Saturday, 7 December 2019

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४७

                                          पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४७
                     फेसबुक, whats app,ट्विटर इत्यादींद्वारे सोशल मिडीया कौटुंबिक जीवन,सामाजिक जीवन,परस्पर संवाद यावर ओव्हर पॉवर झाले आहे.याचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत.पार्किन्सन्स मित्रमंडळाचा अनुभव मात्र वेगळा आहे.कुठलीही साधने चांगली की वाईट हे तुम्ही त्याचा वापर कसा,किती आणि कशासाठी करता यावर अवलंबून असते
                        मंडळाचा फेसबुकवर 'Parkinson's mitramandal'  हा ग्रुप आणि 'पर्किन्सन्स मित्रमंडळ' हे पेज आहे..पार्किन्सन्ससह आनंदी गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी मदत घ्या मदत करा.हे मंडळाचे ब्रीदवाक्य आहे. आमच्या आनंदी राहण्यात शुभार्थी शुभंकर यांच्या बरोबर हितचिंतक,आमच्या परीवाराबद्दल आस्था असणारे या सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे.शुभार्थीच्या भोवतालच्या समाजालाही पार्किन्सन्स या आजाराबद्दल योग्य माहिती समजणे आवश्यक वाटते. याशिवाय शुभार्थीच्या सहवासातील तरुण पिढीही आमच्या गटाच्या जास्तीत जास्त संपर्कात यावी ही इच्छा होतीच.त्यांच्या व्यस्त दिनक्रमात फेसबुक सारखे वेळेनुसार भेटता येणारे,तरुण पिढीचा जेथे वावर आहे असे  साधन सोयीचे आहे अशी भावना होती.ही सर्व  उद्दिष्ट साध्यही होत आहेत..शुभंकर शुभार्थीबरोबर शुभार्थींची मुले, सुना, नातवंडे, समाजातील विविध स्तरातील मंडळी  या गटात सामील झाली आहेत.अनेकांपर्यंत आमच्या स्वमदत गटाची माहिती पोचत आहे.ते ही माहिती इतरांपर्यंत पोचवतआहेत.
                      PMMP GAPPA आणि PARKINSON INFO & SHARING असे दोन whats app group आहेत.शुभंकर,शुभार्थी यांच्यातील परस्पर  संवादासाठी ते अपेक्षेपेक्षा जास्त उपयुक्त ठरत आहेत.जे सभाना येऊ शकत नाहीत असे शय्याग्रस्त आणि परगावचे शुभंकर, शुभार्थी याद्वारे आमच्या परिवारात सामील झाले आहेत.मुंबई,सांगली,कोल्हापूर,नांदेड,अहमदनगर,रत्नागिरी,चिपळूण,नागपूर,सातारा,औरंगाबाद, इत्यादी महाराष्ट्रातील आणि बेंगळूर, इंदूर, गोवा,हैद्राबाद,दिल्ली,बेळगाव इत्यादी महाराष्ट्राबाहेरील शुभंकर शुभार्थी यात सामील आहेत. या सर्वांना मित्रगणाचा (ग्रुप ) खूप आधार वाटतो.
                   गप्पा मित्रगणावर  विषयाचे फारसे  बंधन नाही.इन्फोवर मात्र 'पार्किन्सन्सवर बोलू काहीही इतर काही नाही'.असे आहे येथे पार्किन्सन्सबाबत विचार,माहिती,अनुभव यांची देवाणघेवाण होते.सर्व समान समस्याग्रस्त असल्याने मन मोकळे करण्यासाठी हक्काचा खांदा मिळतो.जे चारचौघात बोलता येत नाही असे काही मनातले बोलण्यासाठी समविचारी व्यक्तीशी  फोनवर बोलण्याचा पर्याय उपलब्ध होतो.सभासदामध्ये शुभार्थीला  अनेक वर्षे सक्षमपणे हाताळणारे,पार्किन्सन्सला मित्र बनवणारे शुभंकर आहेत.न्युरो फिजिओथेरपिस्ट पूनम गांधी,स्पीचथेरपिस्ट नमिता जोशी, आहारतज्ज्ञ रमा, समुपदेशक डॉ.रेखा देशमुख.मायक्रोबायालोजी आणि सायकोन्युरोबीकद्वारे पार्किन्सन्स शुभार्थीवर मेडीटेशनचा प्रयोग केलेल्या डॉ.विद्या काकडे आहेत. आयुर्वेदाचार्य प्रिया पत्की आहेत.स्वमदतगटावर पीएचडी केलेले आणि मंडळाची वेबसाईट पाहणारे डॉ.अतुल ठाकूर आहेत.सोशल मिडिया आणि एज्युकेशन रिसर्चर देवयानी तीर्थळी आहेत.स्वत:शुभार्थी असलेले,पार्किन्सन्सवर हसतखेळत कब्जा करणारे बालरोग तज्ज्ञ प्रकाश जावडेकर आहेत. रमेश तिळवे, मयूर श्रोत्रीय,अंजली महाजन हे admin म्हणून मित्रगणाचा दर्जा,उपयुक्तता वाढविण्याची दक्षता घेतात.
                 मेंदूला खुराक देणारी कोडी,रमेश तिळवे यांच्या फळभाज्या आणि इतर वस्तूतून केलेल्या कालाकुती,जावडेकर यांची पेंटिंग,सौ पाटणकर,सौ गिजरे यांचे विणकाम,पेंटिंग,उमेश सलगर यांचे खाद्यपदार्थ अशी नावांची यादी लांबलचक आहे.शुभार्थीना हे प्रेरणादायी ठरते.
                या मित्रगणाबद्द्ल लिहावे तितके कमीच आहे.आता थोडे पुढच्या गप्पात.

