Sunday, 23 December 2018

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ३३

                                                   पार्किन्सन्सविषयक गप्पा - ३३
                           .मागच्या गप्पात रमेश रेवणकर सभेला येत नाहित असे लिहिले होते.असे असले तरी त्यांचा मंडळाशी अप्रत्यक्ष संबंध येतच असतो.आणि मंडळाच्या कामाला हातभार लागत असतो.ते दरवर्षी स्वत: आकाशकंदील बनवतात.प्रत्येकवेळी वेगळे डिझाईन असते.कलाकृतीच्या प्रदर्शनात आशा रेवणकर ते ठेवते..अनेकांना यातून प्रेरणा मिळते.आमच्या कार्यकारिणी सदस्यांची सातत्यने फोनाफोनी चालू असते.निरोप घेणे, देणे हे ते न कंटाळता  करतात.त्यांच्या घरी अनेकवेळा मिटिंग होते.त्याबद्दल त्यांची नाराजी नसते घरी असले तर थोड्या गपा मारतात.आशा मंडळाच्या कामात बुडून गेलेली  असते.. त्याबद्दलही ते कधी कुरकुर करत नाहीत.
                        टाटा मोटर्समधून उच्च पदावरून ते निवृत्त झाले.त्यानंतरही सल्लागार  म्हणून  काम करत राहिले. ते ब्रिजचे राष्ट्रीय पातळीवरचे चॅम्पियन आहेत एवढेच त्यांच्याबद्दल  माहित होते.   गप्पा - ३२ ला आशाची प्रतिक्रिया आली आणि शुभार्थी रमेश रेवणकर यांच्याविषयी काही गोष्टी नव्याने कळल्या. जेंव्हा १६/१७ वर्षापूर्वी पार्किन्सन्सचे निदान  झाले  तेंव्हा मित्रांना वाटले आता ते ब्रिज खेळू शकणार नाहीत.पण त्यांची इच्छाशक्ती,जिद्द जबरदस्त आहे.पार्किन्सन्स त्यांच्या क्षमतेवर परिणाम करू शकला नाही.पुण्यात आणि .पुण्याबाहेर ते सातत्याने ब्रिज खेळण्यासाठी जात राहिले.रमेश रेवणकर सहभागी आहेत म्हणजे विजय ठरलेला असेच समीकरण या क्षेत्रात आहे.सध्या ते पुण्याबाहेर जात नाहीत.पण पुण्यातील Tournaments मध्ये सहभागी होतात.ते Tournaments आयोजित करतात.परीक्षक म्हणून काम करतात.यासाठी  मुव्हमेंट कार्ड स्वत: तयार करतात.ते जागतिक दर्जाचे असावे म्हणून विशेष अभ्यास करतात.यासाठी त्यांना महिनाभराचा काळ लागतो.हे किचकट काम ते न कंटाळता करतात.प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी ते ब्रिज खेळतात. इतर दिवशी रमी खेळतात.हेच खेळ ते ऑनलाईनही खेळतात.हे विस्ताराने लिहायचे कारण पीडी झालेल्या प्रत्येक व्यक्तीची ग्रहण क्षमता,आकलन क्षमता,स्मरणशक्ती,जाणीव क्षमता   कमी होते असे नाही.
                   त्यांना फिरण्याची खूप आवड आहे. दरवर्षी एक परदेश पर्यटन, भारतातील एखादे स्थळ दर्शन,पुण्याजवळच फार्महाऊसवर जावून राहणे,गणपती उत्सवासाठी मुळ गाव कारवारला जाणे, Tournaments च्या निमित्ताने गावोगावी जाणे अशी त्यांची विविधांगी भटकंती सुरु असते.बाहेर गेलेल्यावेळी कधीतरी आपल्याला जमणार नाही असे वाटले तर ते हॉटेलवर एकटे राहतात आणि आशाला जाऊ देतात.आशा प्रतिक्रियेत त्यांच्याबद्दल म्हणते,
" Some times I worry about his wellness,but  after every problem he rises like a Phoenix.That gives me positivity and stop worrying. ..He is patient but he finds his ways to be happy so our life too runs very smoothly."
                   मी या दोघांची पीडीसह वाटचाल जवळून पहिली आहे.पीडीच्या भास,तोल जाणे अशा कारवाया सातत्यने सुरूच असतात.पण आशा खंबीरपणे  या कारवायांना परतवायला ढाल बनून उभी असते.पार्किन्सन्स  मित्रमंडळात सामील झाल्यावर तिच्यात हा खंबीरपणा आला.आता इतर शुभार्थी शुभंकरांना ती खंबीर बनवत असते.ही प्रक्रिया हळूहळू पण सहजपणे झाली
' Let us ask few questions to ourselves ' या तिच्या २०१५ च्या स्मरणिकेतील लेखात तिने हे सविस्तर लिहिले आहे. सर्व शुभंकर शुभार्थिनी वाचून अत्मपरीक्षण करावे अशा या लेखाचे फोटो सोबत देत आहे.
अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
                      

Wednesday, 19 December 2018

पार्किन्सन्स शुभार्थींच्या( Patient ) कलाकृती - एक उपचार

  पार्किन्सन्स शुभार्थींच्या( Patient ) कलाकृती  -  एक उपचार  
             जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यात आत्तापर्यंत शुभार्थींचा नृत्याविष्कार हे आकर्षण



