Saturday, 20 January 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा - ५

पार्किन्सन्सविषयी गप्पा - ५
आम्ही केसरी टूर्सबरोबर नैनितालला गेलो होतो. त्यापूर्वी नुकतेच ह्यांच्या पार्किन्सन्सचे निदान झाले होते. आणि तेव्हा तसा तो शत्रूपक्षातच होता. सहलीच्या प्रत्येक ठिकाणी नाश्ता, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी सेल्फ सर्व्हिस होती. हे रांगेत उभे रहायचे आणि त्यांनी हातात डिश घेतली की हात थरथरायला लागायचा. ते बघून कोणीतरी येई आणि म्हणे, 'काका, तुम्ही बसा, आम्ही तुम्हाला वाढून आणून देतो.' हे नकार देत. पुन्हा कोणी दुसरे येई, पुन्हा हे नाही म्हणत. त्यावेळी मला इतरांच्या चेह-यावर 'इतका हात थरथरत असूनही माणूस उभा रहातोय, बायकोला मदत करता येत नाही का' ह्या अर्थाचे भाव दिसायचे. पण मला कल्पना असायची की ह्यांना मी मदत केलेली आवडणार नाही. कारण ह्यापूर्वी ऑफिसला जातानाही त्यांनी कधी मी सगळे हातात आणून द्यावे अशा स्वरुपाची नवरेगिरी केली नव्हती. कायम स्वत:ची कामे स्वत: करणे अशी सवय.
तसे पाहिले तर एकदा डिश हातात पकडल्यानंतर पार्किन्सन्सच्या माणसांकडून ती कधी खाली पडत नाही. पण लोकांच्या दृष्टीने पाहिल्यास ही काळजी खरीच होती. मला त्यामध्ये काही गैर वाटले नाही. ह्यांना पार्किन्सन्स होण्यापूर्वी दोनचार वर्षे आम्ही एका लग्नासाठी मोठ्या व-हाडासह नागपूरला निघालो होतो. तेव्हा पार्किन्सन्स असलेले एक आप्त सोबत होते. चहा यायचा, ते थरथरत्या हाताने तो घ्यायचे, सारखे प्रत्येक स्टेशनवर उतरायचे, खाली जायचे, वरच्या बर्थवर जाऊन झोपायचे. त्यांनी हातात चहा घेतला की खाली कोणाच्या अंगावर पडेल, लोक रागावतील अशी आम्हाला खूप भिती वाटायची. त्यांच्या बायकोचा जीव थोडाथोडा व्हायचा. ती त्यांना सारखी सांगत राही, अहो धावपळ करू नका, उतरू नका, वगैरे. पण ते मात्र शांतपणे सगळे करत असत. त्यांच्याकडून कसलीही सांडलवंड, धडपड झाली नाही. त्यामुळे ह्यांच्याबाबतीतही लोकांना काळजी वाटते ह्यात मला काही गैर वाटायचे नाही.
लोकांच्या ह्या रोजच्या विचारण्यामुळे ह्यांची मात्र फार चिडचिड होत असे. ते सतत आपले रागावलेले असत. एकदा केसरीचा सहलप्रतिनिधीच त्यांना 'तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी डिश वाढून आणतो' म्हणाला. त्याच्या स्वरात थोडा आज्ञेचा भाव होता. तेव्हा मात्र हे फार चिडले. ह्यांनी त्याला सुनावले, 'मला मदत नको आहे, हे मी एकदा सांगितले आहे. माझ्या हातून डिश पडली, फुटली, तर मी अख्खा सेट तुम्हाला भरून देईन. पुन्हा मला विचारायचे नाही.' ते ऐकून सगळेच एकदम शांत झाले आणि त्यावर काय बोलावे हे मलाही समजेना. ह्यांना वस्तुस्थिती स्विकारता येत नाहीये, हे लक्षात येतच होते. सुरुवातीच्या काळात जेव्हा पार्किन्सन्स स्विकारलेला नसतो, तेव्हा असे प्रसंग सतत घडतच रहातात.
