 'शुभंकर मल्टीपरपज हॉस्पिटल अॅंड  रिक्रिएशन सेंटर' चा १३४ नंबर फिरवला.'.१३४ फिरवलाय. काळजी करू नको' काका म्हणाले.पीडीमुळे काकुंचे बोलणे न समजणारे तर काकाना ऐकू येत नव्हते.यातून त्यांची खाणाखुणांची भाषा तयार झाली होती.रिक्रिएशन सेंटरमध्येच असा खाणाखुणांनी संवाद साधण्याची  खास कार्यशाळा झाली होती.काकांनी लिंबू सरबत बनवले.मीठ थोडे जास्तच घातले. रेस्क्यूरेमेडीचे थेंबही टाकले.रुग्णवाहिका येण्यास १५/२० मिनिटे तरी लागणार होती.काकांनी काकूंची आवडती किशोरी अमोणकरची सीडी लावली.सहेला रे ऐकता ऐकता काकांचे मन भूतकाळात गेले.

               
                          काकूना पीडीचे निदान झाले तेंव्हा दोघेही हबकून गेले होते. काकू इंग्रजी विषय शिकवणाऱ्या
विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका.त्यांच्या मंत्रमुग्ध करणार्‍या व्याख्यानांनी अनेकजणाना प्रेरणा मिळत होती.पण आता त्यांचे बोलणे अस्पष्ट झाले होते. बोलण्यासाठी ताकद लावावी लागत होती त्याना नैराश्याने घेरले होते.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या संपर्कात आल्यावर मात्र सर्वच बदलले.नर्मदा हॉल मध्ये पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या सभेला गेलेला दिवस त्यांच्या आयुष्याला नवीन वळण देणारा ठरला.मंडळाची मराठीत वेबसाईट होती.इंग्लिशमध्ये वेबसाईट करणारे कोणीतरी हवे होते.काकूनी ते काम हातात घेतले.इथल्या शुभार्थीच्या सक्सेस स्टोरी जगभरातल्या पीडी पेशंटना प्रेरणादायी ठरल्या.जागतिक स्वमदत गटाच्या साखळीत पार्किन्सन्स मित्रमंडळ, एक आदर्श स्वमदत गट म्हणून झळकू लागले.
               हरहुन्नरी आजोबांसाठी तर भरपूर काम होते.बँकेतून उच्चपदावरून निवृत्त झालेल्या काकांनी आर्थिक कामाचा भार तर उचललाच पण कमी तेथे आम्ही म्हणत अनेक कामे हातात घेतली.नुकतीच संस्था रजिस्टर झाली होती.भाड्याच्या जागेत सभा,कोणाच्या तरी घरी कार्यकारिणी मिटिंग असे सगळे होते.आणि बघता बघता मंडळाचा पसारा वाढला.आता स्वत:चे ऑफिस,सभांसाठी सुसज्ज ऑडीटोरीयम आहे.वेबिनार,टेलीकाॅन्फरन्सिंगद्वारे परगावचे शुभार्थीही सभामध्ये सहभागी होऊ शकतात.मंडळाचे विविध गावात अनेक उपगट आहेत.शुभार्थीना सभेला आणायला वाहन व्यवस्था आहे.कलोपचारासाठी साऊंड प्रुफ अद्ययावत यंत्रणा,हॉस्पिटल,रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटर आहे.येथे आयुर्वेद, होमिओपाथी, युनानी, पुष्पौषधी, कलोपचार,योगोपचार  इत्यादी इतर पूरक उपचारपद्धतीसह  एत्रितपणे संशोधन चालते.विविध लक्षणावर मात करून शुभार्थीचे जीवन सुखकर करणाऱ्या अनेक Appचे पेटंट शुभंकरला मिळाले आहे.न्युरो स्पेशल नर्सिंग कोर्स,पीडी स्पेशल केअर टेकर साठी १ महिन्याचा कोर्स,जनरल प्रॅक्टिसनर साठी पीडी बाबत निरंतर शिक्षण अभ्यासक्रम. यासाठी येणाऱ्या खेडोपाडीच्या डॉक्टरसाठी राहण्या,जेवण्याची खास सोय.अशा सुविधा आहेत.आहार, व्यायाम, वगैरे उपयुक्त विषयावर न्युरॉलॉलोजिस्ट ,आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट अशा तज्ञांच्या सल्ल्याने दृक्श्राव्य फिती तयार आहेत.प्रेरणादायी शुभार्थींचे व्हिडीओ जगभर गाजत आहेत.जोशी काकांचा त्यात मोठ्ठा सहभाग आहे.शुभंकर शुभार्थींचे जीवन या सर्वांमुळे सुखकर झाले आहे.