असायचे.गेल्या काही कार्यक्रमात शुभार्थींच्या कलाकृतीचे प्रदर्शन हे ही आकर्षण ठरत आहे.           
 घरभेटीतून अनेक शुभार्थी पेंटिंग करतात,चित्रे काढतात आणि त्याचा त्यांना पीडीच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास उपयोग होतो हे लक्षात आले.यातील पहिला प्रेरणादायी अनुभव डॉ. शीलाताई कुलकर्णी यांचा.तीसपस्तीस वर्षांच्यावर भारत आणि भारताबाहेर त्यानी वैद्यकीय व्यवसाय केला.अनेक रुग्णांवर उपचार करुन त्याना दिलासा दिला.पण त्यांचे पति आणि त्या स्वतः या दोघानाही पार्किन्सन्स झाल्यावर मात्र नैराश्येनी घेरले.पण त्यात गुंतून न राहता त्यातून बाहेर पडण्याचे विविध मार्ग शोधले.ताठरणार्‍या बोटाना वठणीवर आणण्यासाठी कॅरम वीणकाम,चित्रकला यांचा आधार घेतला.२००९ मध्ये जवळच राहणार्‍या सोनाली राणेकडून चित्रकलेचे धडे घेण्यास सुरुवात केली.आठवड्यातून पाच दिवस रोज एक तास शिकणे चालू झाले.शालेय जीवनात एक अनिवार्य विषय म्हणून आणि वैद्यकीय शिक्षणात आकृत्या काढण्यापुरताच चित्रकलेशी संबंध होता आता अडुसष्टाव्या वर्षी पेन्सिल हातात धरली होती.आडव्या उभ्या तिरक्या रेषा काढण्यापासून सुरुवात केली.शिक्षक आलेल्यावेळी ऑफ पिरिएड असला तर उठून बसताही यायचे नाही.सुरुवातीला लगेच हात दमायचे.सारखे खोडरबर लागायचे.रेषांच्या फटकार्‍यातून हाताची असमर्थता जाणवायची.पण मनाचा निर्धार आणि सतत सराव यानी रेषा स्थिर होऊ लागल्या.प्रमाणबद्धता जमू लागली.त्रिमितीची जाण आली.एकाच पेन्सिलिने कमी जास्त दाब देत शेडींग करणे जमू लागले.निसर्ग चित्र, वस्तुचित्र,व्यक्तिचित्र सगळे सराइतासारखे जमू लागले.
या सर्वांपेक्षा महत्वाचे म्हणजे सलग एक तास बसूनही शरीर कुरबुर करेनासे झाले.औषधांची आठवण येईनाशी झाली.नैराश्य दूर होऊन उत्साह, आत्मविश्वास वाढला.
त्यांची शिक्षिका सोनाली राणेनी सांगितले ‘चित्रकलेत त्यांनी प्रगती केलीच पण चित्रकला शिकताना आणि चित्रे काढताना त्यांच्या शारीरिक, मानसिक,अवस्थेत झालेले स्थित्यंतर अधिक आनंदाचे होते.’
चित्रकलेची ही किमया थक्क करणारी होती. २०१० सालच्या  स्मरणिकेचे मुखपृष्ट त्यांच्याच चित्राने सजले.
                          चित्रकलेने पिडीच्या लक्षणावर मात करणारे दुसरे उदाहरणं विद्याधर पटवर्धन यांचे. बँकेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी चित्रकलेचा छंद जोपासला.७५व्या वर्षी पिडी झाला तरी त्यानी चित्रकला सोडली नाही.मी त्याना भेटले तेंव्हा ते ८० वर्षाचे होते...शीलाताईना कंपाची समस्या नव्हती.पटवर्धनाना मात्र ताठरते बरोबरच कंपाचीही समस्या होती..त्यामुळे त्यानी पीडी झाल्यावर केलेली मोठमोठी पेंटींग्ज पाहून त्यांच्या जिद्दीला हॅट्स ऑफ म्हणावेसे वाटले.चित्रे काढताना त्यांची समाधी अवस्था असायची.. कंप, ताठरता जवळही फिरकत नव्हते.
                          कमलाकर झेंडे, कल्पना शिरनामे हेही छंद म्हणून चित्रकला जोपासणारे शुभार्थी.झेडे व्यवसायाने अभियांत्रिकी कॉलेजमधे गणिताचे प्राध्यापक तर  कल्पना खेळाडू होत्या.अशा अनुभवातून                
                       जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यात शुभार्थीच्या कलाकृतीचे प्रदर्शन ठेवायचे ठरले.२००९/१० हे वर्ष कलोपचार या विषयालाच वाहिलेले होते.नृत्योपचार,संगीतोपचार,ड्रम थेरपी अशा  विविध कार्यशाळा आयोजित केल्या होत्या.अनिल अवचट यांच्यासारखे कलाकार अध्यक्ष होते. त्यामुळे असे प्रदर्शन संयुक्तिकही होते..त्यानंतर २०१५ मध्ये असे प्रदर्शन भरले.शुभार्थी विजय राजपाठक यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी माधवी यांनी राजपाठकांचे एक पेंटिंग मला भेट दिले.त्यांची अशी अनेक पेंटीग्ज असल्याचे त्यांनी सांगितले.ती सर्व अप्रतिम होती.वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तासनतास काम करून त्यांनी ती काढली होती.ते सलग इतके तास काम करतात याचे न्यूरॉलॉजिस्टनाही आश्चर्य वाटायचे.शुभार्थीना त्यामुळे प्रेरणा मिळावी म्हणून  प्रदर्शन मांडायचे ठरले..यावेळीही भरभरून प्रतिसाद मिळाला.
                 २०१७ मध्ये तिसऱ्यांदा असे प्रदर्शन आयोजित केले गेले.शांतीवन सहलीत ओरोगामीसाठी सर्वाना कागद दिले होते. शुभार्थी विजय ममदापूरकर यांनी त्या कागदावर चालत्या बस मध्ये अर्कचित्रे काढली.ती पाहून शीलाताई कुलकर्णीना चित्रे काढण्याची  प्रेरणा मिळाली.अनिल कुलकर्णी यांच्या आजारपणात त्यांचे चित्रे काढणे थांबलेच होते.ममदापूरकर यांच्या उत्साहाची लागण अनेकांना झाली आणि  यावर्षी प्रदर्शन ठेऊया असे ठरले. मेळाव्याच्या अनेक दिवस आधीपासून वेळोवेळी  प्रदर्शनाची माहिती दिली जात होती पण कितपत प्रतिसाद मिळतो याबाबत शंका होती.शुभार्थिंनी शंका फोल ठरवली.अनेकांनी कलाकृती आणल्या, त्यात विविधताही होती.या सर्वांनी घेतलेले कष्ट,कल्पकता आणि यातून आजाराचा विसर पडणे,काही लक्षणे कमी होणे हे सर्व पाहून आता कलाकृतीचे प्रदर्शन हा अनिवार्य भाग झालाआहे.
