पार्किन्सन्स हा वृद्धांचा आजार आहे असे म्हणले जाते. हे खरे आहे की पार्किन्सन्सच्या रुग्णांमध्ये वृद्ध लोकांचे प्रमाण जास्त आहे. पण पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काम करताना आम्हाला लहान वयात पार्किन्सन्स झालेले अनेक रुग्ण भेटले. आता गुगलवर पार्किन्सन्ससंदर्भातील जे चित्र दिलेले आहे, त्यातही वृद्ध गृहस्थ दिसतात. श्री. चाड वॉकर नावाच्या एका गृहस्थांच्या पत्नीला तिसाव्या वर्षी पार्किन्सन्स झाला. तर गुगलने ते चित्र बदलावे असे मिशन श्री. वॉकर ह्यांनी सुरू केले आहे. कारण ते चित्र पाहून केवळ वयस्क लोकांना पार्किन्सन्स होतो असा गैरसमज होतो. प्रत्यक्षात लहान वयात पार्किन्सन्स होणा-यांची संख्या ब-यापैकी वाढत जाताना दिसत आहे.
पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काम करताना मला जी सर्वात लहान वयाची मुलगी दिसली, ती बारा वर्षांची, मंजुळा झगडे. ती मला आनंदवनात भेटली. आनंदवनामध्ये सर्वजण सामान्य आयुष्य जगत असतात, मग ते कुष्ठरोगी असोत, अपंग असोत अथवा अंध असोत. तेथे गेलेल्या माणसाला आनंदाची लागण होतेच. ही मंजुळा शिवण विभागात काम करते. आत्ता ती जवळजवळ तीस वर्षांची असेल. जरी इतक्या वर्षांपासून तिला पार्किन्सन्स असला तरी, तिच्याकडे पाहून तिला तो असल्याचे लक्षातही येत नाही. ती मजेत जगत आहे. तिला आपल्या आजाराबद्दल फारसे काही माहितीदेखिल नाही.
त्यानंतर मला अनेकानेक लोक दिसत गेले. तिसाव्या वर्षी पार्किन्सन्स झालेली अमिता गोगटे. अगदी सुरुवातीला जेव्हा आम्ही घरभेटी करत होतो, त्यावेळी तिच्याकडे गेलो होतो. खरेतर ती पार्किन्सन्स मित्रमंडळात येत नाही, तिला त्याची फारशी गरजही वाटली नाही. कारण तिच्या कुटुंबियांनी, माहेरच्या आणि सासरच्या लोकांनी, पतीने, तिला पार्किन्सन्ससह आनंदी रहाण्यासाठी खूप मदत केली. तेव्हा तिचा मुलगा एक वर्षाचा होता. आता तिची मुले मोठी होऊन नोकरीला लागलेली आहेत. मुलेही तिची उत्तम काळजी घेतात. गृहिणी असूनही ह्या सर्व कारणांमुळे ती फार चांगल्या त-हेचे जीवन जगत आहे. तिची थॅलेमॉटॉमी नावाची शस्त्रक्रिया झालेली होती. ही शस्त्रक्रिया पूर्वी केली जात असे, आता ती कालबाह्य झाली आहे. मी तिच्याकडे ब-याच वेळा जाऊन तिला भेटून आले.
श्री. सुधीर वकील हे नागपूरचे एक शुभार्थी आहेत. त्यांचा मुलगा पुण्यात असतो, त्यामुळे ते पुण्यात आल्यावर नेहमी सभांना येतात. त्यांनाही असाच लहान वयात पार्किन्सन्स झाला. आता त्यांना पार्किन्सन्स झाल्यालासुद्धा चाळिसेक वर्षे झाली असतील. ते बँकेत नोकरी करत होते, ती ते व्यवस्थित करू शकले. त्यांचीसुद्धा मी वर उल्लेख केलेली थॅलेमॉटॉमीची शस्त्रक्रिया तर झालीच होती, शिवाय आमच्याकडे जेव्हा ते पहिल्यांदा सभेला आले तेव्हा त्यांची डीबीएस शस्त्रक्रिया होऊनही अकरा-बारा वर्षे होऊन गेली होती. नोकरीतून त्यांनी थोडीशी लवकर स्वेच्छानिवृत्ती घेतली, पण सामान्यत: बरेचसे बँक कर्मचारी घेतात तशीच ती म्हणता येईल. म्हणजे पार्किन्सन्समुळे काम झेपत नाही म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतली, अशातला भाग नव्हता.
