Saturday, 27 September 2014

देणे समाजाचे

                                                        " देणे समाजाचे " 
                                
आर्टिस्ट्री या संस्थेचे संचालक श्री. दिलीप गोखले व त्यांच्या पत्नी सौ. वीणा गोखले यांनी सुमारे दहा वर्षापूर्वी " देणे समाजाचे " या उपक्रमा अंतर्गत दर वर्षी एक प्रदर्शन भरवणे सुरु केले. समाजासाठी विधायक काम करणाऱ्या  स्वयंसेवी संस्थांना प्रसिद्धी मिळावी, त्यांचे  कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे व समाजाला त्याचा लाभ घेता यावा या उदात्त हेतुने  प्रदर्शन भरविले जाते. 
दुर्दैवाने श्री दिलीप गोखले यांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले. श्री दिलीप गोखले यांच्या सहाव्या स्मृतीस अर्पण केलेले हे उपक्रमाचे दहावे वर्ष आहे.श्रीमती वीणा गोखले या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर घेऊन आपल्या सहकाऱ्यांसह हा उपक्रम नेटाने पुढे चालवीत आहेत. त्यासाठी त्यांना सामाजिक कार्याला वाहून घेतलेले, थोर साहित्तिक डॉ अनिल अवचट यांचा भक्कम पाठींबा आहे. 
दर वर्षी सुमारे तीस स्वयंसेवी संस्थाना प्रदर्शनात भाग घेण्याची संधी मिळते.आत्तापर्यंत ९५ संस्थाना असा लाभ मिळाला आहे.प्रत्येक संस्थेला ३X२ मीटर चा एक गाळा, त्यात एक मोठे टेबल, २/३ खुर्च्या , एक प्लग point कनेक्शन अशा सुविधा दिल्या जातात. या सर्व सुविधांसाठी आर्टिस्ट्री भाग घेणाऱ्या संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे भाडे घेत  नाही. 
श्रीमती वीणा गोखले यांनी आम्हाला बोलावून प्रदर्शनात भाग घेण्याची संधी दिली आणि आम्ही आनंदाने ती स्वीकारली.  
यंदाचे प्रदर्शन दि. १२,१३,व १४ सप्टेंबर २०१४ असे तीन दिवस, रोज सकाळी १० त्ते रात्री ९ या वेळात पुण्यातील कर्वे पथावरील ' हर्शल ' हॉल या ठिकाणी भरले होते. दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाच्या उदघाटनाचा समारंभ  झाला. श्रीमती वीणा गोखले यांनी निवेदन केल्यावर माननीय पाहुणे जागतिक कीर्तीचे व्हायोलीन वादक पं. अतुल उपाद्ध्ये व किर्लोस्कर ऑईल चे श्री. राजेंद्र देशपांडे यांची समयोचित व वीणा गोखले यांचे यथायोग्य गुणगान करणारी भाषणे झाल्यावर, साहित्तिक व थोर सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते प्रदर्शनाचे व आर्टिस्ट्रीच्या  कामाचा आढावा घेणाऱ्या चित्रफितीचे उदघाटन झाले. डॉ अनिल अवचट यांनी आपल्या भाषणात आज अशा प्रकारच्या प्रदर्शनाची किती गरज आहे हे सांगितले. या प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगितले व तो सुरु करण्याबद्दल गोखले दाम्पत्याचे कौतुक केले. तसेच पती निधनानंतर वीणा गोखले यांनी निर्धाराने हा उपक्रम समर्थपणे पुढे चालू ठेवल्याबद्दल त्याचे कौतुक केले सर्व उपस्थितांच्या भावनांना जाहीर उद्गार दिला .    
सर्व संस्थांनी आपापले  स्टॉल माहिती, फोटो, व विविध वस्तु यांनी सजविले होते. पार्किन्सन्स मित्र मंडळचा स्टॉलही त्यात मागे नव्हता. मंडळाच्या कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी सकाळी १० ते रात्री ९ मध्ये आपापल्या पाळ्या लावून घेतल्या होत्या व तीनही दिवस त्यांनी त्या व्यवस्थित सांभाळल्या. आमच्या स्टॉलला सुमारे ६०० जणांनी भेट दिली. प्रत्येक जिज्ञासूला कार्यकर्ते माहिती व पत्रके देत होते. प्रत्येकाच्या शंकांना यथा योग्य माहिती देऊन त्यांचे समाधान करत होते. या प्रदर्शनातून ६०० लोकांना आम्ही पार्किन्सन्स मित्र मंडळाची माहिती पुरविली व त्यांच्याकडून त्यांच्या कितीतरीपट लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. 
सुमारे २४ नव्या पेशंटची ( शुभार्थी )नोंद  झाली. ४० जणांनी आपले नाव व फोन नं नोंदवून मंडळाला सहकार्य करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्या सर्वांचा एक मेळावा घेऊन त्यांच्या वेळेचा शुभार्थी साठी कसा उपयोग करून घेत येईल यावर चर्चा करणार आहोत. 
मंडळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांनाही बर्‍यापैकी   प्रतिसाद मिळाला. रोख व चेक द्वारे काही देणग्याही जमा झाल्या. 
या प्रदर्शनाचा मंडळाला खूपच फायदा झाला. समाजातील अनेक लोकांपर्यंत व पेशंट पर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. 
श्रीमती वीणा गोखले यांनी आमची निवड करून आम्हाला प्रदर्शनात भाग घेण्याची संधी दिल्याबद्दल पार्किन्सन्स  मित्र मंडळ सदैव त्यांचे ऋणी राहील. 

No comments:

Post a Comment