Friday, 19 December 2014

पार्किन्सन्सशी मैत्री.- आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाची संहिता

              १४ एप्रिल २०१३ रोजी   आकाशवाणीवर स्नेहबंधमध्ये  झालेल्या कार्यक्रमाची संहिता

           अजितराव आणि मंजिरीताई पतीपत्नी.अजीतरावानी एक वर्षापूर्वी व्ही.आर.एस.घेतली आहे.एकुलती एक विवाहित कन्या प्रिया, अमेरिकेत.अजितराव पार्किन्सन्सचे रुग्ण आहेत.डिप्रेशनमधून सुरुवात झाली.सर्वप्रथम निवृत्तीमुळे डिप्रेशन आले असे वाटले.आता तर हालचालीदेखील मंदावल्या आहेत.हाताला कंप आहे.चला डोकाऊन पाहू त्यांच्या घरात! मुलीचा अमेरिकेहून फोन आलेला दिसतोय.
प्रिया - हॅलो मम्मा,दोन वाजलेत रात्रीचे.१२ वाजल्यापासून तुमच्या Birthday wishes ची वाट पाहतेय. बाबांचा            १२ वाजून १ मिनिटांनी पहिला फोन असतो कुठ आहेत बाबा?
        (बाबा घरातच आहेत पण फोनवर येत नाहीत.)
          मम्मा - (चेहर्‍यावर खोट बोलत असल्याचा भाव) अग,बाबा ज्येष्ठनागरिक संघाच्या ट्रीपला
          गेलेत.बर,तुला  वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा! इथ लाईट गेलेत.मोबाईल पण चार्ज केलेला
         नाही.केंव्हाही बंद होईल तू आता झोप.उशीर झालाय उद्या बोलू  हं!
                                            दुसरा दिवस
प्रिया -  हॅलो मम्मा,आले ना ट्रीपहून बाबा? देना  त्याना फोन महिना झाला असेल त्यांच्याशी  बोलून.   तेंव्हा             देखील बोलण निट ऐकू आल नव्हत.तू म्हणालीस की त्यांचा घसा बसलाय.
मम्मा - (स्वर रडवेला ) प्रिया बेटा,कस सांगू तुला? काल आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्याशी खोट बोलले.बाबा
            घरीच होते ग! त्यांनी बोललेल लोकाना समजत नाही म्हणून ते फोनवरच येत नाहीत.त्याना
            पार्किन्सन्स झाल्यापासून  तेंव्हापासून ते पार बदलूनच  गेलेत.डाव्या हाताबरोबर उजव्या हाताचाही कंप
             वाढलाय.रिक्षावाल्याच्या इन्सीडन्सपासून बाहेर जाणही बंद केलय. 
प्रिया - कुठला .रिक्षावाल्याचा इन्सीडन्स ? मला बोलली नाहीस!
मम्मा - परवा ते रिक्षाने घरी आले.रिक्षावाल्याशी मिटरवरून काहीतरी हुज्जत घालत बसले होते.मी
              पहायला गेले तर रिक्षावाला तावातावाने म्हणत होता "अहो, लटपटत होते.सुखरूप सोडलं ते
              कुठंच गेल.झेपत नाही तर प्यावं कशाला एवढ? एकट्याला सोडू नका आज्जी त्याना." आता
              बाहेरच्या लोकांच तोंड कोण धरणार?दारू पिणार्‍यांबद्दल केवढा तिटकारा त्याना! आणि त्यांच्यावरच               गैरसमजुतीने का होईना हा शिक्का बसला ना! डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या पण घेत नाही कुणीतरी                  त्याना  सांगितलं की या गोळ्यांचे साईड  इफेक्टस् आजारापेक्षा भयंकर असतात.झाल, तेच डोक्यात
              घेऊन बसलेत. तुझ्या मनात नको नको त्या शंका येतात म्हणून जे आहे ते तुझ्या कानावर घालतेय.
