२०१६ या नवीन वर्षाची सुरुवात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पार्किन्सन्स मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर मंदार जोग ( कॅनडा ) यांच्या व्याख्यानाने झाली.समारंभास १५० शुभंकर, शुभार्थी उपस्थित होते.
पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या इतिहासात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा सहभाग वेगवेगळ्या टप्प्यावर होता.३० जून २००२ मध्ये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने पार्किन्सन्स रुग्णांसाठी मेळावा आयोजित केला होता.त्यावेळी आपापल्या पातळीवर पीडी पेशंटना एकत्रित करण्याचे काम करणारे श्री.मधुसूदन शेंडे आणि शरच्चंद्र पटवर्धन हे जुने मित्र भेटले.आणि त्यांचे एकत्रित काम सुरु झाले.
२००८ मध्ये पार्किन्सन्स मित्रमंडळाने जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मेळावा आयोजित केला.त्यावेळी उत्तम प्रतीसाद मिळाला, अनेक कार्यकर्ते मिळाले आणि मंडळाच्या कामाचा वेग वाढला.आणि आता २०१६ मध्ये हॉस्पिटल आणि मंडळ या दोघांनी एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे'Together we move better. '
कार्यक्रमाची सुरुवात 'सं गच्छ्यध्वं सं वदध्वं' या ऋग्वेदातील प्रार्थनेने झाली.
यानंतर डॉक्टर मंदार जोग,दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या न्युरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर राहुल कुलकर्णी,आणि पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांचा श्री करमरकर यांनी पुष्प गुछ्य देऊन सत्कार केला. शरच्चंद्र पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर डॉक्टर मंदार जोग यांना व्याख्यानासाठी पाचारण करण्यात आले.शोभना तीर्थळी यांनी त्यांची ओळख करून दिली.
डॉक्टर मंदार जोग ( M.D.,F.R.C.P.C. )कॅनडा येथील नॅशनल पार्किन्सन्स फाउंडेशन सेंटर ऑफ एक्स्लन्स्,इन पर्किन्सन्स डिसीज अँड मुव्हमेंट डिसॉर्डर् प्रोग्रॅम,हेल्थ सायन्स सेंटर.या संस्थेचे डायरेक्टर अहेत.वेस्टर्न युनिव्हर्सिटी मध्ये न्युरॉलॉजीचे प्रोफेसर आहेत.कॅलिफोर्निया येथिल स्टँडफर्ड रिसर्च इन्स्टिट्युट येथेही व्हिजिटींग प्रोफेसर आहेत.
टोरांटो येथे त्यांचे न्युरॉलॉजिचे शिक्षण झले.डॉक्टर अँथनी लँग यांच्या बरोबर मुव्ह्मेंट डिसऑर्डर मध्ये फेलोशिप पुर्ण केली.एम.आय.टी.मध्ये कॉम्प्युटेशनल न्युरोसायन्समध्ये पोस्ट्डॉक्टरल फेलोशिप पुर्ण केली.त्यांची स्वतंत्र क्लिनिकल प्रॅक्टीस आहेच शिवाय पदव्युत्तर,पीएचडी,आणि पोस्ट डॉक्टरल फेलोच्या संशोधनात ते मार्गदर्शन करतात.
त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.Basel ganglia & their role in movement disorder या विषयातील त्यांचे शेकडो शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.
मेडिकल टेक्नोलॉजीमधील पेटंटस त्याना मिळालेली आहेत.ते फक्त पेटंट घेऊन थांबले नाहीत तर न्युरो टेक्नोलॉजीमधील कंपन्याही कंपन्यांचीही त्यांनी स्थापना केली आहे.
डॉक्टर जोग विविध देशात व्याख्याने देतात.तसेच कार्यशाळाही घेतात.
या बहुआयामी कार्यामुळे त्याना संशोधन,अध्यापन,नवनिर्मिती साठी विविध मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत.
त्यांनी आपल्या व्याख्यानात सुरुवातीला पार्किन्सन्स होण्याची शक्यता कोणकोणत्या बाबीमुळे वाढू शकते हे सांगितले.डीबीएस सर्जरीबाबत विविध स्लाईड्सद्वारे माहिती सांगितली.संशोधनावस्थेतील उपचारांचा आढावा घेतला.त्यांच्या अत्यंत सोप्या शैलीतील ओघवत्या भाषणामुळे एक तास कसा गेला समजला नाही.
यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नाना त्यांनी उत्तरे दिली.
(डॉक्टर मंदार जोग यांचे संपूर्ण भाषण वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.)
आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शोभना तीर्थळी यांनी केले.
दिनानाथ हॉस्पिटलने सर्वांसाठी चहा बिस्किटाची व्यवस्था केली होती.येथे सर्वाना एकमेकांशी चर्चा करण्यास ओळखी करून घेण्यास अवधी मिळाला.
१३ फेब्रुवारी १६ सभेचा वृत्तांत
शनिवार दिनांक १३ - २ - १६ रोजी हॉटेल अश्विनी येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली होती.. शुभंकर आणि शुभार्थी यांच्या परस्पर अनुभव आणि विचारांची देवाणघेवाण ( sharing ) असा कार्यक्रम झाला.यावेळी 'पार्किन्सन्ससह जगताना जगण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी,लक्षणावर मात करण्यासाठी,आनंदी राहण्यासाठी शुभार्थीना कोणाची आणि कशी मदत होते, याबाबतचे अनुभव सांगायचे होते,कृतज्ञता व्यक्त करायची होती,.सभेस ३५ ते ४० सभासद उपस्थित होते.प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.यानंतर आशा रेवणकर यांनी भारती विद्यापीठातील Palliative care वर झालेल्या इंटरनॅशनल सेमिनारच्या सहभागाबद्दल माहिती सांगितली. त्या, शरच्चंद्र पटवर्धन,रामचंद्र करमरकर यांच्यासह या सेमिनार मध्ये सहभागी झाल्या होत्या.या अनुभवाबरोबर शुभंकर म्हणून अनुभवही सांगितले.पतीचा पीडी हाताळण्यात आणि मानसिक आधारासाठी पार्किन्सन्स मित्रमंडळाचा आधार वाटत असल्याचे मत व्यक्त केले.शरच्चंद्र पटवर्धन यांनी यांनीही आपले सेमिनारविषयी अनुभव सांगितले.यानंतर शोभना तीर्थळी यांनी शेअरिंगसाठी असा विषय ठेवण्यामागची भूमिका सांगितली.आपण सकारात्मक विचार करा असे नेहमी सांगतो पण त्यासाठी काय करायचे असा प्रश्न असतो. कृतज्ञता व्यक्त करणे हा सकारात्मकतेकडे.नेण्याचा मार्ग आहे मानसोपचार तज्ज्ञही हे सांगत असतात.सकारात्मकतेकडे जाण्याच्या विविध वाटा दाखवणार्या'बी +Ve
सकारात्मक विचार ......प्रवास पुर्णत्वाकडे'
या पुस्तकाबाबत श्री. करमरकर यांनी माहिती सांगितली.जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील शुभंकर आणि शुभार्थींचे वाढदिवस नेहमीप्रमाणे हास्याचा फुगा फोडून आणि अंजलीने स्वहस्ताने केलेली भेटकार्डे देऊन साजरे करण्यात आले.
यानंतर शुभार्थींनी आपले अनुभव सांगण्यास आणि कृतज्ञता व्यक्त करण्यास सुरुवात झाली.
आर्किटेक्ट असलेल्या चंद्रकांत दीवाणेनी पत्नी व मुलाच्या सहकार्याने १५ वर्षे पीडीला सहन करत असल्याचे,कार्यरत राहिल्याचे श्रेय दिले. त्यांच्याबरोबर आलेल्या मुलाने मात्र त्यांची इच्छा शक्ती महत्वाची असल्याचे सांगितले.
९३ वर्षांचे शुभार्थी कलबाग यांची ओपन हार्ट सर्जरी झाली आहे.त्यांच्या पत्नीला पीडी होता त्या २००४ साली निवर्तल्या.मुले परदेशी.आणि हे एकटेच राहतात.दैनंदिन व्यवहार,आजारपण.होस्पिटलायझेशन यात त्याना कोठेच अडचण येत नाही.त्यांचे सिनिअर सिटीझन गटातील सहकारी,जोडलेली माणसे त्याना मदत करतात.
