७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.दरवर्षी एखादा विषय घेऊन जनजागरण केले जाते.यावर्षी नैराश्य हा विषय आहे आणि 'चला बोलूया नैराश्याविषयी' हे ब्रीदवाक्य आहे.
नैराश्य या आजाराची व्याप्ती खूप मोठ्ठी आहे.त्यावर सर्वत्र भरभरून लिहूनही येत आहे. पण येथे मी फक्त 'पार्किन्सनस आणि नैराश्य' या बद्दलच लिहिणार आहे.
मी या विषयातील तज्ञ नाही.पार्किन्सन्स मित्रमंडळा या स्वमदत गटाचे काम करताना, तसेच पतीला गेली १८ वर्षे पार्किन्सन्स आहे.या अनुभवाच्या आधारे लिहित आहे.काळजीपूर्वक आणि वेळच्यावेळी हाताळल्यास नैराश्याला दूर ठेवता येते.हे अनेक शुभार्थींच्या उदाहरणावरून आढळले ते आपल्यापर्यंत पोचवणे इतकाच या लेखाचा हेतू आहे.माहितीची चूक आढळल्यास कृपया सांगावी
.पार्किन्सन्स आणि नैराश्य यांचा घनिष्ठ संबंध आहे.न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर दिवटे .'नैराश्य ही पार्कीन्सन्सची सखी सजणीच होय' असे म्हणतात
नैराश्य का येते?
नैराश्य हे पार्किन्सन्स आजाराचे महत्वाचे लक्षण आहे. काही वेळा आजाराची सुरुवातच नैराश्याने होते.पीडी(पार्किन्सन्स डीसीज)बद्दलचे अज्ञान,अज्ञानातून भीती,भीतीतून अस्वीकार त्यातून नकारात्मक भावनांची सुरुवात अशी साखळीच निर्माण होते. याशिवाय मेंदुतील रसायनाच्या बदलामुळेही हे होते. कंप,मंद हालचाली,ताठरपणा या लक्षणामुळे दैनंदिन जीवन पूर्वीसारखे राहत नाही.याचबरोबर लाळ गळणे,बोलण्यावर झालेला परिणाम यामुळे सामाजिक भयगंड निर्माण होतो.समाजात मिसळणे,फोन करणे टाळले जाते.दबा धरून बसलेले नैराश्य,चोर पावलांनी शिरकाव करते.
एखादी शस्त्रक्रिया छोटे आजार उदा.ताप येणे,लूज मोशन इत्यादी डेंग्यू,चिकन गुनिया असे मोट्ठे आजार,एखादी दुर्घटना अशावेळी,पीडी शुभार्थीना चटकन नैराश्यानी गाठण्याची शक्यता असते.
बर्याचवेळा इतर लक्षणापेक्षा नैराश्याने वेढल्याने व्यक्ती अधिक अकार्यक्षम होते
.पण नैराश्य ओळखायचे कसे?
पार्किन्सन्स मध्ये नैराश्याचे स्वरूप
.न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टर दिवटे यांनी मंडळाच्या २०१० च्या स्मरणिकेतील 'पार्किन्सन्सची नॉनमोटार लक्षणे' या आपल्या लेखात नैराश्याविषयी लिहिले आहे "पार्किन्समुले शारीरिक अवस्थेबरोबर मानसिक अवस्थेतही बदल होतो.असे रुग्ण निर्णय घेण्यास आजूबाजूच्या वातावरणात रमण्यास तयार होत नाहीत.नवे करण्यास अनुत्सुक असतात.शांतपणे दुसऱ्यावर जबाबदारी टाकतात. आयुष्यात रस वाटत नाही.आता नको,येथेच थांबावे,सगळे संपले असे वाटत राहते.बोलताना गहिवरून येणे,कोणाशी बोलणे नको वाटणे,मिसळणे नको वाटणे,एकलकोंडेपणा बरा असे वाटत राहणे. अशी वृत्ती वाढते.' डॉक्टर दिवटे यांनी नैराश्य आणि पार्किन्सन्सचा संबंध संशोधनाने सिद्ध झालेला आहे असेही सांगितले आहे.शेखर बर्वे यांच्या 'पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत' या पुस्तकाच्या प्रस्तावानेच्या शेवटी त्यांनी लिहिले आहे."शेवटी आवर्जून आणि पोटतिडकीने सांगावेसे वाटते कि निराशा टाळा.त्याला थारा देऊ नका
नैराश्याला थोपवण्यासाठी
नैराश्याचा शिरकाव होऊ नये यासाठी शुभंकरानी( केअर टेकर ),कुटुंबीयांनी सतत सावध असणे गरजेचे आहे.एकटेपणा,नैराश्य वाढवतो.त्यामुळे शक्यतो शुभार्थीला एकटे सोडू नका.