Saturday, 30 November 2019

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४६

                                              पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४६
                                  शुभार्थी अश्विनी दोडवाड यांची मुलगी अनुश्रीचा फोन आला.'काकू कितीतरी दिवसांनी आईचा आनंदी आवाज आणि प्रसन्न चेहरा पाहिला.आता सभेलाही पाठवीन.मंडळाचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.'
                             नुकतीच २७ नोव्हेंबरला पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल मनाली गार्डन येथे गेली होती. आणि हो नाही करता करता अश्विनीताई सहलीत सहभागी झाल्या होत्या.अश्विनीताई सातत्याने सह्लीना,सभाना येत.अगदी आनंदवनच्या सहलीलाही त्या आल्या होत्या.नृत्योपचारात सहभागी होत्या मंडळाच्या मासिक सभेत ५०/६० जणांसाठी वाढदिवसानिमित्त स्वहस्ताने केलेला उपमा त्यांनी एकदा आणला होता.आणि अशा उत्साही अश्विनीताईंचा हल्ली फोनवर बोलतानाही निराशेचा स्वर असे.त्यांची तीनही  मुले त्यांची काळजी घेतात.केअरटेकर ठेवलेला आहे.असे असले तरी पार्किन्सन्स शुभार्थीना गाठण्यासाठी नैराश्य टपूनच बसलेले असते.त्यांनी वरचढ होण्याच्या आतच त्याला हाकलावे लागते.आणि त्याची हकालपट्टी करण्यासाठी पार्किन्सन्स मित्रमंडळासारखा स्वमदतगट निश्चित उपयोगी पडतो.आणि सहल तर यासाठी हुकमी एक्का.निराशेने ग्रासलेल्या अश्विनीताईंच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे कसब सहलीनी केले होते.दरवर्षी सहलीनंतर असे अनेक सुखद अनुभव येतात.
                            शुभार्थीना आनंद देणाऱ्या सहलीचे आयोजन,नियोजन  २/३ महिने आधीपासूनच केले जाते.पुण्यापासून ३०/४० किलोमीटरवर असणारे निसर्गरम्य ठिकाण निवडले जाते.कार्यकारिणीचे सदस्य प्रत्यक्ष जावून २/३ ठिकाणाची पाहणी करून येतात.त्यातले शुभार्थीना सुखावह होईल असे ठिकाण निवडले जाते.बस अगदी ठिकाणापर्यंत जायला हवी.ठिकाण उंच सखल नको,खूप पायऱ्या नसाव्यात.शौचालय जवळ असावे.कमोड असावा.कार्यक्रम,खेळ यासाठी हॉल हवा.असे सगळे आखुडशिंगी,बहुदुधी हवे.
                         ठिकाण निश्चित झाले की नावनोंदणी सुरु होते.बस ठरवणे संख्येवर अवलंबून असल्याने ठराविक तारीख दिली जाते पण अगदी शेवटच्या दिवसापर्यंत नावे येतच राहतात.आणि अशा उशिरा आलेलया शुभार्थीचे मन मोडणे कठीण होते.त्यांच्यात सहलीमुळे झालेले परिवर्तन पाहून केले ते योग्यच होते असे वाटते.
बसमध्ये शुभार्थीना नाश्ता देतानाही त्यांचा कंप लक्षात घेऊन चमच्याने खाण्याऐवजी उचलून खाता येईल असा मेनू ठरविला जातो.खेळ करमणुकीचे कार्यक्रम यांची रेलचेल असते.एकुणात सहलीचे सर्व नियोजन शुभार्थी केन्द्री असते.सर्वजण लहान मुल बनून मनसोक्त आनंद घेतात.सामुहिक शक्तीतून उर्जा निर्माण होते ती उर्जा अनेक दिवस पुरते.
                     सहलीला परगावहून शुभार्थी शुभंकर येतात.ठाण्याच्या अनुराधा गोखले,महाडचे मधुकर तांदळे,बेळगावचे आशा आणि प्रदीप नाडकर्णी अशी उदाहरणे सांगता येतील.अनेक शुभार्थी परदेशवाऱ्या,भारत भ्रमण करतात तरीही त्यांना मंडळाची ही मिनी सहल आकर्षित करते.९४ वर्षाच्या कलबाग काकांचा  सहलीतील सहभाग सर्वच शुभंकर शुभार्थीना प्रेरणादायी असतो.
                     
