Whats app hacker चे थरार नाट्य
दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी झोपेतून उठले.नेहमीप्रमाणे फोन उघडला.सुनील कर्वे यांचा २.३९ वाजता मेसेज होता
Hi,I am sorry I sent you a my 6 digit code by SMS by mistake can you pass it to me please? it is urgent
हा मेसेज मी जसाचा तसा लिहिला आहे.मेसेज पाहिला तेंव्हा घड्याळात तीन तेरा झाले होते.यापुढे माझेही तीन तेरा वाजायचे होते.मी कर्वेना व्हाइस कॉल केला.तो उचलला जात नव्हता.त्या ऐवजी फोन केला असता तर पुढचे नाट्य घडले नसते.कारण गौरी इनामदारलाही असा मेसेज आल्यावर फोन कॉल केला आणी ती वाचली.तिने लगेच ग्रुपवर टाकले.त्यामुळे अशा,मृदुला,अमिता असे अनेकजण वाचले
मेसेज मी उशिरा पाहिला होता.त्यांच्या अर्जंट शब्दांनी मी ताबडतोब मेसेज पाहून कोड पाठवला.त्यांचे Thanks असे उत्तरही आले.त्यावर काही लिहिणार तोच माझे whatsapp बंद झाले होते.ते सुरु करायला मी पाहत होते तर OTP येत नव्हता.नंतर उत्तर आले तुम्ही अनेकवेळा try केल्याने आता १२ तासांनी मेसेज करा.तोपर्यंत मला काहीच लक्षात आले नव्हते. त्यानंतर मला धडाधड विविध ठिकाणाहून अनेकांचे फोन येण्यास सुरुवात झाली.माझ्या एका विद्यार्थिनीने तर मॅडम काळजी करू नका मी आहे असा फोन आला.I need your help असे मेसेज अनेकांना गेले होते.Whatsapp हॅक झाले आहे हे लक्षात आले.मी मी घाईघाईने येणार्या प्रत्येक फोनला सांगितले फोन हॅक झाला आहे.मी इंग्लिश मध्ये कधीच मेसेज करत नाही.त्यामुळे अनेकाना शंका आली.
पुढील सर्व सांगण्या आधी इतरांनी सावधगिरी बाळगावी म्हणून hacker ने कसे hack केले सांगते.Whatsapp कोणत्यातरी एकाच device वर असू शकते.दुसर्या device वर घ्यायचे तर कोड लागतो.त्यांनी चलाखीने किंवा माझ्या बावळटपणाने सुनील कर्वे यांच्या नावाने माझ्याकडून कोड घेतला आणि माझे whatsapp स्वत:च्या ताब्यात घेतले.
मी सर्वात पहिल्यांदा आमचे शेजारी.डॉ.राजू शेठना फोन केला ते आमचे फॅमिली डॉक्टर आहेत तसेच कोणतीही मोबाईल,फोन विषयक तांत्रिक समस्या असो, घरातले छोटे मोट्ठे दुरुस्तीचे प्रोब्लेम असो ते लगेच धाऊन येतात. पण ते नेमके बाहेर होते. ते म्हणाले काकू घाबरू नका मी लीनाला म्हणजे त्याच्या वहिनीला फोन करून सांगतो.ती येईल लगेच.ती अलीही. तीही डॉक्टर असल्याने माझे पॅनिक होणे गोंधळून जाणे थोपवले सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली.सायबर गुन्हेगारी कडे तक्रार नोंदवली.
सारखे फोन येत होते त्याना उत्तरे देणे,माझ्या मुलीना फोन करून सांगणे अशा गोष्टी केल्या.मुलीनी अनेक ग्रुप,नातेवाईक,मित्रमंडळ याना सावध करण्याचे काम केले.मी किती ग्रुप केले आहेत आणि किती लोकाना संकटात टाकत आहे हे मला आज समजत होते.त्या सर्व ठिकाणी मी सूचना केल्या.माझ्या मागे काय नाट्य घडत आहे हे मला समजलेच नव्हते.रमेश तिळवे यांचा फोन आला वहिनी घाबरू नका.उद्यापर्यंत सर्व सुरळीत होईल मृदुलाचा रत्नागिरीहून फोन आला. खर तर ती लग्नाला तेथे गेली.तिला माझी आणि ग्रुपची चिंता.नेमकी या वेळेला मी तिथे नाही असे शंभरदा तिच्या मनात आले असेल.Hacker नी लोक सावध होत आहेत हे पाहून मंडळाचे मी admin असलेले सर्व ग्रुप ताब्यात घेतले आहेत आणि इतर admin ना काढून टाकून स्वत:च्या ताब्यात ग्रुप घेतले होते.ओन्ली फॉर Admin असे ग्रुपचे स्टेटस केले होते.गृप्वरच्या अनेकांना पैसे देण्याविषयी मेसेज गेले होते.मला तिच्याकडून हे समजले.इन्फो ग्रुप म्हणजे मंडळाचा आत्मा.सगळे काम,देवाण घेवाण ठप्प होत होती.ग्रुपशिवाय सर्वाना किती हरवल्यासारखे वाटत असेल हे माझ्या लक्षत येत होते.दुसरा ग्रुप तयार करता येईल का ही खटपट चालली होती.ते कठीण होते.ग्रुपवर शेकड्यांनी सभासद होते.