परभणीचे श्री सोमाणी मंडळाच्या सभांना मुद्दाम हजर राहतात.परभणीला त्याना पिडीबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती.मंडळात सामील झाल्यावर मात्र पीडीबाबतची भीती कमी झाली.मंडळाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मोरेश्वर काशीकर हे स्वत:ची कामे स्वत: करतात.त्यांच्या कुटुंबीयांनी त्याना अजून पीडी पेशंट म्हणून स्वीकारलेच नव्हते.आता त्याना थोडा वळताना फ्रीजिंगचा त्रास होतो. निर्णय क्षमता थोडी कमी झाली असे वाटते.पण योगाच्या सहायाने त्यावर मात करू पाहतात.स्वत:च स्वत:चे शुभंकर होण्यासाठी योगोपचाराबरोबर,रोज मराठी आणि इंग्लिश मध्ये काही तरी लिहिणे,कपडे वळत घालणे,इस्त्री करणे इत्यादी कामे ते करतात.सहा महिन्यांनी न्युरॉलॉजीस्टकडे जातात. याकाळातील सर्व बाबींचे निरीक्षण करून नोंदी करून त्याची यादी घेऊन जाऊन त्यांच्याशी चर्चा करतात.पीडी झाल्यावर इतर उपचार न करत बसता लगेच न्युरॉलॉजीस्टनी सांगितलेली औषधे घेतली.यामुळे ही पीडी नियंत्रणात राहिला.ताठरतेसाठी व्यायाम आणि कंपासाठी शवासन, ध्यान उपयोगी पडते.इतर शुभार्थीना घरी जाऊन मार्गदर्शन केल्याने आनंद मिळतो पीडी नसणारे लोकही मंडळासाठी काम करताना पाहून कृतज्ञता व्यक्त कारावीशी वाटते.
गोपाळ तीर्थळी यांनी पीडीसह आनंदाने राहण्यात पत्नी व इतर शुभंकरांचा वाटा खूप मोठ्ठा असल्याचे सांगत आपल्या पत्नीला इतर शुभंकराबद्दल सांगण्यास सांगितले.शोभना तीर्थळी यांनी २०१५ च्या स्मरणिकेतील 'तुम्ही पण बना रोलमॉडेल' या लेखात तीर्थळी यांनी पार्किन्सन्सला यशस्वीपणे हाताळण्यासाठी काय केले याची सविस्तर माहिती दिल्याचे सांगितले.पार्किन्सन्स मित्रमंडळ डॉक्टर,,शेजारी,हास्यक्लब सदस्य,जेष्ठ नागरिक संघ सदस्य,घरातील नोकर अशी मोठ्ठी सपोर्ट सिस्टीम पाठीशी उभी असल्याचे सांगत या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
फॉरेस्ट ऑफिसर असलेल्या यशवंत एकबोटे यांना पीडी झाल्यावर नैराश्य आले.फॅमीली डॉक्टर्,न्युरॉलॉजिस्ट
यांनी धीर दिलाच पण पत्नीने यातून बाहेर काढण्यासाठी नेटाने प्रयत्न केले.टेबल पुसणे,कपबशी धुणे अशी
छोटो छोटी कामे करायला लावली,आहार औषधे यांचे नियोजन केले,मुख्यत: सकारात्मक विचार करायला लावले.मसाजीस्ट,अमेरिकेत असली तरी तेथून पीडी बद्दल अभ्यास केल्याने,मार्गदर्शन करणारी ,मानसिक आधार देणारी मुलगी आणि इतर कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शुभार्थी देसाई यांच्या वतीने वसुधा देसाई यांनी डॉक्टर्स, सोसायटीतले शेजारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.देसाई यांच्या इच्छाशक्तीचाही त्यांच्या मोठ्या दुखण्यातून बरे होण्यातील वाटा सांगितला.
पाडळकर हे चिंचवडहून आले होते.त्यांनी कुटुंबीय विशेषत: पत्नीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
घोलप यांनी नेहमीच सभांना येत असल्याचे आणि त्याचा फायदा होत असल्याचे सांगितले
.केशव महाजन यानी पत्नीबद्दल भरभरून भावना व्यक्त केल्या.देवाबद्दल असलेली श्रद्धा आनंदी राहण्यात महत्वाची असल्याचे सांगितले.कॅरम खेळण्यासाठी येणारे पार्टनर,राजकुमार आवडता नट हे ओळखून त्यांच्या सीडी भेट देणारे मित्र अशा अनेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.त्यांची पत्नी अंजलीने ते आपल्या १०३ वर्षाच्या आईची आनंदाने सेवा करतात.मुलगी आणि नातू यांचा फोनवर आवाज ऐकूनही मानसिक समाधान मिळत असल्याचे सांगितले.
पद्मजा ताम्हणकर यांनी पार्किन्सन्स मंडळात आल्याने आनन्द वाटतो.इतरत्र संकोच वाटतो असे सांगितले.पती,मुले सुना स्तोत्रे,ओंकार द्वारे अध्यात्मिक साधनाही बळ देते.तरुण पिढीला बेफिकीर म्हटले
जाते पण आपल्याला त्यांची वेळोवेळी मदत होत असल्याचे सांगितले.
भांगे यांनी पत्नी तसेच योगी अरविंद साहित्य,सावरकर इत्यादींच्या वाचनाने आधार मिळत असल्याचे सांगितले.
श्रद्धा भावे यांनी पती, मुले योग्य तेथे मदत करतात,काळजी घेतात. पण स्वत:ची कामे स्वत: करायला लावून आत्मविश्वास वाढवण्यास प्रवृत्त करतात असे सांगितले.
अनिल कुलकर्णी यांनी सपोर्ट ग्रुप आणि न्युरॉलॉजीस्ट यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
रामचंद्र करमरकर यांना या गटात आणणार्या मित्राची, मधुसुदन शेंडे यांची आठवण झाली.त्यांच्यामुळे या कामात ओढला गेलो आणि यातून खूप आनंद मिळत असल्याचे नमूद केले.शरच्चंद्र पटवर्धन आणि श्यामला शेंडे यांनी.त्यांनी उभे केलेले काम पुढे नेणार्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या दोन तास चाललेल्या चर्चेतून प्रत्येकाला व्यक्त व्हायचं असत.यासाठी व्यासपीठ हव असत हे लक्षात आल. स्वमदत गटाबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त करून अशा गटाची गरज अधोरेखित केली. अशा चर्चा वेळोवेळी ठेवणे आवश्यक आहे असे संयोजकांनाही जाणवले.
शुभार्थी नलिनी भडभडे यांचे पती मुद्दाम सभेला आले होते त्यांनी तिळगुळ समारंभासाठी देणगी दिली.वसुधा देसाई यांनी वाढदिवसाबद्दल पेढे दिले.
सर्वाना तिळगुळ देण्यात आला. आणि चहापानानंतर प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
मार्च वृत्त
सैलानी परिवार, सांगवी यांच्याकडून देणगी.
सैलानी परिवार, सांगवीच्या अरविंद काशिनाथ भागवतआणि सहकारी
यांच्यामार्फत ३ मार्च या त्यांचे गुरु सैलानी यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ
सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्था निवडून सत्कार केला जातो व देणगी
दिली जाते.यावर्षी नाम,स्नेहालय,कामायनी इत्यादी संस्थांबरोबर पार्किन्सन्स
मित्रमंडळाचीही निवड केली होती.शरच्चंद्र पटवर्धन,आशा रेवणकर आणि अंजली
महाजन यांनी या कार्यक्रमास हजर राहून हा सत्कार स्वीकारला.यावेळी
सत्काराबरोबर १११११ रुपयांची देणगी दिली गेली.शुभंकर अंजली महाजन यांनी'
रंगतरंग 'या दिवाळी अंकात मंडळाची माहिती देणारा लेख दिला होता.तो वाचून
ही निवड करण्यात आली.
१० मार्च सभा वृत्त
गुरुवार दि.१० मार्च रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने अश्विनी हॉटेल येथे सभा आयोजित केली होती. सभेस ८० सदस्य उपस्थित होते.
गुरुवार दि.१० मार्च रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने अश्विनी हॉटेल येथे सभा आयोजित केली होती. सभेस ८० सदस्य उपस्थित होते.
प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.यानंतर शुभंकर, शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
डॉक्टर संजीव डोळे आणि भारती विद्यापीठाच्या होमिओपॅथी विभागाच्या प्रमुख
प्रो.डॉक्टर अनिता पाटील, त्यांचे सहकारी आणि एमडी करणारे डॉक्टर यांचे
स्वागत करण्यात आले.