                     सहलीपूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत अनेक अडचणी येतात.तोल जातो,ऑनऑफची समस्या आहे फ्रीजीन्गची समस्या आहे,डिस्काय्नेशियामुळे शरीर सारखे हलते अशा अनेक शुभार्थीना नेताना प्रचंड ताण असतो. सह्लीनंतरच्या शुभंकर, शुभार्थींच्या सुखावणाऱ्या प्रतिक्रिया आणि खुललेले चेहरे पाहून ताण विसरायला होतो.पुन्हा सहल निघते.खरे तर  आमची सहल म्हणजे 'ताण हवासा' असेच म्हणावे लागेल. 

                      
                    

Saturday, 16 November 2019

क्षण भारावलेले - ११

                                              क्षण भारावलेले - ११
                   दिवाळी सण आनंदाचा.प्रेमाच्या माणसांच्या भेटीगाठीचा.काहीवेळा दिवाळीत एखादी अनपेक्षित भेट घडते आणि भारावलेले क्षण देऊन जाते.या वर्षी असेच झाले.शुभार्थी उमेश सलगर यांचा फोन आला, मी फराळ घेऊन येतोय.तुम्ही घरी आहात ना? त्यांनी घरी येणे मला आवडलेच असते. पण औंधहून आमच्या घरी येणे म्हणजे दुसऱ्या गावाला जाण्यासारखेच शिवाय ते स्कूटरवर येणार.मी उत्तर देण्यापूर्वीच ते म्हणाले 'ताई मी स्कूटरवर येणार नाही.माझा मुलगा सोडून जाणार आहे.तुम्ही काळजी करू नका'.
                 ठरल्याप्रमाणे ते दुपारी साडेबाराला आले.येता येता आमच्या गेटपाशी ठेवलेल्या कचऱ्याच्या रिकाम्या बादल्या घेऊन आले.आमची कामवाली आत येताना त्या आणत असते.यापूर्वी ते एकदा आले होते आणि कुटुंबांतालेच एक झाले होते.त्यामुळे त्याना काही वाटले नाही तरी मलाच ओशाळल्यासारखे झाले .आमची स्वयंपाक करणारी रंजना अजून आली नाही म्हणून मी काळजीत होते.सलगर म्हणाले मी करतो स्वयंपाक.मी कितीही नाही म्हटले तरी माझ्याकडून त्यांनी भाजी चिरायला घेतली.मला त्यांचा भाजी चिरताना व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून मीही थोडावेळ चिरू दिली.थरथरत्या हातानी त्यांनी कांदा आणि कोबी  बारीक आणि एकसारखा चिरला.मलाही इतका छान चिरता येत नाही.इतक्यात रंजना आली आणि तिने सूत्रे हातात घेतली.
               आता सलगर यांचे त्याच्या पोतडीतून एकेक जिन्नस काढणे चालू झाले.त्यांनी गोव्याहून खास आणलेले आंबाडे,त्रिफळे,फणसपोळी आधी काढली.नंतर स्वतंत्र डब्यातून आणलेले वेगवेगळे फराळाचे जिन्नस काढायला सुरुवात केली.अनारसे,दोन तऱ्हेच्या करंज्या,पातळ पोह्यांचा चिवडा,भाजक्या पोह्यांचा चिवडा,रव्याचे लाडू, बेसन लाडू,चकली,शंकरपाळी,आणि खास बेळगावी चवडे असा फराळ होता.विशेष म्हणजे तो सर्व त्यांनी स्वत: केला होता.ते पाहून मी आवक झाले होते.पार्किन्सन्समुळे सतत कंप असताना इतक्या गोष्टी करायचा विचार तरी कसा येऊ शकतो? हे सर्व काढताना त्यांची त्या पदार्थांच्या कृतीबाबत अखंड कोमेंट्री चालू होती.त्यातून अनारस्याचे पीठही त्यांनी घरीच केले होते असे समजले. विशेष टीप म्हणता येतील अशा अनेक गोष्टी त्यांच्या बोलण्यातून  निघत होत्या.मी त्या लक्षात ठेऊन इतरानाही सांगायच्या असे ठरविले होते.पण माझ्या आता एकही लक्षात नाही.त्यांनाच पुन्हा  बोलते केले पाहिजे आणि त्यावेळी रेकॉर्ड केले पाहिजे असे मला वाटले.या सर्वाबरोबर त्यांनी तांदुळाची खीरही आणली होती.