सर्वाना विविध मार्गाने सावध करण्याचे काम रमेशभाऊ,मृदुला,आशा,अतुल,दीपा असे अनेकजण करत होते.कारण आता .I need your help ला ज्यांनी उत्तर दिले त्याना पैसे मागणे सुरु झाले.माझ्या अकाऊंटवर काही प्रोब्लेम आहे मला सांगायला लाज वाटते.मी उद्यापर्यंत पैसे परत करीन.असे मेसेज येऊ लागले.किती विचारल्यावर २०,००० सांगितले गेले.पेटीएम.गुगल पे अशी वेगवेगळी अकौंट दिली गेली.
मृदुलाने तिचा मुलगा विराज,सून क्षितिजा आणि बहिणीचा मुलगा कौस्तुभ नलावडे अशी तज्ज्ञ टीम माझ्या मदतीला पाठवली.शोभनाताई डीहायड्रेट होतील त्याना सरबत घ्यायची आठवण कर अशा सूचना सुनेला दिल्या होत्या.
मृदुलाच्या सांगण्यावरून नेमके काय झाले आहे त्यांना समजत नव्हते. माझ्याकडे येऊन माझ्या मोबाईलवरचा मेसेज पाहताच काय झाले ते त्याना लगेच लक्षात आले.दुसरा ग्रुप करता येईल का चाचपणी झाली.ते अशक्य वाट्त होते.ते तिघे मला न समजणारी चर्चा बराच वेळ करीत होते.यात नवीन ग्रुप करण्याबद्दलची चर्चाही होती.दरम्यान त्यांनी माझे whatsapp ज्यावर आहे त्या डीव्हाईसचे डिटेल whatsapp ला कळवले आणि यावरून आम्ही मेसेज करू सांगितले.whats app वर दुपारी तीन वाजता बारा तासाची मुदत सांगितली होती.ती पहाटे साडे तीनला पूर्ण होत होती.hacker च्या आधी आम्ही तेथे पोचलो तर whatsaap आमच्या ताब्यात आणि ग्रुपचा प्रश्नच सुटणार होता.मी त्याना म्हटले माझा फोन घेऊन गेलात तरी चालेल.पण मला येणार्या फोनना उत्तरे देणेही तितकेच महत्वाचे होते.
मी त्याना म्हटले रात्री मला उठावे लागते मी तुम्ही सांगाल त्यानुसार करते.त्यांनी काय करायचे त्याच्या सूचना दिल्या.मला त्यांनी तीन पंचविसचा अलार्म लावून दिला.मी त्याप्रमाणे उठून करू पाहात होते तर आधीपेक्षा वेगळेच काही येत होते.ते सराइताना साधेच असेल पण मला समजेना.मी क्षितिजाला मध्यरात्री उठवले तिने सूचना दिल्या त्याप्रमाणे केले.आणि माझा whatsapp सुरु झाला.मी इन्फो ग्रुपवर तातडीने रमेश तिळवे आणि मृदुलाला admin केले.गप्पा ग्रुपवर अंजली भिडे आणि गौरीला admin केले.मला इतका आनंद झाला होता.नाचावे सर्वाना ओरडून ग्रुप चालू झाला असे सांगावेसे वाटत होते.रात्री कोणाला सांगणार?विराज क्षितिजा,कौस्तुभ यांनी किती मोट्ठे काम केले होते.त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.त्याना मात्र वाटत होते आम्ही फार काही केले नाही.पण आमच्यासारख्या अनभिज्ञ लोकांना ते मोठ्ठेच होते.नंतर मला इतकी शांत झोप लागली.सकाळी आठलाच जाग आली तीही मुलीने फोन केल्याने.
सर्व सुह्र्द,शुभंकर, शुभार्थी यांची सदिच्छा, आंतरिक इच्छा,एकीचे बळ यामुळे थरार नाट्य कोणतेही नुकसान न करता संपले होते.आमचे शुभार्थी किरण देशपांडे यांची यावर टिप्पणी,हॅकरनी अवघड पेपर सोडवायला घेतला आणि नापास झाला.
यातून घेतलेला धडा सायबर क्राईमवर अनेक दिवस घ्यायचे ठरत असलेले व्याख्यान लवकरात लवकर घ्यायला हवे.
इतरांसाठी धडा. कोणताही OTP कोड कोणाच्याही सांगण्यावरून पाठऊ नये.व्हिदिओ कॉल न करता फोनकॉल करून खात्री करून घ्यावी.
पैशासाठी कोणाचे अडचणीत आहे असे सांगणारा मेसेज आला तर फोन करून खत्री करून घ्यावी.
एखाद्यानी तसे केलेच तर दुषणे देत न बसता. त्या व्यक्तीला त्यातून बाहेर कसे काढायचे याच्या मागे लागावे.