                         विजय देवधर यांनी २०१७  साली  रंगीबेरंगी कागदाच्या ओरिगामीने.फुलपाखरू,बदक, अनेक प्राणी पक्षी,फुले अशा विविध वस्तू केल्या होत्या.ओरिगामी ही अक्षरेही ओरिगामीतच तयार केलेली.विशेष म्हणजे पीडी झाल्यावर पुस्तकात पाहून त्यांनी ही कला आत्मसात केली.तासनतास मी हे करत राहतो. मला खूप आनंद मिळतो असे ते सांगत होते.२०१८ च्या प्रदर्शनात त्यांनी मन वेधून घेणारी.क्विलिंगची भेटकार्डे केली.ही नाजूक कला आत्मसात करण्यास त्यांना कष्ट घ्यावे लागले.पण त्यात त्यांचे भान हरपून जाई मला रंग बोलावतात असा अनुभव त्यांनी सांगितला.
                       पंचाहत्तरी ओलांडलेल्या पद्मजा ताम्हणकर यांच्या  उत्साहाला  कोणताही उपक्रम असला तरी उधाण येते..त्यांनी कागदी फुले,पिस्त्याच्या कव्हरची फ्रेम,ग्रीटिंग्ज अशा विविध वस्तू प्रत्येक प्रदर्शनात असतात.
                       प्रदर्शनात पाककृती ठेवल्या तरी चालतील असे सांगितले होते.यात महिला वर्ग सहभागी होईल असे वाटले होते परंतु उमेश सलगर यांनी एक वर्षी भरली मिरची ठेवली आणि ही मक्तेदारी स्त्रियांची नाही हे दाखवून दिले.आणलेल्या मिरच्या त्यांनी तेथेच वाटून टाकल्या.प्रमुख पाहुण्यांना देण्यासाठीही त्यांनी मिरच्यांचे स्वतंत्र पाकीट आणले होते.एका शुभार्थीला लांबट मिरचीत मसाला भरण्याचे कौशल्याचे काम  थरथरत्या हाताने करणे कसे जमले असेल? दुसर्या वर्षी त्यांनी खारी चंपाकळी करून आणली होती. सकाळच्या वार्ताहरालाही आपल्या वृत्तात त्याचा उल्लेख करावासा वाटला.
                      पूर्वी दिवाळीला आकाश कंदील घरी केले जायचे. आता कोणी फारसे करताना दिसत नाही आमचे शुभार्थी रमेश रेवणकर मात्र आकाश कंदील घरीच करतात.त्यांचा आकाशकंदील आम्ही प्रदर्शनात ठेवतो.
डॉक्टर जावडेकर आपल्या कलाकृतीना खूप जपतात. आपली पेंटींग स्वत:कडे ठेवून त्यांनी ती प्रेक्षकांना दाखवली.
 ही काही मोजकी उदाहरणे सांगितली.
                       . या सर्वांचे थरथरणारे हात,ताठरलेले स्नायू,काहीना होणारा फ्रीजिंगचा त्रास या सर्वावर मात करत जिद्दीने त्यांनी हे केले. सर्वसामान्यांपेक्षा त्यांना यासाठी कितीतरी जास्त वेळ लागला असणार हेही समजू शकणारे आहे.पीडिला विसरून आनंदी राहण्यासाठी त्यांनी शोधलेले  हे मार्ग नकळत लक्षणांवर मात करतात हेही आता लक्षात आले आहे.इतर शुभार्थींसाठी हे प्रेरणादायी आहे.
                        २०१८ च्या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून आलेले मानसोपचार तज्ज्ञ डॉ.लुकतुके प्रदर्शन पाहून खूपच प्रभावित झाले.त्यांनी शुभार्थींचे भरभरून  कौतुक केले आणि हे कसे साध्य होते हे शास्त्रीय दृष्ट्या समजावून ही सांगितले.त्यांच्या सांगण्याचा थोडक्यात आशय पुढे देत आहे.
                       मेळाव्यातील ईशस्तवन,नृत्य, कलाकृती या सर्वांचा आधार घेत  त्यांनी त्यामागचे विज्ञान समजावून सांगितले.नृत्य करणाऱ्या  शुभार्थींची नृत्य करताना पार्किन्सन्सची लक्षणे थांबलेली सर्वांनी पाहिली..तादात्म्य,सापडलेली लय यामुळे ती थांबली .जेंव्हा लय बिघडते तेंव्हा रोग होतो.कलाकृतीतही   .क्विलिंग हे अत्यंत नाजूक काम Movement  Disorder  असणारी व्यक्ती  करु शकते कारण ते काम करताना त्यांचे मन रमते,छान वाटते.या छान वाटण्यात लय असते.मी माझा स्वामी हा भाव असतो.अशी लय सापडणे महत्वाचे.ती मनाची असते तशी शारीरिक वर्तनाची असते.ही सापडवायची कशी?      
                होकारार्थी मानसशास्त्रात त्याचे उत्तर  सापडते.. होकारार्थी मानसशास्त्र हे जगण्याचे शास्त्र आहे. तसेच त्यात सूत्रे असतात, ती लक्षात ठेवायची आणि ती जगण्याचा प्रयत्न करायचा.Four A हे सूत्र यासाठी डॉक्टरांनी सांगितले
                .१)Adapt  - जुळवून घेणे.यामुळे साधनसामग्रीची शक्ती वाढते,नकार असेल तर जुळवून घेणे कठीण होते.
                २)  Adopt - दत्तक घेणे. आजाराशी  भांडू नये.भोवतालच्या परिस्थितीवर आपला ताबा नसतो, आपल्यावर असू शकतो.
                ३) Alter - मुळ डिझाईन कायम ठेवून् दृष्य सोयी बदललणे.आपल्या अपेक्षा,भावना ,वर्तन,सकारात्मक रीतीने अल्टर करणे.
                ४) Accept -  नाईलाजाने नाही तर स्वेच्छेने स्वीकार करणे.आपल्याला यापेक्षा बदलणे शक्य नाही या पातळीवर आणणे .आणि हे म्हणताना पूर्ण प्रयत्न केला आहे का? हा प्रश्न स्वत:ला विचारणे
              स्वमदत गटात आपल्याप्रमाणे इतर असल्याने स्वीकाराची प्रक्रिया सोपी होते.
   आता whatsapp,फेसबुकसारख्या साधनामुळे कलाकृती  लागलीच इतरांच्यापार्यंत  पोचवता येतात.डॉक्टर जावडेकर भूषणा भिसे यांची पेंटींग्ज,नागपूरच्या सौ.पाटणकर यांच्या कलाकृती आणि कपड्यावरील रंगकाम,विजया प्रभू यांचा कर्नाटकी  कशिदा असे काहीना काही येतच राहते.यातून होणाऱ्या कौतुकामुळे शुभार्थीचा आत्मविश्वास वाढतो आणि इतरांना प्रेरणा मिळते.अशी आनंदाची लागण होणे हेच तर स्वमदत गटाचे काम आहे ना?
            ( 'संपूर्ण' दिवाळी डीजीटल अंक २०१८ मध्ये प्रकाशित )
                               