              रंजनाला काही फराळ काढून ते देत होते तिचा उपवास होता त्यामुळे ती खाऊ शकणार नव्हती.मग लगेच ते म्हणाले.' मी साबुदाण्याची खिचडी आणलीय  ती खा. फणसपोळीही चालेल तुम्हाला.'
              रंजना भाकरी करायला लागल्यावर ते म्हणाले,'शेवटची भाकरी ठेवा मी करतो.' त्यांच्या भाकरी करण्याच्या कौशल्याचे रंजनालाही कौतुक आणि आश्चर्य वाटत होते. मी व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला.रंजना म्हणाली काकू मलाही व्हिडिओ पाठवा.सर्व कामात ते हक्काने मदत करत होते.
              जेवायला बसल्यावर त्यांनी तांदुळाची खीर घेण्याची आठवण केली.आमचे गप्पा मारत हसत खेळत जेवण झाले.बेळगावच्या गप्पा, त्यांचे सांगलीचे घर, त्यांच्या दिवंगत पत्नी लीनाच्या आठवणी,तिचे साहित्य प्रेम, तिला वेळोवेळी भेट दिलेली पुस्तके, त्यांची ३००० पुस्तकांची स्वत:ची लायब्ररी अशा कितीतरी गोष्टी ते सांगत होते.त्यांच्या गप्पातून त्यांनी गावोगावी खूप माणसे जोडली आहेत: लोकांच्या मदतील, धावून जाणे.खायला बनवणे आणि लोकांना खाऊ घालणे, सर्व सणसमारंभ यथासांग पार पाडणे. ही त्यांची आवड आहे हे माझ्या लक्षात आले.पार्किन्सन्समुळे या कशातही खंड पडला नव्हता.उलट पार्किन्सन्स आटोक्यात ठेवण्यात या बाबी उपयुक्तच ठरत होत्या.आपल्या मुलाला आईची उणीव भासू नये यावर त्यांचा कटाक्ष होता.
              थोड्या वेळात त्यांचा मुलगा संदीप न्यायला आला संदीप नाईक हा त्यांचा मानसपुत्र आहे हे त्यांच्याकडून समजले.इन्शुरन्स कंपनीत काम करणाऱ्या सलगर यांना तो गाडीचा इन्शुरन्स करायला आला असताना भेटला.पुण्यात नव्यानेच आलेले सलगर राहण्यासाठी जागा  मिळेपर्यंत जागा शोधत होते. संदीपच्या घराजवळ त्यांना जागा मिळाली.सरकारी जागा मिळाल्यावर सलगर नी त्यांना आपल्या घरीच राहायला बोलावले.त्याला वेळोवेळी मदतीचा हात दिला. आणि आता संदीप त्याना विविध कामात मदतीचा हात देत होता.त्यालाही सलगरच्या रूपाने परक्या गावात वडिलधारे माणूस मिळाले होते.विवाहानंतर तो आता दुसरीकडे राहत असला तरी डॉक्टरकडे नेणे आणणे इतर काही कामासाठीही तो सलगर यांच्याबरोबर असतोच. इन्शुरन्स मध्ये असलेल्या सलगर यांनीअसा भाविष्यकाळासाठी सामाजिक विमा पुरेसा उतरवलेला दिसतो.
             त्यांनी' मनाचा विमा' नावाचा लेख स्मरणिकेसाठी दिला होता. मनाचे ताजेपण टिकवण्याचे अनेक उपाय सांगितले होते.त्यांच्या थोड्यावेळच्या वावरातून हा ताजेपणा प्रत्यक्षातही ते टिकवून आहेत हे लक्षात आले.सलगर आनंद देणे आणि आनंद वाटणे हे असेच चालू राहूदे.  
               
