उबुंटू
' उबुंटू ' या मराठी चित्रपटामुळे उबुंटू हा शब्द सर्वसामान्यांपर्यंत पोचला.त्यातील 'हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे माणसाने, माणसाशी माणसासम वागणे' हे गाणे तर चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच व्हायरल झाले.उबुंटू हे आफ्रिकन तत्वज्ञान आहे..नेल्सन मंडेलाने आपल्या कार्यात याचा उपयोग करून घेतला.उबुंटू म्हणजे 'I am because we are' असे थोडक्यात सांगता येईल.चित्रपटातील ध्येयवादी शिक्षक प्रार्थनेतून,कृतीतून विद्यार्थ्यांच्यात हे तत्वज्ञान पेरतो.३५ पटसंख्या नाही झाली तर शाळा बंद पडणार असते.गावगुंड,पुढारी,गावकरी यांना त्याबद्दल काहीच वाटत नाही.परंतु शिक्षकाच्या गैरहजेरीत मुले एकत्र येऊन त्यांच्या आवाक्याबाहेरचा संघर्ष करून शाळा वाचवतात, अशी साधारण चित्रपटाची कथा.यातून उबुंटू तत्वज्ञान प्रेक्षकांपर्यंत पोचते.उबुंटूमध्ये' मी'ला 'आम्ही'शी जोडणारा धागा प्रेमाचा, माणुसकीचा आहे.त्यामुळे एका सुत्रात सर्व बांधले गेले आहेत.यातून सख्य,परस्परातील प्रेम,सत्य,शांती, समाधान याची निर्मिती होते आणि स्वार्थ,मीपणा,अविश्वास यांचा शिरकाव होत नाही.
व्यक्ती ,कुटुंब,संस्था,समाज या सर्वांसाठी हे तत्वज्ञान उपयुक्त,हितकारी आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळाचा विचार करता शुभंकर, शुभार्थी,त्यांचे कुटुंबीय हे' मी 'पार्किन्सन्स मित्रमंडळ या 'आम्ही'शी एकत्र जोडलेले आहेत.आणि पार्किन्सन्स मित्रमंडळ हा स्वमदतगटही एक 'मी'अनेक दृश्य अदृश्य 'आम्ही'शी प्रेमाच्या धाग्यात जोडला गेला आहे.आणि हेच त्याचे सामर्थ्य आहे.या सामर्थ्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे,येत आहे.आम्हा पती पत्नींनाही आला.
पार्किन्सन्स होण्यापूर्वीचे जीवन आणि
पार्किन्सन्स झाल्यानंतरचे जीवन यात मोठी तफावत असते. आम्ही ते
अनुभवलंय.पार्किन्सन्स आजारानी आमच्या घरात चोर पावलांनी प्रवेश
केला,त्याला आता २० वर्षे झाली.त्यातली साडेसात वर्षे पार्किन्सन्स
मित्रमंडळाची ओळख होण्यापूर्वीची आणि साडेबारा वर्षे पार्किन्सन्स
मित्रमंडळाशी संपर्क आल्यानंतरची.आता मागे वळून पाहताना लक्षात येते की त्या
साडेसात वर्षातले आम्ही आणि आत्ताचे आम्ही यात जमीन अस्मानाचा फरक आहे.आजार
तोच,पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.पार्किन्सन्स मित्रमंडळाचा परीसस्पर्श झाला आणि आमचे जीवनच बदलून गेले.किंबहुना पार्किन्सन्स मित्रमंडळ हेच आमचे जीवन
झाले.
आमच्यासारखीच अनेक उदाहरणे आहेत.स्मरणिकेतील लिखाणातून, सभेतील शेअरिंगमधून,जागतिक मेळाव्याच्या व्यासपीठावरून,सोशल मिडीयावरून अनेकांनी मंडळाचा त्यांच्या पार्किन्सन्ससह आनंदी जगण्यातला वाटा,आणि मंडळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.नमुन्यादाखल काहीच उदाहरणे देत आहे.
कर्नल प्रभाकर मोरे यांनी पाकिस्तान युद्धात शत्रूशी चार हात केले. पीडीने मात्र त्यांना हतबल केले.मंडळात सामील झाल्यावर त्यांना पीडीशी लढण्याचे हत्यारच मिळाले.
लहान वयात पीडी झालेल्या अश्विनी वीरकरच्या जीवनात रस उरला नव्हता.ती कवितेतू व्यक्त होत सांगते,'प्रत्येक वळणावर पीएमएमने सहारा दिला.पार्किन्सन्ससह आनंदी जगण्याचा मंत्र दिला.'