               हं, तुला आणखीन एक सांगायचं राहील.इथ 'पार्किन्सन्स मित्रमंडळ' नावाचा सपोर्ट ग्रुप आहे  तिथ   
               डॉक्टरांनी जायचा सल्ला दिलाय.पण तिथेही जायला हे तयार नाहीत.त्या मंडळीना फोनवर मी                       सांगितलं होत ग हे! तर तेच लोक आत्ता येणार आहेत. बेल वाजली, आलेच बहुतेक ते! उद्या फोन
              करीन काळजी करू नकोस.तुझी मम्मा आहे खंबीर
       ( प्रिया जोरजोराने येरझारा घालतेय.स्वत:शीच बोलतेय.मम्मा ,बाबा आत्ताच्या आत्ता तेथे उडत यावस
             वाटतंय ग!)
                थोड्या वेळात पुन्हा फोन. ( आवाजात एक्साईटमेंट )
   मम्मा -  हॅलो  प्रिया ! झोपली नाहीस न?खूप रात्र झालीय तिथ.माझ्या  लक्षात
                 आहे , पण राहवलं नाही ग म्हणून फोन करतेय.( आवाज थोडा कातर )
    प्रिया - झोपले नाही ग! कॉम्पवर काम करत होते.बोल तू.
    मम्मा - खोट.मला नक्की माहित आहे तू येरझारा घालत असशील.हं, तर मिस्टर आणि मिसेस जोशी                         आत्ताच येऊन गेले.दोन तास कसे गेले समजलेच नाही.घरातलं वातावरण एकदम बदलून गेलय
                बघ.मिस्टर जोशीना गेली दहा वर्षे पार्किन्सन्सचा त्रास आहे.सुरुवातीपासूनच ते अ‍ॅलोपाथीची
                औषधे घेतात त्यांच्याकडे पाहून औषधांच्या साईडइफेक्ट्सची भीतीच गेली.तुला गंमत सांगते, मी
                 न सांगताच बाबा स्वत:हून गोळ्या कुठ ठेवल्यात विचारात होते.
                 मला वाटल होत की ते लोक आल्यावर उपदेश करतील पण ते फक्त एवढच म्हणाले,'सुरुवातीला
                 माझीही अशीच अवस्था होती.आता मी पार्किन्सन्सला आपला मित्र बनवलाय.' त्यानंतर क्रिकेट
                 जुने हिंदी सिनेमे,जुने पुणे अशा कितीतरी गप्पा झाल्या.गुरुवारी हॉटेल अश्विनी येथे सभा आहे.
                 बाबांनी येण्याचे कबुल केले आहे. एक मासिक त्यांनी दिले आहे.त्यात
                तज्ज्ञ डॉक्टरांचे लेख,पेशंटचे अनुभव आहेत.त्यात बसलेत डोक खुपसून.एकीकडे रेडीओ चालू आहे.
                कितीतरी दिवसांनी लावलाय बघ आज.प्रिया तुला माहित आहे त्यांच्या या दोन गोष्टींची मला किती
                चीड होती.पण आज मात्र याच गोष्टीं मुळे मी खुश आहे.हे माणसात आलेत ग!दोन तासांमध्ये किती
                चमत्कार झालाय.( भावनावश होतात.) बर,स्वस्थ झोप आता.किती बोलतेय मी नाही? गुड नाईट.
  प्रिया - मम्मा,तू मिटींगला जाऊन आलीस की फोन कर.आणि हो तू बोल ग भरपूर! छान वाटतंय,फोन ठेवूच
             नये अस वाटतय.मी सुद्धा तुझ्या नॉनस्टॉप बोलण्यावर चिडायची पण आत्ता मात्र ती बडबड छान
             वाटतेय ग!आणि हो,इथे सुद्धा सपोर्ट ग्रुप आहे.पण तुम्ही इकडे यायलाच तयार नाही ना! बरय
             मम्मा,गुड डे! बाय!
