Friday, 20 February 2015

छंद माझा - विजय राजपाठक

                           शुभार्थी विजय राजपाठक यांची पेंटींग्ज आपल्यासमोर आणताना एकीकडे मनापासून आनंद होत आहे आणि दुसरीकडे अतीव दु:खही. आनंद यासाठी की,पार्किन्सन्सच्या थरथरणार्‍या हाताना आणि ताठरलेल्या स्नायूंना न जुमानता त्यांनी जोपासलेला छंद आपल्यापर्यंत वेबसाईटमार्फत पोचवता येत आहे.आणि यामुळे शुभार्थींपर्यंतच नव्हे तर सुदृढ व्यक्तीपर्यंतही एक सकारात्मक उर्जा निश्चित पोचेल याचा विश्वास वाटत आहे.दु:ख यासाठी की आज ते आपल्यात नाहीत.५ डिसेंबर २०१३ला त्यांचे निधन झाले.
त्यानंतर झालेल्या पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्याला त्यांच्या पत्नी माधवी या आल्या होत्या.त्या सभेत मित्रमंडळाची वेबसाईट तयार झाल्याची घोषणा करण्यात आली.वेबसाईटवर शुभार्थींच्या विविध कला सादर करता येतील असे सांगितले होते.माधवी राजपाठक यानी लगेच श्री. राजपाठक यांनी तयार केलेले सुंदर पेंटिंग मित्र मंडळाला देऊ केले.राजपाठ्कांची अशी बरीच पेंटींग्ज आहेत ती पहायला यावी अस आग्रहाच निमंत्रणही दिल.आज वेबसाईटदारे ती पेंटींग्ज आणि  राजपाठकांचा छंद आणि त्यामागचे कष्ट, सर्वांपर्यंत पोचविता येत आहेत.
                           विजय राजपाठक हे शेतकी खात्यात ट्रेसर म्हणून काम करत होते.मित्रमंडळात दाखल झाले तेंव्हा निवृत्त झालेले होते.नोकरीत असतानाच पर्किन्सन्स झाला.डिपार्टमेंटच्या परीक्षा देत वरची पोस्ट मिळाली होती.जबाबदार्‍या वाढल्या. सह्या खूप करायला लागायच्या.या सर्वाचा त्रास वाटायला लागला.यातच स्कूटरवरून जाताना एका सायकलवाल्याला वाचवताना अपघात झाला.पायावरून टेम्पोचे चाक गेले.सहा आठवडे पडून राहावे लागले .या काळात मन रमवायला चित्रकला मदतीला आली. यातून उठल्यावर स्कुटर चालवणे बंद झाले.पायात थोडा दोष निर्माण झाला.आणि चार वर्षे आधीच निवृत्ती घेतली.
                         अध्यात्मिक वृत्ती शांत,सरळ स्वभाव आणि माणसांची आवड यामुळे.जे दान मिळाल त्याबद्दल कुरकुर नव्हती.आनंदी राहण्यासाठी पर्याय शोधण होत.एकीकडे पार्किन्सनस मित्रमंडळात दाखल झाले. आणि दुसरीकडे पेंटिंग्जची आवड जोपासणारा  संस्कारभारतीचा ग्रुप मिळाला.या ग्रुपबरोबर दर रविवारी सकाळी नाश्ता करून पाताळेश्वर, पुणे युनिव्हर्सिटी,विठ्ठलवाडी असा कुठेतरी दौरा असायचा.२/३ तास पेंटिंग करणे चालायचे.मग जेवायला परत घरी. यासाठी त्याना कोणाची मदत लागत नसे. बस,रीक्षा असे मिळेल त्या वाहनाने एकटेच जात.घरातही स्वत:ची कामे स्वत:च करत.न्युरॉलॉजिस्टनाही ते सलग २/३ तास रंगकाम करतात याचे आश्चर्य वाटायचे.या छंदाचा पैसा मिळवण्यासाठी ते उपयोग करु शकले असते.पण त्यांनी ते केले नाही.लग्न, मुंज,वाढदिवस साठी अशा कोणत्याही समारंभासाठी जायचे तर भेट म्हणून स्वत:च्या हातांनी पेंटींग करून देण्यात त्याना आनंद वाटे.अशा अनेक नातेवायिक, मित्रमंडळींच्या घराच्या भिंती राजपाठ्कांच्या चित्रांनी सजल्या आहेत.हा छंद तसा खर्चिकच.स्वत: जाऊन रंगकामाला लागणारे उत्तमातले उत्तमसाहित्य  ते खरेदी करत. पत्नीची याला साथ होती.कधी कधी मात्र घर छोटे त्यात रंगाचा पसारा वाटे.मग थोडी कुरकुर त्या करायाच्या. मग याचं उत्तर ठरलेलं. दुसर कुठल व्यसन नाही ना मी करत? मग हे माझा व्यसन समज.बाल गंधर्व मध्ये प्रदर्शनातही त्यांची पेंटींग मांडली गेली होती.यासाठी होणारा खर्चही हौस सदरात मोडणारा.हृषीकेश पवार यांच्या नृत्योपचार वर्गालाही ते जात.              

                                         नियतीने मात्र त्यांची सत्व परीक्षाच घ्यायचं ठरवलं होत.आधी युरीन इन्फेक्शन,नंतर नागीण असे आजार त्याना एकामागोमाग होत राहिले.प्रतिकार शक्ती, ताकद कमी होऊ लागली.तोल जाऊन पडल्याने डोक्याला मार लागला मेंदूवर शस्त्रक्रिया करावी लागली. अनेक आजाराने क्षिण झालेल्या शरीराला हे सर्व झेपले नाही.आपल्या छंदाची  अनमोल संपत्ती मागे ठेऊन ते अनंतात विलीन झाले.
                          त्यांच्या  पेंटिंग्जचे फोटो विनया चित्रे यांनी काढले.तिच्या काकाना पार्किन्सनस होता.त्यामुळे हालचालीवर किती बंधने येतात याचा तिला अनुभव होता.  नैराश्यात गेलेले तिचे काका तिने पहिले होते.' पार्किन्सन्स झालेली व्यक्ती इतकी सुंदर कलाकृती निर्माण करू शकते हे पाहून मी आवक झाले' अशी प्रतिक्रिया तिने नोंदवली.विनयाने काढलेले फोटो मेलनी पाठवण्याचे काम विनायकनी केले. त्यांच्यासाठी हे काम छोटे असले तरी आमच्यासाठी मोलाचे आहे.विनया, विनायक यासाठी कृतज्ञ आहोत.
माधवी  ताईंच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मदतीमुळेही हे शक्य झाले.