                           काकांची मुलगी मंजिरी इंग्लंड मध्ये आणि मुलगा अमेरिकेत राहतात.त्यांचा तेथे या आम्हाला काळजी वाटते. म्हणून सारखा ससेमिरा चालला होता.आता तो पूर्ण थांबला आहे.आपले आईबाबा 'शुभंकर'च्या हातात पूर्णपणे सुखरूप आहे असा त्यांना भरोसा आहे.शुभंकरमुळे परदेशी,परगावी राहणाऱ्या अशा कितीतरी मुलांना अपराधीपणाची भावना जाऊन निवांत झोप लागत आहे.आणि जेष्ठ नागरिकांना आपला शेवटचा श्वास आपल्याच देशात सोडता येणार याबाबत दिलासा मिळाला आहे..काकांचे मनात पार्किन्सन्स मित्रमंडळाविषयी कृतज्ञता दाटून आली.आणि आपण त्याचा एक भाग आहोत म्हणून अभिमानाने  उर भरून आला.       
                         शुभंकरची रुग्णवाहिका दारात हजर झाली.आणि काका वर्तमानात आले.न्युरो स्पेशालिस्ट नर्स सविताताई बरोबर होत्या.त्यांना पाहताच काका काकुंचे  निम्मे टेन्शन दूर झाले'.शुभंकर'नी पुण्यात प्रत्येक विभागासाठी अशा स्पेशल नर्स नेमल्या आहेत.असा एखाद्या आजाराचे विशेष ज्ञान देणारा पदव्युत्तर नर्सिंग कोर्स तयार करणारे शुभंकर हे आशियातील पहिलेच केंद्र आहे. त्या आठवड्यातून एकदा येतात आणि सर्व तपासणी करतात.ही माहिती न्यूरॉलॉजिस्ट,फिजिओथेरपिस्ट,स्पीचथेरपिस्ट,मानसोपचारतज्ज्ञ अशा  विविध विभागात जाते. याशिवाय परदेशी राहणाऱ्या,इतरत्र राहणाऱ्या मुलांनाही जाते.सातत्याने केस पेपर अध्ययावत राहतो.तर अशा या सविताताई घरच्यासारख्याच झाल्या आहेत.काकू ,काकाना खाणाखुणा करून काहीतरी सांगत होत्या.सविताताई म्हणाल्या 'काकू  समजले मला. बेसन लाडू द्यायला सांगताय ना? आधी सर्व तपासू मग घेते.'' ब्लडप्रेशर थोडे लो आहे' काका म्हणाले.बोलत बोलत काकूना त्यांनी खुर्चीवर बसते कधी केले हे काकुना समजलेही नाही.' काकू फार गंभीर वाटत नाही.पण हॉस्पिटलमध्ये राहा एक दिवस. एक्सरेही  काढू.तुमच्या इतर चाचण्या करायच्याच आहेत त्याही उद्या करू.'
                    काका त्यांना मध्येच थांबवत म्हणाले.आमचे दोघांची  शुभंकर, शुभार्थी संबंधावर उद्याच चर्चा आहे ना?'
 'हो उद्या काकूंचा फिजिओथेरपीचा वार आहे.एकाच फेरीत होऊन जाईल  म्हणून तुम्हाला लेक्चर ठेवले होते. जमणार का पण काकू? बाकी .केअरटेकर कोर्समध्ये तुमचे हे सेशन विद्यार्थ्यांना फार आवडते. आणि काका उद्या परगावच्या शुभार्थींची तपासणी आहे.तुमची मदत लागणार आहेच.तुमच्याशिवाय शिबीर अशक्यच.' सविता ताई कौतुकाने म्हणाल्या'.सविताताई ट्रेनिंग सेंटरमधील नर्सिंग विभागाच्या प्रमुख आहेत
शुभंकरमध्ये वर्षातून दोनदा शिबीर घेऊन परगावच्या रुग्णांसह अल्पदरात तपासणी केली जाते.  जोशिकाकांसारखे  अनेक जण यावेळी उत्साहाने मदतीला येतात.
                 ' चला सविताताई तयार आहे आम्ही.'काका म्हणाले.काका काकूंचा बऱ्याचवेळा विविध कामासाठी शुभंकरच्या गेस्टहाउसमध्ये मुक्काम असतो.आणि त्यासाठी एक बॅग भरून सदैव तयारच असते.