             ( गुरुवारची मिटिंग आटपून मंजीरीताई परत आलेत.तातडीने प्रियाला फोन करत आहेत.)
मम्मा -  हॅलो  प्रिया, माझ्या फोनमुळे लवकर उठाव लागल का? पण मिटींगला जाऊन आल्यापासून कधी
             एकदा तुझ्याशी बोलेन अस झालय.मिटींगला खूप लोक आले होते.काहीजण तर एकटेच आले
            होते.३०/३५ व्या वर्षीच पार्किन्सन्स झालेले दोघे होते.खुर्च्या मांडण्यापासून सर्व कामे हे रुग्णच करत होते.इथ रुग्णांना शुभार्थी    म्हणतात.जीवनाचा शुभ अर्थ शोधायला निघालेला म्हणून शुभार्थी. मला तर खूपच आवडला हा
            शब्द.इथे वर्गणी वगैरे काही नाही.दानपेटी ठेवली होती त्यात ऐच्छिक वर्गणी टाकायची.
             अग, आणखी एक गोष्ट  सांगायची  म्हणजे न्युरॉलॉजिस्ट्चे व्याख्यान ठेवले होते.ते ऐकून
             पार्किन्सन्सबद्दलचे बरेच गैरसमज दूर झाले.बाबांच्या व्ही.आर.एस. नंतर मी त्याना सारखी
            ओरडायची.तुम्ही मंद झालात, आळशी झालात,नुसते मख्खासारखे बसून असता.  पार्किन्सन्समुळेच
            होत सगळ.व्याख्यानामुळे  समजल बघ.मलाच आता वाईट वाटत माझ्या बोलण्याच.
             पार्किन्सन्समुळे स्नायू ताठर होतात त्यामुळे व्यायाम अत्यावश्यक. use or loose हे  डॉक्टरांनी
            सांगितलेल ठसलय यांच्या मनावर.आता आम्ही दोघ पुन्हा योगासानाला जायला सुरुवात करणार
           आहोत. तू आमची अजिबात काळजी करू नको.We are on right track.चल बाई, माझ बोलण काय
           संपायच नाही.स्वयंपाक व्हायचा आहे.तू कशी आहेस? बर्फ पडत असेल ना आता?
                                                     तीनचार महिन्याचा काळ लोटलाय.
 प्रिया - हॅलो मम्मा,अविनाशबरोबर पाठवलेले सामान मिळाले.तू पाठवलेल्या पुरणपोळ्या खाऊन मी
           आणि हेमंत तृप्त झालो.सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाबांचं जाडजूड पत्र! तुमच मित्रमंडळ चांगलच
           चाललेलं दिसतंय.तू वाचलस का ग पत्र?
मम्मा - नाही बाई! म्हणजे ह्यांनी वाचायला दिल नाही म्हणून नाही अस नाही.अविनाश आला तेंव्हा मी तुला
            द्यायचं सामान  पॅक करत होते.त्यामुळे वेळ झाला नाही बघ वाचायला.काय म्हणताहेत? अक्षर खराब
            झालय म्हणून लिहायचं सोडून दिल होत.स्वत:च्या मोत्यासारख्या अक्षराचा त्याना किती अभिमान
            होता! तू आणि मी अक्षरासाठी कितीतरी  बोलणी खाल्लीत नाही का? मित्रमंडळातील एका शुभार्थीने
             स्वत:च्या सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या लिखाणाची झेरॉक्स कॉपी सर्वाना दिली.ती पाहून याना पुन्हा
            लिहिण्याची स्फुर्ती झाली. वाचनात आलेले चांगले विचार लिहून ठेवायची त्यांची सवय सुटली होती.ती
            पुन्हा सुरु झाली बघ.
