सोमवार दि. २० सप्टेंबर २०२१ - आपल्या फुलराणी शुभार्थी गीता पुरंदरे यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम झाला.प्रश्नोत्तरे स्वरूपाचा हा कार्यक्रम होता.त्यांचे यामागचे कष्ट,समरसता,सातत्य पाहून सर्व भारावून गेले..त्यांच्या विविध पुष्परचना यावेळी अतुल ठाकूर यांनी स्क्रीनवर शेअर केल्या.प्रत्यक्ष पुष्परचना करतानाचा व्हिडीओही दाखविला.
सोमवार दि. २७ सप्टेंबर २०२१ - पार्किन्सन मित्रमंडळाच्या कार्यवाह आणि शुभंकर अशा रेवणकर यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम झाला.शुभंकर म्हणून त्याना आलेल्या अडचणी आणि त्यांनी त्यातून धैर्याने काढलेले मार्ग,याचा त्यांनी घेतलेला आढावा सर्वांची मने हेलावून गेला.आपल्या अडचणी दु;खे यापुढे काहीच नाहीत ही सर्वांची भावना झाली.
मंगळवार दि. १९ ऑक्टोबर २०२१ - कोजागिरी निमित्त शुभार्थी उल्हास गोगटे यांची मुलाखत डॉ.शोभना तीर्थळी यांनी घेतली..उल्हास गोगटे म्हणजे बाबांची मानसकन्या आणि त्यांच्या आठवणीची पानगळ पुस्तकाची प्रकाशिका त्रिवेणी कुलकर्णी.आणि मुलगा अमर ही यावेळी उपस्थित होते.एक आदर्श शुभंकर आणि जिंदादिल बाबा ८९ व्या वर्षीही दु;खावर संकटांवर मत करून आनंदाने जगात आहेत .त्यांचा जीवनपट थक्क करणारा आणि प्रेरणादायी ठरला.त्यांच्या काही कविता त्रिवेणीनी वाचून दाखवल्या.त्यांच्या विविध छंदांचे फोटो योग्यवेळी अतुलनी टाकल्याने कार्यक्रमाची रंगत वाढली.
सोमवार दि. २२ नोव्हेंबर २०२१ -शुभंकर जोत्स्ना पुजारी यांनी आपले अनुभव सांगितले.बाराक्षाराबाद्द्ल माहिती सांगितली शुभार्थी दिनेश पुजारी यांच्यासाठी त्या वेळोवेळी बराक्षाराचा उपयोग करतात त्यांचा याबाबतचा अनुभव चांगला आहे.
सोमवार दि. २० डिसेंबर २०२१ -भाषातज्ज्ञ,बहुभाषा अभ्यासक शुभार्थी अविनाश बिनीवाले डी.लिट. यांनी शब्द कोश या विषयावर व्याख्यान दिले.त्याना मुंबई विद्यापीठाने डी.लिट.दिली त्याबद्दल पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे मानपत्र देण्यात आले .मानपत्राचे लेखन प्रा. मृदुला कर्णी यांनी केले.
सोमवार दि. २७ डिसेंबर २०२१ - शुभार्थी विनोद भट्टे यांचे अनुभव कथन झाले.त्यांच्या पत्नीला अल्झायमर झाल्यावर त्यांनी शुभंकर म्हणून उत्तम साथ दिली.आता त्यांना पार्किन्सन्स झाल्यावर ते स्वत:च स्वत:चे शुभंकर आहेत.त्यांनी फोटोग्राफी,पेंटिंग,चारोळ्या लेखन असे छंद जोपासले आहेत.
सोमवार दि.१७ जानेवारी २०२२ - अनुश्री,ओंकार, हृशीकेश या भावंडानी शुभंकर म्हणून आपले अनुभव कथन केले.शुभार्थी अश्विनी दोडवाड या त्यांच्या मातुश्री आहेत.ओंकार इंग्लंडहून तर अनुष्का, हृशीकेश पुण्यातून बोलले.तिघांनी छान समन्वय साधत आपले अनुभव सांगितले.प्रत्यक्ष आपली शुभंकराची भूमिका बजावतानाही त्यांच्यात समन्वय आहे.
