Thursday, 21 May 2015

शेंडे साहेब- डॉक्टर विजय देव

           






             






                    मधुसूदन चिंतामण शेंडे आणि श्यामला मधुसूदन शेंडे या भारदस्त नावाच्या दांपत्याशी माझी ,आमची ओळख नेमकी केंव्हा व कशी झाली ते नेमके आठवत नाही.स्वभाविकच आहे;योगापेक्षा सह्ज योगाने निर्माण झालेले मैत्र 'तिथीबारच न क्षत्र ' प्रमाणे आठवत नाहीच!
                 त्याच अस झाल,की तुळशीबागवाले कॉलनीतील श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या क्रीडांगणाला फेर्‍या मारणार्‍या आम्हा काही मित्रांना शेंडे भेटले ते प्रभात फेरी मारताना.आठवत एव्हढच, की एक उमदा देखणा गृहस्थ ओळख करून घ्यायला आणि द्यायलाही स्वत: पुढे आला.
'मी मधुसूदन शेंडे तुळशीबागवाले कॉलनीतील धोमकर रस्त्यावर 'अमितदीप' या इमारतीत राहतो.ही माझी पत्नी श्यामा.सिव्हील इंजिनीअर म्हणून देशविदेशात चाळीस वर्षे काम केल आणि आता सेवानिवृत्त होऊन मस्त जगायचं ठरवून परत पुण्याला आलो आहे.'
              बहुधा ते वर्ष असाव १९९६ .महिना ऑगस्ट किंवा सप्टेंबर.त्या ओळखीनंतर एम.सी.शेंडे याना आम्ही सगळेच शेंडे साहेब म्हणू लागलो.ठरवून नव्हे अगदी सहज.देशविदेशात मोठे आणि महत्वाचे बांधकाम प्रकल्प राबविणारे मधुसूदन शेंडे एखाद्या ब्रिटीश साहेबासारखेच वाटले.
             लवकरच विश्वास बसणार नाही अशी स्वत:विषयीची हकीकत शेंडे साहेबांनीच सांगितली.'मला पार्किन्सन्स डीसिजचा त्रास आहे'.'१९९३मध्ये तो लक्षात आला.'
           खर सांगायचं तर पार्किन्सन्स आणि 'अल्झायमर्स' या  आजारराविषयी केवळ ऐकून होतो.शेंडे साहेबांमुळे पार्किन्सन्स  कळत गेला.माझ्या धाकट्या कन्येने 'अल्झायमर्स'नावाच्या एकांकिकेत तो आजार झालेल्या तरुणीची भूमिका केली होती.प्रेक्षकांच्या ती चांगलीच अंगावर आली होती.
            धरण,रस्ते आणि इमारती रचण्याचा उद्योग कलेल्या शेंडे साहेबाना शरीर रचना शास्त्र बर समजत असाव.कारण मुळात मेंदूचा विकार असलेल्या पार्किन्सन्सचा शरीरावर कसा परिणाम होतो हे त्यांनी तितक्याच सहजपणे सांगितलं.जितक्या सहजपणे बांधकाम प्रकल्पाविषयी सांगत.
           शेंडे साहेब हा तसा गप्पिष्ट माणूस.गोष्टीवेल्हाळ म्हणावा इतका.स्वत:विषयी सांगता सांगता दुसर्‍याविषयी जाणून घ्याव याची खूप हौस असते.त्याना.स्वत: बोलतील आणि दुसर्‍याला बोलत करतील हा त्यांचा स्वभाव.निरनिराळ्या विषयावर इंटर अ‍ॅक्शन झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह.त्यांच्या या स्वभावाचा खरा अनुभव आला तो आमच्या 'हिंडफिरे' गटाच्या सहलीमधून.आम्ही पाच दांपत्ये,दोन साठे,एक कानडे,एक देव आणि एक शेंडे.सहली काढायची टूम काढली तीही बहुता शेंडे साहेबांनीच. केरळ झाल,कर्नाटक झाल,गोवा झाल, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूदेखील झाल.एवढच काय अंदमान आणि चारधाम यात्रा देखील झाली.या सगळ्या हिंडण्याफिरण्यात शेंडे साहेबांचा उत्साह काही औरच म्हणायचा.त्यांचा पार्किन्सन्सचा वाढता आजार त्या दहा वर्षात त्यांनी एखाद्या मित्रासारखा वागवला.अर्थात श्यामाताई त्यांच्याबरोबर 'सावली' सारख्या असायच्या.त्यांच्यामुळेच शेंडेसाहेब स्वावलंबी राहू शकले.