प्रिया - अक्षर थोड बारीक झालय इतकच.बाकी काही फरक नाही! किती निगेटिव्ह झाले होते बाबा.ह्या
           पत्रातून पूर्वीचे जॉली बाबा मला खूप दिवसांनी भेटले ग! मला सारख गिल्टी वाटत होत.ज्यावेळी
            तुम्हाला माझी गरज आहे तेंव्हा मी तिथे नाही बाबांच पत्र वाचून लक्षात आल की तुम्हाला खरच छान
           मित्र परिवार मिळालाय.किती मोकळेपणानी लिहिलंय ग बाबानी पत्र! मला थोड आश्चर्याच वाटलं याच.
           आणि तू सांगितलं नाहीस तरी पण त्यांनी लिहिलंय की मित्रमंडळात स्वत:ची ओळख करून देताना
           त्याना म्हणे रडायला आल.
मम्मा - हो ग! हल्ली छोट्याछोट्या गोष्टीतही ते भावनावश होतात.I hate tears हा राजेश खन्नाचा डॉयलॉग
            किती ऐटीत फेकायचे माझ्यावर.मला रडुबाई म्हणून चिडवायचे. जेवढ न आवडणार तेवढ सगळ
            आलय बघ त्यांच्या वाट्याला.अगदी लहान मूल होऊन गेलेत.पोटात तुटत ग माझ्या.पण मी खचून
           नाही चालणार.बोलणे अस्पष्ट झालय. तुझ्याशी बोलताना रडायला येईल म्हणून ते बोलण
           टाळतात.
प्रिया - हो,बाबांनी लिहिलंय ते.बाबांचा आवाज ऐकायला असुसलेय ग मी.ए मम्मा, तुझा खंबीरपणा लक्षात
            आलाय बर का त्यांच्या.तुझ्या सपोर्टबद्दल कौतुक केलय त्यांनी.
मम्मा - हो! त्यांच्या चेहर्‍यावर दिसत ना ते! डान्स क्लास चालू झाल्यापासून  चेहर्‍यावरचा मख्खपणा गेलाय
            त्यांच्या.
प्रिया -( चकित होऊन ) डान्स क्लास? तू नाही सांगितलस.
मम्मा - शी बाई! मूर्खच आहे मी.तुला सरप्राईज द्यायचं होत बघ! पार्किन्सन्सवर उपचार म्हणून डान्स थेरपी
            चालू आहे.९/१० महिने झाले.हृषीकेशनी आमची डान्सची डॉक्युमेंटरी केलीय.आमचा डान्स टीचर ग! टीचर कसला मुलगाच वाटतो बघ आम्हाला आमचा.तुला आम्ही तीच डॉक्युमेंटरी पाठवणार होतो.पण ते सरप्राईज मी फोडून बसले ना!
            बर आता थांबते डान्स क्लासला जायचं आहे.आठवड्यातून तीन दिवस असतो.
                                        काही दिवसांनी
प्रिया -( वैतागलेल्या सुरात ) मम्मा, काय ग कुणाला फोन करत असतेस ? कधीपासून फोन करतेय सारखा
           एंगेज लागतोय.
मम्मा - अग,मित्रमंडळाच्या सभेचे फोन.मदत घ्या ,मदत करा अस ब्रीदवाक्य आहे मंडळाच.त्यांची इतकी
            मदत घेतली आता त्याना करायला नको का? तुला एक गंमत सांगू का? आमच्याकडे ते मिस्टर अँड
            मिसेस जोशी आले होते ना? तसेच आम्ही पण जातोय शुभार्थींकडे.किती आनंद असतो ग असा आनंद
           वाटण्यात! हं तू काय म्हणत होतीस?
प्रिया - अग ! फेसबुकवर तुझी आणि बाबांची फ्रेंडशिप रिक्वेस्ट ?चाटच पडले मी.मी किती मागे लागले होते
           तुला शिकवायला.बर फोटो कोणी लोड करून दिले.
मम्मा - कुणी म्हणजे? मीच! पार्किन्सन्स बरोबर संगणकही आमचा मित्र झाला आहे..एकमेकाना निरोप
            देण,लेख देण,नवीन माहितीची देवाण घेवाण अशी मित्रमंडळाची कितीतरी काम होतात संगणकावर.