पार्किन्सन्स आणि होमिओपॅथी उपचार 'या
विषयावर भारती विद्यापीठाने संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे.ज्या
पार्किन्सन्स शुभार्थीना या संशोधनात स्वेच्छेने सहभागी व्हायचे आहे
त्यांना त्यांच्या आजाराची चिकित्सा करून वर्षभर मोफत औषधे दिली जाणार
आहेत.
डॉक्टर डोळे यांनी सुरुवातीला या संशोधनाचे स्वरूप आणि
उद्दिष्टे सांगितली. होमिओपॅथीमध्ये' व्यक्ती तितक्या प्रकृती' असे मानले
जाते.पार्किन्सन्स पेशंटच्या बाबतीतही प्रत्येकाची समस्या वेगळी असेल.या
संशोधनात एमडी करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरकडे एक किंवा दोन पेशंट
असतील.वर्षभर ते त्या पेशंटचा फालोअप घेतील.पेशंटना सोयीच्या ठिकाणी तपासले
जाईल. बदल पाहण्यासाठी व्हिडीओ शुटींग घेतले जाईल.या सर्वांना डॉक्टर डोळे
मार्गदर्शन करतील.औषधेही डॉक्टर डोळे ठरवतील.निघालेले निष्कर्ष प्रकाशित
केले जातील.
प्रो.डॉक्टर अनिता पाटील यांनी संशोधन करणारी भारती
विद्यापीठ ही संस्था ५० वर्षाचा इतिहास असलेली असून .होमिओपॅथी कॉलेजला २५
वर्षे झाली असल्याचे सांगितले.सोमवार ते शुक्रवार संस्थेच्या फिरत्या
दवाखान्याद्वारे खेडोपाडी जाऊन मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते असेही
सांगितले.हे संशोधनही अशा सामजिक जाणीवेतून केले जात आहे.ही औषधे इतर औषधे
चालू असताना घेता येतील.निरोगी माणसांवर प्रयोग करून ती तपासली असल्याने
याचे दुष्परिणाम नाहीत.अॅलर्जी नाही.आपल्या न्युरॉलॉजिस्टना याबाबत
सांगावे.गरज वाटल्यास डॉक्टर डोळेही त्यांच्याशी संवाद साधतील.डॉ.डोळे
यांनी नागपूर येथे झालेल्या वैद्यकीय परिषदेत पार्किन्सन्सवर रिसर्च पेपर
सदर केला होता त्याचा बेस्ट पेपर म्हणून गौरव झाल्याचेही डॉ.पाटील यांनी
सांगितले.
डॉक्टर राजश्री बोंगाळे यांनी आपल्या पीडी पेशंट वडिलांचे अनुभव सांगितले.
शुभार्थी शेखर बर्वे यांनी वसुधा बर्वे यांना २०१२ पासून न्युरॉलॉजिस्ट
डॉ.दिवटे यांना विचारून डॉ.डोळे यांचे होमिओपॅथी उपचार चालू केले.आजाराची
वाढ झाली नाही. अॅलोपॅथीची औषधे वाढली नाहीत.स्मरणशक्ती चांगली राहिली असे
फायदे झाल्याचे सांगितले शंका.मनात न ठेवता विश्वासाने औषधे घ्या असा
सल्लाही दिला.दिनेश पुजारी आणि श्री. चौगुले या शुभार्थीनीही आपल्याला
होमिओपॅथी औषधाने फायदा झाला असल्याचे सांगितले.
डॉक्टर डोळे यांनी
श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.गोळ्या गोड असल्याने डायबेटीस
पेशंटना त्रासाचे होते हा गैरसमज आहे.याला पथ्यपाणी नाही. काहीच औषधांच्या
बाबतीत कांदा आणि कॉफी वर्ज्य करावे लागते.आमची औषधे प्रयोगाने सिद्ध
झालेली असल्याने तुम्ही गिनिपिग आहात असा विचार करू नका असे
सांगितले.उपचारात आजार वाढू नये,कदाचीत औषधाचे प्रमाण कमी होईल,मानसिक
स्वास्थ्य,सर्वसाधारण तब्येत चांगली राहिल्याने आजार बळावणार नाही.हे फायदे
होतील.
इच्छ्युक पेशंटनी आपले सर्व रिपोर्ट,चालू असलेल्या गोळ्या प्रथम भेटीत दाखवाव्या.असे डॉ.पाटील यांनी सांगितले.
अनेक शुभार्थीनी संशोधनात सहभागी होण्यासाठी नवे नोंदविली.
चहा बिस्किटांचा खर्च वाढदिवसानिमित्त शरच्चंद्र पटवर्धन यांनी केला.उषा काळे यांनी पेढे दिले.जागतिक पार्किन्सन्स दिवस मेळावा ११ एप्रिल वृत्त
रविवार दिनांक १0 एप्रिल रोजी लोकमान्य सभागृह, केसरी वाडा येथे जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा आयोजित केला होता.एप्रिलच्या भर उन्हात दुपारी साडे चारला कार्यक्रमास २०० ते २५० शुभंकर शुभार्थी आणि हितचिंतक उपस्थित होते
सुजाता हरगुडेने काढलेल्या सुंदर रांगोळीमुळे प्रसन्न मनाने सर्व आत प्रवेश करत होते.चाफ्याचे फुल देऊन सर्वांचे स्वागत केले गेले.
गणेश वंदना आणि त्यानंतर' हमको मनकी शक्ती दे' या आत्मिक बळ देणाऱ्या' प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.प्रार्थनेत विनया मोडक. वसुधा बर्वे,पद्मजा ताम्हणकर, सविता ढमढेरे आणि अंजली महाजन, या शुभार्थी आणि शुभंकरांनी सहभाग घेतला.संवादिनीवर त्यांच्या गुरु अनुपमा करमरकर होत्या .
संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन व संचालन सौ.आशा रेवणकर यांनी आपल्या ओघवत्या आणि माहितीपूर्ण शैलीत केले.मंडळाचे संस्थापक सदस्य श्री शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपल्या प्रास्ताविकात श्रोत्यांशी संवाद साधला.
( स्मरणिकेत हे प्रास्ताविक समाविष्ट केले आहे.)
सुरुवातीचा कार्यक्रम शुभार्थींच्या नृत्याविष्काराचा होता.त्यांचे संचालन हृषीकेश पवार आणि प्रियशा यांनी केले.लय, तालबद्ध व नियंत्रित हालचाली यांनी कार्यक्रम सुरुवातीसच खूप उंचीवर गेला.
प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उभे राहून सलामी दिली.नृत्यामध्ये विलास जोशी,प्रज्ञा जोशी,मृत्युंजय हिरेमठ,शरद सराफ,प्रभाकर आपटे,सौ लेले,विजय देवधर,शशिकांत देसाई,श्री.देसाई,कर्नल पी.व्ही.चंद्रात्रेय या शुभार्थिनी आणि ,सौ.शेंडे या शुभंकरानी सहभाग घेतला.या सर्वांच्या आणि हृषीकेशच्या साडे सात वर्षाच्या परिश्रमाचे हे फलित होते.हृषीकेशने या उपक्रमाची फोटोसह माहिती हावर्ड युनिव्हर्सिटीच्या अल्टरनेटीव थेरपीत समाविष्ट झाल्याचे सांगितले.२०१५/१६ मध्ये तयार झालेल्या डान्स फॉर पार्किन्सन्स या फिल्मचे अमेरिकेच्या 'मायकेल जे फॉक्स रिसर्च' सेंटरमध्ये स्क्रीनिंग झाले तो अनुभवही आनंददायी होता असे सांगितले.अत्यंत सहज हालचाली करणाऱ्या श्री सराफ यांच्या पायात नुकताच रॉड घातला आहे हे सूत्र संचालिकेने सांगितले तेंव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.
यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर विद्याधर वाटवे यांचे श्री.शरच्चंद्र पटवर्धन यांच्यासह मंचावर आगमन झाले.सर्वांनी उभे राहून मानवंदना दिली.यानंतर श्री पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन
पाहुण्यांचा सत्कार केला.पाहुण्यांच्या सत्कारानंतर गेली आठ वर्षे अश्विनी हॉटेल कार्यक्रमासाठी मोफत देणारे श्री.देवस्थळी,नृत्योपचारासाठी स्वत:च्या घरातील हॉल गेली सात वर्षे देणाऱ्या सुमन जोग,दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या वृषाली बेलेकर,स्मरणिकेच्या प्रत्येक अंकात माहेश्वरी बँकेची जाहिरात देणाऱ्या उर्मिला तोष्णीवाल यांचा सत्कार करण्यात आला.