          शेंडे साहेबांचे दोन्ही मुलगे अमेरिकेत स्थायिक आहेत.शिक्षण संशोधन क्षेत्रात नाव लौकीकासह कार्यरत आहेत.शेंडे साहेबांच्या सुनाही तितक्याच मातब्बर.नातवंड प्रगतीपथावर.प्रतिवर्षी अमेरिकेला मुलांकडे जाण्याचा शेंडे दंपतीचा उत्साह दांडगा. अमेरिकेत पार्किन्सन्स-मित्र मंडळी चांगलीच संघटीत.तेथील मुक्कामात शेंडे साहेबांनी या आजारासंबधी जेवढी माहिती मिळवता येईल तेव्हढी मिळविली.काही रुग्णांना ते प्रत्यक्ष भेटले.अमेरिकेहून परतल्यावर त्यांनी मला जे काही सांगितलं,दाखवलं त्यात 'पार्किन्सन्स' साहित्याचा भरणा असे.ही माहितीपत्रके,ते अहवाल,ती पुस्तके अस नाना परीच साहित्य.
         अमेरिकेतील पार्किन्सन्स मित्र-परिवाराप्रमाणे  पुणे शहरात पार्किन्सन्स मित्रमंडळ स्थापन करण्याची कल्पना आणि कृती शेंडे साहेबांचीच.अर्थात श्री. शरच्चंद्र पटवर्धन यांच्या पुढाकाराचा मित्रमंडळ सुरु करण्यासाठी फार उपयोग झाला.
         शेंडेसाहेब हे पुणे पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य आहेत.मंडळ स्थापन झाल २००० साली पण त्याआधी कितीतरी वर्षे शेंडे साहेबांनी पार्किन्सन्स रुग्णासाठी काम केल आहे.श्यामला शेंडे यांची साहेबाना सतत सक्रीय साथ आहे.पुण्यात असो की परदेशात ते दोघे सतत पार्किन्सन्स या आजारावर विचार करीत आले आहेत.अमेरिकन पार्किन्सन्स,डिसीज असोशिएशनशी संपर्क साधून आहेत.पार्किन्सन्स या एकाच विषयावर त्यांनी माहितीपत्रके,पूरक पुस्तके,उपयुक्त अशा चित्रफिती संग्रहित केल्या आहेत.पुस्तके मराठीतून भाषांतरित करण्याची परवानगी अमेरिकेतील प्रकाशकाकडून मिळवली आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळाने तीन पुस्तकांचे भाषांतर केले ते शेंडे साहेबांच्या सौजन्यामुळेच! विशेष म्हणजे अमेरिकन पार्किन्सन्स,डिसीज असोशिएशन ( APDA ) ने शेंडे दांपत्याला प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे.
         शेंडे साहेब एक निष्णात सिव्हील इंजिनिअर.अनेक अभियांत्रिकी संस्थांचे सन्माननीय सभासद.अकराहून अधिक देशात बांधकाम,बांधकाम व्यवस्थापन,बांधकाम विषयक सल्लामसलत इत्यादी महत्वाची कामे पार पडलेला यशस्वी बांधकाम अभियंता.अशा व्यक्तीला  पार्किन्सन्स सारखा झिजवणारा आजार व्हावा या भोगाला काय म्हणावे? बरे शेंडे साहेबांसारखा मनुष्य असा आजार सहज साहून जातो तरी कसा? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे कोण देणार? शेंडे साहेबांसारख्या उमद्या व्यक्तीला पार्किन्सन्स सारखा आजार व्हावा या भोगाला काहीही म्हणता येणार नाही.तो आजार ते कसा निभाऊन नेतात हे महत्वाच.