चारचाकी चालवणे ही ह्यांची आवडीची गोष्ट. हे अतिशय उत्तम कार चालवायचे. ह्यांना कार शिकवणारा चालक सुरुवातीला काही काळ ह्यांच्यासोबत जायचा. तो म्हणायचा, 'साहेब, तुम्ही इतर गाड्यांना किती चिकटून गाडी नेता, मला खूप भिती वाटते.' पण ह्यांच्याकडून कधीही अपघात घडला नाही. बरोबर हिशोब करून इंचाइंचाचा अंदाज घेऊन ते गाडी पुढे काढत. माझ्या बहीणीकडे सावंतवाडीला गेल्यानंतर त्या अरुंद गल्ल्यांमधून आमची मोठी व्हॅनसुद्धा हे अगदी व्यवस्थित न्यायचे. तिथली माझी बहिणही म्हणायची, की भाऊजी गाडी चालवण्यात सर्वांपेक्षा एकदम वाकबगार आहेत, इतक्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये गाडी आणणे कठीण काम आहे.
पार्किन्सन्सनंतर मात्र असे व्हायला लागले, की गाडी सरळ चालवताना काही अडचण यायची नाही. व्हीलवर हात ठेवल्यावर ट्रिमर्स थांबायचे. पण जेव्हा अडचणीची वेळ येई किंवा ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यावर गाडी काढताना त्यांच्या हाताला इतका कंप सुरू व्हायचा, की त्यांना ते करता यायचे नाही. रिव्हर्स घेतानासुद्धा हीच परिस्थिती व्हायची. अशावेळी आजुबाजूचे लोक उलटेसुलटे बोलतातच. ते मलाही ऐकवायचे नाही. मग हे खूप संतापायचे, आजुबाजुच्या त्या लोकांना ते मुलाहिजा न ठेवता शिव्या घालायचे.
पार्किन्सन्समधे होते काय, की प्रतिक्षिप्त क्रिया होत असतात तेव्हा काही अडचण नसते. जेव्हा माणसाचे विचारचक्र सुरू होते, तेव्हा ट्रिमर्स वाढतात. हे आमच्या अगदी चांगले लक्षात आले होते. आम्ही योगासनाला जात होतो, त्यावेळची गोष्ट. एके दिवशी मेडिटेशनचा वर्ग बराच वेळ चालू होता. मी मेडिटेशन करत असताना आम्हाला शिकवणारे सर आले आणि मला हलवून जागे करून म्हणाले, 'तुमच्या यजमानांकडे पाहिलंत का, त्यांचे ट्रिमर्स पूर्णपणे थांबलेले आहेत.' तेव्हा आमच्या लक्षात आले, की मेडिटेशन करताना ट्रिमर्स थांबतात. त्याचप्रमाणे सवाई गंधर्व महोत्सवाला गेल्यानंतरसुद्धा ते एकदा बसले की शेवटपर्यंत हलायचे नाहीत, गेल्यावर जे बसत ते परत यायला निघण्यासाठीच उठायचे, आणि तितका वेळ त्यांचे ट्रिमर्स पूर्ण थांबलेले असायचे.
ह्या अनुभवांवरून ट्रिमर्स केव्हा थांबतात हे समजत गेले, हा सगळा पुढचा भाग. तोपर्यंत पार्किन्सन्स मित्र झालेला होता, मदत घेण्यातला ह्यांचा जो आखडूपणा होता, तोही हळूहळू कमी होत गेला. आता कोणत्याही समारंभात इतर लोक डिश आणून देतात, त्याचे ह्यांना काही वाटत नाही. दुसरे म्हणजे आम्हाला स्वत:ला पार्किन्सन्स नीट समजल्यामुळे केव्हा काय होते, केव्हा काय करायचे, ह्याबद्दल आम्ही लोकांना आता नीट सांगू शकतो. आम्ही हास्यक्लबला जातो, तेव्हा हे खाली बसलेले उठताना आता आम्ही सांगितल्यानंतर कोणीही ह्यांना धरायला जात नाही. ते सावकाशीने उठतात, एखादीदुसरी पायरी उतरायची असेल तर उतरतात. ते केस कापायला जातात तेथे ब-याच पाय-या आहेत आणि धरायला काही आधार नाही. हे येताना दिसले, की तिथला माणूस येतो, ह्यांना हाताला धरून वर नेतो, नंतर खाली सोडायला येतो आणि हे रस्ता ओलांडेपर्यंत थांबतो वगैरे. त्याचे ह्यांना आता काही वाटत नाही. कारण पार्किन्सन्स आता मित्र झालेला आहे. मात्र ही मैत्री होण्याची प्रक्रिया आपण एका वाक्यात सांगू शकण्याएवढी सोपी नसते. तर त्याबद्दल आता गप्पांच्या पुढच्या भागामध्ये बोलू.
शब्दांकन - सई कोडोलीकर

No comments:

Post a Comment