            आता वेबसाईट आणि फेसबुकवर कम्युनिटी पेजही करणार आहे.*
प्रिया - ग्रेट! एकदम जोरदार घोडदौड चालू आहे की! मम्मा मी तिथ असते ना तर उचलून गरगर फिरवले 
          असत बघ तुला आणि कल्पनेत फिरवलही आणि तुझ घाबरून पुरे बाई, पुरे ग! हेही ऐकल.हो आणि 
           कुठल्या ट्रिपचे फोटो आहेत? किती खुश दिसतात आमचे बाबा? एकाच फोटोत दिसतात ते, तू मात्र  
           बर्‍याच फोटोत आहेस.गजरा बिजरा माळलाय,आपल्या बागेतील फुलांचा का? वावss
मम्मा - आग हो हो! एकदम किती प्रश्न विचारशील? पार्किन्सन्स मित्रमंडळाची ट्रीप होती.साठ जण 
             होते.अंताक्षरी,खेळ गाणी,गप्पा खूप धमाल केली.बाबांचा एकाच फोटो आहे कारण ते स्वत:च  फोटो 
             काढत होते.
प्रिया - काय सांगतेस काय?
मम्मा - हो ना! तू दिलेला डिजिटल  कॅमेरा पडूनच होता. तो कपाटातून बाहेर काढला.पार्किन्सन्स डे ला 
            शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन आहे.त्यासाठी बाबा कुठे कुठे जाऊन फोटो काढत होते.ते सर्व फोटो
             फेसबुकवर टाकीनच नंतर.आणि हो,बाबांचा जो फोटो आहे ना,तो बक्षिस घेतानाचा आहे.ओरिगामी
             स्पर्धा होती त्यात त्यांच्या बेडकाला फर्स्ट प्राईज मिळाले.आणि तो फोटो मी काढलाय.
प्रिया - (आनंदाने भरून आलेल्या आवाजात ) मम्मा,तुमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाकडे जादुची कांडी आहे 
            का ग?तुमच्यातला हा बदल अनाबिलीव्हेबल आहे बघ.आणि हो,तुमच्या पार्किन्सन्स डे साठी तुझ्या 
           अकाऊन्टला पन्नास डॉलर भरत आहे.
मम्मा - आम्ही असेच नव्हतो का ग आधी? थोडस भीतीच,अज्ञानाच,नैराश्याच मळभ आल होत.वर्षभराच्या 
            मित्रमंडळाच्या सहवासात ते दूर झालय.आणि लख्ख प्रकाश पडलाय.आता दोन दिवसांनी तुझा 
            वाढदिवस आहे ना? एक सरप्राईज  आहे.फोन ठेवते आता.नाहीतर तू काय ग,सांग ना मला. म्हणत 
            बसशील आणि माझ्याकडून ते फुटून जाईल. माझ्या पोटात काही राहत नाही.बघ!
                            ( दोन दिवसांनी प्रिया कडे रात्रीचे बारा वाजलेत.फोन वाजतो.)
प्रिया - हॅलो मम्मा,बोल ना!
मम्मा - तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आणि आता हे सरप्राईज
बाबा - बेटा Happy Birthday to you ---
प्रिया - अय्या बाबा तुम्ही ? किती स्पष्ट बोलाताय हो! अगदी माझ्याजवळ आहात अस वाटत.माझ्या 
          आयुष्यातली ही सर्वात छान भेट.आणि छान सरप्राईज! Thank you पार्किन्सन्स मित्रमंडळ Thank you 
          very much!
बाबा -  बेटा,अजून एक वेगळच सरप्राईज आहे.जून मध्ये आम्ही दोघे येतोय तुझ्याकडे.