सोमवार दि.३१ जानेवारी २०२२ - शुभंकर अंजली महाजन यांचे त्यांच्या रक्तदानाच्या अनुभवावर व्य्ख्यान झाले.त्यांचा रक्तगट ओ आरएच निगेटिव्ह आहे हा दुर्मिळ आहे आणि ऐनवेळी रक्त द्यावे लागते.त्यांनी २२ वेळा बोलावणे आल्यावर हातातले काम टाकून रक्तदान केले.त्यांनी आपल्या अनुभवाबरोबर रक्तदाना विषयीही माहिती दिली.आशा रेवणकर यांनी त्यांची ओळख करून दिली.
सोमवार दि.२८ फेब्रुवारी २०२२ - समुपदेशक आणि शुभंकर अस्मिता कुलकर्णी यांनी 'एक समुपदेशक शुभंकराच्या भूमिकेतून' या विषयावर व्याख्यान दिले.आपल्या पतीचा पार्किन्सन हाताळताना समुपदेशक असल्याने आपल्या पतीचा पार्किन्सन हाताळणे आणि त्यांची मानसिक अवस्था सांभाळणे त्या चांगल्या प्रकारे करूशकतात.हे करताना शुभांकराने स्वत:चे स्वास्थ्य सांभाळणे आणि स्वत:ला वेळ देणे गरजेचे आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.मृदुला कर्णी यांनी त्यांची ओळख करून दिली.
सोमवार दि.२८मार्च २०२२ - माधुरी पेठे यांनी 'बारा क्षाराची तोंडओळख' या विषयावर व्याख्यान दिले.यामागचा सिद्धांत त्यांनी अतिशय सोप्या भाषेत सांगितला.विषय समजून घेतला तर घरच्याघरी विविध शरीरिक तक्रारीवर आणि जाराव्र आपण याचा उपयोग करून घेऊ शकतो.
रविवार दि.२४ एप्रिल २०२२ - आपल्या सर्वांचे लाडके नृत्यगुरू हृषीकेश पवार यांची मुलाखत डॉ.शोभना तीर्थळी यांनी घेतली. त्यांचा स्वत:चा नृत्यप्रवास,पर्किन्सन्स मित्रमंडळाचे भेट, शुभार्थीना १२ वर्षे मोफत शिकवताना आलेले अनुभव,मिळालेला आनंद यावर सविस्तर उत्तरे दिली.अनेकाना मुलाखत ऐकून नृत्यवर्गास प्रवेश घ्यावा असे वाटले.
सोमवार दि.२ में २०२२ - शुभार्थी डॉ.अविनाश धर्माधिकारी आणि शुभंकर डॉ.अमिता धर्माधिकारी यांनी 'तणाव कमी होण्याचा गर्भ संभवतेवर सुपरिणाम' या विषयावर विविध आकडेवारीच्या तक्त्यासह व्याख्यान दिले.धर्माधिकारी पती पत्नी लोणावळ्याच्या मन:शक्ती केंद्रातील या प्रकल्पातील सांखीकीय विश्लेषणासाठी मदत करतात,
सोमवार दि.७ जून २०२२ - एस.व्यास योग युनिव्हर्सिटी बंगलोर येथील सिनिअर योग थेरपिस्ट परमेश्वर सोम यांनी 'पार्किन्सनसाठी उपयुक्त योगासने' या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले.सर्वाना ती उपयुक्त वाटली.त्यांनी ज्यांना इच्छा आहे त्याना ऑनलाइन शिकवण्याची तयारी दर्शवली.