             
          
           
             
. 

Friday, 1 November 2019

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४५

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४५
अंतर्बाह्य उजळू या..
दिवाळी संपली. फराळ करणे, फराळाची देवाणघेवाण, आकाश कंदिल, रांगोळ्या, पणत्या लावणे, भेटीगाठी, हसणेखिदळणे आणि फॉरवर्डेड का असेनात, पण मेसेजेस पाठवणे. परदेशातील नातेवाईक, सैन्यदलातील जवान ह्यांच्यापर्यंत आनंद पोहोचवण्याचाही आपण प्रयत्न केला. अगदी आनंदीआनंद.
हे सर्व ओसरताना गुरु ठाकूर ह्यांच्या कवितेतील,
'बाहेर आहे झगमगाट, उजळलाय सारा गाव,
आतल्या अंधाराचं काय, तेथे एक दिवा लाव'
ह्या ओळी मनात रेंगाळत राहिल्या.
थोडे आत डोकावूयात का?
पार्किन्सन्स शुभंकर आणि शुभार्थींचा विचार करताना मला जाणवले, दिवा लावण्यासाठी आपल्याला पणती किंवा निरांजन काहीतरी हवे. ते म्हणजे पार्किन्सन्सचा स्विकार. तो तर मंडळातल्या सर्वांकडे आहेच. असे मला तरी वाटते. नसेल, तर तो आधी मिळवायला हवा. डॉक्टरांचा सहानुभाव, शुभंकरांचे प्रेम, आधार, काळजी घेणे, हे सर्व दिव्यातील तेल. पार्किन्सन्सविषयीच्या यथार्थ माहितीची वात. आजारावर मात करून स्वतःचे जीवन उजळविणा-या अनेकांकडून स्फुल्लिंग घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचविणारे, आत्मविश्वास, दिलासा देणारे पार्किन्सन्स मित्रमंडळ हे काडीचे माध्यम असेल. ह्यामुळे आतला अंधार नक्कीच दूर होईल. सर्वांच्या एकत्रित प्रकाशात नवीन सामिल होणाराही सुरुवातीपासूनच प्रकाशित होईल.
आता पुढची पायरी.
आपलेच दुःख गोंजारत न रहाता, नेणिवेच्या दारावर, जाणिवेच्या पारावर, जेथे जेथे असेल वाव, तेथे एक दिवा लाव.
शब्दांकन - सई कोडोलीकर
https://www.parkinsonsmitra.org
https://parkinson-diary.blogspot.com/2019/08/blog-post.html