सातत्याने शुभार्थीचे निरीक्षण करून .न्यूरॉलॉजिस्टच्या संपर्कात राहा.ते नैराश्याच्या अवस्थेबद्दल नेमकेपणाने सांगून मानसोपचार तज्ञाची गरज आहे का सांगतील.मानसोपचाराची बरीच औषधे पार्किन्सन्स वाढविणारी असतात त्यामुळे .न्यूरॉलॉजिस्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ यांच्या एकत्रित सल्ल्यातून औषधोपचार करा.स्वत:च्या मनाने इतर पेशंटचे ऐकून औषधे घेऊ नका.प्रत्येक शुभार्थीच्या आजाराचे स्वरूप वेगवेगळे असते.
नृत्य,चित्रकला,संगीत,ओरिगामी अशा कलेत मन रमवा.
हास्यक्लब,जेष्ठ नागरिक संघ अशा विविध गटात सामील होण्यास प्रवृत्त करा.स्वमदत गट हा अत्यंत उपयोगी ठरतो.कारण येथे समदु::खी असतात.
एकत्रित गटाने भोजन,छोट्या सहली,गाण्याचे कार्यक्रम इत्यादी झेपेल त्यानुसार करा.
लग्न,मुंजइत्यादी घरगुती समारंभात आवर्जून हजर राहा.
नातवंडे, पाळीव प्राणी यांच्यात मन रमवा.
शास्त्रीय संगीत,सुगम संगीत ऐका.
खळखळून हसवणारे विनोदी चित्रपट,सिरीयल पहा.
छोट्या मोठ्या सामाजिक कामात गुतावून घ्या.
धार्मिक वृत्तीचे असाल तर जप,प्रवचने ऐकणे करा.
ध्यान हा नकारात्मक विचार दूर करून आनंद निर्मिती साठी उत्तम उपाय आहे'
अनेक शुभार्थींच्या उदाहरण वरून नैराश्याला दूर ठेवता येते हे निश्चितपणे सांगता येते.
शुभार्थींचे अनुभव
आमचा स्वत:चाच अनुभव सांगायचा तर, पार्किन्सन्सबाबतचे अज्ञान दूर होऊन स्वीकार करण्यास आम्हाला सहा वर्षे लागली.पीडी झालेल्या माझ्या पतिना नैराश्याने घेरले होते. मलाही त्याची लागण
होऊ लागली होती.पार्किन्सन्स मित्रमंडळाशी संपर्क आल्यावर शुभार्थी मधुसूदन शेंडे, आणि शुभंकर शरच्चंद्र पटवर्धन यांच्या कार्याने आमच्यात जादूची कांडी फिरावी तसा फरक झाला.'पार्किन्सन्ससह आनंदात जगूया ' हे मंडळाचे ब्रीदवाक्य होते.मदत घ्या आणि मदत करा ही अपेक्षा होती.आम्ही मदत घेतली आता मदत करणे ही अपेक्षा पूर्ण करायची होती आम्ही पूर्ण वेळ मंडळाच्या कामात गुंतून गेलो.एक छान परिवार मिळाला.सभा, सहली, शेअरिंग,मेळावे,घरभेटी पार्किन्सन्स साक्षरतेसाठी विविध मार्ग अवलंबणे यात नैराश्याने कधी पाठ सोडली समजलेही नाही. आज इतरांना हे रोल मॉडेल वाटतात. आम्हाला ज्या गोष्टीला सहा सात वर्षे लागली त्या एका क्लिकवर जगभरातील कोणत्याही शुभार्थी पर्यंत पोचवताना होणारा आनंद शब्दातीत आहे.