                  रुग्णवाहिकेतून काकूंसाठी व्हीलचेअर आणली गेली.रुग्णवाहिका पाहून शेजारी पाजारी जमा झाले होते.व्हीलचेअरवर नेहमीच्या हसतमुख काकू पाहून सर्वाना हायसे वाटले.शेजारच्या स्मिताला काकुनी कामाच्या बाईसाठी,पोळ्यावालीसाठी सूचना दिल्या.बाईसाठी किल्ली देऊन ठेवली.रुग्णवाहिका शुभंकर पर्यंत पोचली.लांबून शुभंकरची पाटी आणि लोगो पाहीला की प्रत्येकवेळा काका काकू दोघानाही आपले छोटे मुल बघताबघता कीर्तीशिखरावर पोचल्याची भावना होते.हॉस्पिटलच्या पायाभरणी पासूनचा प्रवास आठवतो.शुभंकर हॉस्पिटल इको फ्रेंडली,येणाऱ्या पेशण्टला नातेवाईकांना शिरताच प्रसन्न वाटावे असे बनविण्यासाठी सर्वानीच जीव ओतून काम केले होते.याआधी शुभंकर, शुभार्थींची बाहेर पडायचे तर ओढाताण व्हायची. .न्यूरॉलॉजिस्ट एकीकडे,फिजिओथेरपिस्ट दुसरीकडे,नृत्योपचार तिसरीकडे, सभा वेगळ्याच ठिकाणी आता मात्र सकाळी रिकाम्या पोटी तपासणी साठी यायचे,शुभंकरच्या canteen मध्ये नाष्टा करायचा.संध्याकाळी रिपोर्ट मिळणार असले तर विरंगुळा केंद्रात आराम करा,कॅरम खेळा,चेस खेळा,गाणी ऐका,व्हिडीओ पहा.असे कितीतरी पर्याय.दुपारचे जेवण घेऊन संध्याकाळी डॉक्टरची भेट घेऊनच घरी जा.सभा असली तर ती करून..जे काही लागेल ते एकदा आत शिरले की सर्व काही उपलब्ध.
                   ' काका तुम्हाला शय्याग्रस्तांच्या वॉर्डमध्ये जायचे असेल ना? तुमचा आल्यावर प्रथम तेथे जाण्याचा शिरस्ता  माहित आहे मला' काका साविताताईंच्या बोलण्याने तंद्रीतून जागे झाले.'.तुम्हाला आधी उतरावे लागेल.आता काकूंची जबाबदारी आमची तुम्ही बिनधास्त जा.'सविता ताई म्हणाल्या.काकांनी काकूंचा हात प्रेमाने हातात घेतला.त्यावर आपला दुसरा हात ठेवत काकुनी नजरेनेच सविताताईंच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
                    शय्याग्रस्त विभागात पीडीच्या चौथ्या अवस्थेतले, पडल्याने तात्पुरते शय्याग्रस्त असलेले शुभार्थी असतात.काकांच्या येण्याची सर्व वाट पाहत असतात.काका प्रत्येकाची विचारपूस करत होते, चेष्टामस्करी करत होते.काकांच्या खिशात छानछान व्हिडीओ ,गाणी लोड केलेला पेनड्राइव्ह सतत असतो.तेथे असलेल्या टीव्हीवर ते शुभार्थीना दाखवतात.कोणी काही गाणी,चित्रपट सुचवतात. पुढच्यावेळी ते शोधून लोड करून आणतात.काका तेथून बाहेर पडतच होते,इतक्यात मेडिकल सोशल वर्कर विशाखा धावत पळत येताना दिसली.खूप आनंदात दिसत होती.विशाखा म्हणजे उत्साहाचे कारंजे. कोणत्याही रुग्णाला एका सेकंदात हसते करण्याची कला तिला अवगत आहे'.काका एक आनंदाची बातमी आहे मी तुम्हाला फोन करणार होते एवढ्यात तुम्ही दिसलात.' अग सांग ना मग लवकर.' हो सांगते. सांगते. आपल्या' तू माझा सांगाती' चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्ण पदक मिळाले आहे.पत्रकार येतील एवढ्यात.त्यावेळी तुम्ही असायला हवे.
                              
                                                आता सत्यात 
                    हे स्वप्न रंजन न संपणारे. पण ते पूर्ण करायचे तर सत्यात यायलाच हवे नाही का?
२००० मध्ये मधुसूदन शेंडे आणि शरच्चंद्र पटवर्धन यांनी मंडळाचे बीज रोवले.तगवले.अगदी बागेतही सभा घेतल्या.कधी कधी दोघेच असायचे. सामाजिक परीस्थिती स्वमदत गटास अनुकूल झाली.मदतीचे हात मिळाले आणि २००८ नंतर रोप जोमाने वाढीस लागले.या वाढीसाठी कष्ट घेणारे मधुसूदन शेंडे,जे.डी.कुलकर्णी,अनिल कुलकर्णी,चंद्रकांत दिवाणे आज आपल्यात नाहीत.आता संस्था रजिस्टर झाली आहे. आणि वर स्वप्नात पाहिलेल्या सर्व बाबी आमच्या उद्दिष्टात आहेत.त्यामुळे हे शेख महमदी स्वप्नरंजन नाही आपल्या सर्वांच्या मदतीने आम्हाला ते पूर्ण करायचे आहे.आपण यासाठी पुढे याल याबद्दल खात्री आहे.आमच्या हयातीत हे सर्व होणार नाही हे मला माहित आहे.पण हे स्वप्न उचलून धरणारी पुढची फळी तयार होत आहे.

No comments:

Post a Comment