Monday, 21 October 2019

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४४

                                            पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४४
                              आज मतदानाचा दिवस.अनेक धडधाकट नागरिक मतदानासाठी गेले नाहीत पण आमचे अनेक शुभार्थी मात्र सकाळीसकाळीच मतदान करून आले.Whatsapp वर काहींनी फोटो पाठवले.त्यांचे कौतुक आमच्या गटापुरतेच मर्यादित न राहता सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी येथे शेअर करत आहे.
                              आमही मतदान केंद्रावर गेलो तर रांगेतील लोकांनी आम्हाला पुढे जाऊ दिले.आम्हाला ज्यांनी आपल्या गाडीतून नेले होते त्या संजीव आणि लीना शेठ यांचे मतदान होईपर्यंत थांबावे लागले तर माझ्या यजमानांना बसायला खुर्ची दिली.वसूमती देसाईलाही शशिकांत देसाई यांच्या बाबत असाच अनुभव आला.केंद्रावरील लोकांचे सहकार्य मिळाले.सर्वच शुभार्थीना मतदान केंद्रापर्यंत जाणे सोपे नव्हते.
                         अंजली महाजनचे. घर तिसऱ्या मजल्यावर आहे.केशवरावाना ऑन ऑफची समस्या आहे.ही समस्या म्हणजे औषधाचा परिणाम संपला की शरीर ताठर होऊन हालचाल करता येत नाही. पुन्हा दुसरा डोस घेऊन त्याचा परिणाम सुरु होईपर्यंत ती तशीच राहते. अंजली महाजनचा अनुभव तिच्याच शब्दात देत आहे.
                          ' मी रीक्षेने मतदान केंद्रावर नेले. सोबत मामा होते. १० वाजता सिंडोपा दिली १०.३०  वाजता आँनपिरियेड सुरू झाला मी रेडीच होते लगेच हळूहळू जिन्याने खाली उतरवले. रिक्षा गेट जवळ आणली  मतदान केंद्रात ११ वाजता पोहचलो पेशंट आहे विनंती केली  ११.१५ वा.आत सोडले माझे मतदान होई पर्यंत खुर्ची वर बसवले मी मतदान करून येईपर्यंत गोळीचा असर कमी झाला फ्रिजींग अवस्था झाली दोघांच्या मदतीने मतदान केंद्रातून बाहेर आणले व्हिलचेअर वर बसवून गेट पर्यंत येता यावे म्हणून अधीँ सिंडोपा दिली पाणी पाजले दहा मिनीटांनी रिक्षात बसवून जिन्या पर्यत आणले खुर्चीत दहा मिनीटे बसवून पुन्हा गोळीचा परिणाम झाल्यावर हळूहळू जिना चढवत वर आणले'.
                          इतका खटाटोप करावा लागणार हे अंजलीला आधीच माहित होते.तरी तिने केशवरावाना नेण्याचे आणि केशवरावांनी जाण्याचे धाडस केले.ब्युरोच्या मामांचेही कौतुक करायला हवे.
                           