मंडळ दरवर्षी या कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशित करते.डॉक्टर विद्याधर वाटवे यांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
डॉक्टर वाटवे यांनी स्वत:ची ओळख स्वत:च करून देणार असल्याचे सांगितले होते.त्यांनी एमडी,डीपीएम.ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी व पदविका प्राप्त केली आहे.पुना हॉस्पिटलच्या स्थापनेपासून ते तेथे कार्यरत आहेत. अखिल भारतीय मानसोपचार तज्ज्ञ संघटनेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते.जागतिक मानसोपचार तज्ज्ञ संघटनेचेही ते सदस्य आहेत.
आपल्या व्याख्यानात डॉक्टर वाटवे यांनी प्रथम पार्किन्सन्स आजार म्हणजे काय, त्याची लक्षणे याबद्दल माहिती सांगितली.पार्किन्सन्स पेशंटला होणाऱ्या मानसिक आजाराचे निदान करताना प्रथम पीडीची औषधे,डायबेटीस,बीपी इ.ची औषधे याचा काही परिणाम आहे का हे पाहावे लागते.त्यानुसार पुढे औषधोपचार करावे लागतात.पीडी पेशंटबाबत न्युरॉलॉजीस्ट हा टीम कप्तान असतो.
पार्किन्सन्स मध्ये होणाऱ्या मानसिक आजारात प्रथम क्रमांक डिप्रेशनचा.४०% पेशंटमध्ये ते आढळते.काही वेळा डिप्रेशन निदान झाल्यावर त्या धक्क्यातून तात्कालिक असे ते असते.डोपामिनची पातळी कमी झाल्यानेही उदभऊ शकते. काहीवेळा पीडीची इतर लक्षणे दिसण्यापुर्वी लक्षण म्हणूनही डिप्रेशन आढळते.यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधाने काही वेळा कॉन्स्टिपेशन,अस्वस्थता असे साइड इफेक्ट होतात.शॉक ट्रिटमेंट हा सर्वात सुरक्षित उपचार आहे. पण त्याबाबत गैरसमज आढळून येतात.सिनेसृष्टीतील अतिरंजित कथा यात भर टाकतात.
यानंतर येतो चिंतातूरता( anxiety ) हा आजार.यात विविध प्रकारची भीती,काळजी येते.यासाठी anti anxiety औषधे,समुपदेशन,सायको थेरपी यांचा उपयोग होतो.
निर्विकारता ( Apathy ) बऱ्याच पेशंटमध्ये दिसते.हा औषधाचा परिणामही असू शकतो.याशिवाय सायकोसीस,यात hallucination,delusion यांचा समावेश होतो.काही वर्तन समस्याही असतात.
डिमेन्शीया,यात बुद्धी,भावना,व्यक्तिमत्वाचा हळूहळू ऱ्हास होतो हाही काहीजणात संभवतो.पूर्वी मानसोपचाराच्या औषधाने पीडी वाढायचा परंतु आता अनेक नविन औषधे आली आहेत.या सर्वावर न्युरॉलॉजीस्टआणि मानसोपचार तज्ज्ञ यांच्या सहाय्याने उपचार करता येतात.शुभंकराची भूमिकाही महत्वाची असते.
भाषणात शेवटी प्रार्थना, नृत्य यांचे त्यांनी कौतुक केले.स्वमदत गटही मानसिक आधारासाठी सहाय्यक ठरत असल्याचे सांगितले.
यानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
रामचंद्र करमरकर यांनी विविध निवेदने केली.
दीपा होनप यांनी आभारप्रदर्शनाचे काम अत्यंत भावपूर्ण शब्दात केले.
शेवटी सर्व उपस्थितांचे तोंड पेढ्यांनी गोड करून कार्यक्रम संपला.उपस्थित शुभार्थीना स्मरणिका मोफत देण्यात आल्या.सभेस येऊ न शकलेल्याना पोस्टानी पाठवण्यात येतील असे जाहीर करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यात अनेक स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.छपाईचे काम करताना इतरही मदत करणारे विनय दिक्षित, येणाऱ्यांची नोंद् ठेवणारे व स्वागत करणारे सुनंदा गोडबोले,रेवती हर्डीकर,सुहास हर्डीकर,अरुंधती जोशी;पुस्तक विक्रीचे काम करणारे हरिप्रसाद व उमा दामले,अजित कट्टी,विनया व मोरेश्वर मोडक,हे सर्व आमचेच आहेत.त्यांचे नेहमीच सहकार्य असणार आहे याची खात्री आहे.
या कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग आणि फोटो काढण्याचे काम शशांक साठे आणि प्रशांत शेंडे यांनी उत्तमरीत्या केले आहे.वेबसाईटवर ते देण्यात येईल.कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्याना कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल.
मे २०१६ वृत्त
होमिओपॅथिक संशोधन
भारती विद्यापीठाचा होमिओपॅथी विभाग आणि संजीवन होमिओपॅथी,हेल्थकेअर आणि रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्या २६१ व्या जयंतीनिमित्त 'पार्किन्सन्सवर होमिओपॅथीक उपचार' असा संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे.भारती विद्यापीठातील एमडी करणारे डॉक्टर्स पार्किन्सन्स रुग्णांची वर्षभर मोफत तपासणी करून व उपचार करतील.संजीवन होमिओपॅथी,हेल्थकेअर आणि रिसर्च सेंटरचे डॉक्टर संजीव डोळे आणि भारती विद्यापीठाच्या होमिओपॅथी विभाग प्रमुख प्रो.डॉक्टर अनिता पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन असणार आहे.
यासाठी स्वेच्छेने नावे द्यायची होती.५८ पेशंटनी नावे दिली.या प्रकल्पाची पहिली फेरी पूर्ण होत आली आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या मदतीने,कोथरूड,अश्विनी हॉटेल,सहकारनगर,घोले रोड असे पेशंटच्या सोयी साठी गट करण्यात आले.कोथरूड गटासाठी वासू आणि शशिकांत देसाई,सहकारनगर साठी राजीव आणि सविता ढमढेरे यांनी आपल्या घरात तपासणी साठी चोख व्यवस्था केली होती.अश्विनी हॉटेल तर आमच्या हक्काचे झाले आहे.घोले रोडला डॉक्टर डोळे यांच्या दवाखान्यात तपासणी चालू आहे.इतर गटातील पेशंटची तपासणी पूर्ण झाली.
कुलश्री राजगुरू,प्रणिता कानडे,निष्ठा अग्निहोत्री,सागर नीटवे,ग्यानप्रकाश श्रीवास्तव या डॉक्टर्सनी प्रत्येक पेशंटची जवजवळ तासभर केस हिस्ट्री घेऊन तपासणी केली.
जे पेशंट काही अडचणीमुळे येऊ शकले नाहीत त्यांच्या साठी हे सर्व डॉक्टर डॉक्टर संजीव डोळे यांच्या दवाखान्यात १० जून पर्यंत सोमवार ते बुधवार सकाळी १०.३० ते १ आणि संध्याकाळी ५.३० नंतर उपलब्ध असणार आहेत.यापूर्वी ज्यांनी नावे दिली नाहीत ते पेशंटही या संधीचा लाभ घेऊ शकतील.
यानंतर डॉक्टर संजीव डोळे सर्व पेशंटची तपासणी करतील.
मित्रमंडळाचे काम फक्त समन्वयाचे आहे.पेशंटनी स्वत:च्या जबाबदारीवर यात सहभागी व्हावयाचे आहे.
निवेदन
गुरुवार दि.१२ मे रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
डॉक्टर मानसी देशमुख यांचे ' स्मरणशक्ती आणि ब्रेन जिम' या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान होणार आहे.सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४.३० वाजता
१२मे २०१६ सभेचा वृत्तांत
गुरुवार दि.१२ मे रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने डॉक्टर मानसी देशमुख यांचे ' स्मरणशक्ती आणि ब्रेन जिम' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.त्या क्लिनिकल सायकोलॉजीस्ट आहेत आणि 'Mind-trail Intellectual services,Psychological services and research center' च्या संचालक आहेत.
सभेस ६० जण उपस्थित होते.