         शेंडे साहेबांनी आजाराच स्वागत केलय.त्याची लक्षण ओळखली आहेत.त्याचे परिणाम जाणून घेतले आहेत,आपण जे अनुभवल,आपल्याला जे उमगल ते इतराना सांगून समजाऊन घेऊन वेदना आणि दु:ख वाटून घेऊन हलक कराव अस त्याना मनापासून वाटत आल्याच जाणवत.'वेदनेचा जयजयकार' हे तत्वज्ञान
असू शकत प्रत्यक्षात वेदना शमवणारे उपाय आणि औषध याना शरण जाणे जमले तरी पुष्कळ काही घडून येऊ शकत अस शेंडे साहेबांना वाटत असणार  पार्किन्सन्स सारख्या आजारावर ' निवांता साहून जाणे म्हणजे हातपाय गाळून बसणे नाही: तर त्या आजारावर मात करीत म्हणणे,-
मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण |
मोक्ष अथवा बंधन,सुख समाधान इच्छा ते | |
शेंडे साहेब प्रसन्न आहेत.आज आत्ता आणि या क्षणीही.
डॉक्टर विजय देव यांचा परिचय 
 पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या उभारणीच्या काळात डॉक्टर विजय देव आणि विणा देव यांची मोलाची मदत लाभली.विजय देव यांनी एस.पी.कॉलेजमध्ये ३० वर्षे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले.राज्यशास्त्रावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.कौटिल्य आणि मॅकिअव्हेली यांचा तुलनात्मक अभ्यास हा त्यांचा पीएचडीच्या संशोधनाचा विषय होता.गो.नी.दांडेकर दुर्ग साहित्य संमेलनाचे ते प्रवर्तक आहेत.गो.नी.दांडेकर यांच्या साहित्याच्या अभिवाचनाचे कार्यक्रम डॉक्टर देव यांच्यासहत्यांचे  सारे कुटुंब करते हे सर्वश्रुत आहे.
त्यांनी आपले मित्र शेंडेसाहेब यांच्यावर लिहिलेला लेख २१ मे या शेंडे साहेबांच्या  वाढदिवसादिवशी प्रसिद्ध करत आहोत.
या लेखानंतर पुढच्याच महिन्यात श्री मधुसूदन शेंडे यांचे निधन झाले.
त्यांनी देहदान केले. 


       

Friday, 1 May 2015

पार्किन्सन्स आणि भास - शुभार्थींचे अनुभव

                               पार्किन्सन्समध्ये भास हे एक लक्षण आहे हे पार्किन्सन्सविषयक लिखाणातून वाचल होत पण नुसत वाचण आणि प्रत्यक्ष उदाहरणे पाहण यात महद अंतर आहे अस मी घरभेटीत भास होणारे शुभार्थी आणि त्यातील विविधता पाहिली तेंव्हा लक्षात आले.हे अनुभव देऊन मला घाबरून टाकायचं नाही तर यामागच वास्तव समजून घेऊन योग्यवेळी योग्य उपचाराने त्यावर मात करता येते हे सांगायचे आहे इतरांच्या अनुभावातून किती वेगवेगळ्या स्वरूपाचे भास होऊ शकतात हेही निदर्शनास आणायचे आहे.
                           पहिला अनुभव श्री साक्रीकरांच्याकडे आला.त्याना इतरही बरेच आजार होते.ते बेड रीडन होते अनेकांची मदत होत असे.ब्युरोची माणसे होती,व्यायाम करून घ्यायला फिजिओथेरपीचा माणूस यायचा.सर्व सुरळीत चालल होत.भास व्हायला सुरु झाल्यावर मात्र त्याना हाताळण कठीण झाल.त्याना त्यांच्या बहीणीच्या नवर्‍याचे निधन झाले आहे सर्व माणसे जमली आहेत,बहिण रडत आहे असे  दिसत होते.नातेवाईकांना फोनही केले आणि पत्नीने अस काही नाही असे उलट फोन केले.
                     एकाना माणसांचे बोललेले आवाज ऐकू यायचे तर एकाना बेल वाजल्याचा आवाज यायचा आणि कोणी दार उघडत नाही असे वाटायचे.एका शुभार्थीना हॉस्पिटलमध्ये असताना तिच्या पतीने नर्सला धक्का दिला आणि सर्व नर्सनी संप पुकारला आहे तिच्या पतीला मारण्यासाठी ते मागे लागले आहेत असे वाटत होते.