Saturday, 19 October 2019

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४३

                       
                                      पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४३

                   
                        मी' रेडिएशनचा आनंददायी अनुभव.' हा लेख लिहिल्यावर अनेकांनी माझ्या सकारात्मकतेचे,कॅन्सर सारख्या आजाराला आनंदाने स्वीकारल्याबद्दलचे भरभरून कौतुक केले.याचे बरेचसे श्रेय  पार्किन्सन्स मित्रमंडळाला जाते.मंडळात सामील होण्यापूर्वीची मी आणि सामील झाल्यावरची मी यात महदंतर आहे.
                      पार्किन्सन्स मित्रमंडळात सामील झाल्यावर पार्किन्सन्ससह आनंदी राहण्याचा कानमंत्र मिळाला.आणि तो अनेकांना देण्याचा वसा आम्ही दोघांनी स्वीकारला. पार्किन्सन्ससह आनंदी जगणारे अनेक शुभार्थी आमचे रोल मॉडेल बनले .हे करता करता एक तप उलटलेले समजलेच नाही.आता कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायचे हा स्वभावच बनून गेला.
                     ,कॅन्सरचे निदान झाल्यावर आधीच पार्किन्सन्स आणि त्यात  कॅन्सर झालेले आणि या दोनही आजारावर यशस्वीपणे मात करून आनंदी जगणारे अनेक शुभार्थी आठवले.त्यांची सकारात्मकता आमच्यापर्यंत झिरापली होतीच.त्यांचा स्वीकार पाहता माझा आजार काहीच नव्हता.त्यांच्याबद्दल आजच्या गप्पात लिहित आहे.
                  डॉ.महादेव ठोंबरे हे कृषीतज्ज्ञ कृषीसंशोधनादरम्यान कीटकनाशकांच्या संपर्कात होते. त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता.संशोधनावरचे त्यांचे प्रेम मात्र कमी झाले नव्हते.मंडळात आले त्यावेळी त्यांचे बोलणे व्हिस्परींग सारखे होते. त्यातच पार्किन्सन्स झाला.८० वर्षाचे वय पण या सर्वांवर मात करून ते सभेला एकटे येत.इतरांना उपयोगी होतील असे उपचार,माहिती शेअर करत.बोलण्याची समस्या असतानाही फोन करून काहीना काही सुचवत.
                  शीलाताई कुलकर्णी आणि अनिल कुलकर्णी दोघा पती पत्नींना पार्किन्सन्स.त्यात शिलाताईंना कॅन्सर झाला.सर्दीखोकला व्हावा इतक्या सहजपणे त्यांनी हे स्वीकारले.चित्रकला,विणकाम,नृत्योपचार यात मन रमवले.सगळे छान चालू असता अनिल कुलकर्णी पडल्याचे निमित्त होऊन त्यांचे दुखणे वाढतच गेले.शिलाताईंना ते स्वत:पासून दूर जाऊ देत नसत.सहा महिने त्या खोलीतून बाहेरही पडल्या नाहीत. त्यातच अनिल कुलकर्णींचे निधन झाले.हे दु:ख पचवून त्या सभांना सहलीला येतच राहिल्या.क्षण भारावलेले या लेख मालेत मी त्यांच्याबद्दल लिहिले आहे त्याची लिंक सोबत देत आहे.
                    मिलिंद तेलंग हे  एका Architecture college चे प्रिन्सिपॉल होते.त्यांनाही  पार्किन्सन्स होता त्यात कॅन्सर झाला.हे दोन्ही आजार सांभाळत त्यांनी आपला कार्यकाल पुरा केला.ते  सभेला जेंव्हा यायचे तेंव्हा फोर व्हीलर चालवत यायचे.ते बासरी ,सिंथेसायझर अशी वाद्ये वाजवतात.२०१० सालच्या जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात त्यांनी बासरी वाजवली होती.आता निवृत्त झाल्यावर ते चिंचवडला राहायला गेले.ते अजूनही व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणून व्याख्याने देतात.नातवाबरोबर वाद्ये वाजवतात. कॅन्सरमधून बाहेर पडले आहेत परंतु  पार्किन्सन्स आहेच. त्याला त्यांनी व्यवस्थित सांभाळले आहे.
                  स्वमदत गटाची हीच तर खासियत आहे.'अवघे धरू सुपंथ' म्हणत आनंद देणे, आनंद घेणे हे दोन्ही चालूच राहते.
 
https://www.parkinsonsmitra.org/?p=2193
https://parkinson-diary.blogspot.com/2019/08/blog-post.html

Sunday, 13 October 2019

आठवणीतील शुभार्थी - यशवंत एकबोटे

                               आठवणीतील शुभार्थी  - यशवंत एकबोटे
               आज १४ ऑक्टोबर.शुभार्थी यशवंत एकबोटे यांचा वाढदिवस.माझ्या मुलीचा वाढदिवसही याच दिवशी असल्याने माझ्या लक्षात राहतो.आज त्यांची प्रकर्षाने आठवण येते कारण शुभेच्छा स्वीकारायला आज ते नाहीत.त्यांच्या प्रेरणादायी आठवणी मात्र भरपूर आहेत.३ ऑक्टोबर ला वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणी  जागवून आणि त्यांचे समृद्ध जीवन शुभंकर शुभार्थीपर्यंत पोचवून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहत आहे.
                              