नेहमीप्रमाणे प्रार्थनेने आणि त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात जन्म असलेल्या शुभंकर शुभार्थींचे
वाढदिवस साजरे करून सभेस सुरुवात झाली.
व्याख्यानात सुरुवातीला डॉक्टर मानसी देशमुख यांनी पार्किन्सन्स आजार,त्याची लक्षणे,मेंदूच्या विविध भागाची कार्ये. याबाबत उल्लेख केला.हे व्याख्यान नाहीतर कार्यशाळा आहे असे सांगत कॉगनीटीव्ह इम्पेंअरमेंट आणि त्यात सुधारणा करण्यासाठी घरच्या घरी शुभंकरालाही करता येतील अशा करावयाच्या विविध कृती,खेळ,छोटे प्रयोग यावर भर दिला.कॉगनीटीव्ह हा शब्द वापरतो तेंव्हा त्यात विचार करणे,स्मरणशक्ती,संघटन,लक्ष केंद्रित करणे, अशा विविध बाबी येतात.पीडी पेशंटमध्ये कॉगनीटीव्ह इम्पेंअरमेंटमुळे सुरुवातीला सौम्य स्वरूपाचे बदल होतात.कामाची अमलबजावणी,लक्षकेंद्रित करणे इत्यादीत अडचणी निर्माण होतात,विचार प्रक्रिया मंदावते त्यामुळे अपेक्षित काम पूर्णत्वास नेण्यास विलंब लागतो.
योग्य शब्द सापडण्यास त्रास होतो.हे सांगताना त्यांनी अल्झायमर आणि पीडीमुळे येणाऱ्या समस्या यातील फरक स्पष्ट केला.पीडीमध्ये डीक्शनरी असते शब्दही उपलब्ध असतात परंतु हालचाली मंदावल्याने डीक्शनरीपर्यंत पोचायला वेळ लागतो.विचार प्रक्रिया मंदावल्याने शब्द सापडायला वेळ लागतो. अल्झायमरच्या बाबतीत मात्र डीक्शनरीची पानेच कोरी असतात.त्यामुळे सुधारण्यासाठी वाव नसतो.पीडीमध्ये मात्र तो असतो.ब्रेनजीमने दैनंदिन जीवनातील अडचणींची तीव्रता कमी करू शकतो.१९८७ मध्ये प्रथम ब्रेनजीम ही संज्ञा वापरली गेली.
स्मरणशक्ती म्हणजे पूर्वीचे अनुभव आणि शिकलेल्या गोष्टींचा खूप मोठा साठा असतो.स्मरणश्क्तीचेही लाँग टर्म मेमरी,शॉर्टटर्म मेमरी,वर्किंग मेमरी असे प्रकार असतात.यासाठी आणि विविध कॉगनीटीव्ह कौशल्यांसाठी
डॉक्टर मानसी यांनी काही कृती( activity ) करवून घेतल्या.यात Visual scanning,लक्षपूर्वक ऐकणे,शब्द आठवणे,हालचाली आणि विचारप्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोडींग,Acrochart इत्यादींचा समावेश होता.यानुसार शुभंकरानी रोज शुभार्थीकडून करवून घेणे अपेक्षित आहे.तीच कृती पुन्हा पुन्हा केल्याने कौशल्यात सुधारणा होते.सातत्य महत्वाचे.या कृती करण्यापूर्वी शुभार्थीची ही कौशल्ये कोणत्या पातळीवर आहेत हे तपासता येतील अशी ३९ प्रश्नांची प्रश्नावली त्यांनी दिली.ही प्रश्नावली म्हणजे मान्यतापत्र ' Quality of Life scale and memory scale.' आहे.काही दिवस सातत्याने activity केल्यावर पुन्हा ही प्रश्नावली भरून काही फरक झाला आहे का हे पाहायचे.इंग्लंड,अमेरिकेत तज्ज्ञ सायकॉलॉजिस्ट हे करतात. पण आपल्याकडे याला अजून इतके महत्व दिले जात नाही.परंतु या स्केलनुसार घरी करवून घेणे शक्य आहे.शुभंकराने शुभार्थीची मानसिकता समजून घेणे यासाठी महत्वाचे आहे.थेरपी आणि ब्रेनजीम यातील फरकही त्यांनी सांगितला.उदासीनता,भयगंड,चिंताग्रस्तता इ.साठी थेरपीची गरज असते.या सर्वात मला बदलायचं आहे हा दृष्टीकोनही महत्वाचा असल्याचे सांगितले.
यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
मित्रमंडळ हा आता एक परिवार झाला आहे.मित्रमंडळ सदस्यांना आपल्या आनंदात सर्वाना सहभागी करून घ्यावेसे वाटते.वसू देसाई यांचा नातू ९५ % गुण मिळऊन दहावी उतीर्ण झाल्याने त्यांनी सर्वांसाठी पेढे आणले,सविता ढमढेरे यांना नात झाल्याने त्यांनी काजूकतली वाटली तर आशा रेवणकर यांनी वाढदिवसाबद्दल चहा बिस्कीटे दिली.
निवेदन
गुरुवार दि.१४ जुलै रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
वैद्य नरेंद्र पेंडसे यांचे ' पार्किन्सन्ससाठी आयुर्वेद' या विषयावर व्याख्यान होणार आहे.सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु. ४ वाजता
Press ? for Keyboard
गुरुवार दि.११ ऑगस्ट रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे. न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर सुयोग दोषी यांचे व्याख्यान होणार आहे.सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु. ४ वाजता
११ ऑगस्ट सभेचे वृत्त
गुरुवार दि.११ ऑगस्ट रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने हॉटेल अश्विनी येथे न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर सुयोग दोषी यांचे व्याख्यान आयोजित केले होते.व्याख्यानास ६० जण उपस्थित होते.प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.शोभना तीर्थळी यांनी सुयोग दोषी यांची ओळख करून दिली.
डॉक्टरनी आपल्या व्याख्यानात अनैच्छिक हालचाली ( dyskinesia ),ताठरता,posture,तोल जाणे अशा विविध लक्षणाबाबत आणि औषधोपचार,शस्त्रक्रिया इत्यादीबाबत माहिती सांगितली.
पार्किन्सन्स मध्ये हालचाली मंदावतात.पण डीस्कायनेशियाचा त्रास सुरु होतो तेंव्हा त्या वाढतात. साधरणपणे लहान वयात पीडी झालेल्यांना ही शक्यता जास्त असते. आणि लीओडोपा बरेच दिवस घेतल्यावर ही शक्यता वाढते. त्यामुळे लहान वयात पीडी झालेल्याना आणि सुरुवातीची अवस्था असताना डोपामीन अगोनीस्ट औषधे दिली जातात.यातही डीसेंबल आणि नॉनडीसेंबल असे प्रकार असतात.नॉनडीसेंबल पूर्ण बंद करता येत नाहीत. स्वीकारावे लागतात.डीसेंबलमध्ये डोस अॅड्जेस्ट करून थोडी सुधारणा होऊ शकते पण त्यात ताठरता वाढते.डीबीएस शस्त्रक्रिया हाही उपाय आहे.Amantadine,paciten यांचा डीस्कायनेशियावर उपयोग होऊ शकतो परंतु त्यातून काही पेशंटना भास,मानसिक समस्या सारखे साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते.हे लक्षात घेऊन उपाययोजना करावी लागते.
posture आणि gait ची समस्या पीडी वाढत गेल्यावर निर्माण होते.मेंदूकडून आपोआप होणाऱ्या प्रतिक्रिया असतात त्याही कमी होतात.फ्रीजिंग म्हणजे पुतळा होण्याची समस्या निर्माण होते.यावर कोणतेही औषध नाही.फिजिओथेरपीचा उपयोग होतो.कसे उठायचे, कसे चालायचे, रात्री उठताना काय खबरदारी घ्यायची,कमोड कसा वापरायचा यासाठी मार्गदर्शन करून समस्येचे थोड्या प्रमाणात निराकरण करता येते.
शस्त्रक्रिया कोणासाठी यावरही डॉक्टरांनी मोलाच मार्गदर्शन केल.शस्त्रक्रिया करताना कोणाची करावी याचे निकष महत्वाचे.PSP, MSA या समस्या असणाऱ्यांना शस्त्रक्रियेचा उपयोग होत नाही.ज्याना सिंडोपाचा उपयोग होतो त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया योग्य ठरते.नॉनमोटार लक्षणावर शस्त्रक्रियेचा उपयोग होत नाही.शस्त्रक्रियेत इन्फेक्शन,ब्लीडींग होण्याची इतर शस्त्रक्रियेप्रमाणेच रिस्क असते.
यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना डॉक्टरनी उत्तरे दिली.
शुभंकर आणि शुभार्थी यांचे वाढदिवस यानंतर साजरे करण्यात आले.वाढदिवसानिमित्त अश्विनी दोडवाड यांनी इडली चटणी तर अनिल शिरोडकर यांनी चहा दिला.
यानंतर भारती विद्यापीठाच्या होमिओपॅथी कॉलेजच्या डॉक्टरांनी त्यांच्या संशोधनात सहभागी असलेल्या शुभार्थीकडून फीडबॅक घेतला.काही नवीन शुभार्थिनी संशोधनात सहभागी होण्यासाठी नावे दिली.प्रार्थनेने सभेची सांगता झाली.
पुढील महिन्यातील कार्यक्रम, दुसरा गुरुवार, गणेशोत्सवात येत असल्याने पहिल्या गुरुवारी होणार असल्याचे आणि हृषीकेश पवार यांनी नृत्योपचाराची दुसरी बॅच बुधवार व गुरुवार संध्याकाळी ४ ते ५ या वेळात सुरु केली आहे असे जाहीर करण्यात आले.
निवेदन
गुरुवार दि.१ सप्टेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने कार्यशाळा आयोजित केली आहे.
प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या
न्युरोफिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंग आणि त्यांच्या विद्यार्थिनी या कार्यशाळेचे संयोजन करणार आहेत प्रत्येक शुभार्थीची स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार आहे.सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु.३ वाजता
गुरुवार दि.१ सप्टेंबर १६ च्या कार्यशाळेचे वृत्त.
गुरुवार दि.१ सप्टेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने फिजिओथेरपी कार्यशाळा आयोजित केली होती.
लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या 'डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपी'च्या
न्युरोफिजिओथेरपिस्ट
प्राध्यापक
डॉक्टर नेहा सिंग त्यांचे सहकारी आणि विद्यार्थिनी अशी ४५ जणांची टीम या
कार्यशाळेसाठी खास लोणीहून आली होती.या टीमसह एकूण ९० जण कार्यशाळेत
सहभागी होते.डॉक्टर नेहा सिंग, २०१२ साली मंडळाने फिजिओथेरपी कार्यशाळा आयोजित केली होती तेंव्हा डी.वाय.पाटील कॉलेजच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी म्हणून सहभागी होत्या.त्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रकल्प पार्किन्सन्सवर आधारित होता.आज त्या स्वत: प्राध्यापक म्हणून कार्यशाळेचे आयोजन करत होत्या.अश्विनी मध्ये त्यांची टीम दोन वाजताच हजर झाली.मंडळाचे कार्यकर्ते ठरल्याप्रमाणे अडीच वाजता गेले तर नेहा आणि टीमची गरजेनुसार टेबल खुर्च्या मांडून,बॅनर लावून पूर्व तयारी झाली होती.शुभंकर, शुभार्थीही येऊ लागले होते.त्यामुळे वेळेत कार्यक्रमास सुरुवात झाली.
सुरुवातीला शुभार्थी कडून अनुमती पत्रक (consent form ) भरून घेऊन प्रत्येकाला बिल्ले लावण्यात आले.प्रत्येकाचे वजन,उंची,बी.पी. पाहण्यात आले.विद्यार्थिनीनी शुभार्थींचे assessment form भरले. एकूण ३६ शुभार्थी होते.स्टेशन १,२,३,४ अशा पाट्या टेबलसमोर लावल्या होत्या.मधल्या भागात शुभंकर आणि ज्यांची तपासणी झाली आहे त्या शुभार्थींची बसायची व्यवस्था केली होती.शुभार्थींचे, कंप,तोल जाणे,ताठरता, पोश्चर अशा समस्येनुसार वर्गीकरण केले होते. त्यानुसार वेगवेगळ्या स्टेशनवर शुभार्थींना बसवले गेले.प्रत्येक शुभार्थीबरोबर एक विद्यार्थिनी होती.प्रत्येक शुभार्थीला पुरेसा वेळ देऊन शिस्तबद्धपणे प्रत्येकाच्या शंकांचे निरसन करत, माहिती आणि व्यायाम सांगण्याचे काम सुरु होते..छापील माहिती असलेली पत्रकेही देण्यात आली.एकीकडे ३.३० वाजता डॉक्टर नेहा यांनी कार्यशाळेचे प्रयोजन आणि माहिती सांगितली.चार वाजता सर्वाना एकत्र बसवून सर्वांकडून कार्डियाक एक्सरसाईज म्हणजे चेअर एरोबिक्स करून घेतले.प्रत्येक शुभार्थीच्या शेजारी एक फिजिओथेरपिस्ट होता.समोर डॉक्टर साहिल घोरपडे,डॉक्टर रॅचेल नगरकर हे दोन डेमॉन्स्ट्रेटर होते.याशिवाय डॉक्टर नेहाही स्वत:एक्सरसाईज कसे करायचे हे दाखवत होते.यात खालीलप्रमाणे एक्सरसाईज शिकवले.
१)march pass २)stretch & swipe ३) tap & clap ४) एक आणि तीनचे एकत्रीकरण ५) दोन आणि तीनचे ६) दोन्ही हात जोरजोरात झटकणे.हे सर्व करताना काय काळजी घ्यायची हेही सांगितले.उदाहरणार्थ
नाश्त्याआधी करणे,जेवणानंतर १ ते दीड तासाने करणे,आरश्यासमोर बसून १,२,३,४ असे अंक मोजत करणे हे
महत्वाचे असल्याचे सांगितले.
याशिवाय हात आणि पाय यांचे कोआर्डीनेशन,श्वासोच्छवास,पोश्चर,कॉन्सन्ट्रेशन या गोष्टीही महत्वाच्या असल्याचे सांगितले.
या सगळ्या भरगच्च कार्यक्रमात नेहमीप्रमाणे वाढदिवसही साजरे करण्यात आले.वाढदिवसानिमित्त उषा चौधरी यांनी काजू डिलाईट आणि शीला कुलकर्णी यांनी चॉकलेट दिली.
शुभंकर कल्याणी कुलकर्णी या छोट्या मोठ्या कामासाठी ऑनलाईन केअरटेकर पुरविणारी संस्था सुरु करणार आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली.डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी असलेल्या देविका भिडे यांना नृत्य आणि फिजिओथेरपी यांची सांगड घालून पार्किन्सन्ससाठी प्रकल्प करावयाचा आहे त्यासाठी शुभार्थिनी सहभागी व्हावे अशी त्यांनी विनंती केली.
अडीच तीनला सुरु असलेला हा भरगच्च कार्यक्रम सहा वाजेपर्यंत चालला.डॉक्टर नेहा यांनी केलेले नियोजन,
दीपा होनप,अरुंधती जोशी,सविता ढमढेरे, वसू जोशी या कार्यकर्त्यांनी केलेली धावपळ,त्यांना अनेक शुभंकरांची साथ, शुभार्थीं चा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.
निवेदन
गुरुवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.यावेळी
डॉक्टर श्रीधर चिपळूणकर यांचे 'पार्किन्सन्स आणि पोश्चर' याविषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान होणार आहे.
सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता
१३ ऑक्टोबर मासिक सभा वृत्त
गुरुवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने हॉटेल अश्विनी,येथे सभा आयोजित केली होती.यावेळी डॉक्टर श्रीधर चिपळूणकर यांचे 'पार्किन्सन्स आणि पोश्चर' या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले.सभेस ७०/८० शुभंकर, शुभार्थी उपस्थित होते.आशा रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.काहीतरी वेगळे करण्यासाठी औषधाविना आजार बरा करणे अशी संकल्पना घेऊन डॉक्टर चिपळूणकर यांनी प्रॅक्टीस सुरु केली.जवळजवळ १० हजार विविध आजाराच्या पेशंटनी याचा फायदा घेतला.त्यांच्या दवाखान्यात गेल्या गेल्या 'Visit before you take medicine' अशी पाटी दिसते.त्यांनी आयुर्वेदातील एमडी पदवी मिळवली.त्यानंतर डिप्लोमा इन फिजिओथेरपी,पॅथालॉजीत पोस्ट ग्रॅज्युएशन केले.स्पोर्ट सायन्स,स्कीन एजिंग आणि रीज्युवेनेशन या विषयातील विविध पदव्या देश परदेशात मिळवल्या.या सर्वातून स्वत:ची वेगळी उपचारपद्धती विकसित केली.
