पार्किन्सन्सविषयी गप्पा – २ –
ह्यांचे सांगलीच्या वालचंद कॉलेजमधले मित्र श्री. यशवंत बावकर
ह्यांच्या घरी आम्ही ब-याच दिवसांनी जाणार होतो. तिथेच ह्यांचे वालचंदमधले
दुसरे एक मित्र श्री. कानेटकर हे येणार होते. पार्किन्सन्स झाल्यानंतर
बावकरांशी आमच्या ब-याच गाठीभेटी झाल्या होत्या. पण कानेटकर मात्र ह्यांना
पार्किन्सन्स झाल्यानंतर पहिल्यांदाच भेटणार होते. ते आले आणि एकदम
म्हणाले, 'अरे गोपाळ, तुला मी कशा अवस्थेत पाहीन असे वाटले होते, तू तर
फारच चांगल्या अवस्थेत आहेस. खूप बरे वाटले बघ मला, छान आनंद वाटला तुला इतक्या चांगल्या अवस्थेत पाहून.'
तर नंतर बोलता बोलता विषय निघाला. त्यांचे पु. ल. देशपांडेंच्याकडे जाणे
येणे होते. त्यामुळे मला वाटते, की कदाचित त्यांच्या डोळ्यांपुढे पु. ल.
देशपांडेंचा पार्किन्सन्स असावा. आमच्या ब-याच पेशंट्सच्या बाबतीत -
पेशंट्स म्हणजे आम्ही त्यांना शुभार्थी म्हणतो - शुभार्थींच्या बाबतीत
जेव्हा पार्किन्सन्सचे निदान होते, त्यावेळेला अशीच काहीतरी रुपे त्यांच्या
डोळ्यासमोर असतात. कुणाला विजय तेंडुलकरांनी कमलाकर सांरंगांबद्दल,
सारंगांच्या पार्किन्सन्सच्या अगदी गलितगात्र अवस्थेबद्दल लिहीलेले होते,
ते आठवते. आपली अशीच अवस्था होणार का असे वाटते. कुणाच्या डोळ्यासमोर
विद्याधर पुंडलिक असतात. तर कुणाच्या नजरेसमोर आजुबाजूचे नातेवाईक, त्यांची
अशी पाहिलेली गलितगात्र स्वरुपातली रुपे असतात.
साठच्या दशकाच्या आधी पार्किन्सन्सवर काही औषधेच नव्हती. आता मात्र परिस्थिती खूप बदललेली आहे. आणि अशा इतक्या वाईट परिस्थितीतली रुपे डोळ्यासमोर येण्यापेक्षा सर्वांना हे बदललेले स्वरुप समजावे, म्हणून मी नेहमी फेसबुकवर आमच्या शुभार्थींची, जे नृत्य करतात, गातात, विविध कलाकृती करतात, लेखन करतात, सहलींमध्ये रमतात, सभेचा आनंद घेतात, अशी आनंदी असलेली विविध रुपे दाखवत असते.
जेव्हा कुणाला पार्किन्सन्सचे निदान होईल, त्यावेळेला हे अशा कार्यरत स्वरुपातले शुभार्थी त्यांच्या डोळ्यासमोर असावेत, असे मला वाटते. त्यांच्या मन:पटलावर अशी कोणती तरी गलितगात्र चित्रे असू नयेत, ह्यासाठी माझे हे प्रयत्न असतात.
शब्दांकन - सई कोडोलीकर