   एकबोटे सभांना नियमित येत.त्यावेळी फारसा संवाद होत नसे परंतु सहलीमध्ये मात्र.संवादाला भरपूर वाव असायचा.सहलीत ते दमून कधी बसले नाहीत तर सर्व उपक्रमात सहभागी व्हायचे.आजूबाजूचा निसर्ग,व्यक्ती यांचे ते भरपूर फोटो काढायचे.फॉरेस्ट ऑफीसर पदावरून निवृत्त झालेल्या एकबोटे यांचे पर्यावरण,पाणी प्रश्न,निसर्ग,फोटोग्राफी हे जिव्हाळ्याचे विषय होते.त्यांचा जिव्हाळा कृतीशील होता.पाणी प्रश्नावर अण्णा हजारे, ज्ञानप्रबोधिनी यांच्याबरोबर काम केले होते. या विषयातील तज्ज्ञ म्हणून ते सल्ला मसलतही करत.पार्किन्सन्स मित्रमंडळाचा Whatsapp group सुरु झाल्यावर त्यांचा सातत्याने सहभाग असे.त्यांच्या आवडीच्या विषयावरील सुंदर फोटो आणि माहिती ते शेअर करत.लिहिणे फारसे शक्य नसल्याने त्यांचे अनुभव Voice message स्वरुपात त्यांनी सांगावेत असे आम्ही त्यांना नेहमी म्हणत असू. त्यांच्याशी गप्पा मारत त्याचा ऑडीओ करावा असाही विचार होता पण ते राहूनच गेले.
                               यशवंत एकबोटे यांना २००९ पासून पार्किन्सन्स होता. आपल्या व्याधीबद्दल विषाद न करता ते आनंदाने जगत होते सभेला ते एकटेच येत तेही चालत.सभेच्यावेळी फोटो काढणे,व्हिडीओ तयार करणे हे चालू असे.एप्रिल १४ सालच्या पार्किन्सन्स दिनाच्यावेळी शुभार्थीच्या नृत्याचा त्यांनी प्रेक्षकात बसून सुंदर व्हिडीओ तयार केला होता.वय आणि पार्किन्सन्स या दोन्हीवर मात करत उत्साहाने ते अनेक गोष्टी करत.
                               सभेत शेअरींगचे सेशन आहे आणि एकबोटेनी  उठून शेअरिंग केले नाही असे कधीच झाले नाही.त्यांच्या शेअरिंग मधून त्यांची सकारात्मकता पोचत असे.ते एकदा म्हणाले,टेबल साफ करणे, भांडी विसळणे, अशी घरातील कामे करतात.यातून समाधान मिळते.हाताला बोटांना व्यायाम होतो. तसेच पत्नीला मदत होते.पत्नीही ८० वर्षांची आहे.औषधे नियमित घेणे,व्यायाम,प्राणायाम करणे, २ किलोमीटर चालणे यामुळे पीडीला आटोक्यात ठेवणे सोपे होते. हल्ली काही दिवसात पार्किन्सन्स आणि वृद्धत्व यांनी शरीरावर परिणाम करायला सुरुवात केली होती. सहलीलाही ते मुलीला बरोबर घेऊन आले होते.
                           एका शेअरिंग मध्ये खुर्चीवरून उठताना, पायऱ्या चढताना त्रास होतो.मागे तोल जातो,गिळताना त्रास होतो.डोळ्यांना दोन दोन गोष्टी दिसतात.झोप येत नाही.या सर्वामुळे नैराश्य येते.अशा काही समस्या असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ.जावडेकर यांनी आपल्याला झोपेचा त्रास होता,तो झोपण्यापूर्वी काहीतरी क्लिष्ट वाचल्याने कमी झाला असे सांगितले.यावर डोळ्यामुळे वाचता येत नाही असे एकबोटे यांनी सांगताच मी त्याना ऑडीओ बुकचा पर्याय सुचविला.उतारवय आणि १० वर्षाचा पीडी असताना एकबोटे व्यवस्थित बोलू शकतात,चालू शकतात,स्मरणशक्ती चांगली आहे, सुसंबद्ध विचार करू शकतात,हेही खूप आहे, असे स्वत:ला समजावल्यास त्रास कमी वाटेल असे सुचविले.त्याना ते पटले. सभेला आल्याने नैराश्य कमी झाल्याचे ते म्हणाले शेवटी त्यांच्या काही समस्या असल्या तरी इतर शुभार्थीना मात्र या वयात ते इतक्या गोष्टी करतात याचे अप्रूपच वाटत होते.सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.
                          आजच्या सभेत वाढदिवस साजरा करून घ्यायला ते नसतील.त्यांचा उत्साही वावर त्यांचा हसतमुख चेहरा यांच्या  आठवणी  मात्र सर्वाना नेहमीच प्रेरणा देत राहतील.