विमाननगरहून सभांना येणारे रामटेके एकदा म्हणाले,"आम्हाला सभेला यायचे तर रिक्षेलाच दोनतीनशे रुपये घालवावे लागतात.पण आमच्यासाठी हा मानसोपचार आहे त्यामुळे हा खर्च अनाठायी वाटत नाही"
.परगावच्या शुभंकर, शुभार्थींनाही मंडळाचा आधार वाटतो.गीता पुरंदरे,छाया फडणीस यांनी' बोल अनुभवाचे' या वेबसाईटवरील सदरात मंडळाच्या उपयुक्ततेला मनमोकळी दाद दिली आहे.सहल,सभांना परगावचे शुभंकर,शुभार्थी आवर्जून येतात ते प्रेमाच्या धाग्यात जोडले गेल्यामुळेच.हा धागा इतका पक्का असतो की शुभार्थी हे जग सोडून गेल्यावरही तो टिकून राहतो.शेंडे साहेबांच्या निधनानंतरही त्यांची स्वप्ने पुरी करण्यासाठी श्यामलाताई मंडळासोबत आहेत. मंडळाच्या त्या अध्यक्षही आहेत.पटवर्धन वहिनी गेल्या तरी शरच्चंद्र पटवर्धन आम्हा सर्वांचेच शुभंकर आहेत,मंडळाचे आधारस्तंभ आहेत.
श्री.आनंदराव गोडबोले आपल्या विल मध्ये पार्किन्सनन्स मित्रमंडळासाठी तरतूद करून ठेवतात,.
उषाताई कुलकर्णी आर्थिक मदतीचा पतीचा वारसा चालू ठेवतात.स्वयंसेवक म्हणून संस्थेच्या कार्यात मदत करतात.
नयना मोरे रेखा आचार्यच्या शुभंकर म्हणून आनंदवन सहलीला सोबत करतात.
विजया दिवाणे स्मरणिकेत जाहिरात देणे,सहल, सभांना येणे चालूच ठेवतात.
ठाण्याच्या अनुराधा( ?) गोखले पतीच्या पुण्यतिथीला देणगी देत राहतात.आवर्जून ठाण्याहून सहलीला,सभांना येतात.
पार्किन्सन्स
मित्रमंडळाची हीच तर खासियत आहे. एकदा आत शिरलेला माणूस कुटुंबातील एक
होऊन जातो.त्यांचे जोडलेपण मंडळाला मोट्ठे करत राहते.
पार्किन्सन्स मित्रमंडळ या 'मी'चा विचार करता संस्था,व्यक्ती अशा अनेक कड्यांच्या साखळीत मंडळ गुंतले आहे.संस्थेच्या विस्ताराची सुरुवातच सर्व स्वमदतगटांना एकत्र आणणाऱ्या 'सेतू' या संस्थेचा हात हातात घेऊन झाली.'देणे समाजाचे' या प्रदर्शनाच्या सहभागातून असंख्य स्वयंसेवी संस्थांशी अप्रत्यक्षपणे मंडळ जोडले गेले.'अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कारा'ने मुक्तांगणशी,आयपीएचशी नाते जोडले.'इसाहित्य प्रतिष्ठान'च्या हजारो पुस्तकात 'मित्रा पार्किन्सना' जाऊन बसले आणि अनेक शुभार्थींना आमच्यापर्यंत घेऊन आले. हृषीकेश पवारनी आपल्या नृत्य संस्थेद्वारे,नृत्योपचार प्रयोगाद्वारे शुभार्थीच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण केले.आमच्या शुभार्थींना आणि मंडळाला जगाच्या नकाशावर स्थान दिले 'टुगेदर वुई मूव्ह बेटर' हा जगभरातील स्वमदतगटांचा नारा आहे. ओघाने आमचे मंडळही त्यात आहेच.
व्यक्तिगत पातळीवर आमच्या परिवारात मूकपणे सामील झालेले,मंडळाच्या वेबसाईटचे विनामुल्य काम पाहणारे अतुल ठाकूर,जिला आम्ही पाहिलेही नाही अशी आमचा लोगो करून देणारी अश्विनी करमरकर,स्वत:च्या घरचे काम समजून मंडळाच्या छपाईचे काम करणारे विनय सहस्रबुद्धे, अनेक वर्षे मोफत हॉल उपलब्ध करून देणारे अरुण देवस्थळी, संस्था रजिस्ट्रेशन आणि लेखापरीक्षणाचे काम मोफत करणारे माधव येरवडेकर आणि त्यांचे सहकारी. यादी खूप मोठ्ठी आहे. यातील कोणालाच त्यांची नावे यावीत यात रस नाही.ते संस्थेशी समरस झाले आहेत.