सोमवार दि.२७ जून २०२२ - शुभार्थी शैला भागवत यांनी कोविदनंतर भर उन्हाळ्यात केलेला प्रवास त्यासाठी केलेली पूर्व तयारी आणि प्रवासाची आनंददायी पूर्तता याबाबतचे अनुभव सांगितले.गप्पात त्यांचे पती शशी भागवत ही सह्भागी झाले.त्यांचे अनुभव खूपच प्रेरणादायी होते.
मंगळवार दि.१९ जुलै २०२२ - शुभार्थी गौरी इनामदार यांनी पार्किन्सन बरोबर माझा प्रवास या विषयावर संवाद साधला.वेगवेगळी वळणे घेत चाललेला त्यांचा प्रवास नैराश्यातून साकारात्म्क्तेकडे कसे जाता येते याचा वस्तुपाठच होता.
मंगळवार दि.२३ ऑगस्ट २०२२ - शुभंकर शोभना तीर्थळी यांनी 'शुभंकराची भूमिका' या विषयावर आपले विचार मांडले.काळजीवाहकासाठी शुभंकर शब्द वापरण्याची सुरुवात,या शब्दाचा अर्थ,व्याप्ती याबद्दल माहिती सांगितली.शुभंकराच्या विविध परिघातील शुभार्थीबरोबर सदैव असणार्या शुभंकरांनी कोणत्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात यावर प्रकाश टाकला.
मंगळवार
दि.२० सप्टेंबर २०२२ - आपले शुभार्थी,
ज्येष्ठ भाषातज्ञ आणि शब्दकोशतज्ज्ञ डाॅ. अविनाश बिनीवाले सर, यांनी
"आपणही मोठी कामे करू शकतो" या विषयावर मार्गदर्शन केले. शब्द कोश क्षेत्रात कोणती कामे होण्याची गरज आहे याबद्दल त्यांनी आपले मौलिक विचार मांडले.व्याख्यानानंतर लगेचच काहींनी यातील काही कामे करण्याची तयारी दर्शवली.
सोमवार दि.२६ सप्टेंबर२०२२ - हरहुन्नरी शुभार्थी विश्वनाथ भिडे आणि अंजली भिडे यांनी यांनी सर्वांशी संवाद साधला.आजाराची स्वीकृती आणि घरातील पोषक वातावरण यामुळे अजारासह आनंदी जीवन जगता येते. याचा वस्तुपाठ म्हणजे विश्वनाथ भिडे आणि अंजली भिडे यांचे सहजीवन असे म्हणता येईल.
मंगळावर दि.२२ डिसेंबर २०२२ - शुभंकर अंजली भिडे आणि त्यांच्या सहकार्यांनी विविध गुणदर्शनाचा 'सुगंधी गजरा' सादर केला.नाट्य संगीत, भावगीते,जुनी सिने गीते अशी विविधता यात होती.याशिवाय शिटीवरील गाणी ,माउथ ऑर्गन यांनीही कार्यक्रमाची रंगत वाढवली.
मंगळवार दिनांक २७ डिसेंबर २०२२ - रोजी, शुभंकर श्री
विलास गिजरे, यांनी "नर्मदा परिक्रमा अनुभव...एक संधी स्वओळख आणि
स्वसुधारणेची " या विषयावर आपले अनुभव कथन केले.मनाचा निर्धार,कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळू न देणे,जुळवून घेणे असे गिजर यांचे अनेक गुण परिक्रमेत उजळून निघाले.
मंगळवार ३ जानेवारी २०२३ - डॉक्टर अविनाश बिनीवाले यांनी 'नर्मदा परिक्रमा दुसरी बाजू' सांगितली. "नर्मदा
परीक्रमा " हा आपल्या अनेकांच्या उत्सुकतेचा विषय असतो.यामुळेच जेव्हा
बिनिवाले सरांकडे सुध्दा नर्मदा परीक्रमेबद्दल माहीती आहे, असे कळले
तेव्हा अनेकांनी ते ऐकूया अशी इच्छा व्यक्त केली .त्याची नोंद घेऊन
आयोजित केला होता.शिक्षण, भाषा शास्त्र या अंगाने तेथील परिस्थितीचा,समाजाचा बिनीवाले यांनी शोध घेतला.
