Thursday, 1 June 2017

पार्किन्सन्ससाठी फेसबुक

                                          अनेक मित्र मैत्रिणींनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या सर्वाना मन:पूर्वक धन्यवाद.या निमित्ताने आपला मित्र परिवार वाढला आहे हे अचानक लक्षात आले.२०१०  मध्ये मी फेसबुक जॉईन केल तेंव्हा आपला मित्रपरिवार एवढा वाढेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.पण  वाढता वाढता वाढे असा गोतावळा वाढतच गेला.याच श्रेय आमचा मित्र, पार्किन्सन्सचे. हल्ली आमच्या आयुष्यात जे काही घडते त्याचा करता, करविता, घडविता तोच असतो.आमच्या दोघांच्याही स्वला त्यांनी विस्तारित केले.
फेसबुक जॉईन केले तेंव्हा, आमच्या देशपांडे फॅमिली या क्लोज ग्रुपवर बहिणी, भाऊ,त्यांची मुल, मुली,जावई,सुना,नातू,नाती,नातजावइ,नातसुना अशा ३७ व्यक्ती एवढीच मर्यादा होती मी बुजलेली असायची.अनेक चुका व्हायच्या.पण घरचीच माणसे असल्याने चुका झाल्या तरी काही वाटत नव्हते.पण हळूहळू फेसबुकनी नावे सुचवायला सुरवात केली. फ्रेन्डशिप रिक्वेस्टही यायला लागल्या. थोडी सरावल्यावर लक्षात आले,येथे तरुण मंडळींचा वावर जास्त आहे.पार्किन्सन्स शुभार्थींच्या मुले,सुना नातवंडे यांच्याशी संवाद साधण्यासाठी तरुण पिढीच्या व्यस्त दिनक्रमात फेसबुक सारखे वेळेनुसार भेटता येणारे साधन सोयीचे आहे. या आजाराबद्दल शुभार्थीच्या भोवतालच्या समाजातील बऱ्याचजणांना माहित नसल्याने शुभार्थीकडे विचित्र नजरेने पहिले जाते.आधीच आपल्या लक्षणांमुळे निराश झालेल्या शुभार्थिना समाजात वावरण्याचा भयगंड निर्माण होतो.त्यामुळे एकूण सर्वांनाच या आजाराबद्दल समजावे म्हणून  मी पार्किन्सन्स कम्युनिटीही तयार केली.अतुल ठाकूर यांनी पेजही तयार करून दिले. शुभंकर, शुभार्थिंबरोबर शुभार्थींची मुले, सुना, नातवंडे यांनाही  या गटात सामील केले.काहींनी गटात सामील व्हायची इच्छा दर्शविली. काहीना मीच सामील करून घेतले.

आता फेसबुक माझ्यासाठी विरंगुळा नव्हता तर पार्किन्सन्स मित्रमंडळाची अनेक उद्दिष्टे साध्य करण्याचे उत्तम साधन होते.पार्कीन्सन्स मित्रमंडळ या स्वमदत गटाची माहिती पोचविणे.शुभंकर शुभार्थीना आपले अनुभव,विचार,प्रश्न यासाठी मंच मिळवून देणे,शुभंकर,,शुभार्थी यांच्याच नाही तर इतर समाजाच्याही मनातील पार्किन्सन्सबाबतचे  गैरसमज दूर करून पार्किन्सन्स साक्षरता. निर्माण करणे,सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे,विविध शुभार्थींच्या अनुभावाधारे पीडीसह आनंदाने जगता येते हे दाखवून देणे,आम्हाला मदतीचे हात हवेत हे लोकांपर्यंत पोचवणे.अशा अनेक
उद्दिष्ट सिद्धीसाठी फेसबुक नक्कीच सहाय्यभूत होत आहे.

फेसबुकमुळे भारतातीलच नाही तर जगभरच्या इतर स्वमदत गटाशीही संपर्क वाढला.आता मी जाणीवपूर्वक मित्रमंडळ वाढवायला सुरुवात केली.मी जेथे काम करीत होते तो टीमवी परिवार,पुणे विद्यापीठ परिवार,विद्यार्थी,माझ्या मुलींच्या मित्रमैत्रिणी,माझ्या नवऱ्याचे मित्र,कलीग,शिक्षक,मायबोलीवरील सदस्य',मित्रा पर्किंन्सना' हे इसाहीत्यने पुस्तक प्रकाशित केल्यावर तिथला परिवार, स्वमदत गटाशी संबंधित व्यक्ती, शाळा कॉलेज मधल्या मित्रमैत्रिणी हे तर हक्काचेच होते.परंतु जे मला कदाचित ओळखत नव्हते पण मी ज्यांना कधी ना कधी भेटले होते ऐकले होते,वाचले होते,ज्यांचे विचार मला पटले होते, आवडले होते अशा अनेक व्यक्तीना मी मैत्रीची विनंती केली.यात प्राध्यापक,सामाजिक  कार्यकर्ते,प्रकाशक,लेखक,डॉक्टर्स,पत्रकार,कलाकार अशा ज्यांचा समजाशी नेहमी संबंध येतो त्या विविध वयोगटातील अनेक व्यक्ती होत्या.अनेक वलयांकितानाही मी बिनधास्त विनंती केली. अपवाद वगळता अनेकांनी ती स्वीकारली.
काही इतरांच्या पोस्टवर आलेल्या प्रतिसादावरून व्यक्ती आपल्याशा वाटल्या त्यानाही विनंती केली. हे सर्व करताना या व्यक्तींना सामजिक भान आहे असा माझा समज झाला त्यांनाच मी विनंती केली.आपल्या आसपास कोणी पिडी पेशंट असला तर ते त्यांना नक्कीच आमच्या गटाबद्दल सांगतील याची मला खात्री होती.
मी माझ्या स्वार्थासाठी परिवार वाढवला तरी अनेकांच्या उत्तमोत्तम पोस्टमुळे माझेही अनुभव विश्व वाढत गेले.फेसबुकला नावे ठेवणार्यांना मी ठामपणे सांगू शकते हे साधन नीट हाताळले तर ते तुम्हाला भरभरून देते.
सर्व मित्र मैत्रीणीना पुन्हा एकदा खूपखूप धन्यवाद.


 

No comments:

Post a Comment