काही व्यक्तींच्या आस्तित्वाने वातावरणात चैतन्य निर्माण होते. भोवतालच्या सर्वाना सकारात्मक उर्जा मिळते. डॉक्टर अनिल अवचट म्हणजे बाबा यांपैकी एक.अशी उर्जा त्यांच्या पुस्तकातून मिळाली होतीच.टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या दूरस्थ विद्यार्थ्यांचा १९९०च्या सुमारास स्नेहमेळावा होता.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते.ती त्यांच्याशी पहिली प्रत्यक्ष भेट.त्यांची ओळख मीच करून दिली होती.खेड्यापाड्यातून आलेल्या आमच्या विद्यार्थ्याना त्यांच्या भेटीचेच अप्रूप होते.त्यांच्या व्याख्यानाने ते भाराऊन गेले.पुढील काळात डॉ.अनिल अवचटपासून बाबा म्हणण्यापर्यंत ते जवळ येतील असे वाटलेच नव्हते.याचे श्रेय आमच्या पार्किन्सन मित्राला.
सर्व स्वमदत गटाना एकत्रित करणाऱ्या 'सेतू' या संस्थेद्वारे बाबांच्या मुली मुक्ता आणि यशोदा प्रथम संपर्कात आल्या.आणि तेथील इतरांप्रमाणे डॉ.अवचट आमच्यासाठी बाबा झाले.
मी व्याख्यान देणार नाही हे बाबानी सांगितल होत. आम्हालाही व्याख्यान नकोच होत. मला न्यायला यायची गरज नाही, असही सांगितल होत. ओरिगामीसाठी लागणारे कागद तेच आणणार होते. वेळेपुर्वीच ते आले. बरोबर एक सहाय्यकही होता. आल्या आल्या त्यानी आम्ही केलेली रचना बदलली. टेबल आणि त्याभोवती पार्किन्सन्स शुभार्थी बसतील अशी रचना केली. कारण टेबलवर कागद ठेउन काम करणे सोपे होणार होते. निमंत्रित पाहुणेपण गुंडाळून स्वतःही ते या कामात सहभागी झाले.
कृतीनुसार वेगवेगळ्या आकाराचे कागद त्यानी कापुन आणले होते. अरुंद लांबट पट्ट्या,लांबट चौकोनी, चौरस, वृत्तपत्राचे पूर्ण पान अशी विविधता त्यात होती.
आणि प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाला.कार्यक्रमाच्या सुरुवतीलाच, बाबांच्या चेह-यावरच्या; ह्या अतिशय प्रेमळ हास्याने सा-यांना आपलेसे केले आणि ओरिगामी मध्ये रंगवून टाकले. सा-यांची लगबग सुरू झाली. एकमेकांना मदत करत, बाबांची मद्त घेत सारे रंगून गेले.भिरभिर,मासा,फुलपाखरु,विमान्,ससा,बेडुक अशा वस्तु बनु लागल्या.कित्ती सोप्प असा काहिंच्या चेहर्यावर भाव, तर कोणी आपल विमान उडत नाही म्हणुन हिरमुसलेले.बाबा लगेच तिथ जाउन नेमक काय चुकले सांगत होते.अनेक्जण माझ्याकडे या म्हणुन बोलवत होते बाबाही तत्परतेने जात होते.शिकणारे आणि शिकवणारे सर्वच वय विसरुन लहान मुल झालेले.
आता सर्वांच्या टेबलवर वर्तमानपत्राचा मोठा कागद आला.त्याची गांधी टोपी बनवण्यात आली आता सर्वजण तयार झाले होते थरथरणारे हात स्थिर झाले होते.ताठरलेल्या स्नायुत जान आली होती भावविहिन चेहर्यावर भाव उमटु लागले सर्वाना सहज टोपी बनवता आली.
आपल्याच डोक्यावर टोपी घालून घेण्यासाठी सारे चपळ बनले.
गांधीटोपीनंतर मुगुट.आता टोप्या काढुन मुगुट घालण सुरु झाल.
इतकेच नव्हे तर तयार केलेले मुगुट घालून प्रत्येक जण माझा पण फोटो काढा म्हणत होते. बाबांप्रमाणे फोटो काढणारी मीही आता डिमांडमधे होते.पण माझाच फोटो काढण्याचा वेग कमी पडत होता.
शेवटी बाबानी स्वतः करुन आणलेल्या अनेक कलाकृती दाखवल्या.
सर्वानी आपण केलेल्या वस्तु स्वतःच्याच केलेल्या टोपीत भरल्या.मुलाना नातवंडाना दाखवायला.माझ्या मनात ती सुरेख संध्याकाळ अजुनही रेंगाळतेय. मला खात्री आहे सर्व शुभंकर आणि शुभार्थींच्याहि मनात रेंगाळत असणार.
मी या सर्वाच सुरुवातीपासुन व्हीडिओ शुटींग करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या आणि माझ्या कॅमेराच्या मर्यादामुळे ते निट होउ शकल नाही.माझ्या मनःपटलावर मात्र हे सर्व कोरल गेल.
.