आमच्याकडे श्री. बी. के. चौगुले नावाचे एक शुभार्थी आहेत. ते शिक्षक पदापासून गटशिक्षणाधिकारी पदापर्यंत पोहोचले. त्यांनाही असाच लहान वयात पार्किन्सन्स झाला. नोकरीत असताना त्यांची सांगलीला बदली झाली. त्यांना वरचे पद मिळणार होते. ब-याचदा काही आजार नसतानाही केवळ बदली टाळण्यासाठी वरचे पद नाकारणारे लोक असतात. पण चौगुलेंनी मात्र ती बदली स्विकारली, तेथे जाऊन अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आणि अशा आजारातदेखिल उत्तम कामगिरी केल्याप्रित्यर्थ त्यांचा तेथे सत्कार केला गेला. त्यानंतर नोकरीचा पूर्ण कार्यकाल संपवून ते निवृत्त झाले.
आमच्या रेखा आचार्यही अशाच. त्यांना सत्तेचाळिसाव्या वर्षी पार्किन्सन्स झाला. एमआयटीमधील मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतील बालवाड्या उभ्या करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यादेखिल आपला कार्यकाल पूर्ण करून २००५ मध्ये निवृत्त झाल्या.
ह्या सर्व शुभार्थींकडे पाहिले तर त्यांची अवस्था आपल्याला समजू शकते. ते सहज काम करत आहेत आणि त्यांना सगळे झेपत आहे असे चित्र अजिबात नसते. पण मनाचा निर्धार असेल तर ते झेपू शकते. ह्याचे आणखी एक मोठे उदाहरण म्हणजे श्री. उमेश सलगर. ते आजही न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये कार्यरत आहेत, शिवाय त्यांना फिरतीची नोकरी आहे. ऑडिटसाठी ते वेगवेगळ्या गावांना जात असतात. उलट तेथे गेल्यावर पार्किन्सन्स मित्रमंडळाचीही काही कामे असतील तर ते करतात. मध्यंतरी जमशेदपूरला त्यांच्या ऑफिसचे काही काम निघाले. तेथे जायला त्यांच्या ऑफिसमधील इतर कोणी तयार नव्हते. त्यावेळी सलगर गेले आणि ते काम करून आले. ह्याशिवाय त्यांचे वेगवेगळ्या निबंध स्पर्धांमध्ये भाग घेणे वगैरेही सुरू असते. थोडक्यात पार्किन्सन्स झाला म्हणून ते कुठे कमी पडलेत, असे झालेले नाही.
श्री. वासू म्हणून एक शुभार्थी आहेत. त्यांच्या वडिलांनाही पार्किन्सन्स होता, नंतर वासूंनाही लहान वयातच झाला. त्यांचा मोठा व्यवसाय आहे. त्यांची डीबीएस शस्त्रक्रिया झाली. आपण ज्यांना अनैच्छिक हालचाली म्हणतो, तशा त्यांच्या खूप होत होत्या. डीबीएस शस्त्रक्रियेनंतर त्या पूर्ण थांबल्या. आम्ही घरभेटीला गेलो तेव्हा त्यांनी शस्त्रक्रियेपूर्वीचा आणि नंतरचा, असे दोन्ही व्हिडिओ आम्हाला दाखवले. आता ते अतिशय चांगल्या प्रकारे आपला व्यवसाय सांभाळत आहेत.
अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. त्यामुळे लहान वयात पार्किन्सन्स झालेल्या व्यक्तींनी मनाने हरू नये. ब-याच वेळा असे होते की, इतक्या लहान वयात आजार झाल्यानंतर त्याचा स्विकार करणे फार कठीण जाते आणि तो स्विकार न झाल्यामुळे पार्किन्सन्स वाढतच जातो. ह्या सर्वांची उदाहरणे एवढ्यासाठीच दिली की, तुम्ही मनाने ठरवले तर तुम्ही नोकरी-व्यवसाय उत्तम प्रकारे करू शकता, त्यामध्ये काही अडचण येत नाही. अनेकवेळा आजुबाजूचे लोकसुद्धा सांभाळून घेतात, पण प्रत्येक वेळा असे सांभाळून घेण्याचीही गरज पडतेच असे नाही.
श्री. अरविंद वेतुरकर ह्या शुभार्थींना नोकरीसाठी तळेगावला जावे लागायचे. त्यांचे घर तिस-या मजल्यावर होते. ते औंधला रहात, तेथून ते आधी बसने रेल्वेस्टेशनला आणि तेथून तळेगावला जात. त्यांनीही आपला नोकरीचा कार्यकाल पूर्ण केला. त्यांनाही असाच खूप लवकर, पस्तीस की छत्तिसाव्या वर्षीच पार्किन्सन्स झालेला होता.
अशी किती उदाहरणे सांगावीत? खूप खूप सांगता येतील. तर ज्यांना लहान वयात पार्किन्सन्स झाला आहे, त्यांनी ही सर्व उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर ठेवावीत, नाउमेद न होता मन जास्त कणखर करावे आणि आलेल्या परिस्थितीला समर्थपणे तोंड द्यावे, असे आवर्जून सांगावेसे वाटते.
शब्दांकन - सई कोडोलीकर.