पार्किन्सनन्स बरा होत नाही आणि सतत वाढत जाणारा आजार आहे हा विचार घेऊनच पीडी पेशंट जगत असतो.औषधाव्यतिरिक्त, तुम्हीच तुमचे डॉक्टर बना, यासाठी आजार समजून घ्या असा सल्ला त्यांनी दिला.यासाठी त्यांनी वेदनेचे उदाहरण दिले.बुटात खडा अडकल्यास पटकन समजते, आपण तो काढून टाकतो.झोपेतही काही चावल्यास प्रतिक्षिप्त क्रियेने शरीर मागे घेतो.वेदनेपासून दूर होण्याची इच्छा त्यामागे असते.मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. वेदनेला प्रत्येकाची वेगवेगळी प्रतिक्रिया असते.प्रत्येकजण क्षमतेनुसार सहन करत जातो.वेदना वाढल्यावर भीती,काळजी वाटते. वेदना समजून घेण्यासाठी वेदना कधीपासून हे पहायचं. प्रत्येकांनी आपला उपाय शोधायचा.बरेच जण वेदनाशामक औषधे घेतात यातून अॅसिडीटी वाढते.वेदना दुसरीकडे फक्त ढकलली जाते.आपण वरून काही चोळतो तेंव्हाही झुमझुमते.त्यामुळे लक्ष वेदनेपासून दुसरीकडे वळवले जाते.
आजारातून बरे होण्यासाठी प्रतिकारशक्ती, विचारशक्ती वाढवली तर शरीर स्वत:च औषध तयार करु शकेल.
शरीर करत नसेल तर ते करण्यासाठी काय करायचं? आपल्याच मेंदूला कामाला लावायचं.मेंदूचा ४% भागच आपण वापरतो.आणखी वापरायचा.यासाठी पक्षाघाताचे उदाहरण त्यांनी दिले.डावा हात पॅरलाईज झाला असेल तर उजवा हातही तसाच डाव्याप्रमाणे ठेवायचा.तसेच पाहत राहायचे हे करताना आपण दमतो.घाम येतो.हळूहळू उजव्या हाताची दोन बोटे हलवायची.त्याप्रमाणे डाव्या पॅरलाईज झालेल्या हाताचीही हालचाल होऊ लागते.म्हणजेच विरुद्ध बाजूचा परस्पर संबध पाहून आपण स्नायूवर नियंत्रण आणू शकतो.
व्यायामातही विविधता असावी.दहावेळा हात हलवला की अकराव्यावेळा ती नुसती हालचाल असते.व्यायाम नसतो.चालणे,पोहणे,उठाबशा काढणे अशी विविधता असावी.दमश्वास, ताणणे हे असावे.व्यायामाने ताठरता कमी होते.शरीरावरील लक्षणाचा मनाशी कसा संबंध असतो हे सांगताना त्यांनी परीक्षेचे उदाहरण दिले.घाम येणे, हात कापणे, फटिग ही शारीरिक लक्षणे भीतीने,मानसिक ताणाने दिसतात.हे टाळण्यासाठी ताणावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे ठरते.ऑलिम्पिकमध्ये सिल्वर वरून गोल्ड मेडलकडे जाण्यासाठी असे ताणावरील नियंत्रण आपण शिकवत असल्याचे त्यांनी सांगितले.खेळाडू बाहेरून स्टेरॉइड घेतात,पकडले जातात.परंतु शरीरात स्वत:चीच स्टेरॉइड तयार करायची क्षमता असते,ती वाढवायची.आजारावरील नियंत्रणासाठीही नकारा ऐवजी शरीरातील लक्षणे स्वीकारून समजून घेणे महत्वाचे.नकारात्मक विचार यायला लागले की लगेच दखल घेऊन आपले ज्यात मन रमते अशा गोष्टी करायच्या.स्वयंपाक,चित्रकला,बागकाम,गाणी ऐकणे,म्हणणे, प्रवास करणे,जे करायचे ते तन्मयतेने केल्यास,आनंदी असल्यास चांगले स्टीरॉइड तयार होते.गोष्टी सहज उपलब्ध झाल्या की त्रास घेणे कमी होते अवलंबित्व येते.यासाठी त्यांनी सर्वांना पटेल असे मोबाइलचे उदाहरण दिले.मोबाईलवर नंबर सेव्ह केल्याने मोबाईल हरवला तर जवळच्या माणसाचा फोन नंबरही आठवत नाही.अशाच आपण नित्याच्या अनेक क्रिया कमी करतो.आवश्यक क्रिया न केल्याने आजाराला निमंत्रण देतो.त्यामुळे नित्याच्या क्रिया कमी करू नका आणि क्रिया करताना मन केंद्रित करा असा सल्ला दिला.याचबरोबर पोटाने श्वास घेण्यासही सांगितले.लहान मुले असाच श्वास घेतात.इगो सोडून खळखळून हसणेही महत्वाचे असल्याचे सांगितले.
यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.फळ्यावर रेखाचित्रे काढून बसणे,उठणे,झोपणे,झोपून उठणे,वाहन चालवणे,स्वयंपाक करणे,रिक्षात बसणे अशा विविध वेळी पोश्चर कसे असावे हे समजावून सांगितले.चहापान झाले,औपचारिक रित्या सभा संपली तरी श्रोत्यांचे प्रश्न विचारणे संपत नव्हते.डॉक्टरांनी न कंटाळता,ठरलेल्या वेळापेक्षा जास्त वेळ देऊन सर्वांच्या शंकांचे निरसन केले.सर्वांच्याच मनात सकारात्मक विचार पेरले.
वाढदिवसानिमित्त श्यामलाताई शेंडे यांनी चहा दिला.
निवेदन
सर्वाना दिवाळी आरोग्यपूर्ण,आनंदाची,सुखसमृद्धीची जावो.
मासिक सभा गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे.
यावेळी 'पूरक उपचार पद्धतीबद्दलचे आपले अनुभव' या विषयवार शेअरिंग असणार आहे.
पहिली १५ मिनिटे डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी असलेल्या देविका भिडे या, नृत्य आणि फिजिओथेरपी यांची सांगड घालून पार्किन्सन्ससाठी प्रकल्प करत आहेत.त्याबद्दल माहिती सांगणार आहेत.याबाबतची व्हिडीओ सीडीही दिली जाणार आहे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता
दिवाळीच्या आनंदात भर टाकणारी आणखी एक माहिती देत आहे.
शुक्रवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पुण्याजवळील शांतीवन येथे दिवसभराची सहल जाणार आहे.ज्यांना सहभागी व्हायचे आहे.त्यांनी गुरुवार दिनांक १० नोव्हेंबरच्या कार्यक्रमात प्रत्येकी रुपये २०० भरून नाव नोंदवायचे आहे.१० नोव्हेंबरच्या कार्यक्रमात सहलीची रूपरेषा सांगणारे पत्रक दिले जाईल.
पार्किन्सन्स मित्रमंडळाची मासिक सभा गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी आयोजित केली होती.
यावेळी 'पूरक उपचार पद्धतीबद्दलचे आपले अनुभव' या विषयावार शेअरिंग झाले.प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.
डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी असलेल्या देविका भिडे या, नृत्य आणि फिजिओथेरपी यांची सांगड घालून पार्किन्सन्ससाठी प्रकल्प करत आहेत.पहिली १५ मिनिटे त्यांनी त्याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती सांगितली.प्रसिद्ध नृत्यांगना सुचित्रा दाते यांच्या कडे त्यांची नृत्यसाधनाही चालू आहे.सुचित्र दाते या गेली काही वर्षे पार्किन्सन्स पेशंट आणि जेष्ठ नागरिकांसाठी मोफत नृत्योपचार करत आहेत.देविका यांना फिजिओथेरपीचा त्यांचा अनुभव आणि नृत्य हे बऱ्याचवेळा सारखे आणि एकमेकास पूरक आहेत असे वाटले.यासाठी त्यांनी पदव्युत्तर प्रकल्पासाठी हा विषय घेतला. प्रात्यक्षिकासाठी त्यांना शीतल टेकावडे आणि झिनल संगवी यांनी मदत केली.भरतनाट्यममधील आडव,विविध मुद्रा,नवरस त्यांनी दाखवले.शुभंकर शुभार्थीनीही यात उत्साहाने सहभाग घेतला.फिजिओथेरपी करताना कंटाळवाणे वाटू शकते नृत्याची जोड दिल्याने ते मनोरंजक होते.पाय आपटताना अॅक्युप्रेशरचे सर्व पॉईंट दाबले जातात,नृत्याच्या विविध बाबी करताना हालचालीतील समन्वय, चालण्यात सुधारणा,तोल सावरणे या गोष्टी साध्य होतात,आत्मविश्वास वाढतो.नवरसाच्या अभिनयामुळे चेहऱ्याला फेशिअल होते. भावविहीन चेहरा हे पिडीचे लक्षण, त्यावर मात करता येते.
