पार्किन्सन्स विषयक गप्पा - ८९
दर वर्षी जागतिक पार्किन्सन दिन मेळाव्यात शुभार्थीच्या कलाकृतीचे प्रदर्शन हे आकर्षण असते.यातून अनेकांना प्रेरणा मिळते.२०२३ च्या प्रदर्शनात एक नवा प्रयोग झाला. शुभार्थी शैला भागवत यांनी प्रदर्शनात काचेच्या बाटल्या पेंटिंग करून ठेवल्या होत्या.या बाटल्या विकून त्यातून आलेले पैसे त्या मंडळाला देणगी देणार होत्या.हे सर्व करताना विक्रीची व्यवस्था त्यांनीच केली होती.बाटल्यांवर दर लावून ठेवले होते.त्यांचा stall सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.बाटल्या विकून मंडळाला त्यांनी साडेसात हजार मिळवून दिले.पार्किन्सनची खोड मोडत केलेली ही स्वकष्टार्जित कमाई देताना मिळालेल्या आनंदाची जातकुळी वेगळीच असते.
या शिवाय कार्यकारिणीच्या सर्वाना धन्यवाद देणारी वारली पेंटिंग केलेली कोस्टर दिली.२०२२ च्या ऑनलाईन मेळाव्यातही त्यांनी वारली पेंटिंग ठेवली होती.माझ्या घरी आल्या त्यावेळीही त्यांनी अशी कोस्टर दिली होती.आमच्या बाहेरच्या हॉलमध्ये ती ठेवली आहेत. येणारे जाणारे त्याबद्दल विचारतात तेंव्हा शैलाताई आजाराला सांभाळत काय काय करतात याचे तोंडभरून कौतुक सांगताना मलाच कृतकृत्य झाल्यासारखे वाटते
हे सर्व करताना त्यांना कष्ट पडलेच शिवाय डिसेंबरपासूनच कामाल सुरुवात केली. त्यांनी याचे कोठेही शिक्षण घेतले नव्हते, युट्युबवर पाहून,अनुभवातून शिकत हे केले.एप्रिलमध्ये असलेल्या प्रदर्शनासाठी त्यांनी डिसेंबरपासून कामाला सुरुवात केली.हे काम आनंद देणारे असले तरी किचकट आणि वेळखाऊ आहे.पार्किन्सन शुभार्थी साठी तरी काठीण्य पातळी अधिकच वाढणारी.एखादे उद्दिष्ट ठेवून काम केले की ते तडीला नेले जाते.अशा मताच्या शैलाताई असल्याने त्यांनी ३० बाटल्या करण्याचे उद्दिष्ट ठेवले 'सुख म्हणजे नक्की काय असत' याची समज असलेले जीवनसाथी शशिकांत मदतीला तत्परच होते.या बाटल्या साबणाच्या पाण्यात ५/६ दिवस भिजवून ठेवाव्या लागतात.साफ करायला लागतात. हे जिकीरीचे काम ते करत.मुळात कोणी आपल्याबरोबर आहे ही भावनाच बळ देणारी.
सुरुवातीला टोमॅटो केचपच्या बाटल्यांवर ट्रायल घेतली. ओळखीतल्यानी,नातेवाईकांनी भरपूर बाटल्या आणून दिल्या.अक्रेलिक,ग्लासपेंट यांचा वापर केला.रंग पातळ असतो वाळायला दीड तास तरी लागतो.तोवर पुढचे काम होत नाही.त्या साधारणपणे संध्याकाळी आणि रात्री दहानंतर हे काम हातात घेत.यावेळी काहीतरी लेक्चर लावायचे.कधी श्लोक,कधी गाणी म्हणत हे काम करायचे एक प्रकारचे मेडीटेशनच व्हायचे.कधी मनाशी डिझाईन ठरवलेले असायचे.कधी गुगलवर पहायचे.बाटलीवरील काही झाकायचे असल्यास त्यानुसार डिझाईन मध्ये बदलही करावे लागत.काही बाटल्यात आत लाईट लागेल असेही केले.
मेळाव्याचा दिवस येईपर्यंत उद्दिष्ट पूर्ण झाले.आता प्रदर्शनाच्या ठिकाणी ते हळुवारपणे न्यायचे होते.बाटल्या मांडणे विक्रीसाठी कोणीतरी सर्व वेळ असणे या सर्वाचे त्यांनी उत्तम नियोजन केले होते.त्यादिवशी पंधरा बाटल्या गेल्या.नंतरही अनेकांनी मागितल्या.हृशिकेशच्या बॉक्स येथे झालेल्या कार्यक्रमात मंडळातर्फे भेट दिल्या.दिवाळीत भेटवस्तू देण्यासाठी बाटल्या केल्या.आणखी एका संस्थेलाही बाटल्या विकून त्यांनी मोठ्ठी देणगी दिली.'हा छंद जीवाला लावी पिसे' अशी त्यांची अवस्था झाली आहे. २०२४ च्या मेळाव्यासाठी बाटल्या असतीलच. शिवाय नव्या जोमाने वेगळी कलाकृती घेऊन त्या येत आहेत.त्यांच्या जिद्दीला कल्पकतेला कष्टाला,नियोजनाला सलाम.
२०२४ च्या मेळाव्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन शुभार्थीनो तुम्हीही लागा कामाला.