मंगळवार २४ जानेवारी २०२३ - शुभार्थी रेखा आचार्य यांच्याशी शोभना तीर्थळी आणि रेखा आचार्य यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या.वाढलेल्या पार्किन्सनची तमा न बाळगता जीवनातील अनेक अंगांचा आस्वाद घेण्याची त्यांची वृत्ती सर्वाना प्रेरणा देवून गेली.शरीर साथ देत नसताही केलेल्या विविध पाककृतीही थक्क करून गेल्या
मंगळवार २८ फेब्रुवारी २०२३ - शुभार्थी उमेश सलगर यांनी गोवा पर्पल फेस्टिवल २०२३ मध्ये पार्किन्सन मित्रमंडळाचे ब्रॅंड अँबेसडर म्हणून प्रतिनिधित्व केले.ही दिव्यांगांची राष्ट्रीय परिषद होती.ही परिषद त्यांनी गाजवली.त्यांचे तेथील अनुभव त्या फेस्टिवल मधून मिळालेली प्रेरणा, संस्थेचे प्रतिनिधित्व केल्याने वाढलेली जबाबदारी या सर्वांचे विवेचन केले.त्यांच्या कामगिरीमुळे सर्वांच्याच मनात अभिमानाची भावना निर्माण झाली.
मंगळवार २५ एप्रिल २०२३ - प्रवास भाषा निर्मितीचा या विषयावर डॉ,अविनाश बिनीवाले यांचे रंजक आणि माहितीपूर्ण व्याख्यान झाले.अनेकांच्या प्रश्नांना त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली.यानंतर किरण सरदेशपांडे,अविनाश धर्माधिकारी आणि सुनील कर्वे यांनी पार्किन्सन्समुळे बोलण्यावर परिणाम झाला असता त्यावर मात कशी करता येते हे आपले अनुभव सांगत कथन केले.
मंगळवार ३० मे २०२३ - शुभार्थी गौरी इनामदार यांनी प्राणायाम या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले.त्या अनेक वर्षे योगासने आणि प्राणायाम यांचे क्लास घेत होत्या.अमेरिकेतही त्यांच्या व्याख्यानांना चांगला प्रतिसाद मिळाला.त्यांना योगासन आणि प्राणायामाचा स्वत:चा पीडी आटोक्यात ठेवण्यासाठी चांगलाच उपयोग होत आहे.त्यांचे अनुभवावर आधरित व्याख्यान सर्वाना भावले.
मंगळवार २७ जून २०२३ - दुबई येथील शुभार्थी मिलिंद जोशी आणि शुभंकर अपर्णा जोशी यांनी आपल्या पार्किन्सनसह प्रवासाचे अनुभवकथन केले.लहान वयात पार्किन्सन झाल्यावर त्यांनी सकारात्मकतेने,सुजाणतेणे आजाराकडे पाहिले.तेथील Movement mantra या सपोर्ट ग्रुपमध्ये ते सामील झाले.नियमित व्यायाम, लेखन,सुयोग्य आहार, विहार या आधारे त्यांनी पार्किन्सनला नियंत्रणात ठेवले.पत्नीची साथ होतीच.त्यांचे अनुभव सर्वांसाठी प्रेरणादायी होते.
मंगळावर २५ जुलै २०२३ - मंडळाच्या अध्यक्षा श्यामालाताई शेंडे यांच्याशी शोभना तीर्थळी आणि आशाताई रेवणकर यांनी गप्पा मारल्या.गप्पातून पार्किन्सन मित्रमंडळाची सुरुवातीची वाटचाल,मंडळाचे बीजारोपण करणारे मधुसुदान शेंडे यांचा पार्किन्सनसह प्रेरणादायी प्रवास,श्यामालताईंची त्याना मिळालेली साथ आणि शेंडे साहेबांचा वसा पुढे चालवणे या सर्वांचा उलगडा झाला.रामचंद्र करमरकर यांनी निभावलेल्या मैत्रीच्या आठवणी,अमित करकरे यांची भावूक करणारी क्लिप,डॉ.वीणाताई देव यांनी आपल्या सखीबद्दल व्यक्त केलेल्या भावना,दीपा होनप आणि अंजली महाजन यांनी सांगितलेल्या हृद्य आठवणी यांनी गप्पा वेगळ्याच उंचीवर नेल्या.