या प्रयोगात सहभागी असलेले मोरेश्वर काशीकर यांनी आत्तापर्यंत आठ सेशन केलेली आहेत. त्यांनी पाय आपटण्यामुळे फ्रीजिंगची समस्या कमी झाल्याचे सांगितले.
यानंतर रामचंद्र करमरकर यांनी सहलीबद्दल माहिती सांगितली.
शरच्चंद्र पटवर्धन यांनी पूरक उपचार म्हणजे अॅलोपथीचे उपचार चालू ठेऊन केले जाणारे इतर उपचार अशी पूरक उपचारपद्धतीची व्याख्या करत चर्चेला सुरुवात केली.
मोरेश्वर काशीकर यांनी वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे पूरक उपचार वापरत असल्याचे सांगितले.यात आयुर्वेद,होमिओपॅथी,नृत्योपचार,योगासने,प्राणायाम,सर्वांग सुंदर व्यायाम,संगीत इत्यादीचा समावेश असल्याचे सांगितले.ते शुभार्थीनी मदत मागितल्यास घरी जाऊन योग शिकवतात.यात त्यांना आनंद मिळत असल्याचेही सांगितले.विजय ममदापुरकर यांनी खेळाडू म्हणून स्वत:चे अनुभव सांगितले.श्री काशीकर यांच्या स्मरणिकेतील योगोपचार उपचारावरील लेखाचा फायदा झाल्याचे सांगितले.स्वमदत गटाचा आत्मविश्वास वाढण्यास उपयोग होतो असे ते म्हणाले. विशाखा मेंडजोगे यांनी सुज्योग थेरपीबद्दल माहिती सांगितली.श्री.राजीव ढमढेरे यांच्यासाठी त्या ही थेरपी वापरतात. त्यांना याचा उपयोग होतो.उमेश सलगर यांनी आयुर्वेदिक औषध आणि महानारायण तेलाने मसाज याचा उपयोग झाला अशी माहिती दिली
नेहमीप्रमाणे वाढदिवस साजरे करण्यात आले.शोभना तीर्थळी यांनी,गोपाल तीर्थळी यांच्या वाढदिवसानिमित्त खांडवीच्या वड्या- हा पारंपारिक पदार्थ आणला होता.तर हेमा शिरोडकर यांनी दिवाळीनिमित्त स्वत: केलेली चकली आणली होती.विनिता कुलकर्णी यांनी चहा दिला.
८ डिसेंबर मासिक सभा वृत्त
गुरुवार दिनांक ८ डिसेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती.. यावेळी डॉक्टर अरूण दातार (संचालक - सूर्या जिम) यांचे 'पार्किन्सन्स आणि व्यायाम' या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले. सभेस ५०/६० जण उपस्थित होते.आशा रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.सुरुवातीला डिसेंबर महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत अशा शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस साजरे करण्यात आले.यावेळी माननीय वक्त्यांचा वाढदिवसही डिसेंबर मधील होता.
डॉक्टरांनी सुरुवातीला '.प्रार्थना नसती तर मी वेडा झालो असतो असे गांधीजी म्हणत' असे सांगत प्रार्थनेचे महत्व सांगितले.
यानंतर त्यांनी काही वेगवेगळ्या कारणाने शारीरिक दोष निर्माण झालेल्या व्यक्तींना व्यायामाद्वारे कसे बरे केले याची उदाहरणे सांगितली.१०/१२ वर्षाच्या मुलाचे आजारपणामुळे हातपाय अधू झाले होते.या मुलाकडून मसाज,पोहणे, व्यायाम हे करवून घेतले.चार वर्षात ज्याला छोटा दगडही उचलता येत नव्हता तो ११५ किलो वजन उचलू शकला.हे साध्य करण्यासाठी काही महत्वाच्या बाबी त्यांनी सांगितल्या.
१) आपले दु:ख,त्रास जवळच्या व्यक्ती सोडल्यास सर्वाना सांगत बसु नका.यावर बहिणाबाईची कविता त्यांनी सांगितली.'माझ दु:ख माझ दु:ख तयघरात कोंडलं,माझ सुख माझ सुख हंड्या झुंबरे टांगलं'.
स्वत:च्या अपघातानंतर निर्माण झालेल्या दुर्धर परिस्थितीवर मात करण्यास ती उपयोगी पडल्याचे त्यांनी सांगितले.
२) ठरलेले व्यायाम करताना लक्ष केंद्रित करणे महत्वाचे.शुभंकराने व्यायाम करताना जिद्द, आशावाद निर्माण करावा.प्रेम, काळजी,सहानुभूती दाखवून शुभार्थीला कमकुवत करू नये.
३) .व्यायामात सातत्य,काटेकोरपणा,शिस्त हवी.उरकाउरकी नको.कंटाळा नको' टू.फिल टायर्ड इज नॉट टू बी
टायर्ड' 'द मसल्स ग्रो ओन्ली व्हेन ...यु फोर्स देम टू ग्रो' हे लक्षात घ्यावे.
४) You are not disabled by the disabilities you have but you are able by the abilities you have.
५) मनाने खंबीर बनून दुखण्यावर स्वार व्हा. यातून ,शरीराची ताकद वाढवत नेता येते.
६) व्यायाम करताना निश्चीत असे उद्दिष्ट हवे.यात अल्पकालीन,दीर्घकालीन,निर्णायक असे प्रकार सांगितले.
यानंतर त्यांनी प्रत्यक्ष व्यायाम करून घेतले.व्यायामाच्या सुरुवातीला दीर्घ श्वास घेऊन मन स्थिर केले.त्यानंतर डोळे मिटून पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाला ताण विरहीत करण्यास सांगितले.नंतर पुन्हा त्याच अवयवांना ताण देण्यास सांगितले.पुन्हा ताण विरहीत करून व्यायाम प्रकार सुरु केले.( हे व्यायाम प्रकार स्वतंत्रपणे संचार किंवा स्मरणिकेत देण्यात येतील) सर्व शुभंकर शुभार्थी उत्साहाने यात सहभागी झाले.'नो पेन नो गेन' म्हणून काही झाले तरी व्यायाम चुकवायचा नाही.हे सर्वांच्या मनावर ठसवले.
ज्या दिवशी व्यायाम नाही त्यादिवशी जेवण नाही असा निर्बंध स्वत:वर घातल्याचे त्यांनी सांगितले.व्यायामाबरोबर आहार विहाराचे महत्वही विशद केले.त्यांच्या विचाराना 'आधी केले मग सांगितले' असे अनुभवाचे अधिष्ठान असल्याने, सर्वांनाच त्यांचे विचार भावले.पंचाहत्तरीतही त्यांची शरीरसंपदा, दीड दोन तासातील आत्मविश्वासपूर्ण,उत्साहाने ओतप्रेत भरलेला वावरही सर्वांवर प्रभाव टाकून गेला.
यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
शेवटी अंजली महाजनने व्यायामाविषयीच्या घोषणा सांगितल्या.
डॉक्टर दातार यांनी पेशंट एकत्रित आल्यास आपण व्यायाम शिकवण्यास तयार आहोत असे सांगितले.डॉक्टरांच्या जीवन दर्शन सांगणाऱ्या 'शून्यातून सूर्याकडे' या पुस्तकाच्या प्रती काहीजणांनी घेतल्या.
पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या ' पार्किन्सनन्सचा स्वीकार करून पार्किन्सन्ससह आनंदी राहावे' या ब्रीदवाक्याला पूरक आणि प्रेरणादायी अशा डॉक्टरांच्या व्याख्यानाने सकारात्मक विचाराची पेरणी नक्कीच झाली.
No comments:
Post a Comment