पार्किन्सन विषयक गप्पा ८७
नानावटी हॉस्पिटलचा पार्किन्सन पेशंट साठी अपोमोर्फिन उपचार पद्धतीचा व्हिडीओ वृद्धांचे पालकत्व ग्रुपवर आला होता हा व्हिडीओ चार वर्षापूर्वी व्हायरल झाला होता.पार्किन्सनमित्रमंडळाच्या ग्रुपवरही तो आला. त्याबाबतच्या सत्यासत्यतेबाबत त्यावेळी उलट सुलट चर्चा खूप झाली.मेडिकल कम्युनिटी कडून अशा मिसलीडिंग व्हिडीओ टाकण्याबाबत विरोध झाला.PDMDS ( Parkinson movement and disorder society) ने पत्रक काढून सावधगिरीची सूचना दिली. ती सोबत देत आहे. तरी ही तो अधून मधून अनेकांच्या कडून अजूनही येतच असतो.या ग्रुपवर अनेक सभासद असल्याने या उपचार पद्धतीच्या मर्यादा येथे सांगितल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकेल म्हणून हा लेखन प्रपंच.
या आजाराने गांजलेल्या पेशंटना निट चालता न येणारी व्यक्ती एक इंजक्शन दिल्यावर निट चालू शकते व्यायाम करू शकते हे पाहून दिलासा मिळणे साहजिक होते.आणि सांगणारेही इंग्लंड आणि भारतातले प्रतिथयश डॉक्टर होते.काही पेशंटनी हॉस्पिटलला संपर्क करून विचारणा केली असता त्यांची सर्व माहिती विचारून घेऊन हे त्यांच्यासाठी नाही प्रगत स्टेजच्या पेशंटला उपयुक्त आहे असे सांगितले.एका प्रगत स्टेजच्या पेशंटला याचा उपयोग पाच सहा तासासाठीच आहे आणि सर्व प्रोसिजरचा खर्च तीस पस्तीस हजार आहे असे सांगण्यात आले.शिवाय पेशंटची तपासणी केल्यावरच इंजक्शन द्यायचे किंवा नाही हे ठरविले जाते असे सांगण्यात आले.थोडक्यात व्हिडीओ जेवढा मिसलीडिंग होता तशी हॉस्पिटलमधून दिली जाणारी माहिती मिसलीडिंग नव्हती.
यानंतर न्यूरॉलॉजिस्टना माहिती विचारली असता एका प्रतिथयश न्यूरॉलॉजिस्टनी दिलेल्या माहितीने बऱ्याच शंकांचे निरसन झाले.इंग्लंड अमेरिकेत अनेक वर्षापूर्वी याचा उपयोग केला गेला.या न्यूरॉलोजिस्टनी ही १९९० मध्ये ते दिले होते.परंतु याचा उपयोग अत्यंत मर्यादित राहिला.पार्किन्सन्सच्या अगदी पुढच्या स्टेजमध्ये असताना अत्यंत क्रिटीकल परिस्थितीत तात्पुरता त्याचा उपयोग होऊ शकतो.याचा परिणाम २/३ तासापुरताच राहतो.साईड इफेक्ट्सही आहेत असे सांगण्यात आले.आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार १५००० ते ३५०००रु. इतका खर्च एका वेळचा असतो.त्यामुळे ही उपचार पद्धती अत्यंत खर्चिक आहे.व्यवहार्य अजिबातच नाही.
थोडक्यात व्हिडीओ फेक म्हणता येत नाही आणि संपूर्ण वास्तव दाखवणाराही नाही. पार्किन्सन्स पुढच्या स्टेजमध्ये गेल्यास हालचाली अजिबात करता
येत नाहीत.अशा वेळी अत्यंत महत्वाच्या समारंभास हजर राहायचे आहे.अत्यंत क्रिटिकल परिस्थिती आहे तर
तात्पुरते हे घेता येईल.आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यास कोणी घेऊही शकेल. पार्किन्सन्स बरा करण्यास त्याचा उपयोग
निश्चित नाही.आणि ते सहजासहजी उपलब्धही होणार नाही हेही तेवढेच खरे आहे.आपल्या न्यूरॉलॉजिस्टच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मानाने कोणतेही उपचार अजिबात करू नयेत हा प्रेमाचा सल्ला.