Saturday, 15 December 2018

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ३२




पार्किन्सन्सविषयक गप्पा - ३२
मागच्या गप्पांमध्ये मी अमिता गोगटेचे उदाहरण देऊन, तिला पार्किन्सन्स मित्रमंडळात येणे नको वाटते, याविषयी बोलले होते. तिच्याबाबतीत तिची सपोर्ट सिस्टीम खूप भक्कम होती आणि ती स्वमदत गटाच्या मदतीशिवायही आनंदी राहू शकत होती. शुभंकर आणि शुभार्थी ह्या दोघांनाही कोणत्याच बाह्य आधाराची गरज नव्हती.
पण असे अनेकजण असतात, ज्यांना स्वमदत गटाची आत्यंतिक गरज असते. शुभार्थी आणि त्याचबरोबर शुभंकरालाही असते. पण त्यांना असे वाटत असते की, आपण ह्या स्वमदत गटात आल्यानंतर येथे दिसणारे पुढच्या टप्प्यावरील, पुढच्या अवस्थेतील शुभार्थी पाहून आपल्या मनाला जास्त त्रास होईल, त्यामुळे उलट आपला पार्किन्सन्स वाढेल. असा काहीतरी त्यांचा समज असतो. किंवा तसे शुभार्थी पाहून आपलीही पुढे अशी अवस्था होईल ह्या विचाराने जास्तच दु:ख होते आणि त्यामुळे ते शुभार्थी पहाणे नको वाटते, असेही काहींचे म्हणणे असते. पण असे प्रत्यक्षात होत नाही.
मंडळात अनेक शुभार्थी येतात त्यावरून तसे होत नाही हे लक्षात येते. त्याचबरोबर आकाशवाणीवर सेतू ह्या विविध स्वमदत गटांना एकत्र करणा-या गटाअंतर्गत सर्व स्वमदत गटांची माहिती सांगणा-या मुलाखती झाल्या होत्या. तेव्हा त्यामध्ये न्युरॉलॉजिस्ट डॉ. सुधीर कोठारी आणि पार्किन्सन्स मित्रमंडळाचे अनिल कुलकर्णी सहभागी झाले होते. त्यावेळी डॉ. कोठारींनी सांगितले होते की, त्यांच्याकडे येणा-या रुग्णांपैकी स्वमदत गटात जाणा-या रुग्णांचा पार्किन्सन्स आटोक्यात असलेला आढळतो. ते रुग्ण आनंदी दिसतात. हे न्युरॉलॉजिस्टने केलेले शिक्कामोर्तब आहे. जे मंडळात न येणा-या शुभार्थी आणि शुभंकरांनी लक्षात घ्यायला हरकत नाही.
आम्हालादेखिल असे वाटते की, पार्किन्सन्स झाल्यावर लगेच आपण त्यांच्यापर्यंत माहिती पोचवावी. अगदी आमच्या घरामागच्या गल्लीत रहाणारे एक पार्किन्सन्स रुग्ण आहेत, ज्यांना आम्ही प्रत्यक्ष घरी जाऊन मंडळाबद्दल सांगितले. मात्र त्यांची काही येण्याची तयारी दिसली नाही. मंडळात यायचे नसेल तर हास्य क्लबामध्ये या, बाहेर पडा असेही सुचवले, पण त्यांची तशीही इच्छा दिसली नाही.
अशी खूप उदाहरणे आहेत. शेवटी काय आहे की, घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते, मात्र पाणी त्या घोड्यानेच प्यावे लागते. मग अशावेळी आम्ही शुभंकरांना येण्याबद्दल सुचवतो. त्यांना माहिती मिळते, खूप उपयोगी मुद्दे समजतात आणि त्याचा शुभार्थींसाठी वापर करता येतो. शुभार्थींना हाताळणे सोपे होते. जे शुभार्थी बाहेर पडायला राजी नसतात, त्यांनी पार्किन्सन्सला स्विकारलेले नसते, त्यामुळे त्यांना तर ह्या सर्व आधाराची जास्त गरज असते. त्यांना हाताळण्यासाठी शुभंकरांनाही स्वमदत गटाची खूप गरज पडते.
आमच्या कार्यकारिणीतल्या आशा रेवणकर, ज्या आता पार्किन्सन्स मंडळाची नोंदणी झाल्यावर आमच्या ट्रस्टच्या सदस्यही आहेत, त्यांचे उदाहरण येथे आवर्जून सांगता येईल. त्यांचे यजमान रमेश रेवणकर हे अजिबात मंडळात यायला तयार होत नाहीत. ११ एप्रिलच्या आमच्या जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यालाही ते आले नाहीत. पण आशा रेवणकर येत राहिल्या आणि आमच्या गटात सामील झाल्या, इतक्या छान रुळल्या की आमच्या परिवारातल्याच झाल्या. त्या नेहमी सांगतात की, मला इतका छान गट आणि मित्रमंडळ मिळाले हे फार चांगले झाले. जरी त्यांचे यजमान येत नसले, तरी त्यांना हाताळण्यासाठी आशाताईंना ह्या मदतीचा उपयोग होतो.
म्हणूनच ह्या गप्पांमधून माझे हे सांगणे आहे. शक्यतो शुभार्थांनी तर यावेच, पण समजा, शुभार्थी तयार झाले नाहीत, तर निदान शुभंकरांनी तरी यावे आणि स्वमदत गटाचा फायदा घ्यावा. त्यातून तुमच्या शुभार्थींना आनंदी ठेवण्यासाठी निश्चितच काहीतरी मुद्दे मिळतील अशी खात्री वाटते.
शब्दांकन - सई कोडोलीकर.
अधिक माहितीसाठी

www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.