प्रिया -अय्या खरच का?मी वाट बघेन बरका? बाय गुड डे
* हा कार्यक्रम झाल्यावर वर्षभराच्या आतच श्री. अतुल ठाकूर यांच्या प्रयत्नाने मंडळाची  www.parkinsonsmitra.org ही वेबसाईट झाली.विशेष म्हणजे हे काम ते विनामुल्य करत आहेत.
फेसबुकवर parkinson's mitrmandal ही कम्युनिटीही झाली आहे.शुभंकर हे App ही तयार झाले आहे.

            
          
           
          

Sunday, 14 December 2014

खानापूर सहल

 सहल वृत्तांत

                            गुरुवार दि.११ डिसेंबरला पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल खडकवासला धरणाजवळ डोणजे पानशेत मार्गावरील खानापूर येथील 'सन वर्ल्ड फॉर सिनियर्स' येथे गेली होती.२२ शुभंकर आणि २२ शुभार्थी सहभागी झाले होते.सहा शुभार्थी कोणतीही सोबत न घेता एकटे आले होते.सहा शुभंकर घरात पीडी पेशंट नसताना सहकार्यासाठी सुहृद म्हणून आले होते.
                           दोन वाजता  अश्विनी हॉटेलपासून सहल निघणार होती.दुपारी दिडपासूनच मंडळी जमायला सुरुवात झाली.सर्वांच्या नावाचे बॅच तयार करण्याचे आणि ते सर्वाना देण्याचे काम दीपा होनप करत होत्या अंजली महाजन हजेरी घेत होत्या.शोभना तीर्थळी अजून न आलेले कुठवर पोचलेत हे पहात होत्या.करमरकरांची नेहमीप्रमाणे विविध आघाड्यांवर लगबग चालली होती.सर्व गडबडीत मोबाईल  घरीच विसरले होते.त्यांची मुलगी तो द्यायला आली तर आम्ही बसमधून तिलाच हायजॅक केले.आशा रेवणकर आपले कॉलेजमधील व्याख्यान संपऊन,तर शैलजा कुलकर्णी ऑफिसमधून हाप डे घेऊन थेट आल्या होत्या.सर्व मंडळी आणि बसही वेळेत आली.जसजशी येतील तशी मंडळी बसमध्ये बसत होती.नेहमी बसमध्ये पुढे बसण्यावरून होणारी भांडणे आमच्याकडे कधीच नसतात.बस वेळेत निघाली.ओरिगामीसाठी श्री शरच्चंद्र पटवर्धन यांनी कागद आणले होते ते सर्वाना देण्यात आले.गाणी ,कोडी अशा गमती करत ३५ किलोमीटर कधी पार केले समजलेच नाही.
 निसर्गाच्या कुशीत वसलेली,सन वर्ल्डची बैठी सुबक देखणी वास्तू स्वागतासाठी तयार होती.गेल्या गेल्या थंड पेयांनी स्वागत झाले.मंडळी स्थानापान्न झाली.डिसेंबर महिन्यातील वाढदिवस असणार्‍या वसुधा बर्वे,शरद सराफ आणि श्री. घुमटकर यांचा हास्याचे फुगे फोडून,हास्याचाच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.अंजलीने त्यांच्यासाठी भेटकार्डे करून आणली होती.सर्वाना सहभागी होता येतील असे विविध बैठे खेळ घेण्यात आले.लगेचच नंबर जाहीर करून बक्षिसे देण्यात आली.
इडली,डोसा,वडा,कॉफी खेळात
 प्रथम क्रमांक  -  शैलजा कुलकर्णी
  द्वितीय क्रमांक -  विजया दिवाणे
 चॉइस बाय मेजॉरीटी हा खेळ शुभार्थी मृत्युंजय हिरेमठ यांनी तयार करून आणला होता.यात
  प्रथम क्रमांक  - अविनाश पानसे
द्वितीय क्रमांक - स्मिता सिधये
ओरिगामी मध्ये
शैला कुलकर्णी - चौफुला
निशिकांत जोशी- विमान
विनया मोडक - शिडाची होडी.