मंगळवार दि.२९ ऑगस्ट २०२३ - शुभार्थी अरुण सुर्वे यांनी आपले प्रेरणादायी अनुभव सांगितले. तरुण वयात पीडी झाला तथापी त्यांनी धीराने त्याचा मुकाबला केला.आपली शासकीय सेवा यशस्वीपणे पूर्ण केली छंद जोपासले.पीडी साठी असलेल्या शासकीय सेवा सवलती योजना यांचे लाभ घेतले आणि त्यासाठी काय करावे लागते याची माहिती सांगितली.इतरांना त्यासठी मदत करायची तयारीही दाखवली.त्यांचे मित्र उमेश सलगर यांनी त्यांच्या कार्यकर्तुत्वाची माहिती सांगितली.
मंगळवार ३१ ऑक्टोबर २०२३ - शुभार्थी शोभा ताकवले यांनी मीच माझी शुभंकर असे म्हणत आपले अनुभव सांगितले.नोकरी चालू असताना त्यांना पार्किन्सन्स झाला.नातेवाईक,मुले मुली मदतीला असले तरी दैनंदिन व्यवहारात त्या स्वत:च स्वत:ची काळजी घेतात.त्यांची DBS शस्त्रक्रिया झाली आहे.त्याचा त्यांना चांगला उपयोग झाला. त्याविषयी त्यांनी माहिती सांगितली.स्वत:च स्वत:चे शुभंकर होताना कसे आणि काय बदल केले याची माहिती सांगितली.सर्वांनाच त्यांचे कौतुक वाटले.
मंगळवार दि.२३ जानेवारी २०२४ - शुभार्थी राजीव कराळे आणि शुभंकर माधुरी कारळे यांनी आपले मनोगत मांडले.या दोघा पती पत्नीच्या मनोगतात कोठेही पार्किन्सन्स डोकावत नव्हता.पती पत्नीचे उत्तम सहजीवन,पार्किन्सन्सचा स्वीकार,वाचन, फोटोग्राफीचा छंद, पर्यटनाची आवड,सातत्याने चालण्याचा केलेला व्यायाम,संयत मनोवृत्ती या सर्वांमुळे त्यांचा पार्किन्सनन्स नियंत्रणात आहे.त्यांनी निसर्ग,इमारती यांचे काढलेले फोटो पाहण्यात सर्व रमून गेले.Instagram वर त्यांचे हजारो फोटो आहेत.
मंगळवार दि.२७ फेब्रुवारी २०२४ - गोवा येथील '
पर्पल फेस्टीवल २०२४ ' ला विजयालक्ष्मी रेवणकर या संस्था प्रतिनिधी म्हणून सहभागी झाल्या.तेथील त्यांचे अनुभव त्यांनी भेटू आनंदे मध्ये शेअर केले.त्या स्वत: तेथील अनुभवाने भारावून गेल्या होत्या.विविध प्रकारच्या हजारो दिव्यांगांची राहण्याची जेवणाची व्यवस्था.त्यांच्या विविध गुणदर्शन ,कलाकृतीचे आयोजन हे सर्व चोखपणे केले होते.तेथील विविध कार्यक्रम,स्टाल,यांचे फोटो,व्हिडीओ दाखवल्याने प्रत्यक्ष कार्यक्रमात हजर राहिल्यासारखे वाटले.शेवटी दिव्यांगांचा सहभाग असलेल्या प्रेरणादायी Anthem ने कार्यक्रमाचा शेवट झाला.डॉ.शोभना तीर्थळी यांनी सूत्र संचालन केले.
मंगळवार दि.२६ मार्च २०२४ - शुभार्थी दीपक गडकरी आणि शुभंकर स्मितल गडकरी यांनी
रेडीओ ऑफिसर म्हणून शिपवर काम करताना आणि पार्किन्सन्ससह आनंदाने जगतानाचे अनुभवकथन केले.गडकरींनी आपले अनुभव लिहिलेले होते ते स्मितल ताईंनी वाचून दाखवले.पर्किन्सन्सचा स्वीकार,जगण्यातील नियमितता,पत्नीबरोबर मुली,जावई असे कुटुंबियांचे सहकार्य यामुळे त्यांना पार्किन्सन्सला हाताळणे शक्य होते.सूत्र संचालन शोभना तीर्थळी यांनी केले.
मंगळवार दि.२३ एप्रिल २०२४ -शुभार्थी सविता बोर्डे यांनी त्यांना आलेले अनुभव कथन केले.पार्किन्सन्स होण्याआधीचे जीवन आणि नंतरचे जीवन असे दोन टप्प्यात अनुभव सांगितले.दोन्ही टप्प्यात प्रवासातले चित्तथरारक अनुभव, विविध गोष्टी शिकण्याची आवड,नृत्य,संगीत,पेंटीग इत्यादी कला जोपासणे, जिद्द, सळसळता उत्साह हे त्यांचे गुण जाणवले.गप्पा रंगतदार झाल्या.डॉ. शोभना तीर्थळी यांनी सूत्र संचालन केले.
मंगळवार दि.४ जून २०२४ - शुभार्थी कॅप्टन सुनील कर्वे यांनी आपल्या नेव्हीच्या कारकिर्दीतील अनुभव सांगितले.अमिता धर्माधिकारी यांनी त्यांची मुलाखत घेताना त्यांचा जीवनपट उभा केला.कर्वे पती पत्नी आणि धर्माधिकारी यांनी गप्पष्ट्क नावाने माहिती,चालू घडामोडी यावर आधारित आठ श्राव्य कार्यक्रम सादर केले होते.ही मुलाखतही एक मोट्ठे गप्पाष्टकच वाटले.या मुलाखतीतून चित्तथरारक असे नवे विश्व सर्वांच्यासमोर उभे राहिले.त्यांनी बोटीवरचे अनेक व्हिडीओ, फोटो,दाखवत बोटीवर कार्य कसे चालते हे संगितले.
मंगळवार दि.२७ जून २०२४ - अत्युच्य कामगिरी करणारे शुभार्थी सुहास तांबे आणि त्यांच्या तितक्याच तुल्यबळ सहचारिणी शुभंकर विभा तांबे यांची मुलाखत डॉ.शोभना तीर्थळी यांनी घेतली.त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असते .काही काळ ते भारतात राहतात.भारतात असलेल्या वेळी ते हृषीकेश पवारचा नृत्यक्लास जॉईन करतात.मुलाखतीत त्यांचा जगावेगळा जीवनप्रवास उलगडला.त्यांच्या कवितांच्या वरील वाचन आणि नृत्यातून सादरीकरण दाखवण्यात आले.डॉ. शोभना तीर्थळी यांनी मुलाखत घेतली.
मंगळवार दि.३० जुलै २०२४ - शुभार्थी गीता पुरंदरे यांच्या पायी पंढरपूर वारीवर 'संकल्प सिद्धीचा' हा कार्यक्रम झाला.त्यांची बहिण आणि त्या अशी एकत्र वारी केली.सुरुवातीला अंजली भिडे यांनी भक्ती गीत म्हणून त्यांचे स्वागत केले.पार्किन्सन असताना पायी वारी करण्याचा निश्चय धाडसी होता.घरातूनही परवानगी होती.पूर्व तयारी म्हणून त्या काही दिवस रोज १० किलोमीटर चालत होत्या.वारी सुरु झाल्या वर सर्वात मोठ्ठा,कठीण टप्पा पुणे सासवड होता तो पार केल्यावर त्यांना सर्व सोपेच वाटले.सकाळी चार वाजता उठावे लागे.दिवसभराचा हेक्टिक कार्यक्रम त्यांना झेपला.असतील त्या सोयीत त्या आनंदाने राहिल्या.पार्किन्सन्सच्या गोळ्यांची आठवण येत नव्हती.अंजली भिडे यांनी मुलाखत घेतली.