आपल्याबद्दल कट केला जात आहे असे वाटणारेही भेटले.पत्नी, मुलांबद्दल असा संशय निर्माण झाल्यावर तर  फारच अनावस्था प्रसंग ओढवतो.
                      घरभेटी वाढत गेल्या तसे नवनवीन अनुभव लक्षात आले.भासाबद्दल काही माहित नसणारे,काहीतरी बाधा झाले असे समजून देवदेवस्की करतानाही आढळले. त्यांना भासावरील लेख वाचण्यास दिला.
                 ही समस्या सर्वच शुभार्थीना जाणवेल असे नाही.आमच्या सर्वेक्षणातील १५० शुभार्थीपैकी २९ जणाना भासाची समस्या होती.पुढे ती कमी झाली तर सर्वेक्षणाच्यावेळी ज्याना ही समस्या नव्हती त्यातील काहीना नंतर निर्माण झाली.याबाबतची वैद्यकीय माहिती समजावी म्हणून २०१२ सालच्या स्मरणिकेत न्युरॉलॉजीस्ट हेमंत संत यांचा भासावरील लेख दिला गेला.
           एका उच्चशिक्षित शुभंकरानी फोनवर सांगितलं,तिचा पीडीग्रस्त पती तिच्या चारित्र्यावर संशय घेतो.तिच्याकडे कोणीतरी येत आणि ती त्याच्याबरोबर जाते अस त्याना वाटत होत.मला वेड लागायची वेळ आले.अस त्या रडत सांगत होत्या त्याना शांत करत, भासाचे विविध शुभार्थींचे अनुभव सांगितले आणि तातडीने न्युरॉलॉजीस्टकडे जायला सांगितले.असाच अनुभव अनेक शुभंकर आणि शुभार्थी यांच्या भासाविषयीच्या अज्ञानाबद्दल आल्याने एकदा मित्रमंडळाच्या सभेत  याविषयावर चर्चा घडवून आणण्याची गरज वाटली.त्या सभेत सांगितले गेलेले अनुभवही पुढे देत आहे.

              श्यामला शेंडे यांनी आपले अनुभव सांगितले. मंडळाचे संस्थापक मधुसूदन शेंडे याना गेली २३ वर्षे पीडी आहे.आठ वर्षापूर्वी सहा साली अमेरिकेत असताना आजूबाजूच्या झाडीत लोक हिंडत आहे असे वाटत होते. त्यासाठी त्यांनी सर्वाना उठवल.पण त्यानंतर  काही समस्या नव्हती.११ साली  मात्र अंगावर किडे हिंडतात तोंडातून दोरे निघतात असा वाटायला लागल.कंप आवडत नाही म्हणून स्वत:च त्यांनी गोळ्या वाढवल्या होत्या. भासाच प्रमाण वाढल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल केल.अशा वेळी पेशंट अनावर होऊ शकतो म्हणून ICU ठेवलं.ते त्याना न आवडल्याने ते पळून जाऊ लागले. भासाचाच एक भाग म्हणजे अमेरिकेहून मदतीला आलेला मुलगा, पत्नी,डॉक्टर हे कट करत आहेत असे वाटू लागले.औषधाचे प्रमाण कमी केले.घरच्या लोकांनी सांगितलेले पटत नसल्याने त्यांचे मित्र श्री.शरच्चंद्र पटवर्धन याना बोलावलं.उपचारानंतर भास कमी झाले.पण पार्किन्सनस वाढला.शामला ताईंनी थोडेसे लक्षण दिसल्यास  सुरुवातीलाच तातडीने न्युरॉलॉजीस्टना दाखवावे असा सल्ला दिला
               श्री.पटवर्धन यांनी औषधांच्या उपयोगापेक्षा दुष्परिणाम जास्त झाल्यास डॉक्टरना, कुटुंबियाना तारतम्याने निर्णय घ्यावा   लागतो असे सांगितले.