लहान वयात पीडी झालेल्या प्रज्ञा जोशीला आम्ही घरी भेटलो,तेंव्हा तिची अवस्था अत्यंत वाईट होती. आत्महत्येचे विचार तिच्या मनात घोळत होते.आमच्या परिवारात आल्यावर तिच्यात कायापालट झाला.ती कार्यकारिणी सदस्य आहे.आज तिला आम्ही उत्साहमूर्ती म्हणतो. स्मरणिकेत लेखन,हृषीकेश पवारच्या नृत्योपाचारात सहभाग,मेळाव्यातील प्रार्थनेत सहभाग, सहलीतील उत्साह,आम्हा सर्वाना खास गुजराथी पदार्थ खायला घालणे हे सर्व करताना तिला पाहताना आंतरिक समाधान मिळते.
पद्मजा ताम्हणकर याही आमच्या घरी भेटायला आल्या तेंव्हा नैराश्य त्यंची सख्खी मैत्रीण होती.मित्रमंडळात आल्याने त्यांच्यात झालेला फरक त्यांनी स्मरणिकेतील आपल्या अनुभावातून मांडला आहे.मित्रमंडळ निमित्तमात्र मुळात उत्साही आणि बुद्धिमान असणाऱ्या पद्माजाताईनी स्वत:च शोधलेले उपाय,त्यांच्या ८० वर्षे पार केलेल्या नवऱ्याचे सहकार्य हे महत्वाचे.मंडळाचा रोल सायकल शिकवताना सुरुवातीला हात धरण्याइतकाच.मेळाव्यातील कलाकृती,प्रार्थनेत सहभाग,सहलीत मनोरंजन कार्यक्रमात सहभाग.प्रश्नमंजुषा स्पर्धेत सतत प्रथम क्रमांक मिळवणे, दिनानाथ मधल्या कार्यक्रमातही उपस्थीत राहणे हे त्या उत्साहाने करतात.
ही उदाहरणे नमुन्यासाठी सांगितली.प्रत्येक शुभार्थी आमचा कामातील उत्साह वाढवत असतो.
नैराश्याकडे दुर्लक्ष करू नका आणि घाबरूनही जाऊ नका.हा विचार पोचवणे इतकाच या लेखाचा मर्यादित हेतू आहे.
याबाबत शास्त्रशुद्धसंशोधन होऊन आमच्या अनुभवांना शास्त्रीय अधिष्ठान देण्याचे काम या नैराश्याला वाहिलेल्या वर्षात घेतलं जाईल अशी अशा करायला हरकत नाही.आमचे शुभार्थी स्वत;वर प्रयोग करून घेण्यास तयार आहेतच.
अगदी बरोबर सांगितले आहे. नैराश्य आणि पार्किन्सन्स हे एकमेकांचे जोडीदारच. जेंव्हा जेंव्हा दोघांची दोस्ती तुटते तेंव्हा अगदी छान वाटते. पण काही काळाने त्यांची परत मैत्री जमते. आपण सतत जागरूक राहून परत परत नैराश्याचे विलगीकरण करत राहायचे.
ReplyDeleteएक गोष्ट सतत ध्यानात ठेवायची की आपल्या प्रिय व्यक्तीच्या आयुष्यात जर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ती व्यक्ती अगदी टोकाच्या निराशेच्या भोवर्यात सापडली तर आपण तिला काय सल्ला देऊ?