Saturday, 8 December 2018

पार्कीन्सन्सविषयक गप्पा - ३१

पार्कीन्सन्सविषयक गप्पा - ३१
गप्पांच्या मागील भागात मी म्हणाले होते की, लहान मुलांना पार्किन्सन्सविषयी माहिती सांगितल्यास त्यांचे शुभार्थींबरोबरचे वागणे जास्त योग्य होते. यासंदर्भात येथे मला आणखी एक निरिक्षण नोंदवायचे आहे. ज्यांच्याकडे लहान वयात पार्किन्सन्स झालेले शुभार्थी असतात, त्यांच्याकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट गरजेची असते. होते असे की, मुले खूप अजाण असतात, त्यांना आजाराबद्दल काही सांगण्याइतक्याही वयाची नसतात. तेव्हा घरातील मोठी माणसे शुभार्थींबरोबर जशी वागतात, तशी ती मुले अनुकरण करतात. त्यामुळे कुटुंबियांनी साहजिकच शुभार्थींबरोबर सौहार्दाने वागणे आवश्यक असते. ते एरवीही प्रत्येक घरामध्ये जरुरीचे आहे, मात्र लहान मुले असलेल्या घरांमध्ये जास्त, कारण लहान मुले घरातल्या सदस्यांचे निरिक्षण करत असतात.
उदाहरण द्यायचे झाले तर, अमिता गोगटेला तिसाव्या वर्षी पार्किन्सन्स झाला. तिला पहिला मुलगा होता आणि दुस-या मुलाच्या वेळी बाळंतपणानंतर तिला पार्किन्सन्स असल्याचे लक्षात आले. म्हणजे मुले खूपच लहान होती. पण त्यावेळी तिचे आई-वडिल, सासुसासरे आणि यजमान ह्या सर्वांनी ही समस्या फारच चांगल्या त-हेने हाताळली. अमिताला बसलेल्या ह्या मोठ्या धक्क्यातून बाहेर तर काढलेच, शिवाय मुलांना सांभाळण्यासकट सर्व जबाबदा-या आलटून पालटून एकमेकांमध्ये वाटून घेतल्या. तिच्या यजमानांचे वर्तन तर आदर्श म्हणण्याजोगे होते. आम्ही तिच्याकडे जेव्हा प्रथम गेलो तेव्हा माझ्या यजमानांना नुकताच पार्किन्सन्स झाला होता. म्हणजे तशी बरीच जुनी गोष्ट आहे. तेव्हा तिची कोल्हापूरचे न्युरोसर्जन डॉ. प्रभू ह्यांच्याकडे थॅलॅमॉटोमीची शस्त्रक्रिया झाली होती. आमच्या एका नातेवाईकांकडून ह्या शस्त्रक्रियेमुळे तिच्या तब्येतीत खूप सुधारणा झाल्याचे आम्हाला समजले आणि त्या नातेवाईकांनी तुम्हीही तशी शस्त्रक्रिया करून घेण्याचे सुचवल्यामुळे आम्ही तिला भेटायला गेलो होतो.
अमिताने आम्हाला शस्त्रक्रियेबद्दल बरीच माहिती दिली, शस्त्रक्रियेमुळे सुधारणा वाटत असल्याचेे सांगितले. आधी तिच्या हाताला खूप कंप असे, काही काम करता येत नसे, पण आम्ही गेलो तेव्हा तिने स्वत: केलेले पोहे आग्रह करकरून आम्हाला खायला घातले. फोडणीत मोहरी मी माझ्या हाताने घातली, ही गोष्ट सांगतानाही तिचा चेहरा खुलला होता. त्यावरून मोहरीचे दाणे उचलणे आणि फोडणीत घालणे ही सोपीशी गोष्टही तिच्यासाठी किती अवघड होती, हे लक्षात आले. मात्र शस्त्रक्रियेनंतर तिची परिस्थिती सुधारली होती.
अर्थात थॅलॅमॉटोमी ही जी शस्त्रक्रिया आहे, ती आता मागे पडली आहे किंवा आउटडेटेड झालेली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सध्या डीप ब्रेन स्टिम्युलेशन ही शस्त्रक्रिया रुढ आहे आणि खूप फायदे होत असल्यामुळे आता ती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पण आत्ता आपला विषय शस्त्रक्रियेचा नसल्यामुळे आपण मूळ मुद्द्याकडे वळू.