              आशा रेवणकर यांनी श्री.रेवणकर,दिवंगत मधुकर देशपांडे आणि श्री पद्माकर आठल्ये यांचे अनुभव सांगितले.रेवणकर याना आपले पाकीट जळाले आहे असे वाटत होते.४८ तास ते न झोपता १०/ १० मिनिटांनी  ड्रॉवर उघडून ते पाकीट पहात होते.भासाबद्दल त्यावेळी फारशी माहिती नसल्याने त्या घाबरल्या.त्यांच्या Ameltralच्या तीन ऐवजी दोन गोळ्या केल्यावर त्यांचे भास कमी झाले अर्थात हा निर्णय न्युरॉलॉजीस्टच्या सूचनेवरून घेतला.श्री. आठल्येना चोर आल्याचे वाटत होते ते जवळ काठी घेऊन झोपत.मधुकर.देशपांडेनी तर एकदा पोलीस स्टेशनला फोन करून चोर आल्याचे सांगितले.नातीने हे ऐकले आणि आज्जीस सांगितले.आज्जीने मग पोलीस स्टेशनला फोन करून असे काही नाही असे सांगितले.
                आशा ताई यांच्या अनुभवानंतर मी  त्यावेळी प्रश्नावलीतील  शुभार्थींच्या भास आणि औषधे यांचा काही परस्पर संबंध आहे का हे तपासले होते हे आठवले.पण तो आढळला नव्हता. भास होणारे अनेक जण या गोळ्या घेत नव्हते आणि या गोळ्या घेणार्‍या अनेकाना भास होत नव्हते असे लक्षात आले.होते त्यामुळे विशिष्ट औषधांचे दुष्परिणाम व्यक्तीनुसार वेगळे असतात  त्यामुळे औषधांच्या बाबताचा निर्णय स्वत: न घेता न्युरॉलॉजीस्टवर सोपवावा असा सावधानतेचा इशारा येथे द्यावासा वाटतो.
                दीपा होनप यांच्या वडिलाना पीडी होता.आज ते हयात नाहीत तरी त्यांनी वडिलांची ही समस्या हाताळली आहे. वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून या समस्येकडे पहिल्याने आणि प्रत्यक्ष अनुभवाबरोबर पती एम.डी.फिजिशियन असल्याने या समस्येचे यथार्थ ज्ञान त्याना होते.अतिशय संवेदानशिलतेने ही समस्या त्यांनी हाताळली.एक चतुर्थांश शुभार्थीनाच ही समस्या जाणवते परंतु आपणापर्यंत ती येणार आहे की नाही हे समजणे अश्यक्य.त्यामुळे त्याबद्दल माहिती आवश्यक.शुभार्थीला एकटे न ठेवणे, डिप्रेशन येऊ न देणे,भास होऊ लागल्यास न लाजता इतराना सांगणे.या गोष्टी भासावर मात करण्यासाठी थोड्याफार उपयोगी होऊ शकतात.त्यांनी  स्वत: हाताळलेला Socratic reasoning चा प्रयोग सांगितला.यात शुभार्थीच म्हणण खोडायच नाही कारण हे शुभार्थी कधीच स्वीकारत नाही कारण त्यांच्यासाठी  ते सत्यच असते. त्याऐवजी अप्रत्यक्षपणे वेगळेच प्रश्न विचारत जायचं. ज्यातून हळूहळू ते योग्य  विचारापर्यंत येऊ शकतील.त्याचं वडिलांशी असलेल जवळीकीच विश्वासाच नात यामुळेही हे शक्य झाल.अस त्या म्हणाल्या.प्रत्येक शुभार्थिच्या समस्येनुसार तारतम्यानेच डॉक्टर आणि शुभंकरालाही निर्णय घ्यावे लागतात.
