आमच्या सर्वांची लाडकी शुभार्थी प्रज्ञा जोशी हिला पार्किन्सन्स मित्रमंडळाकडून वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा!.
मागच्या वर्षी तिचा वाढदिवस कार्यकारिणीच्या सर्वांनी मिळून दीपाच्या घरी साजरा केला होता.ती नुकतीच आजारातून उठली होती आणि सर्वाना घरी या असा आग्रह करत होती.तिला काहीतरी निमित्त काढून गुजराथी पद्धतीच्या पाककृती करून खायला घालायला खूप आवडते.मिटिंग सहल यावेळी मोठ्या डब्यातून काहीतरी आणेल,डान्स क्लासमध्ये काहीतरी करून नेईल,देणे समजाचे प्रदर्शन तर तिच्या घरासमोर.त्यामुळे रोजच चहा आणि काहीतरी खायला घेऊन यायची. तिला किती नको म्हटल तरी ती ऐकत नाही.नृत्योपाचारावर हृषीकेशनी फिल्म बनवली तिचे चित्रण हिच्या घरी दिवसभर झाले होते.त्या सर्वांचाही हाच अनुभव होता.हे विस्ताराने सांगायचे कारण तिला पार्किन्सन्समुळे अनैच्छिक हालचालींचा त्रास होतो.तिच्याकडे पाहिल्यावर तिला स्वत:चा ३५ किलो वजनाचा जीव सांभाळता आला तरी खूप झाले असे वाटते.यावेळी मात्र आम्ही सर्वांनी वेगळा घाट घातला.तिचे पती नलीन आणि ती दीपाकडे आले होते.एकूण प्रकाराने ती खूपच भारावून गेली.मला मिठी मारून खूप रडली.
तिच्या पहिल्या भेटीत ती अशीच मिठी मारून रडली होती. पण या दोन्ही स्पर्शात आणि रडण्यात जमीन अस्मानाचा फरक होता.ती अनेक वेळा मला मिठी मारून रडली आहे प्रत्येक वेळचा अर्थ वेगवेगळा असतो कधी खूपखूप प्रेम, कधी कृतार्थता,कधी कृतज्ञता,कधी उगाच लाडात येणे,कधी खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद,पण आता पहिल्या वेळचे नैराश्य मात्र कधीच नसते.
प्रज्ञाला ४५ व्या वर्षी पीडीचे निदान झाले.तिच्या भावालाही पीडी होता.त्याची खूपच वाईट अवस्था तिने पाहिली होती.आपले ही असेच होईल या कल्पनेने ती घाबरली होती. जीव द्यावा असे वाटत होते.मंडळात सामील झाल्यावर मात्र चित्र बदलले.कोथरूड विभागाची ती समन्वयक बनली.प्रज्ञा म्हणजे सळसळता उत्साह असे समीकरण झाले.मित्रमंडळाच्या सर्व कामात तिचा हिरिरीने सहभाग असतो.मेळाव्यातील अनुभव कथन,प्रार्थना आणि नृत्यात सहभाग,स्मरणिकेत लेखन. असे सर्व काही तिने केले आहे.हल्ली तिला सभासदांना फोन करायचे काम देत नाही तर तिला राग येतो.
नृत्योपाचारातील ती पहिल्या पासूनची सदस्य आहे.तिने आपल्या लेखात आपले अनुभव सांगितले.ती ,"नृत्योपचार उपक्रमामुळे माझ्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाला.हालचाल ,बोलणे, चालणे अशा प्रत्येक गोष्टीत गुणात्मक फरक झाला.शरीराचा ताठरपणा कमी कमी होत गेला.घरकामात, स्वयंपाकात व्यवस्थितपणा आला.तिसर्या मजल्यावरील माझ्या फ्लॅटमध्ये मी सामान घेउन एकटी चढु -उतरु लागले.पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यात बसमधे एकटी जाऊ लागले.मानसिकतेत सकारात्मक बदल झाला सर्वच शुभार्थीना सांगितलेल्या हालचाली लगेच जमतात असे नाही.पण मैथीली आणि ऋषीकेश न चिडता न कंटाळता पुनःपुन्हा हालचाली दाखवून करुन घेतात.असे तरुण हसतमुख प्रेमळ .नृत्य शिक्षक मिळाले आम्ही भाग्यवान आहोत."हृषिकेशने तयार केलेल्या फिल्ममध्ये हे अनुभव प्रत्यक्ष पाहताही येतील.
एकदा मी फोन केला असता तिचे पती नलीन म्हणाले अधिक महिन्यासाठी भागवतला गेली आहे. मी विचारले ऐकायला का? तर ते म्हणाले नाही तिच वाचून दाखवते.तासभर असे वाचन करायची ताकद हिच्यात कुठून येते याचे मला आश्चर्य वाटते.पीडी पेशंटना साडी नेसणे म्हणजे कसरतच पण ही रोज साडी नेसून जायची याबद्दल नलीन तक्रार करत होते.मी म्हटले चांगले आहे की? त्यावर ते म्हणाले,'हो पण तिला घडी कुठे करता येते ती मलाच करावी लागते'.भागवत वाचताना ड्रेस घालणे तिला मान्य नसावे कधी कधी तीच्या धर्मिकतेत कर्मकांडाचा अतिरेक होतो यात खाण्यापिंयची बंधने जाचक असतात.यासाठी मात्र आम्ही तिला रागावतो. आधीच तोळा मासा तब्येतीवर याचा परिणाम होतो.
तिच्या प्रकृतीत सारखे चढ उतार असतात.चिमणीने प्रयत्नाने घरटे बांधावे आणि क्रूरपणे कोणी ते पाडावे .तिने पुन्हा बांधावे असे तिच्या तब्येतीबद्दल चालते.तिच्या चिकाटीला पीडीसह आनंदी राहण्याच्या प्रयत्नाला सलाम करावासा वाटतो.
प्रज्ञा तुझ सर्व काही चांगले आहे पण ती कडक बंधने मात्र कमी कर.तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा!