क्षण भारावलेले - २४
१२ जुलै १५ ला अश्विनी हॉल मध्ये नेहमीप्रमाणे मासिक सभा होती.न्यूरॉलॉजिस्ट राहुल कुलकर्णी यांचे व्याख्यान होते. त्यांना व्याख्यानाला बोलावण्यासाठी शेंडे साहेबांची कितीतरी दिवस खटपट चालली होती.हल्ली शेंडे साहेबांचा ऑफ पिरिएड वाढला होता.तरीही ऑन पिरिएड मध्ये ते मंडळासाठी काहीना काही करत असतच.त्यातीलच ही एक खटपट.
एकीकडे राहुल कुलकर्णी येणार याचा आनंद होता.पण त्याला दु;खाची झालर होती.ज्यांनी ही खटपट केली ते शेंडे साहेब आम्हाला सोडून गेले होते.त्याना जाऊन एक महिनाही झाला नव्हता.'शो मस्ट गो ऑन' म्हणून सभा तर होणारच होती.शेंडे साहेब कितीदा तरी पडायचे.खोक पडलेली असायची स्वत:च डॉक्टरकडे जाऊन ड्रेसिंग करून घ्यायचे आणि लगेच सभेला यायचे.त्यांचा हा वसा आम्हाला चालवायचा होता.
मी श्यामलाताईना फोन करून सभेल येताय ना असे बिचकतच विचारले होते. 'बघू' असे त्या म्हणल्या होत्या. त्यांनी यायलाच हवे अशी अपेक्षाही नव्हती.अजुन भेटायला लोक येतच होते.श्यामलाताई मंडळाच्या कामात आता सहभागी होतील का? अशी मनात शंकेची पाल चुकचुकत होती.त्या सुरुवातीपासून म्हणायच्या मला असा सोशल वर्कमध्ये रस नाही.ह्यांच्यासाठी मी सहभागी होते.श्यामाताईंच्या असण्याची आता इतकी सवय झाली होती की त्या नसणार ही कल्पनाही करवत नव्हती.वेळोवेळी त्यांच्या अनुभवाचा,शुभंकर म्हणून शुभार्थीला हाताळण्याच्या कौशल्याचा आम्हाला आधार होता.
शेंडे साहेब गेले त्या दिवसाचे स्मरण अजूनही ताजे होते.दुपारी श्यामाताईंचा फोन आला तर कामाचेच काहीतरी बोलायला फोन केला असेल असे वाटले.फोनवर शेंडेसाहेब गेले असे ऐकले आणि आपल्याला चुकीचे तर ऐकू आले नाही न असे वाटले कारण दोन तीन आठवड्यापूर्वीच २१ मेला शेंडे साहेबांचा वाढदिवस साजरा करयला गेलेल्यावेळी ते अगदी छान होते.
दीपा, अंजली आमचा नातू आर्य आणि आम्ही दोघे त्यांचा वाढदिवस साजरा करायला त्यांच्या घरी गेलो होतो. ते खूप खुश होते.घरी कोणी आले की त्यांना नेहमीच आवडे.त्यांचा ऑन पिरिएड चालू होता.पार्किन्सन गायब झाला होता.त्यामुळे श्यामाताईंचा फोन आल्यावर माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता.मी आणखी कोणी आहे का असे धीर करून विचारले.श्यामाताई घरी एकट्याच होत्या.
मी अंजलीला फोन केला आम्ही जवळ असल्याने लगेच त्यांच्या घरी गेलो.त्यांनी पहिला प्रश्न विचारला तीर्थळींच्या कडे कोण आहे? ते एकटेच आहेत ते राहू शकतील असे मी सांगितले.त्यावर त्या म्हणाल्या.त्यांच्या नात्यातले कोणीतरी गेले. शेंडे साहेब असेच म्हणाले मी राहतो तु जा.पण घरी आले तर यांना खूप त्रास झाला.त्यामुळे तुम्ही आधी घरी जा.खर तर बऱ्याच पार्किन्सन झालेल्या व्यक्तींच्या दु;खद घटना घडली की भावना अनावर होतात त्यामुळे पार्किन्सनही वाढतो हे मी पहिले होते.तीर्थळींच्याबाबतही असे होते पण मला त्यावेळी ते लक्षात आले नाही.श्यामाताईंना मात्र अश अवस्थेतही या गोष्टीचे भान होते.