तर आम्ही अमिताकडे गेलो तेव्हा तिची मुले थोडी मोठी झालेली होती. वडिल जसे जबाबदारीने वागत होते, तशीच ती मुलेही वागत होती. पुढे काही कालावधीने पुन्हा तिच्याकडे जाणे झाले तेव्हा मुले आणखी थोडी मोठी झाली होती. तेव्हा अमिताच्या बोलण्यात आले की, मुले तिला पोळ्या करतानाही मदत करतात. आम्ही तिला पार्किन्सन्स मित्रमंडळात बोलावल्यावर तिने सांगितले की, माझ्याकडे तुम्ही कितीही लोकांना पाठवा, मी त्यांना सगळी माहिती सांगेन, त्यांचे आदरातिथ्य करेन, पण मला मंडळात येणे जमणार नाही. त्याचे कारण असे होते की, अमिताला कोणत्याही बाह्य स्व-मदत गटाची आवश्यकता नव्हती, जशी इतर शुभार्थींना सहसा असतेच. अमिताला कुटुंबिय होतेच शिवाय मैत्रिणीही कायम मदतीसाठी, आधारासाठी तत्पर होत्या. त्यामुळे स्वमदत गटाशिवायही ती छानपैकी आनंदी होती. तिची मुले किंवा यजमान नवनवीन माहिती शोधून त्याप्रमाणे सतत काही ना काही करत रहायचे आणि पर्यायाने तिचे एकूण छान चाललेले होते.
एकदा आम्ही पूर्वकल्पना न देता अचानकच तिच्याकडे गेलो असताना ती मैत्रिणींबरोबर भिशीला गेली होती आणि परस्परच वाचनालयातून पुस्तके बदलून आणणार होती. हे सगळे ती एकटी करत होती. तिचे यजमान जायच्या ठिकाणी खाली सोडत, नंतर मैत्रिणी रस्ता ओलांडून देत आणि ती चालत येत असे. थोडक्यात, सर्व त-हेने अमिता स्वावलंबी आयुष्य जगत होती. केवळ कुटुंबियच नव्हे तर तिला मैत्रिणीही चांगल्या मिळाल्या होत्या. आम्ही भेटलो तेव्हा ती कुटुंबियांबद्दल, मैत्रिणिंबद्दल भरभरून सांगत होती, वाचलेल्या पुस्तकांबद्दल बोलत होती. ती इतकी आनंदी होती की, आम्हीही तिला पार्किन्सन्स मित्रमंडळात सहभागी होण्याचा आग्रह धरला नाही. पण अनेकांना तिच्याकडे पाठवले आणि त्या सर्वांना ती छान माहिती देत असे. महत्त्वाचे म्हणजे, अमिताच्या ह्या सर्व प्रवासात आम्हाला अमिताच्या मुलांचा सक्रिय सहभाग प्रकर्षाने जाणवला.
शब्बीर सय्यद ह्यांनाही असाच लहान वयात पार्किन्सन्स झाला. ते आता नाहीत. त्यांच्याकडे परिस्थिती थोडी बिकट, कारण हा मिळवता हातच आजारी पडल्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक घडीवर परिणाम होणे साहजिक होते. त्यांच्या पत्नी ब्युटी पार्लर चालवत आणि त्यांचा भाऊ त्यांच्या औषधोपचाराचा खर्च चालवत असे. अशावेळी सय्यदांचा दहावीत असलेला मुलगा त्यांची सेवा करत असे आणि त्यांना चांगली वागणूकही देत असे. ही चांगल्या वर्तणुकीची काही उदाहरणे पाहिलेली.
तर एक उदाहरण असेही पाहिले, जेथे असाच अगदी लहान वयात, तीस-बत्तिसाव्या वर्षी पार्किन्सन्स झालेल्या, मुले लहान असलेल्या शुभार्थी स्त्रीला कुटुंबियांकडून बरे वागवले जात नव्हते. तिच्याकडून इतर स्त्रियांसारख्याच कुटुंबियांच्या देखभालीच्या, जबाबदा-या पार पाडण्याच्या अपेक्षा केल्या जात होत्या, आणि त्या ती पूर्ण करू शकत नाही म्हणून तिचा राग केला जात होता. तिची कर्तव्ये पूर्ण करणे तिला शारिरीक मर्यादांमुळे झेपणारे नव्हतेच, पण तिला कुणाचाच मानसिक आधारही नसल्यामुळे ती सततच मनाने खचलेली, दमलेली, निराश मन:स्थितीत असे. त्यामुळे तिचा पार्किन्सन्स आणखीनच वाढत असलेला आम्हाला दिसत होता.
ह्या सर्व उदाहरणांवरून हेच सांगायचे आहे की, लहान मुले म्हणून त्यांना गृहीत न धरता त्यांना शुभार्थीशी कसे वागायला हवे हे सांगितले पाहिजे. ती मोठी झाल्यावर पुढे माहिती समजल्यावर मग ती आपोआपच समंजसपणे वागू शकतात. त्यामुळे शुभार्थींच्या पार्किन्सन्ससह आनंदी रहाण्यामधे तीही सहभागी होतात. कितीतरी वेळा आम्ही पहातो की, घरी लहान मूल असेल किंवा नवे बाळ आले तर शुभार्थी खूप आनंदी दिसतात. परगावाहून किंवा परदेशातून मुले, नातवंडे येतात, तेव्हाही ते खुललेले दिसतात. त्यामुळे पार्किन्सन्स शुभार्थींच्या जीवनातील लहान मुलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
शब्दांकन - सई कोडोलीकर.
अधिक माहितीसाठी

