रक्तदाता पुरस्कार
आमची शुभंकर अंजली महाजन हिला दौंड येथील 'रोहिणी जाधव स्मारक ट्रस्ट'तर्फे हमीद दाभोळकर यांच्या हस्ते 'रक्तदाता' पुरस्कार प्राप्त झाला आहे.या ट्रस्टतर्फे दरवर्षी रक्तमित्र,रक्तदाता,निसर्गपर्यावरण मित्र असे विविध पुरस्कार दिले जातात.रोहिणी जाधव यांचा २७ व्या वर्षी वेळेवर रक्त न मिळाल्याने मृत्यू झाला.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार दिले जातात.पुरस्काराचे हे एकविसावे वर्ष आहे.अंजलीने २१ वेळा रक्तदान केले आहे. तिचा रक्त गट ओ आरएच निगेटिव्ह आहे.हा रक्तगट रेअर असल्याने अत्यवस्थ परिस्थितीतल्या अनेकांचे जीव तिच्या रक्तदानामुळे वाचले आहेत.अचानक रक्त हवे असा फोन येतो आणि ती हातातले सर्व काम टाकून तेथे हजर होते.घरी शंभर वर्षाच्या सासूबाई आणि पार्किन्सन्स झालेले पती आहेत.या गडबडीत त्यांच्याकडे कोणीतरी थांबण्यासाठीही तिला व्यवस्था करायची असते.साठी जवळ आली,पुढे रक्तदान करत येणार नाही. आता जास्तीत जास्तवेळा रक्तदान करायला हवे असे तिला वाटते.अंजली तुझ्या कार्याला सलाम.
गट शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती
शुभार्थी बी.के चौगुले हे १९८१ मध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरीस लागले.१९९० मध्ये स्पर्धा परीक्षा देऊन विस्तार अधिकारी झाले.४५व्य वर्षी २००४ मध्ये पार्किन्सन्स ने गाठले.पण कामातील उत्साह कमी झाला नाही.२३ वर्षे पुणे येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते.त्याना मी २०१७ मध्ये गट शिक्षण अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे.सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे त्यांची बदली झाली.पीडीचा बाऊ न करता त्यांनी हे आव्हान स्वीकारले.पीडी असूनही ते उत्तम कार्य करत असल्याने त्यांचा सांगली जिल्हापरिषद अध्यक्षांच्या हस्ते सत्कार झाला.चौगुले आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
निबंध स्पर्धेतील यश
शुभार्थी उमेश सलगर हे न्यूइंडिया इन्शुरन्सकंपनीत administrative ऑफिसर म्हणून नोकरी करतात कंपनीने ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०१६ 'Vigilance Awareness weak' म्हणून साजरा केला गेला यानिमित्त
'public participation in promoting integrity and eradicating corruption' या विषयावर महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचार्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेत सलगर यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.मन:पूर्वक अभिनंदन!
बहुतांश पार्किन्सन्स शुभार्थी पीडी झाल्यावर नैराश्याने ग्रासतात. व्हीआरएस घेणे पसंत करतात किंवा आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कशीबशी नोकरी करतात.पण सलगर हे मात्र आजाराचे निमित्त सांगून कोणतीही सवलत घेत नाहीत.कामाच्या निमित्याने फिरावे लागते.मध्यंतरी जमशेटपुरला जावे लागणार होते.इतर कर्मचाऱ्यांनी जाण्यास नकार दिला पण सलगर मात्र यशस्वीरीत्या काम करून आले.इतर शुभार्थीसाठी हे प्रेरणादायी आहे.