मला मात्र घरी जाववत नव्हते.मी आमच्या जवळ राहणाऱ्या प्रकाश जोशीना फोन करून आमच्या घरी जायला सांगितले.मी घरी गेले तर जोशी म्हणाले,मी आलो बरे झाले त्यांना दु;ख अनावर झाले होते.कोणीतरी जवळ हवे होते.तीर्थळींना शेंडेसाहेब मोठ्या भावासारखे होते.अजूनही त्यांचा विषय निघाला की ते गहिवरतात.
एवढ्या कठीण प्रसंगातही श्यामलाताईना मला हे सांगायचे सुचले याचे मला आश्चर्य वाटले.हळूहळू त्यांचे नातेवायिक आले.शेजारी आलेच होते.देहदान करायचे असल्याने हॉस्पिटलला फोन करणे चालू होते.तरीही त्या मधूनमधून मला घरी जा सांगत होत्या.या सर्व परीस्थितीत श्यामलाताईच्या संयतपणे निर्णय घेण्याच्या क्षमतेला मी मनातल्या मनात सलाम केला.
अश्विनिमध्ये सभेची तयारी चालली होती.खुर्च्या मांडल्या जात होत्या.माझे लक्ष मात्र श्यामलाताई येतात का यावर होते.त्या आल्या.आणि मी लांबूनच मनातल्या मनात घट्ट मिठी मारली.त्यांनी कितीही मला या कामाची आवड नाही म्हटले तरी त्या मंडळाच्या कामात मनोमन गुरफटल्या होत्या.आता आमचा एक परिवार झाला होता.हे काम आता घरचेच होते.कामाचा व्याप वाढत होता.शेंडे साहेबांचे ट्रस्ट व्हावा हे स्वप्न प्रत्यक्षात आले.शरच्चंद्र पटवर्धन यांनी ट्रस्ट मध्ये येण्यात रस नाही असे सांगितले होते.एकमुखाने अध्यक्ष म्हणून श्यामलाताईच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
त्यांचा आदर्श पुढे ठेवून आपल्या शुभार्थीच्या नसण्यानंतरही अंजली,मृदुला,आशा,सविता या ट्रस्टच्या कार्यात आमच्याबरोबर आहेत.नाशिकहून रमेशभाऊ तिळवे,उषाताई,विजयाताई दिवाणे,बेळगावच्या आशाताई नाडकर्णी,मनीषाताई लिमये,नाशिकहून संगीता आगाशे,मुंबईहून अनुराधा गोखले अशा यांनीही ग्रुप सोडला नाही.विविध कामात मदतीचा हात पुढे केला.अनेक कुटुंबीय पार्किन्सन झालेल्यांपर्यंत मंडळाची माहिती पोचवणे,देणगी देणे असे हस्ते परहस्ते काहीना काही करताच असतात.श्यामाताईंनी त्यांच्याही नकळत असे धडे घालून दिले आहेत.
श्यामलाताईच्या येण्याचा त्यादिवशीचा क्षण आणि त्याचे भारावलेपण माझ्या मनात अजूनही कोरले गेलेले आहे.२५ जुलैला त्यांच्या गप्पांच्या कार्यक्रमात काही आठवणी सांगायच्या राहिल्या त्यातील ही एक. 'आमच्या आधारस्तंभ श्यामलाताई शेंडे' या त्यांच्यावर लीहिलेल्या लेखाची लिंक सोबत जोडत आहे.त्यातून त्यांची नेमकी ओळख होईल.
https://parkinson-diary.blogspot.com/2021/10/blog-post.html