हसायचे आहे
उल्हास गोगटे ,शुभंकर
फिरुनी आज सर्वांशी,हेच सांगायचे आहे,
हसत जगायाचे आणि,हसत मरायाचे आहे.
आली गुलाबा कळी,फुलणे पहावे खास,
बोचले जरी कांटे तिचे,वास घ्यायचा आहे
शिशीराची असो थंडी,वा उष्मा वसंतातला,
गळ पानांची नि बहराची,ख़ुषी घ्यायची आहे.
क्षण येवो तो कोणता,मजेत तो झेलायचा,
आज आहे आपला,अन उद्या आपलाच आहे.
सांगून आम दुनियेला,दाखवू कसे जगावे,
गिळून दु:ख सारे आपले,वर हसायाचे आहे.
मनात माझ्या सदा चंद्रमा
मनात माझ्या सदा चंद्रमा,पौर्णिमेचे चांदणे,
कधी उगावे,कधी मिटावे,गावे सदाच गाणे |
गळ्यात माझ्या,सूर नवेसे,सांजेस ना मारवा ,
नाचत जावे,नाचत यावे,चित्ती ताजा गारवा |
मानसी आशा,अखंड जागी,ठेवी दूर निराशा,
संकट येवो, दु:ख कितीही, स्मरतो परमेशा |
दुर्मुखलेला,कधी न माझा,दाखवितो चेहरा,
आनंदतो मी, बघता त्यांच्या,कौतुकाच्या नजरा |
ध्यानी धरितो,'तों' ची करता अन 'तो' करविता
हाती आपुल्या,कांहीं नसता, उगा कशाला चिंता |
उल्हास गोगटे - हे एक आदर्श शुभंकर आहेत.सेलेबल पाल्सी असलेला ५६ वर्षाचा मुलगा सांभाळणे आणि गेली २१ वर्षे पार्किन्सन्स असलेल्या आणि गेला काही काळ अंथरूणग्रस्त असलेल्या पत्नीची सुश्रुषा करणे हे काम ते आनंदाने, मनापासून स्वत: करतात.आणि भोवतालच हे वास्तव स्वीकारून आशावादी कविता करू शकतात हे खरच प्रेरणादायी आहे.नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांचा हा आशावाद पोचवण्यासाठी त्यांच्या दोन कविता देत आहे.
पुण्यातील नाव कमावलेल्या सुप्रसिद्ध गोगटे गॅरेज व पेट्रोलपंपाचे एक संचालक असलेल्या गोगटे यांनी सत्तेचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ यशस्वी कारकीर्दीनंतर निवृत्त झाल्यावर त्या काळात साचून राहिलेल्या उर्मीना कवितांच्या रूपाने वाट करून दिली.त्यांचे,स्पन्दने,गहिरे रंग आणि मेघडंबरी असे तीन कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.आजपर्यंत त्यांनी व्यवसाय सांभाळून,बंधूंच्या आणि कुटुंबियांच्या सहकार्य व पाठींब्याच्या बळावर ग्लायडिंग,फोटोग्राफी,फोमरेक्झीन आर्टिकल्स,हार्मोनियम व व्हायोलीन वादन,जुन्या वॉल्क्लॉक्सचे पुनरुज्जीवन,सुतारकाम,शिवणकाम,वूडकार्व्हिंग,प्लंबिंग,चित्रकला,मूर्तीकला,कवितालेखन असे विविध छंद जोपासले.या छंदातून अनुभवलेल्या विविध छटाही त्यांच्या कवितातून प्रतीत झालेल्या दिसतात.
No comments:
Post a Comment