मंगळवार दि.२७ ऑगस्ट २०२४ - शुभार्थी श्रद्धा भावे आणि शुभंकर मिलिंद भावे यांनी पार्किन्सन्स बरोबर राहतानाचे अनुभव सांगितले.श्रद्धा व्यवसायाने वास्तुविशारद,इंटरनॅशनल ज्युनिअर आणि सिनिअर लेव्हलला हॉकी खेळणारी.मिलिंद बांधकाम व्यावसायिक.श्रद्धाला लहान वयात पीडी झाला.पण दोघांनी धीराने घेतले.नियमित व्यायाम, पार्किन्सन्सचा स्वीकार,सहल सभा यात सहभाग आणि मदत या आधारे २२ वर्षे पर्किन्सन्सला आनंदाने झेलले.मिलिंदनी हवा तेथे आधार आणि आत्मविश्वास टिकण्याइतकी ढील देत सहकार्य केले.त्यांच्याशी गप्पातून आदर्श शुभंकर आणि शुभार्थी कसा असावा याचा सर्वाना वस्तुपाठ मिळाला.डॉ.शोभना तीर्थळी आणि मृदुला कर्णी यांनी सूत्र संचालन केले.
मंगळवार दि.२४ सप्टेंबर २०२४ - शुभार्थी अविनाश धर्माधिकारी आणि शुभंकर अमिता धर्माधिकारी यांच्याशी पार्किन्सन्सचा स्वीकार आणि पतीपत्नीमधील सामंजस्य या अनुषंगाने गप्पा झाल्या.कॅप्टन सुनील कर्वे यांनी त्यांची मुलाखत घेतली.कर्वेनी त्यांना छान बोलते केले.धर्माधिकारी दाम्पत्य दोघेही संख्याशास्त्रज्ञ आहेत.स्वत:च्या पार्किन्सन्सचे निरीक्षण,समंजस साहचर्य,मनाचा स्थिरपणा,मुलांच्या गगन भरारीतील आनंद,समाधन अशा अनेक बाबींचा समन्वय औषधांइतकाच महत्वाचा आहे हा संदेश या मुलाखतीतून अनेकांपर्यंत पोचला.त्यांचे सुपुत्र तन्मय आणि निपुणही आपल्या आईवडिलांविषयी बोलले.
मंगळवार दि.२२ ऑक्टोबर २०२४ - शुभार्थी अस्मिता सोहोनी आणि शुभंकर अमृता केळकर यांची शुभार्थी सविता बोर्डे यांनी मुलाखत घेतली.आणि त्यांनी पर्किन्सन्सचा स्वीकार कसा केला हे उलगडले.स्मिताताई सेवानिवृत्त शिक्षिका,बालचित्रवाणीसाठी स्क्रिप्ट लेखन करणे,शिक्षकांसाठी प्रशिक्षण घेणे,अध्यापनातील अनेक प्रकार हाताळणे अशा विविध गोष्टी त्यांनी केल्या.चार वर्षापूर्वी पार्किन्सन्सचे निदान झाल्यावर व्याधीचा स्वीकार केला,आपल्या दिनक्रमात बदल केला.विविध छंद जोपासले.त्यांची मुलगी,जावई,नातवंडे, मुलीचे सासू, सासरे असे त्यांचे एकत्रित कुटुंब आहे.त्यांची कन्या अमृता आणि विहिणबाईही संवादात सामील झाल्या.