            मित्रमंडळाचे हितचिंतक डॉक्टर शशिकांत करंदीकर यांनीही आपल्या विवेचनात अनेक दिवस झोप न झाल्यानेही भास होऊ शकतात.भासाची इतर कारणेही पाहण्याची आवश्यकता सांगितली. LSD 25  सारख्या रसायनाचा एक कण सुद्धा भास निर्माण करतो हिप्पी त्याचा वापर काल्पनिक विश्वात जाण्यास करत.मेंदूतील न्युरॉन्सचे प्रमाण एक बिलियनपेक्षा जास्त असते आणि त्यांची कनेक्शन ८०,००० मिलियन असतात त्याचा कोठे कसा परिणाम होईल याचा अंदाज करणे अत्यंत कठीण. त्यांचे अमेरिकेतील न्युरॉलॉजीस्ट मित्र पुढील ५० वर्षात तरी याबद्दलचे कोणते प्रश्न नक्की सोडऊ शकू हे सांगता येत नाही असे सांगतात असे प्रतिपादन केले.डॉक्टर पेशंटला वेळ देत नाहीत अशा तक्रारीवर पीडी च्या २०/२५ लक्षणांची यादी करून त्यातील नेमकी कोणती त्रास देतात यावर खुणा केल्यास डॉक्टर मदत करू शकतील असे सुचविले
          

            शुभार्थी रमेश घुमटकर यांनी घरी ते एकटेच असतात परंतु घरात माणसे वावरत असल्याचा भास होतो. स्कूटरवरून जाताना कोणीतरी ओव्हरटेक करत असल्याचे भास होतात.फिरायला गेले असता मागून कोणीतरी येत असल्याचे वाटते.पण मी स्वत:ला हे भास असल्याचे पटवतो.
             श्री. शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपल्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर आपल्याला भास होत असल्याचे सांगितले.पण हे भास आहेत हे मला समजत होते.पिडीत ते खरे असल्याचे वाटते.
              प्रज्ञा जोशी यांना आपल्या मुलासाठी मुलगी सांगून आले.सर्व पाहुणे मंडळी बाहेर बसली आहेत अस वाटत होत. आपल्या सांगण्याकडे कोणी लक्ष देत नाही याचा राग येत होता.
             सौ.लोढा यांच्या पतिना आपली पत्नी हरवली असे वाटत होते.पत्नीला ते नर्स समजत होते आणि होस्पिटलभर पत्नीला शोधत होते आणि बरोबर मी आहे या सांगण्याच्या प्रयत्नात सौ लोढा. शेवटी मुलांनी फोन करून मम्मी घरी आली आहे अस सांगितलं.आणि यातून मार्ग काढला.
      जागतिक २०१५च्या पार्किन्सन्सदिनाच्या स्मरणिकेत वसू देसाई यांनी त्यांच्या पतीचे अनुभव दिले त्यात भासाविषयीही लिहिले आहे त्याना वेगवेगळे भास होत त्यातील एक उदाहरण त्यांनी दिले आहे.ते त्यांच्याच शब्दात देत आहे."आमच्याकडे घरी तेंव्हा रंगकाम चालू होते आणि हे सांगत आले की आपल्याकडे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले आहेत.व आपल्याला त्यांच्या बरोबर त्यांच्या भावाच्या अंत्ययात्रेला जायचे आहे.ते आपल्याला घेऊन जाण्यासाठी आले आहेत.तु मला पैसे,मोबाइल सगळ दे.अर्धा दिवस ही एकच गोष्ट त्यांच्या डोक्यात होती.दुसर काहीही बोलण्याच्या आणि ऐकून घेण्याच्या ते मनस्थितीत नव्हतेच.अशी कितीतरी उदाहरणे घडली ...सासूबाई वय वर्षे ८५.ब्लडकॅन्सर पेशंट.त्याना यांच्या ह्या वागण्या बोलण्याचे खूप दु:ख होत असे."यानंतर त्यांनी नेहमीच्या डॉक्टरना  दाखवले फरक पडला नाही तेंव्हा न्युरॉलॉजीस्टना दाखवले."न्युरॉलॉजीस्टच्या औषधांनी त्याना चांगलेच बरे वाटू लागले." अस त्या पुढे लिहितात.
             या सगळ्या उदाहरणातून भासाच्या समस्येनी घाबरून न जाता ताबडतोब न्युरॉलॉजीस्टकडे जाणे हे महत्वाचे.मानसोपचार तज्ञाकडे जायची गरज असल्यास न्युरॉलॉजीस्ट तसे सांगतात किंबहुना दोघे चर्चेतून निर्णय घेतात.मानसोपचाराची काही औषधे पार्किन्सन्स वाढवतात.त्यामुळे तारतम्यानेच निर्णय घावे लागतात.
            वरील सर्व उदाहरणात उपचाराने भासाची समस्या कमी झाली.