www.parkinsonsmitra.org ही वेबसाईट पहा.

Thursday, 6 December 2018

२१ नोव्हेंबर २०१८ - घाडगे बोटॅनिकल गार्डन सहल

                                         २१ नोव्हेंबर २०१८ - घाडगे बोटॅनिकल गार्डन सहल
                        दरवर्षी नोव्हेंबर,डिसेंबरच्या दरम्यान पार्किन्सन्स मंडळाची सहल असते.यावर्षी २१ नोव्हेंबरला होती. नेमेची येणारा पाऊस नेम बदलून  पुण्यात २० नोव्हेंबरला अचानक कोसळला. आणि उद्या सहल जाऊ शकेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.हवामानाच्या भविष्यावर हवाला ठेऊन आम्ही सर्वांना आपली सहल ठरल्याप्रमाणे जाणार असा भरोसा दिला.यावेळी प्रथमच नर्मदा हॉलकडे जमायचे होते.प्रभातरोडला बस थांबवता येत नाही, कमिशनरची परवानगी घ्यावी लागते.आशा रेवणकर परवानगीसाठी गेल्या आणि दिलासादायक अनुभव घेऊन परवानगीसह परत आल्या.कमिशनरनी अगत्याने स्वागत केले.त्यांना आमच्या गटाबद्दल माहित होते.परवानगीबरोबर त्या भागात  ड्युटीवर असलेल्या दोन पोलिसांना तेथे थांबायला सांगतो असेही त्यांनी  सांगितले.
                       साडे आठला सर्वांना बोलावले होते.तरी आठपासूनच मंडळीं यायला सुरुवात झाली. चेहऱ्यावर लहान मुलांसारखा आनंद आणि उत्सुकता होती..नर्मदाच्या पारावर आलेली मंडळी स्थानापन्न होत होती.काही उभ्याउभ्याच गप्पा मारत होती..बस उभीच होती.आलेल्या व्यक्तींना नावाचा बिल्ला देवून लगेच बसमध्ये बसवणे,पैसे भरून घेणे,जे अजून आले नाहीत त्यांना फोन करणे,अशी  उमा दामले,अरुंधती जोशी,दीपा होनप,अंजली महाजन,वसू देसाई, आशा रेवणकर,सविता ढमढेरे यांची लगबग चालू होती. बसमध्ये चढण्यासाठी आणलेले स्टूल लहान पडत होते. नर्मदाच्या कुलकर्णी यांच्याकडून मोट्ठे स्टूल  आणले. नर्मदा हॉलही आमच्यासाठी उघडून ठेवला होता.त्यांची आमच्या कामात खूपच मदत होते.
                          अंजलीने हजेरी घेतली आणि ९ वाजून १० मिनिटांनी बस निघाली.अनेकदा सहलीत पुढे जागा मिळवण्यासाठी धडपड,भांडाभांडी आढळते.आम्हाला मात्र इतक्या सहली झाल्या पण असा एकही अनुभव आला नाही.सर्वाना न्याहारीसाठी ठेपले आणि चटणी देण्यात आली.अरुंधतीने नात झाल्याबद्दल बर्फी दिली.ओरिगामीसाठी कागद देण्यात आले. नेहमीप्रमाणे शरच्चंद्र पटवर्धन यांनी चौकोनी कागद कापून आणले होते.नंतर शिकवल्या जाणाऱ्या क्विलीन्गचे साहित्यही त्यांनी आणले होते.चहा घेणारे किती, कॉफी घेणारे किती आणि बिनसाखरेचा घेणारे किती याची मोजदाद होऊन घाडगे गार्डनला ऑर्डर गेली.
                          घाडगे गार्डन जवळच असल्याने लगेचच पोचलो.डोंगराच्या कुशीतले निसर्गरम्य ठिकाण आहे. पोचल्या पोचल्या चहा  तयारच होता.वसूने श्रुजबेरी बिस्किटे आणली होती.आमच्याप्रमाणेच एका शाळेची २५० मुले तेथे आली होती.मनोहारी निसर्गाबरोबर त्यांचे बागडणेही आनंददायी वाटत होते.आमचेही खेळणे, बागडणे सुरु झाले.व्यवधान वाढवणारा,सर्व सहभागी होतील असा इडली डोसा खेळ झाला.तेथेच असलेल्या जादुगार कोहीनुरच्या  जादूच्या  प्रयोगानी आणि त्याबरोबरच्या चटपटीत बोलण्याने निर्भेळ करमणूक झाली.
          यावर्षी प्रथमच आलेल्या उल्हास बापट यांनी सन डायल या स्वत: प्रयोग करून तयार केलेल्या साधनाचे प्रात्यक्षिक दाखवले.हे साधन सूर्याच्या दिशेनुसार वेळ दाखवते.यानंतर बसल्याबसल्या सर्वात जास्त एक रुपयाची नाणी कोणाकडे आहेत,किल्ल्या कोणाकडे आणि डेबिट, क्रेडीट कार्ड कोणाकडे आहेत, असा छोटा खेळ घेण्यात आला.जोत्स्ना सुभेदार यांच्याकडे १७ नाणी,रेखा आचार्यकडे १३ किल्ल्या आणि मधुकर तांदळे यांच्याकडे ४ कार्डस् निघाली.अशा छोट्या खेळात सर्व सहभागी होऊ शकतात.सर्वांनीच याचा आनंद घेतला.                                      
              जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात विजय देवधर यांच्या क्विलिंगचे डॉक्टर लुकतुके यांनी खूपच कौतुक केले होते.सर्वाना ते शिकण्याची इच्छा होती.यातून एकाग्रता,मोटर स्कील वाढणे,नैराश्य कमी होणे असे अनेक फायदे असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले आणि प्रात्यक्षिकास सुरुवात झाली.देवधर यांनी काही प्राथमिक भाग शिकवला.सर्वच शुभंकर, शुभार्थी यात सहभागी झाले.सर्वांच्या ओरिगामीच्या कृतीही करून झाल्या होत्या.विजय देवधर आणि शरच्चंद्र पटवर्धन या परीक्षकांनी त्यातून निवड केली.लगेच बक्षिसेही देण्यात आली.

आशा रेवणकर प्रथम,रेखा आचार्य द्वितीय आणि नंदा चीद्दरवार,केशव महाजन यांना तृतीय क्रमांक विभागून मिळाला.डॉक्टर जावडेकर यांच्या स्केचलाही बक्षीस देण्यात आले.

           सर्वांनाच आता आजूबाजूची हिरवळ, धबधबा,धबधब्यात मनसोक्त डुंबणारी मुले खुणावत होती. एक वाजेपर्यंत जेवण तयार होणार होते. तोवर काहीजण भोवतालचा निसर्ग पाहण्यास गेले.एक दोघांनी तेथे असलेल्या बाजांवर झोपणे पसंत केले.काही तेथेच गप्पा मारत बसले.सगळ्यांना एकपर्यंत गोळा करून आणण्यासाठी  विद्यार्थी सहाय्यक समीतीचा गिरीश कुलकर्णी हा तरुण विद्यार्थी आमच्याबरोबर होता.व्हिडीओ,फोटो काढणे,शुभार्थीना आधार देणे अशा विविध कामात त्याची मदत होत होती.
         जेवणात पिठलं भाकरी, चायनीज,गुलाबजाम,शिरा,पुरी,पावभाजी  अशी विविधता होती. जेवणानंतर सर्वजण हॉलमध्ये जमले.सुरुवातीला वाढदिवस साजरे करून हास्याचा फुगा फोडण्यात आला. वसू देसाईनी प्रश्नमंजुषा तयार करून आणली होती. सर्वांना ते कागद वाटण्यात आले.दिलेल्या वेळानंतर कागद गोळा करण्यात आले.कोणाचे  किती बरोबर आहे पाहून नंबर लावण्यात आले.उन्नत्ती क्षीरसागर,उमा दामले,सुनिता चाफळकर यांनी यात प्राविण्य मिळवले.
        नंतर  करमणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली.माईकनी संप पुकारला. मग जवळ खुर्च्या घेऊन माईकशिवायच कार्यक्रम झाला.पार्किन्सन्सशी सामना करणाऱ्या शुभंकर, शुभार्थीना अशा छोट्या मोठ्या समस्यांना तोंड देणे सहज शक्य होते.

जोत्स्ना सुभेदार यांच्या गणपती पंचरत्नने कार्यक्रमाला सुरुवात झाली.यानंतर शोभना तीर्थळी यांनी सर्वांनी एकत्रित गावून म्हणायचा 'सखू गेली पाण्याला' हा खेळ घेतला.सखुला वेगवेगळे लोक भेटतात आणि हावभावासह गाणी म्हणतात.यात अरुण सुर्वे 'चाहे कोई मुझे जंगली कहे',दीपा,आशा,सविता,वसू इ.नी 'सुहाना सफर',कुर्तकोटी पती पत्नींनी 'तेरी प्यारी प्यारी सुरतको', सुभेदार पती पत्नींनी 'माळ्याच्या मळ्यामध्ये', देसाई पती पत्नींनी 'मेरा साया साथ होगा',डॉक्टर जावडेकर यांनी 'मानसीचा चित्रकार तो'अशी गाणी म्हटली.सर्वांसाठी गाणी तयार होती पण उशीर होत होता म्हणून सखुची साथ सोडावी लागली.
         सूत्र संचालनासाठी अंजलीने सूत्रे हातात घेतली.शोभना आणि सवितानी 'गार डोंगराची हवा' हे गाणे सर्वांसह म्हटले.सरोजिनी कुर्तकोटी यांनी पुलंचे विनोद सांगितले,पद्मजा ताम्हणकर विजया मोघे,अर्चना अंतुरकर, शुभदा गिजरे यांनी भक्ती गीते म्हटली,विजया दिवाणेनी 'चौदहविका चांद',उन्नत्ती क्षीरसागरनी 'तू बुद्धि दे' ही प्रार्थना म्हटली.अंजली महाजननी स्वरचित कविता म्हटली.केशवराव महाजन यांनी 'रहा गर्दीशोमे हरदम' हे गीत म्हटले.डॉक्टर जावडेकर यांनी लहानपणीची आठवण सांगितली.उल्हास बापट यांनी त्यांच्या नोकरीच्या काळात राजीव गांधी यांच्याबरोबर घडलेली थरारक आठवण सांगितली.
         कार्यक्रम चालू असताना  चहा बिस्कीटे आली आणि कार्यक्रमात रमलेल्या सर्वाना वेळेचे भान आले. शेवटी सर्वांनी सैराटच्या गाण्यावर नाचायचे ठरले होते.ते तर व्हायलाच हवे होते आणि झालेही.पटवर्धन,करमरकर हे पंच्याहत्तरी ओलांडलेले तरुण रिंगणात आल्यावर सर्वांनाच स्फूर्ती मिळाली.
        सर्वांचा एकत्रित फोटो झाला आणि पुढच्या सहलीची स्वप्ने पाहत,अनेक दिवसांसाठी उर्जा घेऊन मंडळी जड पावलाने परतली.जावडेकर म्हणाले, प्रत्येक दोन महिन्यांनी सहल निघायला हवी.
         यावेळी सहलीचे आयोजन करताना कार्यकारिणीतील कोणीतरी म्हणाले, पुढच्या वर्षीपासून  सहल नको.खूप टेन्शन येते.सह्लीनंतरच्या शुभंकर, शुभार्थींच्या सुखावणाऱ्या प्रतिक्रिया आणि खुललेले चेहरे पाहून आपलेच विधान विसरायला होते आणि पुन्हा सहल निघते.खरे तर  आमची सहल म्हणजे 'ताण हवासा' असेच म्हणावे लागेल. 




         
              

Monday, 3 December 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा -३०


                       पार्किन्सन्सविषयी गप्पा -३०
                 दर शनिवारी आम्ही आमच्या घरामागेच असलेल्या छोट्या गल्लीत मारुती मंदिरात जातो.सोसायटीचे छोटे मंदिर आहे.बाकावर जेष्ठ नागरिक बसलेले असतात.छोटी मुले खेळत असतात. कधी अभ्यास करत असतात.त्यादिवशी ह्यांना पाहून छोटी मुले आपापसात कुजबुजून हसू लागली.एक मुलगा हाता हलवून नक्कल करत होता तर एक छोटी मुलगी त्यांना दटावत होती.ह्यानी याची आता सवय असल्याने त्यांना त्याचे काहीच वाटले नाही.पण सर्वच पार्किन्सन्स शुभार्थीबद्दल असे होईल असे नाही.माझ्यातला शिक्षक अशा वेळी जागा होतो.मी थांबून त्या मुलाना म्हणाले, असे का होते तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही हसला.आधी मुले मी बोलायला लागल्यावर कावरीबावरी झाली.मी त्यांना म्हटले,मी तुम्हाला रागावत नाही.घाबरू नका.मग त्यांना समजेल अशा भाषेत मेंदूतील डोपामिन कमी झाले की कसा हालचालीवर परिणाम होतो हे सांगितले.मुले ऐकत आहेत म्हटल्यावर इतरही हिताच्या गोष्टी सांगून झाल्या.दुसऱ्या दिवशी त्यातला एक मुलगा आई बरोबर चालला होता.आमच्याकडे पाहून गोड हसला आणि बाय केले.मुलांना निट समजावून सांगितले तर मुले ऐकतात असा माझा अनुभव आहे.शुभार्थीच्या घरी मुले नातवंडे असतात त्याना आजाराबद्द्ल समजावून सांगितले तर त्यांच्या शुभार्थीशी वागण्यात फरक पडतो.शुभार्थीच्या आनंदी राहण्यात आणि पीडीला स्वीकारण्यात कुटुंबातील सर्वांच्या सहकार्याचा आणि त्यांच्याबरोबर सौहार्दाने वागण्याचा खूप वाटा असतो.
       माझ्या नातवाबाबत असेच घडले.पीडीमुळे हालचाली मंद होतात.एकदा लिफ्ट उघडून नातू तयार होता आणि ह्यांना चप्पल घालून लिफ्टपर्यंत यायला वेळ लागत होता. तो ओरडून चिडलेल्या आवाजात म्हणाला,' अब्बू लवकर लवकर या ना'.मी ते हळू का येतात हे त्याला समजावून सांगितले.नंतर मी फोनवर शुभार्थीशी बोलायची तेही तो ऐकायचा जेंव्हा तो आमच्याकडे होता तेंव्हा आम्हाला त्याला सभेलाही घेऊन जावे लागायचे.आता त्याला पीडीबद्दल बरीच माहिती आहे तो ह्यांचे निरिक्षण करून मलाच काहीकाही सांगत असतो.मुलांचे आणखी काही अनुभव पुढील गप्पात.