न्यूरॉलॉजिस्ट,विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांची नावे तरी किती घेणार? त्यांच्याशिवाय आमचे पार्किन्सन्स साक्षरतेचे काम झालेच नसते. सर्वाना गोळा करण्यातील ती भक्कम अशी कडी आहे.
एकातएक अडकलेल्या या साखळ्यांच्यात आणखी एक मोठ्ठे वर्तुळ आहे.ते प्रत्यक्ष सहभागी नसते पण अनेकांना आतल्या बाजूला पोचवण्याचे कार्य करते.त्यांची छोटीशी कृती एक शुभार्थी, त्याचे सबंध कुटुंब यांचे जीवन उजळून टाकणार अस, हे त्यांच्या गावीही नसते.
एकदोनच उदाहरणे सांगते.
चिपळूणचे प्राध्यापक शुभार्थी प्रदीप करोडे थेट आमच्या घरापर्यंत पोचले. ते पुण्याला आलेल्यावेळी एका पुस्तक प्रदर्शनात फिरत होते.त्यांचा हात हलताना पाहून एका व्यक्तीने विचारले, 'तुम्हाला पार्किन्सन्स आहे का? तुम्हाला फोन नंबर देतो.त्यांना भेटा. त्यांचा पार्किन्सन्स ग्रुप आहे".आणि करोडे आमच्यात सामील झाले.Whatsapp group करण्याचा आग्रह त्यांचाच होता.
तळेगाव येथील फिजिओथेरपी कॉलेजची विद्यार्थिनी कृतिका नाईकने तिच्या प्रकल्पासाठी आमच्याशी संपर्क साधला.तिला शुभार्थी विश्वनाथ धारपनी माझा फोन दिला आणि सांगितले, "त्यांना भेट, त्या तुला नक्की मदत करतील".माझा फेसबुकवरील लेख वाचून माझ्या मुलीच्या मित्रांनी त्याच्या मैत्रिणीच्या वडिलांना म्हणजे धारप यांना मंडळाची माहिती सांगितली.ते आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झाले.त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही.तरी त्यांना आमच्याबद्दल विश्वास वाटावा हाच तो जोडणारा दुवा.
हे दुवे छोटे असले तरी महत्वाचे असतात.शरीराची यंत्रणा विनातक्रार काम करते तेंव्हा ह्र्दय,फुफ्फुसे,किडनी,मेंदू हे महत्वाचे अवयव असतातच, शिवाय छोट्या पेशीही तितक्याच महत्वाच्या असतात.डोपामिन(?) तयार करणाऱ्या पेशी कमी झाल्या की शरीरात किती उलथापालथ होते याचा पीडीशी संबंधित सर्वांना चांगलाच अनुभव आहे.कोणतीही यंत्रणा उत्तम चालण्यासाठी छोट्या मोठ्या सर्वांचे एकत्रित जोडले जाणे आणि समन्वयाने काम करणे महत्वाचे असते.पार्किन्सन्स मित्रमंडळात ही प्रक्रिया न ठरवता आपोआप होत गेली.''पार्किन्सन्ससह आनंदी जगूया' हे ब्रीदवाक्य सर्वांसाठी तेवढेच महत्वाचे आहे.
डॉ.ह.वी. सरदेसाई,मानसोपचारतज्ज्ञ डॉ.उल्हास लुकतुके यांच्यासारखे बुजुर्ग शाबासकीची थाप देतात तेंव्हा ती व्यक्तिश: कोणा एकासाठी नसते तर ती आमच्या गटाला, एकमेकांशी समरसतेतून निर्माण झालेल्या ताकदीला',Onenes's ला असते.
शुभार्थी पद्माकर आठवले गेल्यानंतर संजीवनी आठवले यांनी लेख दिला होता. लेखाच्या शेवटी त्या म्हणाल्या,
"तहे दिलसे ईश्वरको हमारी प्रार्थना है की यह मंडल विकसित और विस्तृत होकर दिन दुगुनि और रात चौगुनी उन्नति करे"
बुजुर्गांच्या आशिर्वादाइतक्याच अशा अनेकांच्या मनापासून मिळालेल्या शुभेच्छाही आमचे कार्य पुढे नेतात.