चंद्रकांत दिवाणे - राजहंस
विजय शाळीग्राम - चांदणी
अशा सहा जणांच्या कृती निवडण्यात आल्या.
                     यानंतर' तू बुद्धी दे तू तेज दे ' या शोभना तीर्थळी आणि विनया मोडक यांनी म्हटलेल्या प्रार्थनेने करमणुकीच्या कार्यक्रमाना सुरुवात झाली.केशव महाजन यांनी 'पाकीजा' चित्रपटातील राजकुमारचा आणि 'सौदागर' चित्रपटातील  दिलीपकुमार आणि राजकुमारचे संवाद,'चलरी सजणी' हे गाणे म्हणून टाळ्या मिळवल्या. वसुधा बर्वे यांनी 'खेळ मांडीयेला वाळवंटी घाई'  हा अभंग म्हटला त्या नुकत्याच .संगीताची दुसरी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या म्हणून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.नेहमी वैचारिक आणि माहितीपूर्ण लिहिणार्‍या शेखर बर्वे यांनी स्वरचित कविता म्हणून सर्वाना चकित केले.वसू देसाई यांनी 'प्रत्येक घराला एक दार असत' ही आईच  महात्म्य वर्णन करणारी कविता सादर केली.पद्मजा ताम्हणकर यांनी चारोळ्या म्हटल्या.श्री ताम्हणकरांनी यशवंत देव यानी लिहिलेले विडंबन काव्य म्हटले,मोरेश्वर मोडक यांनीही 'सांग सांग भोलानाथ बायको सुधारेल काय?' आणि पुण्याच्या बारगळलेल्या मेट्रोवरील स्वरचित विडंबन गीते  सादर केली.सौ सराफ यांनी' ईश्वर तुम्हारे साथ हो तो डरनेकी क्या बात है' हे गीत म्हणत आशावाद निर्माण केला.अंजली महाजन यांनी' रुसेन मी भांडेन मी तरी पुन्हा जेवेन मी' हे स्वरचित गीत सादर करत वातावरण थोडे हलके केले.
                     कार्यक्रमाबरोबर बटाटेवडे, ओल्या नारळाच्या करंज्या,चहा असा  अल्पोपाहाराचाही सर्वांनी आस्वाद घेतला.व्यवस्थेमध्ये कुठे कमतरता नाही ना हे पाहण्यासाठी सन वर्ल्डच्या संचालिका रोहिणी पटवर्धन स्वत: जातीने आल्या व उपस्थितांशी संवाद साधला.उगवता सूर्य, कोवळ्या उनातील डोंगर,रात्रीचे पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब अशी निसर्गाची विविध रूपे पाहण्यासाठी मुक्कामाला येण्याचे आमंत्रण दिले.अनेकांनी तशी तयारीही दाखवली.
                     परिसरातला निसर्ग आता सर्वाना खुणावत होता.सातआठ पायर्‍या वर चढून गेल्यावर शंकर हनुमान आणि साईबाबाचे देऊळ आहे.एकदोन शुभार्थी वगळता सर्वजण वर गेले.वरून खडकवासला धरणाच्या  बॅकवॉटरचे विहंगम दृश्य दिसते.संध्याकाळ झाली होती. संथ पाण्यात डोंगरांचे प्रतिबिब दिसत होते.सूर्यदेव  अस्ताला चालले  होते.कोणाचेही पाय हलत नव्हते.पण बुडणारा सूर्याचा लाल गोळा सांगत होता मी चाललो.अंधार होईल तुम्हीही जा सुखरूप. पुन्हा येण्यासाठी.
                     बस आता परतीच्या मार्गाला लागली.सात वाजता अश्विनी हॉटेलपाशी पोचली.सहलीचा थोडा थकवा असला तरी मन ताजीतवानी झाली होती.पुढील काही दिवसांसाठी उर्जा मिळाली.